मागील सत्संगात आपण सारणी लिखाण करण्याचे महत्त्व समजून घेतले होते. आपण चुका सारणीत लिहितो म्हणजे एक प्रकारे आपल्या मनातील ताण कागदावर उतरवतो. त्यामुळे विचारांवर खर्च होणारी मनाची ऊर्जा वाचते आणि ती आपल्या प्रगतीसाठी वापरली जाते.
आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. मागील २ सत्संगात आपण सारणी लिखाण कसे करायचे ? आणि स्वयंसूचनांचे महत्त्व जाणून घेतले होते. आज आपण चुकांवर द्यायच्या स्वयंसूचनांविषयी जाणून घेणार आहोत. आता आपण स्वयंसूचना म्हणजे काय ? हे अगोदर जाणून घेऊया.
स्वयंसूचना म्हणजे काय ?
स्वयंसूचना म्हणजे काय ?, तर स्वतःकडून झालेली अयोग्य कृती, मनात आलेला अयोग्य विचार किंवा स्वतःच्या मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे ! जसे पेन्सिलने लिहिलेले काही खोडायचे असेल, तर आपण खोडरबरने खोडतो, त्याप्रमाणे आपल्या अंतर्मनात जे चुकीचे संस्कार असतात, ते स्वयंसूचनांच्या माध्यमातून पुसले जातात. स्वयंसूचनेमध्ये केवळ ३ गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. १. अयोग्य कृती २. दृष्टीकोन ३. योग्य कृती (उपाय)
यानुसार स्वयंसूचना घेऊन मनाला दिशा दिल्यास आपल्या अयोग्य कृतींमध्ये अथवा वागण्यामध्ये, अयोग्य प्रतिक्रियांमध्ये निश्चितपणे सुधारणा होते. जसे रस्त्यावर दिशादर्शन करणारे फलक किंवा दगड असतात. त्यामुळे आपण योग्य मार्गावर आहोत का ?, नेमक्या कुठल्या दिशेने आपण वळायचे आहे, हे लक्षात येते. अगदी तसेच स्वयंसूचनाही कार्य करतात. एखाद्या परिस्थितीत आपण योग्य काय विचार करायचा ?, कसे वागायचे ?, याची दिशा आपल्याला स्वयंसूचनांच्या माध्यमातून मिळते.
स्वयंसूचना बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
चूक आणि प्रसंग यांनुरूप स्वयंसूचना बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदा. स्वतःकडून होणार्या कृतीच्या स्तरावरील चुका सुधारण्यासाठी, आपले अयोग्य विचार, अयोग्य भावना पुसून टाकण्यासाठी अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देतात. कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे मनात प्रतिक्रिया उमटतात, त्या वेळी अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात. एखाद्या प्रसंगाची भीती वाटत असेल, आत्मविश्वास कमी असेल, एखाद्या सूत्राचा न्यूनगंड वाटत असेल, तर तो दूर करण्यासाठी अ-३ पद्धतीने स्वयंसूचना देतात. समोरच्या व्यक्तीचे वागणे सुधारणे किंवा परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आपल्या हातात असल्यास आ-१ पद्धतीने, तर एखादी परिस्थिती पालटणे आपल्या हातात नसल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला सुधारण्यास आपल्याला शक्य नसेल, तेव्हा आ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात. नामजपाचा संस्कार होण्यासाठी इ-१ पद्धतीने सूचना देऊ शकतो, तर आपल्या स्वभावात पालट होत नसल्यास आपल्याला पेलवतील अशा शिक्षापद्धतीचाही अवलंब करण्यासाठी इ-२ पद्धतीने सूचना घेऊ शकतो. स्वयंसूचनांच्या या वेगवेगळ्या सात पद्धती आहेत. आजच्या सत्संगात आपण ‘अ-१’ या पद्धतीप्रमाणे स्वयंसूचना कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. पुढच्या-पुढच्या सत्संगामध्ये आपण स्वयंसूचनांच्या एकेक पद्धती समजून घेऊया.
‘अ-१’ स्वयंसूचना कोणत्या स्वभावदोषांवर द्यावी ?
‘अ १’ स्वयंसूचना पद्धतीचा उपयोग करून एकाग्रता नसणे, मनोराज्यात रमणे, उतावळेपणा, धांदरटपणा, आळशीपणा, अव्यवस्थितपणा, वक्तशीरपणा नसणे, अतीचिकित्सकपणा, इतरांचे लक्ष वेधून घेणे, स्वार्थीपणा, निर्णयक्षमतेचा अभाव, गर्विष्ठपणा, संशयीपणा, अतीमहत्त्वाकांक्षी असणे यांसारख्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देऊन मात करता येऊ शकते. एकाग्रता नसणे म्हणजे कुठलेही कार्य करतांना त्यात लक्ष नसणे, मनोराज्यात रमणे म्हणजे मनातल्या मनात स्वप्नरंजन करत रहाणे ! कधीकधी गृहिणी दूध तापवायला ठेवून तिथे उभ्या असतात; पण मनात इतर विचार चालू असल्यामुळे दूध उतू जाते, हे मनोराज्यात रमण्यामुळे होते. उतावीळपणामुळे सगळ्या कृती उरकण्याची घाई केली जाते. धांदरटपणा म्हणजे कोणतीही कृती गांभीर्याने, लक्षपूर्वक न करणे ! आळशीपणा म्हणजे कोणतीही कृती करण्याचा आळस करणे. हा आळस केवळ सकाळी लवकर उठण्याच्या संदर्भात असतो, असे नाही, तर स्वतःचे आवरण्याचा, काम करण्याचा किंवा इतर गोष्टींचाही आळस असतो. आळशीपणा मुरलेला असेल, तर कामे प्रलंबित टाकण्याची म्हणजेच चालढकलपणा करण्याची किंवा कामचुकारपणाची म्हणजे काम करण्यास टाळाटाळ करण्याची वृत्ती बळावू शकते. अव्यवस्थितपणामुळे घरातील वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्या जातात. निर्णयक्षमतेच्या अभावामुळे कोणताही निर्णय घेता येत नाही. ‘हे करू कि ते करू ?’, अशी सतत मनाची द्विधा स्थिती असते. स्वार्थीपणामुळे केवळ स्वतःचाच विचार केला जातो. स्वार्थी व्यक्तींमध्ये इतरांचा विचार, इतरांविषयी तितकेसे प्रेम नसते. अतीचिकित्सकपणा, इतरांचे लक्ष वेधून घेणे, गर्विष्ठपणा, संशयीपणा, अतीमहत्त्वाकांक्षी असणे, असेही स्वभावदोष असतात. हे स्वभावदोष अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देऊन दूर केले जाऊ शकतात. दारू पिणे, नखे कुरतडण्यासारख्या सवयी, तोतरे बोलणे, आठ वर्षांनंतरही अंथरुणात लघवी करणे आदी अयोग्य सवयीही ‘अ-१’ पद्धतीने दूर करता येऊ शकतात.
अ-१ स्वयंसूचना पद्धत कधी वापरली जाते ?
आपल्याकडून होणार्या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार, तसेच अयोग्य भावना दूर करण्यासाठी अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देतात. अयोग्य कृती म्हणजे कृतीच्या स्तरावर होणार्या चुका ! अयोग्य विचार आणि अयोग्य भावना हे सहसा मनाच्या स्तरावर असतात. उदाहरणार्थ, कपड्यांच्या घड्या न करताच कपडे तसेच कोंबणे, ही झाली अयोग्य कृती ! ‘कपडे कपाटात कसेही कोंबले, तरी चालू शकतात. ते बाहेर दर्शनी भागात रहात नाहीत, एवढे पुरेसे आहे’, हा झाला अयोग्य विचार ! मित्राचे चांगले कपडे पाहून त्याचा हेवा वाटणे, ही झाली आपली अयोग्य भावना ! तर आज आपण प्राधान्याने कृतीच्या स्तरावर होणार्या चुकांच्या संदर्भात स्वयंसूचना कशी बनवायची हे पहाणार आहोत.
कृतीच्या स्तरावरील चुकीसाठी स्वयंसूचना बनवण्याचे सूत्र
आपल्याला स्वयंसूचना योग्य पद्धतीने बनवता यावी, यासाठी गणिताप्रमाणे एक सूत्र (formula) आहे. त्यानुसार सूचना बनवली, तर ती अचूक होईल. कृतीच्या स्तरावरील चुकांसाठी स्वयंसूचना बनवतांना आपण ‘अयोग्य कृती + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम + योग्य कृती’, हे सूत्र लक्षात घेऊया.
अ-१ स्वयंसूचना पद्धतीचे साधारण ३ टप्पे आहेत. ते म्हणजे अयोग्य कृती, त्यानंतर योग्य दृष्टीकोन किंवा त्या चुकीमुळे होणारा परिणाम आणि तिसरा टप्पा म्हणजे योग्य कृती !
या पद्धतीनुसार केलेल्या वाक्यरचनेमुळे व्यक्तीला अयोग्य कृती, भावना, विचार यांची जाणीव होते आणि त्यावर ताबा मिळवणे शक्य होते. एका प्रसंगाच्या अनुषंगाने या पद्धतीनुसार स्वयंसूचनेची वाक्यरचना कशी करायची ते समजून घेऊया.
१. स्वयंसूचना बनवण्याचे सूत्र
स्वयंसूचना बनवतांना मगाशी पाहिलेल्या सूत्रानुसार ‘तेव्हा’ या शब्दापूर्वी अयोग्य कृती लिहायची. त्यानंतर अयोग्य परिणाम किंवा दृष्टीकोन यांची जाणीव होईल, असे लिहावे, तर शेवटी त्या प्रसंगात कोणती योग्य कृती करायची आहे, ते लिहायचे. सार सांगायचे झाले, तर ‘जेव्हा माझ्याकडून अयोग्य कृती होईल, तेव्हा परिणामांची किंवा योग्य विचार काय असायला हवा, याची मला जाणीव होईल आणि मी योग्य कृती करीन’, अशा पद्धतीने आपल्याला स्वयंसूचना बनवायची आहे. काही उदाहरणांच्या माध्यमातून आपण स्वयंसूचना कशा बनवायच्या, हे पाहूया.
१ अ. ‘अ-१’ पद्धतीने स्वयंसूचना बनवण्याचे उदाहरण
अयोग्य कृती : मी खणात कपडे घड्या घालून न ठेवता कोंबले.
योग्य दृष्टीकोन / परिणाम : दिसायला वाईट दिसते/कपडे शोधतांना वेळ जातो/कपडे लवकर खराब होतात / कपाटात आणि वास्तूत असात्त्विक स्पंदने निर्माण होतात.
योग्य कृती : कपड्यांच्या नीट घड्या घालून ते कपाटात ठेवणे.
१ आ. प्रसंग आणि स्वयंसूचना
प्रसंग
‘मी खणात कपडे घड्या घालून न ठेवता कसेही कोंबते’, अशी समजा आपल्याकडून होणारी चूक आहे. या प्रसंगाचा विचार केला, तर अयोग्य कृती काय आहे ?, तर खणात कपडे ठेवतांना ते घड्या न करता तसेच कोंबणे ! या प्रसंगात योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम काय असू शकतो ?, हे पाहूया. खणात कपडे कोंबल्याने काय परिणाम होतो ?, तर ते दिसायला वाईट दिसते किंवा कपडे नुसते कोंबल्याने पुन्हा कपडे शोधतांना वेळ जातो किंवा कपडे लवकर खराब होऊ शकतात किंवा कपाटात आणि वास्तूत असात्त्विक स्पंदने निर्माण होतात. या अनुषंगाने योग्य कृती काय असेल, तर कपड्यांच्या नीट घड्या घालून ते खणामध्ये ठेवणे. या चुकीच्या मुळाशी स्वभावदोष कोणता आहे ?, तर अव्यवस्थितपणा ! आता आपण या प्रसंगात अ-१ स्वयंसूचना पद्धतीनुसार स्वयंसूचना कशी होईल ते पाहूया.
स्वयंसूचना
जेव्हा मी खणामध्ये कपडे ठेवतांना त्यांच्या घड्या घालण्याऐवजी तसेच गुंडाळून ठेवत असेन, तेव्हा ते दिसायला खराब दिसते, याची मला जाणीव होईल आणि मी कपड्यांच्या नीट घड्या घालूनच ते खणामध्ये ठेवीन.
किंवा
जेव्हा मी खणामध्ये कपडे ठेवतांना त्यांच्या घड्या घालण्याऐवजी तसेच गुंडाळून ठेवत असेन, तेव्हा त्यामुळे कपडे शोधण्यास वेळ लागू शकतो, याची मला जाणीव होईल आणि मी कपड्यांच्या नीट घड्या घालूनच ते खणामध्ये ठेवीन.
किंवा
जेव्हा मी खणामध्ये कपडे ठेवतांना त्यांच्या घड्या घालण्याऐवजी, तसेच गुंडाळून ठेवत असेन, तेव्हा त्यामुळे कपडे लवकर खराब होऊ शकतात, याची मला जाणीव होईल आणि मी कपड्यांच्या नीट घड्या घालूनच ते खणामध्ये ठेवीन.
किंवा
जेव्हा मी खणामध्ये कपडे ठेवतांना त्यांच्या घड्या घालण्याऐवजी, तसेच गुंडाळून ठेवत असेन, तेव्हा त्यामुळे कपाटात आणि वास्तूत असात्त्विक स्पंदने निर्माण होऊ शकतात, याची मला जाणीव होईल आणि मी कपड्यांच्या नीट घड्या घालूनच ते खणामध्ये ठेवीन.
एकाच चुकीच्या संदर्भात चार स्वयंसूचना बनवल्या आहेत. यातून एकाच अयोग्य कृतीच्या संदर्भात निरनिराळे दृष्टीकोन घेऊन किंवा परिणामांची जाणीव करून देऊन आपण स्वयंसूचना कशा बनवू शकतो, हे आता आपल्या लक्षात आले असेल.
स्वयंसूचनेमधील दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तीनुरूप थोडाफार निराळा असू शकतो. जो दृष्टीकोन आपल्या मनाला भावतो किंवा मानवतो, त्यानुसार आपण त्या दृष्टीकोनाचा किंवा होणार्या परिणामांचा स्वयंसूचनेमध्ये अंतर्भाव करू शकतो.
आता आपण एक सूक्ष्मातील प्रयोग घेणार आहोत
सूक्ष्मातील प्रयोग : व्यवस्थित आणि अव्यवस्थित कपाट
अव्यवस्थितपणे ठेवलेल्या वस्तूंमधून कशा प्रकारे स्पंदने निर्माण होऊ शकतात, हेही आपण पाहूया. तुम्हाला ‘स्क्रीन’वर दोन चित्रे दिसत असतील. त्या दोन्ही चित्रांकडे थोडा वेळ पाहून कुठल्या चित्रातून चांगली स्पंदने जाणवतात, याचा अभ्यास करा.
कोणत्या चित्राकडे पाहून आपल्याला चांगले वाटले ?
व्यवस्थितपणे लावलेल्या कपाटाकडे पाहून आपल्याला चांगले वाटते. याचे कारण, व्यवस्थितपणे लावलेल्या कपाटातून चांगल्या लहरी प्रक्षेपित होतात, तर अव्यवस्थित वस्तूंकडे रज-तम लहरी म्हणजे नकारात्मक लहरी आकर्षित आणि प्रक्षेपित होतात. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आपले मन आणि शरीर यांवर होत असतो. आपल्या आजूबाजूला वस्तू अव्यवस्थित ठेवल्या असतील, त्यातून निर्माण होणाऱ्या त्रासदायक स्पंदनांमुळेही वातावरण बिघडते. ईश्वराचे स्वरूप सत्यम्-शिवम्-सुंदरम् असे आहे. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व वस्तू व्यवस्थितरित्या ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रयोगातून आपल्यामध्ये व्यवस्थितपणा असण्याचे किती महत्त्व आहे ते लक्षात येते.
अयोग्य कृती आणि अभ्यास
स्वयंसूचनांच्या संदर्भात आपण अजून एक उदाहरण पाहूया. समजा आपल्याला चहा पिऊन झाल्यावर चहाचा कप विसळून जागेवर ठेवायची सवय नाही. आपण चहा पिऊन झाल्यावर कप तसाच पटलावर किंवा टीपॉयवर ठेवत असू, तर या चुकीच्या संदर्भात स्वयंसूचना कशी बनवायची ते पाहूया. स्वयंसूचना लिहिण्याच्या आधी अयोग्य कृती होण्यामागे नेमका कुठला स्वभावदोष कार्यरत आहे, याचा अभ्यास करणेही महत्त्वाचे असते. हा अभ्यास कसा करायचा ?, तर मनाला ‘अशी कृती का झाली ?’, असा प्रश्न विचारायचा. आताच्या उदाहरणामध्ये अयोग्य कृती काय आहे, तर चहाचा पेला न धुणे ! मग मनाला प्रश्न विचारायचा, चहाचा पेला मी का धुतला नाही ?, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपले जे चिंतन होईल, त्या आधारे आपल्याला स्वभावदोष आणि त्या अनुषंगाने स्वयंसूचना लिहिता येईल. चहाचा पेला धुण्याचा कंटाळा का येतो ? पेला धुवायला विसरतो कि पेला धुणे कमीपणाचे वाटते ? याचा अभ्यास करायला हवा. एखाद्या चुकीचा अभ्यास करतांना त्या पाठीमागची विचारप्रक्रिया लक्षात घेऊन मूळ दोष कोणता आहे ते लक्षात घेऊन त्यावर स्वयंसूचना बनवायची असते. आता या प्रसंगात विचारप्रक्रिया कशी असू शकते आणि त्यानंतर नेमका स्वभावदोष काय असेल ते शोधायचे आहे.
विचारप्रक्रिया आणि स्वभावदोष
* चहाचा पेला धुवायचा कंटाळा येतो – आळशीपणा
* चहाचा पेला धुवायचे विसरते – विसराळूपणा
* पेला धुणे कमीपणाचे वाटते – अहंचा पैलू
चहाचा पेला न धुण्यामागे पेला धुण्याचा कंटाळा येतो, पेला धुवायला विसरतो ? कि पेला धुणे कमीपणाचे वाटते ?, याचा विचार करावा. चहाचा पेला धुवायचा कंटाळा येत असेल, तर त्यामागे स्वभावदोष कोणता येईल ?, तर आळशीपणा ! पेला धुवायचे विसरत असू, तर स्वभावदोष येईल विसराळूपणा ! पेला धुणे कमीपणाचे वाटत असेल, तर तो आपल्या अहंकाराचा भाग असेल. यातील अहंचे पैलू म्हणजे काय, त्यावर स्वयंसूचना कशी द्यायची, याविषयी आपण पुढच्या सत्संगांमध्ये जाणून घेणार आहोत. आता आपण आळशीपणा आणि विसराळूपणा या स्वभावदोषांवर कशी सूचना द्यायची, ते समजून घेऊया.
आता या प्रसंगात ‘अ-१’ पद्धतीने स्वयंसूचना कशी बनेल, ते पाहूया.
अयोग्य कृती कोणती ?: चहा पिऊन झाल्यावर चहाचा कप विसळण्याचा कंटाळा आल्याने चहाचा कप टिपॉयवर तसाच ठेवला.
योग्य दृष्टीकोन / परिणाम काय असू शकतो ? : चहा पिऊन झाल्यावर कप तसाच टिपॉयवर ठेवल्याने तो वाळून जाऊन घासण्यासाठी वेळ लागू शकतो. / चहा पिऊन झाल्यावर कप तसाच ठेवल्याने अव्यवस्थित दिसते.
या दोषावर मात करण्यासाठी योग्य कृती काय करणार ? : चहा पिऊन झाल्यावर मी लगेच चहाचा कप विसळून ठेवीन.
आता आपण अ १ स्वयंसूचना पद्धतीच्या सूत्राप्रमाणे सूचना बनवूया.
आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे ‘अ-१’ स्वयंसूचना बनवण्यासाठी सूत्र कोणते आहे, तर ‘अयोग्य कृती + योग्य दृष्टीकोन किंवा परिणाम + योग्य कृती’ त्यानुसार स्वयंसूचना बनवूया.
स्वयंसूचना : चहा पिऊन झाल्यावर मी चहाचा कप विसळून जागेवर ठेवण्याचा कंटाळा करत असेन, तेव्हा त्यामुळे तो तसाच वाळून खराब होऊ शकतो, याची मला जाणीव होईल आणि मी चहाचा कप लगेच विसळून जागेवर ठेवीन.
किंवा
चहा पिऊन झाल्यावर चहाचा कप विसळून जागेवर ठेवण्याचे विसरलो असल्यास स्वयंसूचना कशी असेल ? तर
स्वयंसूचना : चहा पिऊन झाल्यावर चहाचा कप विसळून जागेवर ठेवायचे राहत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि मी चहाचा कप लगेच विसळून जागेवर ठेवीन.
सर्वांना ‘अ-१’ ही पद्धत लक्षात आली का ? सूत्रानुसार आपली वाक्यरचना योग्य आहे ना ?, स्वयंसूचना मूळ दोषावर घेतली का ? आणि आपण लिहिलेली उपाययोजना वस्तूनिष्ठ किंवा कृतीत आणता येण्याजोगी आहे ना ?, ही सूत्रे स्वयंसूचना बनवतांना लक्षात घ्यावीत.
आता अजून एका प्रसंगाचा आपण सराव करूया. आता जसा आपण चुकीचा अभ्यास केला त्याप्रमाणे अजून एका प्रसंगात स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया. समजा रात्री झोपण्यापूर्वी दूध तापवण्याचा मला विसर पडतो. त्यामुळे सकाळी दूध नासते. आता आपण या चुकीवर १ मिनिटात स्वयंसूचना बनवण्याचा प्रयत्न करूया.
स्वयंसूचना : जेव्हा मी स्वयंपाकघरातील आवराआवर करून तेथून बाहेर पडीन, तेव्हा प्रतिदिन माझ्याकडून दूध तापवायचे राहिले, तर दुसर्या दिवशी दूध नासत असल्याची मला जाणीव होईल आणि मी लगेचच दूध तापवीन.
सूचना क्रमांक २ : जेव्हा मी रात्री स्वयंपाकघरातील आवराआवर पूर्ण करीन, तेव्हा तेथून बाहेर पडण्यापूर्वीच मला दूध तापवण्याची आठवण (जाणीव) होईल आणि मी दूध तापवूनच स्वयंपाकघरातून बाहेर पडीन.
कोणाला असे वाटू शकते की, चुकीच्या पुढे स्वयंसूचना दिल्याने लगेच सुधारणा होईल का ?, तर त्यांनी अजिबात असा विचार करायला नको. स्वभावदोेष निर्मूलनाची ही पद्धत मनापासून राबवली, तर आपल्या अयोग्य वागण्यामध्ये किंवा चुकांमध्ये १०० टक्के सुधारणा होते. जसे साखरेची गोडी चाखल्याविना कळत नाही, त्याप्रमाणे आपल्यातील अयोग्य संस्कार नष्ट होत चालल्याचे अनुभवायचे असेल, तर ही स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवायला हवी. या आठवड्यात आपण आपल्याकडून कृतीच्या स्तरावर होणार्या चुकांसाठी अशा पद्धतीने स्वयंसूचना बनवून त्या सारणीमध्ये लिहूया.
आपण पुढील सत्संगात अयोग्य विचार आणि भावना यांविषयी समजून घेणार आहोत.