मागील सत्संगात आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची तोंडओळख करून घेतली होती. त्यामध्ये स्वभाव म्हणजे काय ?, स्वभावदोषांचे दुष्परिणाम कोणते, तसेच खर्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होण्यामध्ये स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियाच कशी महत्त्वाची आहे, अशी काही सूत्रे पाहिली होती. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया नीट समजून ती राबवता येण्यासाठी प्राथमिक टप्प्यात आपल्याला आपल्या स्वभावाचे चिंतन होणे महत्त्वाचे असते. उदा. घेतलेली वस्तू जागेवर न ठेवणे, जेवतांना अन्नपदार्थांना नावे ठेवणे, आपल्याला अपेक्षित असे घडले नाही, तर चिडचिड करणे असे होते ना ? यापेक्षाही काही वेगळे प्रसंग असू शकतात, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात किंवा अन्य ठिकाणी ताणाची परिस्थिती निर्माण झाली, असे असू शकेल.
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व
आज आपण स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व काय आहे ?, हे जाणून घेणार आहोत. कोणत्याही साधनामार्गाने साधना केली, तरी स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलन झाल्याशिवाय साधनेत प्रगती होत नाही. साधनेत प्रगती होणे म्हणजे काय, तर आपला मोक्षाच्या दिशेने प्रवास होणे ! परिस्थिती कशीही असली, तरी आतून आनंद अनुभवता येणे ! ईश्वराचे अस्तित्त्व जाणवणे ! ईश्वर दोषरहित आणि गुणवान आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर दोषरहित होण्यासाठी म्हणजेच स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
स्वभावदोेषांमुळे होणारी हानी
स्वभावदोषांमुळे होणार्या चुकांमुळे आपली साधना खर्च होते. उदाहरणस्वरूप आपण रागाच्या भरात अपशब्द वापरले म्हणजेच शिवीगाळ केली, खोटे बोललो, तर आपला ३० माळा जप वाया जातो. इतरांना लागेल, असे बोललो, इतरांना दुखावले, तरी आपली साधना खर्च होते. स्वभावदोषांमुळे केवळ साधनेत हानी होते असे नाही, तर व्यावहारिक जीवनातही अनेक समस्या निर्माण होऊन व्यक्ती दुःखी होते.
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया परिणामकारक होण्यासाठी आवश्यक सूत्रे
स्वतःमधील उणिवा मान्य करणे
कोणत्याही व्यक्तीची दुःख टाळून आनंदप्राप्ती करायची ओढ असते. ते साध्य करायचे असेल, तर स्वभावदोषांचे निर्मूलन करणे आवश्यक असते; पण ही प्रक्रिया राबवायची असेल, तर सगळ्यांत पहिल्यांदा काय करावे लागेल ?, तर आपल्यामध्ये उणिवा आहेत, दोष आहेत, हे मनापासून मान्य करावे लागेल.
‘मी खरोखरच कसा आहे ?’ याचे चिंतन करणे
सर्वसामान्य व्यक्तीची आणि प्राथमिक अवस्थेतील साधकाची वृत्ती बहिर्मुख असते. त्यामुळे सुरुवातीला ‘एक माणूस म्हणून ‘मी’ नेमका कसा आहे’, याची त्याला जाणीव नसते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःविषयी काही भ्रामक समजूती असतात. बहुतेकांना स्वतःचे विचार, वागणे, तसेच कृती योग्यच वाटत असल्याने व्यक्ती भ्रामक समजुतींच्या आधारे स्वतःची एक ‘आभासी प्रतिमा’ म्हणजे pseudo image निर्माण करते. ही प्रतिमा वास्तवापासून वेगळी असते. उदाहरणार्थ, ‘मी सगळ्या कृती नीटनेटक्या आणि व्यवस्थित करते’, ‘मी इतरांना साहाय्य करतो’ किंवा ‘मला अमुक एक गोष्ट जमणारच नाही’ अशा काही ठाम कल्पना व्यक्तीच्या मनात रुजलेल्या असतात. या विचारांच्या आधारे तयार झालेली आभासी प्रतिमा जपण्याचा व्यक्ती कळत-नकळत प्रयत्न करत असते. त्यामुळे बहुतेकांचे वेगवेगळ्या व्यक्तींसह वागणे वेगवेगळे असते. अंतर्मुखतेच्या पहिल्या टप्प्यात या आभासी प्रतिमेला छेद देऊन ‘खरा ‘मी’ कसा आहे’, हे ओळखणे आणि त्यासाठी स्वतःच्या मनाला अभ्यासणे आवश्यक ठरते. स्वतःची ओळख जितकी वास्तवाशी मिळतीजुळती असेल, तितकी अंतर्मुखतेची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. आपले कुठे चुकले, आपण कसे वागायला हवे, याचे चिंतन करणे म्हणजे अंतर्मुखता आणि एखाद्या प्रसंगात इतरांनी कसे वागायचे, ते ठरवणे, इतरांना दोष देणे, एखादी परिस्थिती न स्वीकारणे म्हणजे बहिर्मुखता ! आपल्याला बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे प्रवास करायचा आहे.
दैनंदिन ताणतणावावर आध्यात्मिक स्तरावर मात करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया उपयुक्त असणे
सहसा कसे असते ?, तर ‘मी केलेली कृती चांगलीच आहे’, ‘माझे म्हणणे योग्यच आहे’, ‘मला समजून घेतले जात नाही’, ‘माझ्याच संदर्भात असे वागले जाते’, अशा स्वरूपाची सर्वसामान्य व्यक्तीची विचारप्रक्रिया असते. एखादा निर्णय चुकला, तर समोरच्या व्यक्तीमुळे कसा चुकला किंवा परिस्थिती अमुक-तमुक असल्यामुळे कसे झाले, अशी विचारप्रक्रिया होते; पण एखाद्या परिस्थितीमध्ये ‘मी काय करू शकलो असतो ?’ किंवा ‘माझे काय चुकले’, अशी विचारप्रक्रिया होत नाही. तशी विचारप्रक्रिया किंवा चिंतन होणे, हा स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे. ही विचारप्रक्रिया झाली, तर नेमके काय चुकते आहे, याच्या मुळाशी जाता येऊन त्यावर उपाययोजना काढता येऊ शकते. आज देशविदेशांतील अनेक जिज्ञासू ही स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकून आनंदी, उत्साही आणि तणावविरहित आयुष्य जगत आहे. ही प्रक्रिया आपल्याला दैनंदिन ताणतणावावर आध्यात्मिक स्तरावर कशी मात करायची ?, हे शिकवते. या प्रक्रियेविषयी आपण जाणून घेऊया.
मनाचे कार्य
चांगली किंवा वाईट कृती करण्यापूर्वी तसा विचार आपल्या मनात येतो आणि कृती घडते. म्हणजेच कृतीपेक्षाही मनातील विचार अधिक महत्त्वाचा असतो. स्वभावाचा संबंध मनाशी असतो. सत्संग शृंखला चालू होण्यापूर्वी जी ३ प्रवचने झाली होती, त्यातील तिसर्या प्रवचनात आपण मनाचे कार्य समजून घेतले होते.
अंतर्मन आणि बाह्यमन
बाह्यमन आणि अंतर्मन हे मनाचे २ मुख्य भाग आहेत. मनाच्या रचनेत आणि कार्यात बाह्यमनाचा वाटा केवळ १० टक्के, तर अंतर्मनाचा ९० टक्के वाटा असतो. बाह्यमन म्हणजे जागृत मन ! नेहमीचे विचार आणि भावना यांचा संबंध बाह्यमनाशी येतो. आपल्या अंतर्मनात सर्व भावभावना, विचारविकार, अनुभव, इच्छा-आकांक्षा साठवलेल्या असतात. थोडक्यात अंतर्मनामध्ये या जन्माचे, तसेच गतजन्मांचे वेगवेगळे संस्कार सुप्तावस्थेत असतात.
संस्कार
संस्कार म्हणजे काय ? व्यवहारात ‘संस्कार’ या शब्दाचा अर्थ चांगले आचार, विचार आणि कृती असा होतो. आध्यात्मिकदृष्ट्या ‘संस्कार’ म्हणजे आपल्या वृत्तीचे आणि आपल्याकडून होणार्या कृतींचे अंतर्मनात उमटणारे ठसे. चांगल्या गोष्टींचे संस्कार होतात, तसेच वाईट गोष्टींचेही संस्कार होतात, उदा. देवाचा नामजप करण्याचा संस्कार होतो, तसाच शिव्या देण्याचाही संस्कार होतो. एखादा विचार किंवा कृती पुनःपुन्हा होत गेल्यास हे संस्कार अधिकाधिक दृढ होतात आणि चित्तात स्थिर होतात. या जन्मातीलच नव्हे, तर पूर्वीच्या सर्व जन्मांचे संस्कार अंतर्मनाच्या खोलवरच्या थरांत रुजलेले असतात. प्रत्येक संस्कार व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या बंधनात टाकतो.
मनातील चांगल्या वाईट संस्कारांप्रमाणे वृत्ती बनते आणि वृत्तीतून विचारांची निर्मिती होते
जसे मनातील चांगले वाईट संस्कार, तशी आपली वृत्ती बनते आणि वृत्तीतून विचारांची निर्मिती होते. विचारांनुसार आपल्याकडून चांगली किंवा वाईट कृती घडते. एखाद्या प्रसंगानुसार आपल्या अंतर्मनातील आवडी-नावडी, वासना, आपली वैशिष्ट्ये असे सुप्तावस्थेतील संस्कार जागृत होतात आणि त्यानुसार आपली कृती होते. उदा. रस्त्यात एखादी १०० रुपयांची नोट मिळाली, तर कोण काय करील ? कुणी ती नोट उचलून स्वतःकडे ठेवेल, तर कुणी इतरांना विचारेल की, ‘कुणाची नोट पडली आहे ?’, येथे नोट सापडण्याची घटना एकच आहे; पण दोन प्रकृतीच्या व्यक्तींची कृती निराळी आहे. याचे कारण त्या व्यक्तींच्या अंतर्मनातील संस्कार ! लोभाचा संस्कार असणार्याने ती नोट स्वतःकडे ठेवली, तर प्रामाणिक व्यक्तीने ती नोट कोणाची आहे, हे इतरांना विचारले. मानवाकडून जी काही कृती घडते, ती त्याच्या मनामुळे घडते. शरिराकडून होणारी प्रत्येक कृती मनामुळे होते. मन चांगले असल्यास, म्हणजे मनात स्वभावदोष आणि अहं नसल्यास योग्य कृती होते आणि स्वभावदोष आणि अहं असल्यास अयोग्य कृती होते. स्वभावदोषांचा परिणाम वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन अशा सर्वच क्षेत्रांत दिसून येतो. त्यामुळेच एक आत्मविश्वासपूर्ण, सकारात्मक, अंतर्मुख जीवन जगायचे असेल, तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
आपणही दैनंदिन जीवनात असे ताणतणावाचे प्रसंग अनुभवतो ना ? भूतकाळातील काही प्रसंगांचे आपल्या मनावर दडपण असते, काही व्यक्तींची आपल्याला भीती वाटत असते, कोणाला भविष्याची चिंता असते, तर विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती असते. स्वभावदोष अधिक असतील, तर दिवसभरातील बराच काळ आपले मन अस्वस्थ किंवा तणावग्रस्त असते. आपण असे प्रसंग दैनंदिन जीवनात अनुभवत असू.
पुढील सत्संगात आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे टप्पे जाणून घेणार आहोत. प्रत्यक्ष स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला आपल्या वागण्याचे चिंतन करायचे आहे. या आठवड्यात आपण आपल्याला कोणत्या गोष्टींचा ताण येतो, आपल्या कुठल्या कृती किंवा स्वभावदोष आपल्या लक्षात येतात, याचा अभ्यास करूया. प्रतिदिन आपले वागणे आणि बोलणे यांचे निरीक्षण करूया आणि आपले कुठे चुकते आहे ?, याचा विचार करूया. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्या नोंदी आपल्याकडे करून ठेवूया. त्यासाठी एक वही घालूया. हा या सत्संगाचा आपल्या सर्वांसाठी गृहपाठ आहे.