सत्संग ११ : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची तोंडओळख

मागील सत्संगात आपण भाव म्हणजे काय ?, भाव आणि भावना यांमध्ये असलेला भेद , तसेच भावजागृतीच्या प्रयत्नांमध्ये मानसपूजेचे महत्त्व आणि ती कशी करायची हे समजून घेतले होते. ‘भाव तेथे देव’ असल्याने नामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांच्या जोडीला मानसपूजा असे भावजागृतीचे प्रयत्न करून भगवंताच्या अखंड अनुसंधानात रहाणे कसे शक्य होते याविषयी शिकलो.

अष्टांग साधनेची सूत्रे समजून घेतांना आपण स्वभावदोष निर्मूलन करण्याचे महत्त्व समजून घेतले होते. आज आपण विस्ताराने या प्रक्रियेचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व

आनंदी जीवनासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया

धर्मशास्त्रामध्येही म्हटले आहे की, मानवाने  षड्रिपूंचा त्याग केला पाहिजे. संतांनीही सांगितले आहे की, षड्रिपू माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. या षड्रिपूंसह इतरही अनेक अवगुण, वाईट सवयी माणसाला जडलेल्या असतात. त्यामुळे व्यक्तीचे आयुष्य तणावग्रस्त आणि दुःखी बनते. आनंदी जीवन जगायचे असेल, तर हे षड्रिपू घालवणे किंवा आपल्या स्वभावातील दोष, वाईट सवयी घालवणे आवश्यक असते. आपल्यालाही ‘आपल्यामध्ये दोष असू नयेत’, असे मनापासून वाटते. मात्र दोष कसे घालवायचे ?, हे कोणी आपल्याला सांगितले नव्हते. हे नेमके कसे साध्य करायचे ?, याची अद्वितीय प्रक्रिया सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे. ही प्रक्रिया आचरणात आणल्यानंतर आनंदामध्ये पुष्कळ वाढ झाल्याची, तणाव निघून गेल्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. आजही अनेक जण घेत आहेत. ‘स्वभावाला औषध नाही ’, असे म्हणतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष दूर करण्याची प्रक्रिया मनापासून आणि प्रामाणिकपणे आचरणात आणली, तर व्यक्तीच्या स्वभावामध्ये आमूलाग्र पालट होऊ शकतो. इथून पुढच्या काही सत्संगांमध्ये आपण हीच प्रक्रिया सविस्तर शिकणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की, आपण ही प्रक्रिया एकाग्रतेने समजून घेऊन आचरणात आणावी.

 

स्वभाव म्हणजे काय ?

आरंभी आपण स्वभाव म्हणजे काय ?, हे जाणून घेऊया. आपण समाजात वावरत असतांना अनेक व्यक्ती आपल्या संपर्कात येतात; परंतु त्या एकसारख्या स्वभावाच्या असतात का ?, तर नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. कोणी शांत, कोणी रागीट, कोणी प्रेमळ, कोणी लबाड, तर कोणी भित्रा असतो. जेव्हा प्रत्येक कृतीतून आपल्या अंतर्मनातील तेच तेच संस्कार प्रकट होतात, तेव्हा त्यांना ‘स्वभाव’, असे म्हणतात, उदा. एखादा इतरांशी आपणहून बोलत असेल, चांगल्या प्रकारे संवाद साधत असेल, तर ‘त्याचा स्वभाव बोलका आहे’, असे आपण म्हणतो. थोडक्यात स्वभाव म्हणजे व्यक्तीची प्रकृती. एखाद्या व्यक्तीला लहानसहान कारणांवरून राग येत असेल, तर ती व्यक्ती रागीट, असे आपण म्हणतो. काही व्यक्तींच्या बाबतीत वर्तनाची ही गोष्ट इतकी वारंवार होते की, ती व्यक्ती म्हणजे तो गुण किंवा दोष, असे समीकरणच होते. जसे व्यक्तीच्या अंतर्मनातील संस्कार तशी त्या व्यक्तीची वृत्ती म्हणजे स्वभाव बनतो. त्याप्रमाणे त्याच्या मनात विचार येतात आणि विचारानुरूप त्या व्यक्तीकडून चांगली किंवा वाईट कृती घडत असते. व्यक्तीचे वागणे आणि बोलणे यांतून तिच्यातील संस्कारांचे प्रकटीकरण होत असते.

 

आध्यात्मिक परिभाषेत स्वभावदोष म्हणजे ‘षड्रिपू’!

सर्वसाधारणपणे चांगल्या संस्कारांना गुण आणि वाईट सवयींना ‘स्वभावदोष’, असे म्हटले जाते. एखाद्याच्या स्वभावामुळे त्या व्यक्तीची स्वतःची किंवा इतरांची हानी होत असेल, तर तो त्या व्यक्तीचा स्वभावदोष झाला. आध्यात्मिक परिभाषेत त्यांना ‘षड्रिपू’ असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीत ते कमी-अधिक प्रमाणात कार्यरत असतात.

 

षड्रिपूंवर मात करण्यासाठी साधनाच आवश्यक !

‘माणसाने स्वतःमधील षड्रिपू नष्ट केले पाहिजेत’, असे आपण नेहमी ऐकतो; पण हे षड्रिपू म्हणजे नेमके काय ?, तर ते अगोदर आपण समजून घेऊया. षड् म्हणजे सहा आणि रिपू म्हणजे शत्रू. ‘षड्रिपू’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ‘सहा शत्रू.’ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मनुष्याचे सहा शत्रू आहेत. माणसामध्ये एक रिपू जरी प्रबळ असला, तरी उर्वरित पाचही रिपू कार्यरत कसे होतात ? याचे एक उदाहरण पाहूया. एका स्त्रीमध्ये ‘मोह’ हा रिपू प्रबळ होता. त्यातूनही तिला सुवर्णालंकारांचा मोह अधिकच होता. तिच्या शेजारी रहाणार्‍या स्त्रीने एकदा सोन्याचा हार घातला होता. तो पाहिल्यानंतर ‘मलाही तसाच हार हवा’, असा ‘काम’ म्हणजे तीव्र इच्छा तिला निर्माण झाली. तिने तिच्या पतीला, तसे सांगितले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘सोन्याचा हार’ विकत घेणे मला जमणार नाही’, असे तिच्या पतीने तिला सांगितले. त्यावर तिला ‘क्रोध’ आला. तिची चिडचिड चालू झाली. त्यामुळे तिच्या पतीने कर्ज काढून कसाबसा तसाच सोन्याचा हार विकत घेतला. हार मिळाल्यानंतर तिने तो घालून सर्वांसमक्ष मिरवला. यातून तिच्यात ‘मद’ उत्पन्न झाला. काही दिवसांनी तिच्या शेजारी रहाणार्‍या स्त्रीच्या हातात सोन्याच्या बांगड्या पाहिल्यावर ‘मलाही तशाच बांगड्या हव्यात’, असा ‘लोभ’ तिच्या मनात उत्पन्न झाला. सोन्याचा हार विकत घेण्यासाठी कर्ज काढल्यामुळे या वेळी लगेचच सोन्याच्या बांगड्या विकत घेणे तिच्या पतीला शक्य नव्हते. त्यामुळे तिला तिच्या शेजारी रहाणार्‍या स्त्रीविषयी ‘मत्सर’ वाटू लागला. यातून काय लक्षात येते ?, तर एक रिपू प्रबळ असेल, तर अन्य पाच रिपू परिस्थितीनुसार कार्यरत होतात. त्यामुळे एकही रिपू कार्यरत होऊ न देणे महत्त्वाचे ठरते. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आपण पाहिले. दैनंदिन जीवनात अशा अनेक घटना आपल्याही संदर्भात घडत असतात. सर्व संतांनीही ‘षड्रिपू हे मनुष्याचे शत्रू आहेत’, हे सांगितले आहे. त्यावर साधनेच्या बळावर मात करता येऊ शकते. म्हणूनच आपण ही प्रक्रिया समजून घेत आहोत.

 

स्वभावदोषांचे दुष्परिणाम

आपण आपल्यातील स्वभावदोषांकडे गांभीर्याने पहात नसल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. स्वभावदोषांमुळे व्यक्तीचे जीवन तणावग्रस्त बनते आणि त्याचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही दुष्परिणाम दिसायला लागतात. शारीरिक स्तरावर काय दुष्परिणाम होतात ? समजा एखाद्याचा स्वभाव अतीकाळजी करण्याचा असेल, तर शरिरातील अवयवांवरही त्याचा दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे त्याला आम्लपित्त, अल्सर, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब असे आजार उद्भवतात. मानसिक स्तरावर काय परिणाम होतात ?, तर स्वभावदोषांमुळे निराशा येते, एकाग्रता आणि आत्मविश्वास यांचा अभाव, विस्मरण, उद्ध्वस्त व्यक्तीमत्त्व (स्किझोफ्रेनिया) यांसारखे विविध मानसिक आजार होतात. जितके स्वभावदोष अधिक, तितका आपल्या मनावर ताण येतो. क्षुल्लक घटनांमुळेही अशा व्यक्तीला मनस्ताप होतो. स्वभावदोषांशी लढून टिकून रहाण्यासाठी मनाची शक्ती किंवा ऊर्जा मोठ्या प्रमाणावर खर्च होते. त्यामुळे त्या व्यक्तीला लगेचच थकवा येतो आणि निरुत्साह जाणवतो. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी एखादी व्यक्ती सिगारेट, दारू आदी व्यसनांचा आधार घेते; पण तसे केल्याने मानसिक तणावाचे निर्मूलन होत नाही. त्यामुळे व्यावहारिक जीवनातही स्वभावदोषांचे निर्मूलन ही काळाची आवश्यकता बनली आहे.

स्वभावदोषांचा आध्यात्मिक स्तरावरही तोटा होतो. कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी जोपर्यंत स्वभावदोष निर्मूलन आणि अहंनिर्मूलन हे काही प्रमाणात साध्य होत नाहीत, तोपर्यंत साधनेत प्रगती करणे अतिशय कठीण होते, उदा. ध्यानयोगाने साधना करणार्‍याने ध्यान लावण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्याच्यातील दोषांमुळे त्याच्या मनात असंख्य विचार येत असतील, तर व्यवस्थित ध्यान लावता येणार नाही. स्वभावदोषांमुळे होणार्‍या अयोग्य कृतींमुळे व्यक्तीची साधना खर्च होते. त्यामुळे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होत नाही, उदा. एकदा खोटे बोलले की, ३० माळा जप फुकट जातो. त्यामुळे साधना करतांना नामजप करणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे. एखाद्या भांड्याला अनेक छिद्रे असतील, तर ते भांडे पाण्याने पूर्ण भरू शकेल का ? छिद्र बुजवल्यानंतरच भांड्यात पाणी राहू शकेल. त्याप्रमाणे व्यक्तीला असणारी स्वभावदोषरूपी छिद्रे बुजवल्यानंतरच व्यक्तीरूपी भांड्यामध्ये साधनारूपी पाणी साठून राहू शकते.

 

खरा व्यक्तिमत्त्व विकास स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारेच शक्य !

आजकाल व्यक्तिमत्त्व आदर्श बनवण्यासाठी अनेक जण विशेषतः तरुण वर्ग भरमसाठ शुल्क देऊन व्यक्तिमत्त्व विकास वर्ग किंवा शिबिरे यांमध्ये जात असल्याचे आपल्याला दिसते. अनेक मोठ्या अस्थापनांमध्येही आत्मविश्वासाने आणि कार्यकुशलतेने काम करता येण्यासाठी व्यक्तिमत्त्वातील त्रूटी दूर करण्यासाठी हे व्यक्तिमत्त्व विकासाचे म्हणजे personality development चे वर्ग घेतले जातात. soft skills च्या अंतर्गत सभ्यतेचे शिष्टाचार शिकवले जातात; पण तेथे मूळ स्वभावदोषांवर प्रक्रिया केली जात नसल्याने ते तात्पुरते आणि वरवरचे ठरते. आपल्याला एखादी जखम झाली, तर ती मुळापासून बरी होण्यासाठी मलमपट्टी करण्याबरोबरच डॉक्टर आपल्याला औषधेही देतात. त्याचप्रमाणे बाह्यमनाला आपण कितीही समजावून सांगितले, तरी अंतर्मनातील अयोग्य संस्कार घालवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरच आपले व्यक्तीमत्त्व पूर्णतः पालटणार आहे, हे आपण लक्षात घेऊया. दैनंदिन जीवन जगतांना किंवा एखादे काम करतांना भावभावनांचे उत्तम व्यवस्थापन करता येणे, तसेच परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळता येणे महत्त्वाचे असते. त्यासाठी नम्रता, निरपेक्षता, विवेक, निःस्वार्थीपणा, कठीण प्रसंगाला सामोरे जातांना सकारात्मक राहून स्थिर चित्ताने, विवेकबुद्धीने निर्णय घेता येणे यांसारख्या गोष्टींची आवश्यकता असते. ते सहज जमण्यासाठी समूळ आणि आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे. साधनेने जशी बुद्धी सात्त्विक होते, स्वभावदोषांचे प्रमाण उणावत जाते, तसा व्यक्तिमत्त्वाचा आपोआप विकास होत जातो. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाले, तर ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हा स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा ‘बाय प्रॉडक्ट’ आहे. व्यक्तीतील दोष दूर करून तिच्या चित्तावर गुणांचा संस्कार निर्माण करण्याच्या प्रक्रियेला ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’, असे म्हणतात. ही प्रक्रिया तुम्हाला शिकायला आवडेल ना ? पुढच्या सत्संगांमध्ये आपण ही प्रक्रिया नेमकी कशी करायची, हे समजून घेऊया.

पुढील सत्संगात आपण आपल्यातील अवगुण किंवा स्वभावदोष कसे दूर करायचे, आपले मन नेमके कसे कार्य करते ? हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या आठवड्यात आपण प्रतिदिन थोडा वेळ स्वतःच्या स्वभावाचे चिंतन करूया. आपल्यामध्ये काय उणिवा आहेत याचा अभ्यास करूया. तसेच लक्षात आलेले दोष आणि अयोग्य सवयी वहीत लिहून काढूया आणि पुढील सत्संगात प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करूया.

Leave a Comment