सत्संग १६ : आध्यात्मिक त्रास आणि उपाय (सात्त्विक कापूर आणि अत्तर)

गेल्या आठवड्यात आपण आध्यात्मिक त्रास म्हणजे काय, वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचा आपल्यावर कसा परिणाम होतो, हे समजून घेतले. आध्यात्मिक उपायांच्या अंतर्गत आपण आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी दर तासाला प्रार्थना करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आपल्याकडून प्रार्थना झाल्या का ? त्या करतांना आपल्याला काय जाणवले ? याविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभव असतील किंवा प्रयत्न करतांना काही अडचणी आल्या असतील, तर आपण मोकळेपणाने खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकता.

आजच्या सत्संगामध्ये आपण आध्यात्मिक उपाय यामधील अत्तर आणि कापूराचे उपाय हा एक महत्त्वपूर्ण पैलू समजून घेणार आहोत.

 

आध्यात्मिक अडथळ्यांचे स्वरूप

आता आपण सत्संगाच्या मुख्य विषयाकडे वळूया. गेल्या आठवड्यात आपण आध्यात्मिक उपायांच्या अंतर्गत आध्यात्मिक प्रार्थना कोणती करायची, हे समजून घेतले होते. आज आपण अजून एका प्रभावी आध्यात्मिक उपायाविषयी जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांनी असे अनुभवले असेल की, नामजपाला बसायचे ठरवले, तर आपल्याला बसू नये, असे वाटते. नामजप, सत्सेवा किंवा धर्मसेवा करण्याच्या वेळेतच नेमके आपल्याला काही तरी काम मागे लागते, सेवा करतांना अचानक थकवा येऊन निरुत्साह जाणवतो. पुष्कळ प्रयत्न करूनही यश मिळत नाही. कौटुंबिक समाधान नसते. अशा प्रकारे आपल्याला काही त्रास होत असेल, तर त्याचे कारण आध्यात्मिक असू शकते, हे समजून घ्यावे. कलियुगात प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतो.

 

आध्यात्मिक उपायांचा परिणाम

आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असते. आध्यात्मिक उपायांमुळे आपले शरीर, मन, तसेच बुद्धी यांवर आलेले नकारात्मक आणि अनिष्ट आवरण दूर व्हायला साहाय्य होते. आध्यात्मिक उपायांमुळे आपल्याभोवती एक प्रकारे संरक्षककवच निर्माण होते.

आजच्या सत्संगात आपण सात्त्विक कापूर आणि अत्तर उपायांविषयी जाणून घेऊया.

 

अत्तर उपाय

१. सूक्ष्मातील प्रयोग

अत्तराच्या उपायांविषयी जाणून घेण्याआधी आपण एक छोटासा प्रयोग करूया. आपण सुगंध, सुगंध… हा शब्द मनातल्या मनात थोडा वेळ उच्चारूया आणि त्यानंतर दुर्गंध, दुर्गंध हा शब्द मनातल्या मनात थोडा वेळ उच्चारूया. सुगंध हा शब्द उच्चारल्यानंतर किती जणांना चांगले वाटले ?

आपल्याला ‘दुर्गंध’ या शब्दापेक्षा ‘सुगंध’ हा शब्द उच्चारल्यावर चांगले वाटते. आपण आता प्रत्यक्ष कुठला सुगंध घेतला नव्हता, तरीही केवळ शब्द उच्चारून आपल्याला त्यातील स्पंदने जाणवली. याचे कारण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात. आपण जेव्हा रामाचा जप करतो, तेव्हा रामाचा स्पर्श, रूप, रस, रामाचा गंध आणि रामाची शक्ती तेथे असते. सुगंध हा देवतांचा गुणधर्म आहे. देवाची पूजा करतांना आपण उदबत्ती लावतो, कापसाने देवाच्या मूर्तींना अत्तर लावतो, ते त्याचसाठी !

दैवी शक्ती सुगंधाकडे आकर्षित होतात, तर दुर्गंधाच्या ठिकाणी अनिष्ट शक्ती असते; म्हणून आपल्याला देवळात चांगले वाटते; पण कचराकुंडीच्या ठिकाणी चांगले वाटत नाही. आपले आजूबाजूचे; म्हणजे सोसायटीमधील किंवा कार्यालयातील वातावरण सहसा अस्वच्छ किंवा असात्त्विक असते. अस्वच्छता असेल, तर तेथे दैवी शक्ती येतील का ?, तर नाही. त्या ठिकाणी अनिष्ट शक्तींचेच प्राबल्य असणार ! अशा वातावरणात आपले रक्षण होण्यासाठी सतत सुगंध येत राहील, यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. अत्तराच्या उपायांतून हे साध्य होते.

२. अत्तराचे उपाय कसे करायचे ?

अत्तराचे उपाय म्हणजे काय करायचे आहे, तर अधूनमधून अत्तर आपल्या हाताला लावून आपल्याला त्याचा सुगंध घ्यायचा आहे. असे केल्याने सुगंधाच्या माध्यमातून एक प्रकारची सकारात्मक आणि दैवी शक्ती त्या ठिकाणी कार्यरत होते. सुगंधाच्या माध्यमातून आपल्याला ईश्वरी चैतन्य मिळते, तसेच मनालाही उत्साह येतो. आपण आपल्या हाताला किंवा कपड्यांना अत्तर लावू शकतो. आपण दर १ घंट्याने अत्तराचे उपाय करू शकतो. देवपूजेतील अत्तर आणि स्वतःला लावण्याचे अत्तर वेगवेगळे ठेवावे.

३. सुगंधामुळे चांगले वाटण्यामागचे आध्यात्मिक कारण

सुगंधामुळे चांगले वाटण्यामागे आध्यात्मिक कारणही आहे. सगळ्यांत लवकर मनाच्या आत जाणारी तत्त्वे आहेत, ध्वनी आणि गंध ! याचे कारण ही दोन्ही तत्त्वे वायूशी संबंधित आहेत. ध्वनी वायूद्वारे पुढे जातो आणि गंधसुद्धा हवेच्या, म्हणजे श्वासाद्वारेच पुढे जातो. त्यामुळे सुगंध घेतला की, मनाची मरगळ लवकर दूर होते.

आपण देवाला डेलिया, ऑर्किड इत्यादी फुले वाहत नाही; कारण ती कृत्रिम वाटतात आणि त्यांना गंधही नसतो. अपवादात्मक एखादे फूल वगळता देवाला सुगंध असणारी फुले वाहिली जातात. त्यातही विशिष्ट देवतेला विशिष्ट सुगंधी फुलेच वाहिली जातात, उदा. कमळ श्री लक्ष्मीदेवीला वाहिले जाणे, यामागे पुष्कळ सखोल अभ्यास आहे. यात ‘ती संबंधित देवता आणि त्या फुलाचा रंग, गंध, तसेच अन्य गोष्टी यांचा अभ्यास असून ते एक शास्त्र आहे.’

 

कापूर उपाय

१. कापूर उपाय करण्याची पद्धत

कापूराचा आध्यात्मिक उपायही सहज करता येण्यासारखा आहे. कापराचा उपाय करतांना भीमसेनी कापराची थोडीशी भुकटी करून ती एका तळहातावर घ्यावी. दुसरा तळहात कापराची पूड असलेल्या तळहातावर चोळून नंतर दोन्ही तळहात आपल्या तोंडवळ्यावर झाकून दीर्घ श्वासाद्वारे आपल्याला सुगंध घ्यायचा आहे. त्या वेळी आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करावी. आपल्याकडे भीमसेनी कापूर उपलब्ध असेल, तर आपण आताही सांगितल्याप्रमाणे उपाय करू शकतो. आपण रात्री झोपतांनाही अंथरूणावर कापराची थोडीशी भुकटी टाकू शकतो. खणामध्ये आपल्या कपड्यांच्या घड्यांमध्ये कापूर ठेवू शकतो.

२. सनातनच्या कापराविषयीची अनुभूती

कापूर-अत्तर उपाय केल्यामुळे अनेकांना चांगले अनुभवही आले आहेत. मिरज येथील एका ताईंनी त्यांच्या वर्षभराच्या गव्हाच्या धान्यसाठ्यामध्ये सनातनचा सात्त्विक भीमसेनी कापूर ठेवला होता. प्रतीवर्षी धान्याला कीड लागू नये; म्हणून त्या खडेमीठ, लवंगा, बोरीक पावडर, एरंडेल तेल इत्यादी घालून ठेवत होत्या. सर्व काळजी घेऊनही धान्याला कीड लागत असे; पण सनातनचा कापूर ठेवल्यावर त्या वर्षी गव्हामध्ये एकही किडा नव्हता. आपण श्रद्धेने आध्यात्मिक उपाय केले, तर बुद्धीपलीकडची प्रचिती येते, याचे हे उदाहरण !

३. कापूर उपायांचा परिणाम

भीमसेनी कापूर आयुर्वेदाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कापराच्या सुगंधामुळे आपल्यावर आलेले नकारात्मक आणि अनिष्ट शक्तींच्या आवरणाचे विघटन होते.

४. सनातनची सात्त्विक अत्तरे आणि भीमसेनी कापूर

आध्यात्मिक उपायांसाठी सनातनची चमेली, चंदन, केवडा आणि मोगरा या सुगंधांची अत्तरे उपलब्ध आहेत. सनातनचा सात्त्विक भीमसेनी कापूर उपलब्ध आहे. या उत्पादनांचे वैशिष्ट्य म्हणजे सनातनची सर्व उत्पादने ही सात्त्विक पद्धतीने नामस्मरण करत बनवल्याने त्यामध्ये अजून चैतन्य आहे. आपण आपल्या संपर्कात असणाऱ्या सनातनच्या साधकांकडून किंवा www.sanatanshop.com या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून ही अत्तरे घेऊ शकता.

५. सनातनचा शुद्ध सात्त्विक भीमसेनी कापूर

कापूर-अत्तर उपाय कसे करायचे ?, ते आपल्या लक्षात आले ना ! या आठवड्यात आपण प्रतिदिन १ घंट्याने कापूर-अत्तर यांचे उपाय करण्याचा प्रयत्न करूया. सकाळी ९ वाजता आपण उपाय केले, तर पुढे १० वाजता पुन्हा उपाय करू शकतो. कापूर-अत्तर दोन्ही उपाय एकापाठोपाठ एक न करता त्यामध्येही थोडे अंतर ठेवू शकतो. दिवभरात किमान ७ ते ८ वेळा आपले कापूर-अत्तर उपाय होतील, असे प्रयत्न करूया. नियमित उपाय केल्यानंतर आपल्याला काय जाणवले ?, ते पुढच्या सत्संगामध्ये सांगूया.

होमिओपॅथीची औषधे चालू असतील, तर कापूर-अत्तर किंवा तीव्र गंध असलेले काही वापरायचे कि नाही, अशी काही जणांना शंका असते. अशी शंका असेल, तर त्यांनी त्यांच्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे कृती करावी.

Leave a Comment