गेल्या आठवड्यात झालेल्या सत्संगात आपल्याकडून होणार्या अयोग्य कृतींवर अ-१ पद्धतीने कशी स्वयंसूचना द्यायची ?, ते आपण पाहिले. आज आपण मनातील अयोग्य विचार आणि भावना यांवर अ-१ पद्धतीने स्वयंसूचना कशी देता येऊ शकते, ते पहाणार आहोत.
आता आपण सत्संगाच्या मुख्य विषयाकडे वळूया. गेल्या आठवड्यात झालेल्या सत्संगात आपण आपल्याकडून होणार्या अयोग्य कृतींच्या संदर्भात अ-१ पद्धतीने स्वयंसूचना कशी द्यायची ?, हे समजून घेतले होते. आपल्या मनात येणारे अयोग्य विचार, तसेच भावना यांच्या संदर्भातही अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देता येते. दिवसभरात आपल्या मनामध्ये अनेक विचार आणि भावना उमटत असतात. त्यांतील काही योग्य असतात, तर काही अयोग्य !, उदा. मला अमुक एक कृती जमणारच नाही असे वाटणे, सतत भविष्याची काळजी वाटणे किंवा भूतकाळातील एखाद्या प्रसंगात मन अडकणे, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, इतरांवर सतत टीका करणे, ही अयोग्य विचारांची काही उदाहरणे आहेत.
काही वेळा षड्रिपुंपैकी एक किंवा अनेक रिपू कार्यरत होतात, उदा. आपल्याला एखाद्याने साहाय्य केले नाही, तर ‘परत कधीतरी ती व्यक्ती माझ्याकडे येऊ दे, मग त्याला दाखवते’, असे विचार येतात; कार्यालयात एखादा सहकारी आपल्यापेक्षा अधिक कुशल आणि हुशार असेल, तर त्याचा हेवा वाटणे, शेजारच्या काकूंकडे असलेला सोन्याचा हार पाहून तशाच प्रकारचा हार आपल्याकडेही असायला हवा, असे वाटणे, या सगळ्या अयोग्य भावना झाल्या. आपल्याकडून होणार्या अयोग्य कृतींमागेही अयोग्य विचारच कारणीभूत असतो.
एका अभ्यासानुसार दिवसभरात आपल्या मनात ६० सहस्र ते ८० सहस्र विचार येऊन जातात. याचा अर्थ तासाला आपल्या मनात अडीच ते ३ सहस्र विचार येऊन जातात. यातील बहुतेक विचार हे अनावश्यक असतात. अयोग्य विचारांमुळे आपल्या मनात नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे हे विचार कमी करणे आणि अयोग्य विचारांच्या ऐवजी योग्य विचार करण्याची सवय लागणे, यांसाठी स्वयंसूचनांची पद्धत अत्यंत प्रभावी आहे.
अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे सूत्र
स्वयंसूचना म्हणजे स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे ! अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे गणिताप्रमाणे एक सूत्र (formula) आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सत्संगातही आपण ते पाहिले. अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे सूत्र आहे, ‘अयोग्य कृती / विचार / भावना + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम यांची जाणीव + योग्य कृती !’ याप्रमाणे आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला आपल्या मनात येणारे अयोग्य विचार, तसेच भावना यांना योग्य दिशा देता येऊ शकते.
१. उदाहरणांचा अभ्यास
आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून स्वयंसूचनांचा अभ्यास करूया.
अ. चूक
समजा ‘मला आयुष्यात काही चांगले करायला कधीच जमणार नाही’, ‘मला कुठलीच गोष्ट नीट येत नाही’, अशा विचारांनी निराश वाटले’, अशी चूक आहे.
आ. विश्लेषण
हे सगळे अयोग्य म्हणजे नकारात्मक विचार आहेत. बर्याच जणांमध्ये नकारात्मक विचार करणे हा स्वभावदोष असतो. अशा व्यक्ती नेहमी उदास असतात. आपण कितीही सकारात्मक रहायचे ठरवले, तरी बर्याच प्रसंगात आपल्याला नकारात्मक विचारांवर मात करता येत नाही, असे होते. याचे कारण आपला सकारात्मक रहाण्याचा निश्चय बाह्यमनाच्या पातळीला असतो, तर ‘नकारात्मक विचार करणे’ या स्वभावदोषाचा आपल्या अंतर्मनावर संस्कार झालेला असतो. आपण जेव्हा स्वयंसूचना लिहितो, तेव्हा या सूचना आपल्या अंतर्मनाचा वेध घेतात. त्यामुळेच त्या परिणामकारक ठरतात.
इ. स्वयंसूचना
आताच्या प्रसंगासाठी स्वयंसूचना कशी होऊ शकेल ?, तर जेव्हा ‘मला आयुष्यात काही चांगले करायला जमणार नाही’, असे विचार येत असतील, तेव्हा मला जाणीव होईल की, आतापर्यंतच्या अनुभवांतून मला बरेच काही शिकायला मिळाले आहे. माझ्यातील गुणांच्या आधारे मला नक्की चांगले कार्य करता येईल, असा विचार करून मी उत्साहाने पुढील प्रयत्न करीन.
२. आता आपण अजून एका प्रसंगाचा अभ्यास करूया.
अ. चूक
समजा चूक अशी आहे की, ‘बरेच जण सिग्नल मोडतात, मग मी मोडला; म्हणून काय बिघडले ?’, या विचारांनी लाल सिग्नल असतांनाही गाडी पुढे रेटली.
आ. विश्लेषण
या प्रसंगाचा विचार केला, तर सिग्नल मोडण्याची अयोग्य कृती होण्यामागे मूलतः अयोग्य विचार कारणीभूत आहे. ‘बरेच जण चूक करतात; म्हणून मी चूक केली, तर कुठे चुकले ?’, हा अयोग्य विचार आहे. कोणी कसेही वागले, तरी आपल्याला योग्यच वागायचे आहे. नेहमी खरेपणाने आणि नियमानेच वागणे ही साधना आहे आणि तसे वागल्यामुळे माझी साधना होणार आहे.
इ. स्वयंसूचना
जेव्हा बरेच जण सिग्नल मोडतात या विचाराने मलाही ‘लाल सिग्नल लागलेला असतांना गाडी पुढे रेटावी’, असे वाटत असेल, तेव्हा वाहतूकीचे नियम मोडल्याने माझा जीव धोक्यात येऊ शकतो, याची मला जाणीव होईल अणि मी लाल सिग्नल लागल्यावर गाडी थांबवीन आणि हिरवा सिग्नल लागल्यावरच गाडी पुढे नेईन.
ई. अन्य सूत्रे
याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही त्यांनी पूर्वी केलेल्या मार्गदर्शनात हे सूत्र स्पष्ट केले आहे की, नियमपालन करण्यातून व्यक्तीची साधना होते. ‘वेळ वाया जातो’; म्हणून बरेच जण नियमांना फाटा देण्याचा प्रयत्न करतात; पण आपण नामस्मरण करत असू, तर ‘तो वेळ वाया गेला’, असे होत नाही.
अशाच प्रकारे ‘कार्यालयात थोडेसे उशिरा गेले, तरी चालते’ असे वाटणे, ‘पालक सभेत किंवा सोसायटीच्या बैठकीत मला नीट बोलायला जमेल का ?’ असे विचार येणे, ‘जाऊबाईंपेक्षा मला चांगला स्वयंपाक करता येतो’, असे वाटणे, ही काही अयोग्य विचारांची उदाहरणे आहेत. अयोग्य विचारांवर आपण अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देऊ शकतो.
३. आपण अजून एका उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून घेऊया.
अ. चूक
समजा, एक आई तिला वाटणार्या काळजीच्या संदर्भात चूक लिहित आहे. चूक अशी आहे, ‘पदवीधर झालेल्या मुलाला भविष्यात चांगली नोकरी मिळेल का’, याची खूप काळजी वाटत होती. त्या काळजीच्या विचारांत कशातच लक्ष लागले नाही.’
आ. विश्लेषण
मुलाचे चांगले व्हावेसे वाटणे, ही भावना अयोग्य नाही. कुठल्याही आई-वडिलांना तसेच वाटत असते; पण मुलाच्या भविष्याच्या अतीकाळजीमुळे ताण येत असेल किंवा सतत तेच विचार मनात घोळत असतील, तर ते दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. अतीकाळजी करणे ही अयोग्य भावना आहे.
इ. स्वयंसूचना
आताच्या प्रसंगाचा विचार केला, तर त्यावर स्वयंसूचना कशी होऊ शकेल ?, ते आपण पाहूया. ‘पदवीधर झालेल्या मुलाला चांगली नोकरी मिळण्याविषयी काळजीचे विचार माझ्या मनात येतील, तेव्हा प्रत्येकाला त्याच्या प्रारब्धानुसार जे मिळायचे ते मिळतेच, याची मला जाणीव होईल आणि मी नामजप करण्याकडे लक्ष देईन.’
किंवा
इ. स्वयंसूचना
यावर अशीही सूचना देऊ शकतो की, जेव्हा पदवीधर झालेल्या मुलाला चांगली नोकरी मिळण्याविषयी काळजीचे विचार माझ्या मनात येतील, तेव्हा ‘देव जे करेल, ते चांगलेच करेल’, अशी श्रद्धा ठेवून मी नामजपाकडे लक्ष देईन आणि मुलालाही साधना करण्यास सांगीन.
ई. अन्य सूत्रे
अतीकाळजी करणे, हे दुर्बल मानसिकतेचे लक्षण आहे. बर्याच जणांना कुठली ना कुठली काळजी वाटत असते. कुणाला नवीन घर किंवा गाडी घेण्याची, कुणाला लग्न होण्याची, कुणाला पगारवाढ होण्याची, तर कुणाला अजून कशाची ! काळजी करण्यामुळे व्यक्तीचे मन कशात लागत नाही ! त्या व्यक्तीवर एक प्रकारचा मानसिक ताण असतो. त्यामुळे वर्तमानकाळातील आनंदापासून व्यक्ती वंचित रहाते. आपली देवावरची श्रद्धा जेवढी वाढेल, तेवढी आपल्यामध्ये निर्भयता येईल. देवावरच्या श्रद्धेमुळे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळते. यात लक्षात घ्यायची अजून एक गोष्ट म्हणजे, व्यक्तीच्या जीवनात घडणार्या ६५ टक्के घटना या प्रारब्धाधीन असतात. याचा अर्थ, प्रारब्धात जे असेल, ते व्यक्तीच्या वाट्याला येते. साधनेमुळे प्रारब्ध सुसह्य होते आणि प्रारब्धभोग भोगण्याचे बळ मिळते. आपल्याला आपले क्रियमाण पूर्ण वापरायचे आहे; पण अपेक्षा किंवा चिंता न करता सर्व देवावर सोपवून वर्तमानकाळातही रहायचे आहे.
४. आपण अजून एका आणि आजच्या सत्संगातील शेवटच्या प्रसंगाचा अभ्यास करूया.
अ. चूक
समजा, ‘मैत्रीण सोनल हिचा सुंदर कलाकुसर असलेला किंमती सोन्याचा हार पाहिल्यावर माझ्याकडे सोनलइतके चांगले दागिने नाहीत; म्हणून तिचा हेवा वाटला’, असा प्रसंग आहे. यावर आपण स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी १ मिनिटाचा वेळ घ्या. हेवा वाटणे, ही अयोग्य भावना झाली. त्यावर आपल्याला स्वयंसूचना बनवायची आहे. आता आपण योग्य स्वयंसूचना कशी होऊ शकेल, ते पाहूया.
आ. स्वयंसूचना
जेव्हा मैत्रिण सोनल हिचा सोन्याचा हार पाहिल्यावर माझ्याकडे तिच्याइतके चांगले दागिने नाहीत; म्हणून हेवा वाटत असेल, तेव्हा प्रत्येक जण त्याच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार वस्तू खरेदी करतो याची मला जाणीव होईल आणि मी सोनलचे कौतुक करून तिच्या आनंदात सहभागी होईन.
इ. विश्लेषण
जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा हेवा वाटायला लागतो, तेव्हा ती व्यक्ती समोर आली, तरी मनात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्या व्यक्तीचे केवळ दुर्गुणच दिसायला लागतात. त्यातूनच अपरोक्ष टीका करण्याची किंवा ‘गॉसिपिंग’ करण्याची वृत्ती बळावते. यात मनाची ऊर्जाही पुष्कळ वाया जाते. इतरांच्या दुःखात सहभागी होणे, तुलनेने सोपे असते; पण इतरांच्या आनंदात सहभागी होणे अवघड असते. इतरांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यालाही अनेक गोष्टी शिकायला मिळू शकतात. एक तत्त्वज्ञानाचा विचार असाही आहे की, ज्या व्यक्तीचा हेवा वाटतो, त्या व्यक्तीशी मैत्रीभाव ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसे केल्यावर आपल्यातील हेवा वाटण्याची भावना कमी होऊ शकते.
स्वयंसूचनांमुळे पुष्कळ प्रमाणात लाभ होतो. आपणही नियमितपणे सारणीलिखाण करून आपल्याकडून होणार्या चुकांवर स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया.
आजच्या सत्संगात आपण अयोग्य विचार आणि भावनांच्या संदर्भात स्वयंसूचना कशा द्यायच्या ते शिकलो. या आठवड्यात आपण स्वतःच्या मनातील अयोग्य विचार आणि भावनांकडे लक्ष ठेवूया. मनातील अयोग्य विचार आणि भावनांचे निरीक्षण करून ते प्रसंग सारणीत लिहूया, तसेच आज शिकल्याप्रमाणे स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. पुढील सत्संगात आपण स्वयंसूचना सत्र कसे करायचे हे पहाणार आहोत. प्रक्रियेचा अभ्यास चांगल्याप्रकारे होण्यासाठी प्रत्येक सत्संगाला उपस्थित रहाण्याचे महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन सत्संगाला उपस्थित राहूया.