मागील आठवड्यात आपण आपल्या मनातील अयोग्य विचार, अयोग्य भावना यांवर अ-१ पद्धतीने स्वयंसूचना कशा द्यायच्या याविषयी जाणून घेतले होते. आतापर्यंत आपण सारणीमध्ये चुका लिहिणे आणि त्यावर स्वयंसूचना तयार करत आहोत. आपल्यातील स्वभावदोष समूळ नष्ट होण्यासाठी स्वयंसूचना सत्र करणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या सत्संगात आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजे स्वयंसूचना सत्र करणे शिकून घेणार आहोत.
आतापर्यंतच्या सत्संगांत आपण स्वयंसूचनांच्या पद्धती, तसेच स्वभावदोषांचे वर्गीकरण करून त्याची व्याप्ती काढणे, हे विषय समजून घेतले. आज त्याच्या पुढच्या टप्प्याला आपण स्वयंसूचना सत्र कसे करायचे ?, हा विषय समजून घेणार आहोत. स्वयंसूचना सत्र हा स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आपल्या मनाचे निरीक्षण करून आपल्याकडून होणार्या चुकांची नोंद स्वभावदोष निर्मूलन सारणीमध्ये करणे आणि त्यावर स्वयंसूचना लिहिणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच स्वयंसूचना सत्र करणेही महत्त्वाचे आहे. स्वयंसूचना म्हणजे आपल्याला जे करायचे आहे ते स्मरणात ठेवणे आणि जे करायचे नाही, तेसुद्धा स्मरणात ठेवणे ! मनाला स्वयंसूचना दिल्याने त्याला समजते की, ‘अरे, हे करायचे आणि हे करायचे नाही.’ लहानपणी आई मुलाला वळण लावण्यासाठी एखादी गोष्ट वारंवार सांगते. त्याचा संस्कार मनावर होऊन चांगल्या सवयी लागतात. पुढे त्या सवयी मुलाच्या कायमस्वरूपी अंगवळणी पडतात. स्वयंसूचनांचेही अगदी तसेच आहे. सत्राच्या माध्यमातून योग्य काय आणि अयोग्य काय, कसे वागायचे आणि काय टाळायचे, हे मनाला बजावले जाते. त्यामुळे व्यक्तीची सतर्कता वाढते आणि अयोग्य कृती टाळून योग्य कृती करण्याचा, योग्य प्रतिसाद देण्याचा संस्कार मनावर होतो. त्यामुळे एकंदरीतच व्यक्तीची फलनिष्पत्ती वाढते आणि खर्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होतो. आज काल व्यक्तीमत्त्व विकासासाठी हजारो रुपये खर्च केले जातात; पण तो बराचसा भाग बाह्य स्तरावर असतो, उदा. चेहरा हसरा कसा ठेवायचा ? इतरांना आदर कसा द्यायचा ?, अशा प्रकारे व्यक्तिमत्त्व विकासाच्या वर्गात शिकवले जाते; पण ते वरवरचे झाले. मन निर्मळ झाले, इतरांविषयी मनात आपलेपणा आणि प्रेमभाव निर्माण झाला, तर आपोआपच कृतींमध्ये पालट होतो. हे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे साध्य होते. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या मूळ स्वभावात पालट होतो. त्या माध्यमातून मनाचे शुद्धीकरण होत असल्याने आध्यात्मिक स्तरावरही आपल्याला लाभ होतो.
स्वयंसूचना सत्र म्हणजे काय ?
स्वयंसूचना सत्र म्हणजे काय, तर आपल्याकडून होणार्या चुका, अयोग्य कृती टाळून त्याजागी योग्य कृती काय करायच्या, याची मनाला दिशा देणे ! मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार येत असतील, तर त्याऐवजी मनाला सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करण्याची सवय लावणे ! स्वयंसूचना सत्र हे एखाद्या होकायंत्राप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे होकायंत्रावर दिशा कळते; पण त्या दिशेने जहाज न्यायचे असेल, तर नाविकाला स्वतःला त्या दिशेने जहाज न्यावे लागते. त्याप्रमाणे स्वयंसूचना सत्र आपल्याला योग्य विचार काय करायचा, योग्य कृती काय करायच्या, याची मनाला दिशा देतात; पण त्या स्वयंसूचनांप्रमाणे कृती करण्यासाठी व्यक्तीला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. तसे केले, तर स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला वेग येतो.
व्याप्तीतील पैलू निवडून स्वयंसूचना बनवणे
सत्र करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर आपण आपल्यातील ज्या तीव्र स्वभावदोषांची व्याप्ती काढली आहे, त्या व्याप्तीतील एक पैलू आपल्याला स्वयंसूचना सत्रासाठी निवडायचा आहे. प्रक्रियेसाठी आरंभी आपण २ स्वभावदोष निवडू शकतो. या २ स्वभावदोषांवर २ आणि नामजप होण्यासाठीची एक अशा ३ स्वयंसूचना आपण सत्रामध्ये देऊ शकतो, उदा. आपण अव्यवस्थितपणा हा स्वभावदोष प्रक्रियेसाठी निवडला असेल, तर त्याच्या व्याप्तीच्या अंतर्गत अनेक सूत्रे असू शकतात. अव्यवस्थितपणा कपड्यांच्या घड्या करण्याच्या संदर्भात असू शकतो, कट्टा आवरण्याच्या, चप्पल जागेवर ठेवण्याच्या, गाडी पार्क करण्याच्या संदर्भात असू शकतो. स्वयंसूचना सत्र करतांना आपल्याला यांपैकी एक अयोग्य कृती निवडून त्यावर स्वयंसूचना द्यायची आहे. अयोग्य कृतींची वारंवारता, तीव्रता आणि कालावधी यांचा विचार करून आपण एक अयोग्य कृती स्वयंसूचना देण्यासाठी निवडू शकतो. समजा अव्यवस्थिपणा या स्वभावदोषाच्या अंतर्गत कट्टा नीट न आवरण्याची कृती वारंवार घडत असेल, तर हा पैलू आपण स्वयंसूचना सत्रासाठी निवडू शकतो. त्यावर स्वयंसूचना कशी होऊ शकेल, तर जेव्हा मी कट्टा अव्यवस्थिपणे आवरत असेन, तेव्हा ते दिसायला खराब दिसते, प्रत्येक कृती सत्यम्, शिवम्, सुंदरम् अशा पद्धतीने करण्यातून साधना होणार आहे, हे लक्षात घेऊन मी नामजप करत नीट कट्टा आवरीन. अशाच पद्धतीने दुसर्या स्वभावदोषाच्या व्याप्तीतील एक पैलू निवडून त्यावर स्वयंसूचना बनवावी. समजा दुसरा स्वभावदोष आपण ‘रागीटपणा’ हा निवडला आहे आणि त्यातील पैलू यजमानांनी घरकामात साहाय्य करण्यास नकार दिल्याने राग येणे, असा घेतला आहे. उदाहरणादाखल त्यावर स्वयंसूचना कशी होऊ शकेल ? तर, जेव्हा यजमान किराणा सामान आणायला नकार देतील, तेव्हा त्यांची काय अडचण आहे, हे मी शांतपणे जाणून घेईन आणि त्यानुसार उपाययोजना काढीन. त्यानंतर आपण आधीच्या सत्संगात पाहिल्याप्रमाणे इ-१ पद्धतीने नामजप होण्यासाठी सूचना देऊ शकतो. जेव्हा मी कोणाशी संभाषण करत नसेन किंवा माझ्या मनात निरर्थक विचार येतील, तेव्हा माझा नामजप चालू होईल.
सूचनासत्राचे स्वरूप
आता आपण प्रत्यक्ष स्वयंसूचना सत्र कसे करायचे ?, हे समजून घेऊया. सूचनासत्र करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करून कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचा नामजप करावा. मन एकाग्र होण्यासाठी २ मिनिटे नामजप करावा. त्यानंतर आपण निवडलेल्या पहिल्या स्वभावदोषाच्या पैलूवर ५ वेळा स्वयंसूचना द्यावी. त्यानंतर प्रार्थना करून दुसर्या स्वभावदोषाच्या पैलूवर ५ वेळा स्वयंसूचना द्यावी. त्यानंतर पुन्हा प्रार्थना करून तिसर्या स्वभावदोषावर ५ वेळा स्वयंसूचना द्यावी. आपण प्रक्रियेसाठी २ स्वभावदोष निवडले असतील, तर तिसरी स्वयंसूचना नामजपाविषयी देऊ शकतो. अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशी द्यायची ? ते आपण पुढे शिकणार आहोत. केवळ आता माहितीसाठी म्हणून अ-३ पद्धतीने एखाद्या स्वभावदोषावर आपण स्वयंसूचना देणार असू, तर सत्र करतांना ती ५ वेळा न देता एकदाच द्यावी.
स्वयंसूचना देऊन झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करावी. एक सत्र करण्यासाठी साधारण ८ मिनिटे लागतात. अभ्यास सत्राचा कालावधी कमी किंवा अधिक झाल्यास विशेष फरक पडत नाही. कालावधीपेक्षा स्वयंसूचनासत्र प्रभावीपणे करणे अधिक महत्त्वाचे आहे.
प्रत्यक्ष उदाहरण
समजा आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी मगाशी पाहिल्याप्रमाणे अव्यवस्थितपणा आणि रागीटपणा हे स्वभावदोष निवडले असतील, तर त्यावर स्वयंसूचना सत्र कसे करू शकतो, हे आपण पाहूया. सत्र करण्याच्या आरंभी प्रार्थना करावी की, ‘हे भगवंता तूच माझ्याकडून एकाग्रतेने सत्र करून घे. मी देत असलेल्या स्वयंसूचना माझ्या अंतर्मनापर्यंत पोचू देत. सूचनासत्र करतांना कोणतेही अडथळे येऊ देऊ नकोस.’ त्यानंतर आपल्या उपास्यदेवतेचा २ मिनिटे एकाग्रतेने नामजप करावा. त्यानंतर एका सत्रात प्रथम एका स्वभावदोषाच्या पैलूवर ५ वेळा स्वयंसूचना द्यावी. त्यानंतर प्रार्थना करावी. त्यानंतर लगेच दुसर्या स्वभावदोषावर ५ वेळा स्वयंसूचना द्यावी. त्यानंतर पुन्हा प्रार्थना करावी. नंतर नामजप होण्यासाठी ५ वेळा स्वयंसूचना द्यावी. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करावी. हे स्वयंसूचना सत्र एके ठिकाणी बसून एकाग्रतेने आणि मनापासून करावे.
सत्र किती कालावधीसाठी करावे ?
१. प्रक्रियेसाठी निवडलेल्या स्वभावदोषांवर कमीत कमी आठवडाभर स्वयंसूचना द्याव्यात. एक आठवडा सूचना देऊनही एखाद्या स्वभावदोषात काहीच फरक पडला नाही, तर तीच सूचना ३-४ आठवडे द्यावी.
२. एका पैलूवर स्वयंसूचना देत असतांना त्यामध्ये अपेक्षित पालट दिसून आले की, स्वयंसूचना देण्यासाठी आपण त्याच स्वभावदोषाचा दुसरा पैलू पुढील आठवड्यासाठी निवडू शकतो, उदा. अव्यवस्थितपणा या स्वभावदोषाच्या अंतर्गत कट्टा न आवरणे या पैलूवर आपण स्वयंसूचना देत आहोत. त्यात पालट दिसून आला, तर अव्यवस्थितपणाच्याच दुसर्या पैलूवर उदाहरणार्थ कपड्यांच्या घड्या न करणे, गाडी नीट ‘पार्क’ न करणे अशा अन्य पैलूंवर स्वयंसूचना देऊ शकतो. स्वभावदोष बर्यापैकी कमी झाला, तर आपण प्रक्रियेसाठी अन्य स्वभावदोष निवडू शकतो. अशाप्रकारे ५ – ६ महिने नियमित, प्रामाणिकपणे आणि मनापासून प्रक्रिया राबवली, तर आपल्या आनंदामध्ये निश्चितपणे वाढ होईल.
स्वयंसूचना सत्राविषयीची अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे
१. सूचनासत्र करतांना सूचनेतील शब्दांचे विस्मरण होत असेल, तर सूचना कागदावर लिहून त्या वाचू शकतो. सत्र करतांना आरंभीच्या टप्प्याला आपण ज्या स्वयंसूचना देणार, त्या कागदावर लिहून काढून वाचूया. या स्वयंसूचना आपल्या लक्षात राहिल्या की, मग डोळे मिटून एकाग्रतेने सत्र करू शकतो. डोळे मिटून सत्र केले की, ते अधिक एकाग्रतेने व्हायला साहाय्य होते. आरंभीच्या टप्प्याला मात्र आपण कागदावरच्या सूचना वाचूनच स्वयंसूचनांचे सत्र करूया.
२. सत्र करण्याची आठवण होण्यासाठी गजर लावू शकतो.
३. स्वयंसूचना सत्र करत असतांना त्या स्वयंसूचनेच्या अनुषंगाने योग्य कृती होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. तसे केले, तर प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते.
स्वयंसूचना सत्राचे लाभ
स्वयंसूचना सत्र केल्यामुळे काय लाभ होतो ?, तर स्वयंसूचना सत्रांमुळे दैनंदिन जीवनात घडणार्या सर्व घटनांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाण्याची सवय होते. स्वभावदोष लक्षात आल्यानंतर येणारे नैराश्य बर्याच अंशी दूर होते. मनात येणार्या नकारात्मक प्रतिक्रिया बर्याच अंशी टाळता येतात. प्रक्रियेतील विविध कृती करतांना आपला आत्मविश्वास आणि उत्साह वाढतो. अयोग्य कृती करण्यापूर्वी, तसेच अयोग्य प्रतिक्रिया मनात उमटण्यापूर्वीच आपण सतर्क होतो. कोणत्याही प्रसंगात योग्य कृती करण्याचा आणि योग्य प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा संस्कार आपल्या चित्तावर होतो. आपल्याकडून होणार्या अयोग्य कृतींचे आणि व्यक्त होणार्या अयोग्य प्रतिक्रियांचे प्रमाण हळूहळू न्यून होते. कोणत्याही प्रसंगात योग्य कृती आणि योग्य प्रतिक्रिया यांचा विचार केल्यामुळे सदसद्विवेकबुद्धी जागृत रहाण्यास साहाय्य होते. एकूणच आपल्यातील स्वभावदोष दूर होऊ लागल्याने आपल्या आनंदातही वाढ होते.
आजच्या सत्संगात आपण स्वयंसूचना सत्र कसे करायचे आणि स्वयंसूचना सत्र केल्याने काय लाभ होतात, हे समजून घेतले. आपल्यातील स्वभावदोष समूळ नष्ट होण्यासाठी स्वयंसूचना सत्र करणे आवश्यक आहे. आज सत्संगात शिकल्याप्रमाणे आपण स्वयंसूचना सत्र करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या मनात उमटणार्या आणि व्यक्त होणार्या अयोग्य प्रतिक्रयांमुळे आपल्या साधनेची पुष्कळ हानी होते. आपल्याकडून इतर दुखावले जातात. त्यावर स्वयंसूचना सत्राच्या माध्यमातून मात करता येते; म्हणूनच पुढील सत्संगात आपण अयोग्य प्रतिक्रियांवर मात करता येऊन सकारात्मक रहाता येण्यासाठी उपयुक्त असलेली अ-२ स्वयंसूचना पद्धत शिकणार आहोत. या आठवड्यात आपण आपल्या वागण्या-बोलण्याचे, आपल्या मनात उमटणार्या अयोग्य प्रतिक्रियांचे निरीक्षण करून पुढील सत्संगात येऊया.