सत्संग २१ : अ-२ स्वयंसूचना पद्धत

आज आपण आपण ‘अ-२’ स्वयंसूचना पद्धत समजून घेणार आहोत.

मागील आठवड्यात झालेल्या सत्संगात आपण स्वयंसूचना सत्र कसे करायचे ?, हे जाणून घेतले होते. त्याप्रमाणे स्वयंसूचना सत्र करण्याचा प्रयत्न कोणी कोणी केला ? आपल्याला सत्र करतांना काय अनुभवायला आले ? काही अडचणी आल्या का ? स्वयंसूचना बनवतांना किंवा सारणीलिखाण करतांना कोणाला काही अडचणी आल्या असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता, तसेच साधनाविषयक अन्य काही प्रयत्न झाले असतील तर तेही सांगूया.

आता आपण आजच्या सत्संगाच्या मुख्य विषयाकडे म्हणजे अ-२ स्वयंसूचना पद्धतीकडे वळूया. आपल्या मनामध्ये सतत काही ना काही विचार चालू असतात. संकल्प-विकल्प हे मनाचे कार्यच आहे. एखादा प्रसंग घडल्यानंतर त्याला आपल्याकडून दिला जाणारा प्रतिसाद हा आपल्या मनातील विचारांवर किंवा आपल्या स्वभावावर अवलंबून असतो. आपल्यापैकी सगळ्यांना अर्ध्या भरलेल्या पेल्याचे उदाहरण ठाऊक असेल ! पेला अर्धा भरला आहे म्हणायचे कि रिकामा आहे म्हणायचे, हे आपल्या दृष्टीकोनांवर अवलंबून असते. आपला प्रतिसाद आणि दृष्टीकोन सकारात्मक आणि योग्य असा ठेवण्यासाठीचे एक उपयुक्त साधन म्हणजे अ-२ स्वयंसूचना पद्धत !

स्वयंसूचना पद्धतीचा क्रमांक पद्धतीचे शीर्षक
अ १ अयोग्य कृती, विचार अथवा भावना यांमुळे होणारा परिणाम लक्षात घेऊन योग्य कृती किंवा विचार यांसाठी दृष्टीकोन
अ २ मनात येणार्‍या वा व्यक्त होणार्‍या अयोग्य प्रतिक्रियांवर योग्य प्रतिक्रिया बिंबवणे ( १ – २ मिनिटांपेक्षा अल्प वेळ टिकणार्‍या प्रसंगात अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रियाच यावी, यासाठी ही पद्धत वापरतात.)
आ १ इतरांचे स्वभावदोष दूर करून किंवा त्यांची वाईट परिस्थिती बदलून आपल्या मनावरील ताण कमी करणे शक्य असणे
आ २ इतरांचे स्वभावदोष दूर करणे किंवा वाईट परिस्थिती बदलणे अशक्य असणे
इ १ नामजप होण्यासाठी स्वयंसूचना
इ २ शिक्षापद्धत अवलंबणे

प्रत्येक प्रसंगात व्यक्तीकडून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त होते. अयोग्य प्रतिक्रिया स्वभावातील दोषांमुळे येतात, तर योग्य प्रतिक्रिया स्वभावातील गुणांमुळे येतात. एखादा प्रसंग घडल्यावर मनात अयोग्य विचार येण्याऐवजी योग्य विचार येऊन त्यानुसार कृती करणे, हे आपल्याला या सूचनापद्धतीतून साध्य करायचे आहे.

आपण गेल्या आठवड्यात पाहिले की, साधारणपणे कृतीच्या स्तरावर होणार्‍या चुकांसाठी, तसेच मनात येणारे अयोग्य विचार आणि भावना दूर होण्यासाठी अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देतात, तर कमी कालावधीच्या प्रसंगात मनात उमटणार्‍या प्रतिक्रियांसाठी अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात. स्वयंसूचनांच्या अन्य पद्धती आपण पुढच्या सत्संगांत पहाणार आहोत.

 

अ-२ स्वयंसूचना पद्धत कोणत्या स्वभावदोषांवर उपयोगी आहे ?

अ-२ स्वयंसूचना पद्धतीचा उपयोग करून दुसर्‍यांवर टीका करणे, चिडचिडेपणा, रागीटपणा, भांडखोरपणा, पश्चात्ताप न होणे, हट्टीपणा, संशयीपणा आदी स्वभावदोषांवर स्वयंसूचना देऊन मात करता येऊ शकते.

सतत काही महिने स्वयंसूचना दिल्यामुळे अयोग्य प्रतिक्रियेच्या ऐवजी योग्य प्रतिक्रिया येत राहिली, तर चित्तावर दोषाच्या जागी गुणाचा संस्कार निर्माण होऊन स्वभावात सकारात्मक बदल होतो. १ – २ मिनिटांपेक्षा कमी वेळ टिकणार्‍या प्रसंगात अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रियाच यावी, यासाठी ही पद्धत वापरतात. एखाद्या प्रसंगामुळे मनात येणारी प्रतिक्रिया भलेही दीर्घकाळ टिकणारी असेल; पण तो प्रसंग कमी कालावधीचा घडलेला असेल, तर अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात.

उदा. सगळे कुटुंबीय जेवायला बसलेले असतांना यजमानांनी भाजी तिखट झाल्याचे सांगितल्यावर वाईट वाटून ‘सगळ्यांसमोर कशाला सांगायचे ?, भाजी काही खूप तिखट नव्हती, थोडीशीच तिखट होती’, अशा प्रतिक्रिया आल्या. समजा, या प्रतिक्रिया मनात ४-५ तास टिकल्या, तरी मूळ प्रसंग काही मिनिटांचाच असल्याने अयोग्य प्रतिक्रिया दूर होऊन योग्य प्रतिक्रिया मनात येण्यासाठी अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात.

 

अ-२ स्वयंसूचना पद्धतीचे सूत्र

अ-२ स्वयंसूचना पद्धत म्हणजेच अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रिया येण्यासाठीची पद्धत. प्रतिक्रिया म्हणजे प्रतिसाद ! अयोग्य प्रतिक्रिया म्हणजे अयोग्य प्रतिसाद ! अ-१ स्वयंसूचना पद्धतीप्रमाणेच अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देण्याचे सूत्र आहे.

प्रसंग + योग्य दृष्टीकोन + योग्य प्रतिक्रिया (विचार किंवा कृती)

या सूत्रानुसार अ-२ पद्धतीने स्वयंसूचना कशी बनवायची ?, ते आपण पाहूया.

 

स्वयंसूचनेत अयोग्य प्रतिक्रियांचा उल्लेख करू नये

अ-२ पद्धतीने स्वयंसूचना बनवतांना एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यावे की, मनात येणार्‍या अयोग्य प्रतिक्रियांचा स्वयंसूचनेमध्ये उल्लेख करू नये.

 

अ-२ स्वयंसूचना पद्धतीची उदाहरणे

उदाहरण १

अ. प्रसंग : समजा आपण एखाद्या कार्यालयात काम करत आहोत. कार्यालयात काम करतांना आपल्याला काही अडचणी येत आहेत. त्या सोडवण्यासाठी आपण वरिष्ठांकडे वेळ मागितला. तेव्हा वरिष्ठ म्हणाले, ‘आता मला वेळ नाही. आपण नंतर बोलूया.’ हे ऐकल्यानंतर मला वाईट वाटले आणि मनात प्रतिक्रिया आली, ‘वरिष्ठ माझ्याकडे लक्षच देत नाहीत. त्यांना माझ्या समस्या सोडवण्यासाठी वेळच नसतो.’

या प्रसंगात आपल्या मनात जे विचार आले, ते सकारात्मक आहेत कि नकारात्मक ? तर नकारात्मक ! ‘माझ्या अडचणी ऐकायला वरिष्ठांना वेळच नसतो’, अशा प्रकारची प्रतिक्रिया नकारात्मक आहे, तसेच उद्वेगातून आलेली आहे. या विचारांमुळे त्रास कोणाला होतो ?, तर आपल्यालाच ! आपण असा विचार केल्याने परिस्थितीत काही फरक पडतो का ? समजा वरिष्ठांचे काही चुकत असेल, तरी आपल्या मनात उमटणार्‍या प्रतिक्रियांमुळे त्यांच्यामध्ये काही सुधारणा होते का ?, तर नाही ! त्यामुळे परिस्थिती कशीही असली, तरी त्या परिस्थितीत मी योग्य विचार काय करायचा, मी योग्य कसे वागायचे ?, याचे चिंतन करून तसे प्रयत्न करणे, ही प्रक्रिया आहे. प्रसंगांवर स्वयंसूचना दिल्याने, त्या प्रसंगात योग्य कसे वागायला हवे, हेही आपल्या लक्षात येते आणि आपल्या मनावर दडपणही रहात नाही.

आ. विचारप्रक्रियेचा अभ्यास : आताच्या प्रसंगाचा विचार केला, तर आपल्या विचारप्रक्रियेतून आपले कोणते स्वभावदोष आपल्या लक्षात येतात ? ‘मी वरिष्ठांकडे गेल्यावर त्यांनी माझ्या अडचणी लगेच सोडवाव्यात’, या विचारांतून आपल्या काय लक्षात येते, तर आपल्या अपेक्षा आहेत, वाईट वाटणे म्हणजे भावनाशीलता आहे, तसेच वरिष्ठांनाही कदाचित काही काम असू शकेल, असा दुसर्‍यांचा विचार त्यात नाही. या प्रसंगात आपले स्वभावदोष आहेत, अवाजवी अपेक्षा असणे, भावनाशीलता आणि दुसर्‍यांचा विचार नसणे !

एखाद्या प्रसंगात आपले एकापेक्षा अधिक स्वभावदोष कार्यरत असू शकतात. अशा वेळी ज्या स्वभावदोषाची तीव्रता अधिक आहे, त्या स्वभावदोषावर स्वयंसूचना बनवावी. एखाद्या प्रसंगात कार्यरत असलेले सर्व स्वभावदोष तीव्र असतील, तर सर्व दोषांवरही स्वयंसूचना बनवू शकतो. आताच्या प्रसंगात आपण ‘अवाजवी अपेक्षा करणे’ हा स्वभावदोष दूर करण्यासाठी स्वयंसूचना कशी द्यायची, ते आपण पाहूया.

इ. उदाहरणाचा अभ्यास : स्वयंसूचना बनवण्यासाठी आपण सूत्राप्रमाणे जाऊया. सूत्र काय आहे, तर प्रसंग + योग्य दृष्टीकोन + योग्य प्रतिक्रिया (विचार किंवा कृती)

प्रसंग काय आहे ?, तर मला येणार्‍या अडचणींविषयी वरिष्ठांकडे वेळ मागितल्यावर ते ‘नंतर बोलू’, असे म्हटल्यावर प्रतिक्रिया आल्या.

या प्रसंगात आपण काय दृष्टीकोन ठेवू शकतो, तर ‘सध्या वरिष्ठांकडे महत्त्वाचे आणि तातडीचे दुसरे काम असेल.’

योग्य कृती काय आहे, तर वरिष्ठांना चर्चा करण्यासाठी कोणती वेळ सोयीची आहे, हे मी शांतपणे विचारून घेईन.

ई. स्वयंसूचना : आता याची स्वयंसूचना कशी होऊ शकते, ते आपण पाहूया.

कार्यालयात काम करतांना मला येणार्‍या अडचणींविषयी वरिष्ठांकडे वेळ मागितल्यानंतर ते मला ‘नंतर बोलू’, असे सांगतील, तेव्हा ‘सध्या त्यांची व्यस्तता आहे, हे समजून घेईन आणि ‘पुढील कोणती वेळ मिळू शकते ?’, असे मी त्यांना नम्रपणे विचारीन.

या स्वयंसूचनेमुळे काय होते, तर वरिष्ठांविषयी नकारात्मक निष्कर्ष काढला जात नाही, पुढची सोयीची वेळ विचारल्याने आपली समस्या साधारणपणे कधी सुटू शकते, याचा अंदाज येतो, तसेच इतरांना समजून घेतल्याने आपल्या मनावरही काही दडपण रहात नाही.

उदाहरण २

आताच्या प्रसंगाप्रमाणेच आणखी एका प्रसंगाचा आपण अभ्यास करूया.

अ. प्रसंग : समजा प्रसंग असा आहे की, मुलगा अनिष वय झाले, तरी विवाह करण्याचे मनावर घेत नव्हता. त्याविषयी यजमानांबरोबर चर्चा करण्यासाठी गेल्यावर ‘आता मला वेळ नाही. नंतर आपण याविषयी सविस्तर बोलूया’, असे यजमानांनी सांगितले. तेव्हा ‘मी एवढ्या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, तरी ते लक्ष देत नाहीत. त्यांना घराचे प्राधान्य नसतेच’, अशा प्रतिक्रिया आल्या.

आता आपण वरिष्ठांच्या संदर्भात जो प्रसंग पाहिला, तसाच हा प्रसंग आहे. आपण बोलायला गेल्यावर यजमानांनी लगेच बोलावे, अशी अपेक्षा आहे, तसेच यजमानांना त्या वेळी काही वेगळे महत्त्वाचे काम आहे का ?, याविषयी जाणूनही घेतले नसल्याने इतरांना समजून घेण्याचा प्रयत्नही यात नाही. त्यामुळे आपण लगेच ‘यजमान कधीच घरच्या गोष्टींना प्राधान्य देत नाहीत’, असा निष्कर्ष काढून मोकळे होतो. यावर स्वयंसूचना कशी होऊ शकते ?, ते आपण पाहूया.

आ. स्वयंसूचना : मुलाच्या विवाहाविषयी चर्चा करण्यासाठी यजमानांकडे वेळ मागितल्यानंतर ते मला ‘नंतर बोलू’, असे सांगतील, तेव्हा त्यांना त्या वेळी दुसरे काही काम आहे का ?, हे मी जाणून घेईन आणि ‘आपण नंतर कधी बोलूया ?’, हे मी त्यांना शांतपणे आणि नम्रपणे विचारीन.

इ. प्रसंगाचा अभ्यास : वरिष्ठांच्या प्रसंगासारखीच आताच्या प्रसंगात स्वयंसूचना बनवली आहे. केवळ यजमानांविषयीच्या प्रसंगात आपण ‘त्यांना इतर काही काम आहे का ?’, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. तसे आपण कार्यालयात वरिष्ठांच्या संदर्भात करू शकत नाही; पण जेथे शक्य आहे, तेथे आपल्याला समोरच्या व्यक्तीची भूमिका तशी का आहे ?, हे संवाद साधून समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जेवढे आपण इतरांना समजून घेऊ, तेवढे आपण अधिक व्यापक आणि समजूतदार होऊ शकतो.

उदाहरण ३

आता आपण अजून एका प्रसंगाचा अभ्यास करूया.

अ. प्रसंग : समजा, प्रसंग असा आहे की, मला टी.व्ही. वरील एक गाण्यांचा कार्यक्रम पहायचा असतांना यजमानांनी टी.व्ही.वर बातम्यांचा ‘चॅनेल’ लावला. तेव्हा ‘तुम्ही कधीच माझ्या मनाप्रमाणे करत नाही’, असे त्यांना चिडून म्हणाले आणि तेथून निघून गेले.

आ. प्रसंगाचा अभ्यास : अशा स्वरूपाचा प्रसंग घरी घडतो ना ? आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काही तरी व्हावे, असे वाटते; पण काही कारणांमुळे तसे घडत नाही, तेव्हा आपली चिडचिड होते. ‘स्वतःच्या मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, हा अहंकाराचा एक पैलू आहे. जो आपल्या साधनेत, तसेच व्यावहारिक आयुष्यातही अडथळा ठरतो. त्यावर मात करायची असेल, तर जिथे साधनेच्या दृष्टीने आपली विशेष हानी होत नाही, तिथे इतरांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा हे तीन टप्पे आहेत. स्वेच्छा म्हणजे सगळे स्वतःच्या इच्छेप्रमाणे, मनाप्रमाणे करणे. परेच्छा म्हणजे इतरांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे आणि ईश्वरेच्छा म्हणजे ‘देवाची इच्छा काय आहे ?’, हे जाणून त्याप्रमाणे वागणे. स्वेच्छेने वागणारा माणूस आणि पशू यांमध्ये काही भेद नसतो. साधना करतांना स्वेच्छा सोडून परेच्छेने वागण्याचा प्रयत्न केला, तर हळूहळू ईश्वरेच्छा म्हणजे काय ते कळू शकते. आताच्या प्रसंगाचा विचार केला, तर आपल्या आवडीचा ‘टी.व्ही’.वरील एखादा कार्यक्रम पाहिला नाही, तर काही विशेष फरक पडत नाही. त्यामुळे यजमानांनी बातम्या लावल्या; म्हणून स्वतःचा हिरमोड करून घेण्यापेक्षा आपण यजमानांसह बातम्या पाहू शकतो किंवा तो वेळ नामजपासाठी देऊ शकतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे की, पती-पत्नी यांच्या नात्यामध्ये जो माघार घेतो, त्याची आध्यात्मिक प्रगती लवकर होते. साधनेच्या प्राथमिक टप्प्यात मन पुष्कळ कार्यरत असते; पण जशी साधना वाढेल, तसा आपला मनोलय होतो. मनोलय झाला की, मनाला वाईट वाटणे, मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे असे काही उरतच नाही. या टप्प्याला पोचण्यासाठी परेच्छेने वागणे महत्त्वाचे आहे.

इ. स्वयंसूचना : आता आपण या प्रसंगावर स्वयंसूचना कशी होईल ?, ते पाहूया.

‘जेव्हा टी.व्ही. वरील गाण्याचा कार्यक्रम पहायचा असतांना यजमान बातम्या लावत असतील, तेव्हा परेच्छेने वागण्यातून साधना होणार आहे, हे लक्षात घेऊन मी स्थिर राहीन आणि नामजप करीन.’

किंवा

जेव्हा टी.व्ही. वरील गाण्याचा कार्यक्रम पहायचा असतांना यजमान बातम्या लावत असतील, तेव्हा यजमानांची बातम्या पहाण्याची आवड लक्षात घेऊन मी त्यांच्यासमवेत बातम्या पाहीन/ मी माझे अन्य काम करीन.

उदाहरण ४

अ. प्रसंग : आता आपण अजून एका प्रसंगाचा अभ्यास करूया. समजा, सासूबाईंनी मला मी एका खोलीचा केर नीट काढला नव्हता, असे सांगितल्यावर ‘त्या नेहमी माझ्या चुकाच पहातात’, अशी प्रतिक्रिया आली, असा प्रसंग आहे. हा प्रसंग सूनेच्या संदर्भात घडला आहे. या प्रसंगाचा आपण अभ्यास करूया.

आ. प्रसंगाचा अभ्यास : या प्रसंगात चुका न स्वीकारणे, स्पष्टीकरण देणे, बहिर्मुखता हे सूनेचे स्वभावदोष कार्यरत आहेत. कोणी आपली चूक सांगितल्यावर ‘ती व्यक्ती नेहमी माझ्या चुकाच पहाते, असा विचार करणे’, ही अयोग्य प्रतिक्रिया झाली. त्या जागी योग्य प्रतिक्रिया काय असायला हवी ?, तर ‘बरे झाले, माझी चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे मला पुढच्या वेळी अजून चांगले करता येईल.’ बर्‍याच वेळा चूक सांगणार्‍या व्यक्तीच्या सांगण्याच्या पद्धतीकडे आपले लक्ष जाते आणि चूक स्वीकारली जात नाही किंवा एखाद्या व्यक्तीविषयी मनात पूर्वग्रह असेल, तर समोरच्या व्यक्तीकडे पूर्वग्रहदूषितपणे पाहिले जाते. आपल्याला कुणीही चूक सांगितली, तर साधना म्हणून आपल्याला सर्वप्रथम ती चूक स्वीकारायची आहे. चूक स्वीकारतांना कदाचित् आपल्या मनाचा संघर्षही होईल; पण आपल्याला तो करून अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करायचा आहे; कारण शेवटी व्यवहार असो वा साधना, चुकांमुळे आपली साधना खर्च होत असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही म्हटले आहे की, प्रत्येक चूक आपल्याला ईश्वरापासून दूर नेते. त्यामुळे आपल्याला चूक स्वीकारून ती चूक कशामुळे झाली ?, चूक सुधारण्यासाठी काय उपाययोजना काढता येईल, याविषयी चिंतन करायचे आहे.

इ. स्वयंसूचना : आताच्या प्रसंगात कशी स्वयंसूचना होऊ शकेल ?, ते आपण पाहूया.

जेव्हा सासूबाई माझ्याकडून खोलीतील केर व्यवस्थितपणे काढला गेला नसल्याचे सांगतील, तेव्हा चूक लक्षात आणून दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी पुन्हा एकदा लक्षपूर्वक केर काढीन.

किंवा

जेव्हा सासूबाई माझ्याकडून खोलीतील केर व्यवस्थितपणे काढला गेला नसल्याचे सांगतील, तेव्हा चूक स्वीकारणे ही साधना आहे, हे लक्षात घेऊन मी पुन्हा एकदा लक्षपूर्वक केर काढीन.

ही स्वयंसूचना आपल्या लक्षात आली ना ? बर्‍याच वेळा आपली विचारप्रक्रिया किंवा आपली भूमिका आपल्याला योग्यच वाटत असते आणि हीच धोक्याची घंटा आहे. आपल्या मनात उमटणार्‍या प्रतिक्रियांचा आपल्या स्वतःला किंवा इतरांना त्रास होत असेल, तर आपले काही तरी चुकत आहे, हे समजून घ्यावे. आपल्याला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत काय करायचे आहे, तर या अयोग्य प्रतिक्रियांवर मात करून मनात सकारात्मक किंवा योग्य प्रतिक्रिया येण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला इतरांना किंवा परिस्थितीला पालटण्यासाठी प्रयत्न न करता स्वतःला पालटायचे आहे, हा प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे.

सरावासाठी उदाहरण

आता आपण सरावासाठी काही प्रसंग पाहूया आणि त्यानुरूप स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया.

अ. प्रसंग : ट्रॅफीक जॅममध्ये अडकलेल्या श्री. आकाश यांना ऑफिसमधून घरी यायला नेहमीपेक्षा उशीर झाल्यामुळे पत्नीने ‘एवढा उशीर का झाला ?’, असे विचारल्यामुळे राग आला आणि त्यांनी ‘तुला प्रश्न विचारायला काय ? तू घरीच असतेस’, असे रागाने म्हटले.

या प्रसंगावर आपण आता १ मिनिटात स्वयंसूचना देण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर योग्य स्वयंसूचना कशी देऊ शकतो, हे समजून घेऊया.

आ. स्वयंसूचना : या प्रसंगाच्या अनुषंगाने आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. अ-२ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याचे सूत्र आहे – प्रसंग + योग्य दृष्टीकोन + योग्य प्रतिक्रिया.

त्यानुसार या प्रसंगात स्वयंसूचना कशी होऊ शकेल, तर ‘घरी उशिरा पोचल्यावर जेव्हा पत्नीने ‘एवढा उशीर का झाला?’, असे विचारल्यामुळे मला राग येईल, तेव्हा तिला माझी काळजी वाटत असल्याने ती तसे विचारत आहे, हे लक्षात घेऊन मी उशीर होण्याचे कारण शांतपणे सांगेन.

 

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेशी संबंधित सनातनचे ग्रंथ

सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. ते www.sanatanshop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण या ग्रंथांचा अवश्य लाभ घ्यावा.

आजच्या सत्संगात आपण मनात उमटणार्‍या तसेच आपल्याकडून व्यक्त होणार्‍या अयोग्य प्रतिक्रियांवर अ-२ स्वयंसूचना पद्धतीने स्वयंसूचना कशा द्यायच्या हे पाहिले. या आठवड्यात आपण स्वतःचे निरीक्षण करून आपल्या मनात उमटणार्‍या आणि आपल्याकडून व्यक्त होणार्‍या अयोग्य प्रतिक्रिया सारणीमध्ये लिहूया, तसेच स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. पुढील सत्संगात आपण अ-१ आणि अ-२ या स्वयंसूचना पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास पहाणार आहोत.

Leave a Comment