सत्संग १५ : आध्यात्मिक त्रास आणि उपाय (प्रार्थना)

मागील सत्संगात आपण सारणी लिखाण करण्याचे महत्त्व समजून घेतले होते. आपण चुका सारणीत लिहितो म्हणजे एक प्रकारे आपल्या मनातील ताण कागदावर उतरवतो. त्यामुळे विचारांवर खर्च होणारी मनाची ऊर्जा वाचते आणि ती आपल्या प्रगतीसाठी वापरली जाते. आपण सर्वांनी सारणी लिखाण करण्याचा प्रयत्न केला ना ?

आपण या सत्संगांना जोडायला लागलो, त्यापूर्वी गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी तीन प्रवचने ऐकली. या प्रवचनांतून आपण लक्षात घेतले की जीवनातील साधारण ८० टक्के समस्या निर्माण होण्यामागे आध्यात्मिक कारण असू शकते. या समस्यांशी लढतांना साधना करणार्‍या व्यक्तीला आध्यात्मिक उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. जशी एखादी इमारत उभी करण्यासाठी आपल्याला पाया भक्कम करावा लागतो त्याप्रमाणे आनंदप्रप्तीसाठी आवश्यक गुरुकृपायोगानुसार साधनेची इमारत उभी करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक बळ आणि संरक्षक कवच आवश्यक असते. आपण साधना करत असतांना सामान्य ‘व्यक्ती ते साधक, साधक ते शिष्य, शिष्य ते संत’, असा प्रवास असतो. मनाची शुद्धी झाल्यास आपण संतत्वाकडे उन्नतीचा प्रवास करू शकतो; म्हणून मनाच्या शुद्धीसाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया समजून घ्यायला सुरुवात झाली आहे. ही स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे मंथन आहे. ती प्रक्रिया समजून घेऊन कृतीत आणता यावी यासाठी आपल्याला जीवनात येणारे अडथळे दूर कसे करावेत ? हा भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आध्यात्मिक त्रास म्हणजे काय ? आणि यावर अध्यात्मिक उपाय कसे करावेत ?, हे समजून घेऊया. आपण सहज आणि सोपे असे आध्यात्मिक उपाय कसे करावेत हे पुढील तीन सत्संगांमध्ये समजून घेणार आहेत.

आता आपण आजच्या मुख्य विषयाकडे वळूया. बरेचदा चांगली कृती करतांना त्यात अडथळे येतात. त्याचे अगदी साधे उदाहरण म्हणजे नामजप करणे ! एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करतांना अनेकदा आपले मन भरकटते, नामजप करण्याचा विसर पडतो किंवा नामजपाला बसण्याच्या वेळेला नेमके काही तरी काम येते, असे आपण अनुभवले असेल ना ! याउलट एखादी ‘टीव्ही’वरची मालिका पहायची असेल, तर आपल्याला मन एकाग्र करावे लागते का ? बरेच जण मालिकेशी समरस होऊन ती पहात असतात. असे का होते ?, चांगल्या कार्यामध्ये किंवा साधनेमध्ये अडथळे का येतात ?, हे आपण आज समजून घेणार आहोत. आजचा विषय महत्त्वपूर्ण असल्याने आपण तो पूर्ण एकाग्रतेने ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

अनिष्ट शक्तींचे होणारे त्रास

समाजात जशा चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती असतात, तशाच त्या वातावरणातही असतात. समाजातील वाईट प्रवृत्ती ज्याप्रमाणे स्थूल रूपात कार्यरत दिसतात, तशा वातावरणात त्या सूक्ष्मातून कार्यरत असतात. ज्याला आपण अध्यात्माच्या भाषेत दैवी आणि अनिष्ट शक्ती असे संबोधतो, त्यांनाच वैज्ञानिक भाषेत ‘सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा’, असे म्हणतात. वातावरणातील सकारात्मक किंवा दैवी शक्ती साधना करणाऱ्यांना साहाय्य करतात, तर नकारात्मक किंवा अनिष्ट शक्ती साधना करणार्‍यांच्या साधनेत किंवा सत्कार्यात बाधा निर्माण करतात.

सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा किंवा दैवी आणि अनिष्ट शक्ती यांमध्ये पूर्वापार संघर्ष चालू आहे. प्राचीन काळी ऋषिमुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यात विघ्ने आणत, ऋषिमुनींना जिवे मारत, गायींना मारून खात, हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. असुरांनी त्रेता आणि द्वापार युगांत देवतांना, तसेच प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या साक्षात् अवतारांनाही त्रास दिला; पण देवता आणि अवतार यांनी असुरांशी युद्ध करून धर्मविजय मिळवला. आतापर्यंत जितकी देवासुर युद्धे झाली, त्यांत अंतिमतः देवता, अवतार आणि देवतांचा पक्ष घेऊन लढणाऱ्यांचा विजय झाला आहे, हा इतिहास आहे. हा देवासुर संग्राम केवळ प्राचीन काळी चालू होता, असे नाही, तर तो युगानुयुगे चालूच असतो. साधनेत येणारे अडथळे किंवा आपल्याला साधनेला होणारा विरोध हा त्याचाच भाग असू शकतो. त्यामुळे आपण सतर्क राहून आध्यात्मिक उपाय आणि साधना चिकाटीने करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

 

अनिष्ट किंवा नकारात्मक शक्ती म्हणजे काय ?

पूर्वीच्या काळी आसुरी शक्ती राक्षसस्वरूपात स्थूलातून प्रकट होत असत. रावण, शुंभ-निशुंभ, हिरण्यकश्यपू, सिंदुरासूर या मानवी रूपातील आसुरी शक्तीच होत्या. सध्याच्या काळात या अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून कार्य करत असतात. सामान्यतः वातावरणातील नकारात्मक उर्जेमुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक असे विविध स्वरूपाचे त्रास होतात. आपल्याला स्पंदनांच्या माध्यमातूनही त्याविषयी जाणीव होऊ शकते.

आपणही अनुभवले असेल की, एकाच बिल्डिंगमधील एका सदनिकेत म्हणजे ‘फ्लॅट’मध्ये पुष्कळ चांगले वाटते; पण दुसर्‍या ‘फ्लॅट’मधील वातावरण दाब म्हणजे ‘प्रेशर’ असल्यासारखे वाटते. देऊळ, फुलांची बाग यांसारख्या परिसरात गेल्यावर मन उत्साहित होते, तर स्मशान, रुग्णालय यांसारख्या परिसरात जायला नकोसे वाटते किंवा मनाच्या स्तरावर अस्वस्थता वाटते. याची कारणे विज्ञानाद्वारे किंवा बाह्य परिस्थितीचा अभ्यास करून सापडतीलच असे नाही; कारण बहुतांश वेळा आध्यात्मिक म्हणजे अनिष्ट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव हे कारण त्यामागे असते.

 

अनिष्ट शक्तींच्या त्रासांची लक्षणे

आताच्या काळात बहुतेकांना अनिष्ट शक्तींचा त्रास असतो. कोणाला तो तीव्र स्वरूपात असतो, कोणाला मध्यम, तर कोणाला सौम्य स्वरूपात. या त्रासांची काही लक्षणे आहेत. ती समजून घेऊया.

शारीरिक लक्षणे

अनिष्ट शक्तींच्या त्रासाची शारीरिक लक्षणे काय आहेत, तर एखाद्या व्यक्तीला असणारे शारीरिक आजार अनेक महिने किंवा वर्षे उपचार करूनही ठीक होत नाहीत. उदाहरणार्थ, अन्न किंवा पाणी न पचणे; पोट फुगणे; पोटशूळ; त्वचारोग; हाडे ठिसूळ होणे; रक्ताच्या उलट्या होणे; कारण नसतांना तोल जाणे; धाप लागणे आणि शारीरिक क्षमता घटणे अशा प्रकारचे आजार त्यावर उपचार करूनही ठीक होत नाहीत.

मानसिक लक्षणे

मानसिक स्तरावर काय दिसून येते, तर निराशा, अती भित्रेपणा, मनात नकारात्मक विचार येणे यांमुळे मन अस्वस्थ होते.

कौटुंबिक लक्षणे

कौटुंबिक स्तरावर सातत्याने लहानसहान प्रसंगांतही कुटुंबियांमध्ये मतभेद किंवा अपसमज होतात. त्यामुळे दुरावा, संशय किंवा वैर निर्माण होते; कुटुंबातील सदस्यांना व्यसन लागते; कुणी ना कुणी सतत आजारी रहाते; कुटुंबातील व्यक्तींना लहान-मोठे अपघात होतात; काहींचे अकाली किंवा अपघाती निधन होते इत्यादी त्रास होतात.

आर्थिक लक्षणे

आर्थिक स्तरावर काय लक्षात येते, तर पुष्कळ प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही; व्यवसायात यश येत नाही; काटकसर करूनही घरात पैसा टिकत नाही; पैसा जमा होताच वैद्यकीय उपचार, अपघाताची हानीभरपाई, कर्ज फेडणे इत्यादींसाठी व्यय होतो.

इतर लक्षणे

आध्यात्मिक त्रासाची इतरही काही लक्षणे आहेत, उदा. विवाह न होणे; वैवाहिक समस्या निर्माण होणे; मूल न होणे; अपत्य बालपणातच मृत्यू पावणे, विहिरीतील पाण्यावर काळसर थर येणे, पाण्याची चव अचानक पालटणे, पाणी अचानक आटणे; घरात शिजवलेले अन्न न पुरणे, अन्नात बाभळीचे काटे किंवा खिळे सापडणे, गोठ्यातील गाईचे दूध अचानक आटणे, गायीची वासरे न जगणे; घरात लाल मुंग्या, कोळी, पाली, उंदीर किंवा ढेकूण होणे; घरात कावळा, कबुतर, काळे नाग, घुबड किंवा गिधाड येणे; घरात लावलेली तुळस अकारण करपणे, जास्वंदीच्या फुलांवर काळे डाग किंवा छिद्रे पडणे, आंब्याचा मोहोर अचानक गळणे, झाडांना वाळवी लागणे, वृक्षाची पाने अवेळी झडणे, फळे न येणे, आल्यास रोगट किंवा विचित्र रंगाची येणे, छिद्र पडलेली, बेचव, कीड लागलेली असणे; भाजीपाला आणि पिके नीट न येणे. अशा प्रकारची लक्षणे दिसत असतील, तर त्यामागे अनिष्ट शक्तींचा त्रास हे कारण असू शकते.

आध्यात्मिक लक्षणे

अनिष्ट शक्तींच्या त्रासाची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक लक्षणे आहेत, तशी आध्यात्मिक लक्षणेही आहेत. ती काय आहेत, तर झोपेत दचकून उठणे; व्यक्तीला रामरक्षा म्हणतांना जांभया येणे; वाईट स्वप्ने पडणे; झोपेत ओरडणे किंवा दात करकरवणे; वस्त्रांवर अकस्मात् विचित्र डाग पडणे; वस्त्रे अकारण फाटणे किंवा जळणे; वस्तू गहाळ होणे; पाकिटातील पैशांच्या नोटा आपोआप घटणे; लादी, भिंत आदींवर रक्ताचे डाग पडणे, देवघरातील दिवा वारंवार विझणे; रक्त लागलेली वस्त्रे सापडणे; काळी बाहुली, सुया टोचलेले किंवा पिंजर लावलेले लिंबू सापडणे; मिरचीचा जळका वास येणे; दुर्गंध येणे; रात्री वास्तूत घुंगरांचा नाद किंवा किंकाळ्या ऐकू येणे इत्यादी.

अशा प्रकारची लक्षणे दिसत असतील, तर त्यामागे ‘अनिष्ट शक्तींचा त्रास’ हे कारण असू शकते. बाह्यतः अशा घटनांमागचे कारण लक्षात येत नाही; पण आध्यात्मिक उपाय किंवा साधना केल्यावर हे त्रास दूर होतात. याची भीती बाळगायची किंवा काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही; कारण नकारात्मकतेच्या तुलनेत सकारात्मतेची शक्ती प्रचंड असते. आपण प्रतिदिन आध्यात्मिक उपाय केले, तर या त्रासांवर निश्चितपणे मात करता येऊ शकते. देवाच्या कृपेने आपल्याला एक नवा आध्यात्मिक पैलूही शिकायला मिळत आहे. तो ठाऊक नसता, तर आपण आयुष्यभर आध्यात्मिक त्रासांवर बौद्धिक किंवा मानसिक स्तरावरच प्रयत्न करत राहिलो असतो आणि त्रासाचे निवारण न झाल्याने त्रस्तच राहिलो असतो ! ‘अनिष्ट शक्तींमुळे साधनेत बाधा येते. आध्यात्मिक उपायांद्वारे आध्यात्मिक त्रासावर मात करता येऊ शकते’, हे महत्त्वाचे सूत्र आपण लक्षात घ्यायला हवे.

 

अनिष्ट शक्तींच्या त्रासांवर आध्यात्मिक उपाय

आध्यात्मिक उपायांमुळे आपले शरीर, मन, तसेच बुद्धी यांवर आलेले नकारात्मक आणि अनिष्ट आवरण दूर व्हायला साहाय्य होते. अनिष्ट शक्तींचा प्रतिकार करणे शक्य होते. आध्यात्मिक उपायांचा सूक्ष्मस्तरावर परिणाम होऊन आपल्याभोवती एक प्रकारे संरक्षककवच निर्माण होते आणि साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधना व्यवस्थित चालू रहाते.

आध्यात्मिक उपाय व्यक्तीवर, तसेच वास्तू-वाहन यांच्यासाठीही करता येतात. हे आध्यात्मिक उपाय कोणते आहेत, तर दृष्ट काढणे, नामजप-प्रार्थना करणे, वास्तूत देवतांच्या नामपट्टया लावणे, सात्त्विक कापूर-अत्तर उपाय करणे, स्तोत्रे आणि संतांनी गायलेली भजने लावणे ! आपण पुढच्या सत्संगांमध्ये आध्यात्मिक उपायांच्या वेगवेगळ्या पद्धतींविषयी सविस्तर जाणून घेणारच आहोत. आज आपण एक सोपा; पण तितकाच प्रभावी असलेल्या ‘प्रार्थना’ या आध्यात्मिक उपायांविषयी जाणून घेऊया.

प्रार्थना करणे

आपण देवळात गेल्यावर देवाला प्रार्थना करतो किंवा आपल्यावर कधी संकट आले, तर प्रार्थना करतो; पण बहुतांश वेळा या प्रार्थना आपल्या इच्छापूर्तीच्या किंवा संकट टळण्याच्या संदर्भात असतात. साधना करतांना काय आवश्यक आहे, तर काही व्यावहारिक गोष्टी देवाकडे मागण्यापेक्षा आध्यात्मिक स्तरावर प्रार्थना करणे ! आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात प्रार्थना करायच्या म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे; म्हणून देवाला प्रार्थना करायची आहे. आर्त भावाने केलेली प्रार्थना देवाच्या चरणी पोचतेच. आपण आपल्या उपास्य देवतेला संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करायची, ‘हे भगवंता, माझ्या (स्वतःचे नाव घ्यावे) मन, बुद्धी आणि शरीर यांवर आलेले नकारात्मक आणि अनिष्ट शक्तींचे आवरण समूळ नष्ट होऊ दे आणि तुझ्या नामजपाचे, चैतन्याचे संरक्षककवच माझ्याभोवती निर्माण होऊ दे.’ आपण ही प्रार्थना आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. आपण जेव्हा बाहेर जाणार असू तेव्हा किंवा प्रत्येक तासालाही मनातल्या मनात ही प्रार्थना करू शकतो.

या आठवड्यात आपण आता सांगितलेली प्रार्थना दिवसभरातून किमान १० वेळा करूया. प्रार्थना करण्यासाठी देवासमोरच उभे रहायला हवे, असे नाही. आपण देवाचे स्मरण करून बसल्या जागेवरूनच प्रार्थना करू शकतो. आपण आर्तभावाने प्रार्थना करून आध्यात्मिक उर्जा अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

Leave a Comment