सत्संग १४ : सारणी लिखाण

मागील सत्संगात आपण स्वयंसूचनांचे महत्त्व समजून घेतांना आपल्याकडून घडणार्‍या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार यासंदर्भातील काही प्रसंग आणि त्यावर स्वयंसूचना कशा दिल्या जाऊ शकतात हे समजून घेतले होते. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून स्वतःमध्ये पालट घडवायचा असेल, तर स्वतःकडून होणार्‍या चुका, मनात येणारे अयोग्य विचार, अयोग्य भावना यांचे निरीक्षण करणे आवश्यक असते. ते जमले की पुढचा भाग सोपा होतो. म्हणूनच आपण मागील सत्संगात आपल्याकडून झालेल्या चुकांच्या नोंदी वहीत करायचे ठरवले होते. स्वतःचा अभ्यास करण्यासाठी सारणी लिखाण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आजच्या सत्संगात आपण प्रक्रियेचा पुढचा टप्पा  स्वभावदोष सारणी लिखाण कसे करायचे हे समजून घेणार आहोत.

 

सारणी लिखाण करण्याचे महत्त्व

आजच्या सत्संगात आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या दृष्टीने चुकांच्या शास्त्रशुद्ध नोंदी कशा करायच्या, हे समजून घेऊया. अंतर्मुख राहून स्वतःच्या वर्तनाचे निरीक्षण करणे, चिंतन -मनन करणे हे महत्त्वाचे आहे. कुणाला असे वाटू शकेल की, साधना करत असतांना नामस्मरण, सत्सेवा करतांना स्वतःच्या चुकांकडे का लक्ष द्यायला हवे ? याचे कारण असे आहे की, आपल्याकडून कळत-नकळत ज्या चुका होत असतात, त्यामुळे आपली साधना खर्च होत असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती एकीकडे नामस्मरण करत आहे; पण दुसरीकडे तिला तिच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि रागीट स्वभावामुळे ती कुटुंबियांना दुखावते, असे असेल, तर रागामुळे, इतरांची मने दुखावल्यामुळे जे पाप निर्माण होते, त्याचे परिमार्जन करण्यात नामस्मरणातून मिळणारी शक्ती खर्च होते. त्यामुळे नामस्मरणाचा आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने विशेष लाभ होत नाही. आनंदावस्था अनुभवता येत नाही. दिव्याभोवतीच्या काचेच्या वेष्टनावर धरलेली काजळी स्वच्छ केल्यावरच दिव्याचा लख्ख प्रकाश बाहेर पडू शकतो. त्याप्रमाणे आपल्याभोवती असलेल्या रज-तमात्मक दोषांच्या आवरणाची काजळी दूर केल्यावरच आपल्याला आपल्या अंतरंगात असलेल्या सच्चिदानंदमय ईश्वराची अनुभूती येऊ शकते. त्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे महत्त्वाचे आहे. सारणीलिखाण करणे हा या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपण पुढचे काही सत्संग या प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत. ही प्रक्रिया राबवून अनेकांनी त्यांचा ताण-तणाव नाहीसा झाला, सकारात्मकता निर्माण झाली, कोणतीही परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला, अशा अनुभूती घेतल्या आहेत. ही प्रक्रिया मनापासून राबवल्यावर आपल्यालाही आपल्या वर्तनात निश्चितपणे सकारात्मक पालट जाणवतील.

 

स्वभावदोष निर्मूलन सारणीचे रकाने

आज आपण या प्रक्रियेच्या अंतर्गत सारणी लिखाण कसे करायचे, ते समजून घेऊया.

दिनांक अ.क्र चुका
(अयोग्य कृती / विचार / प्रतिक्रिया)
वर्गीकरण
(स्वतःला कि इतरांना कळली ?)
कालावधी स्वभावदोष स्वयंसूचना प्रगती

१. दिनांक आणि अनुक्रमणिका

आपल्याला प्रतिदिनच स्वतःकडून होणार्‍या चुकांच्या नोंदी करायच्या आहेत. आपण ज्या दिवशी सारणी लिहित असू, तो दिनांक ‘दिनांक’ या स्तंभामध्ये लिहावा. पुढच्या अनुक्रमांकाच्या स्तंभामध्ये आपल्याला १,२,३… असे चुकांचे आकडे लिहायचे आहेत. आपण आपल्या वहीमध्ये हा आराखडा लिहून घेऊ शकता.

दिनांक अ.क्र चुका (अयोग्य कृती / विचार / प्रतिक्रिया)
१ जाने २०२४ १. कार्यालयात सहकार्यांचे कौतुक झाल्यावर ‘काम आम्ही करतो; पण कौतुक इतरांचेच होते’ असे विचार येऊन मन अस्वस्थ झाले.
२. बैठकीला पोचण्यास १० मिनिटे उशीर झाला

२. अयोग्य कृती, विचार अथवा प्रतिक्रिया

पुढचा महत्त्वाचा स्तंभ आहे चुका म्हणजे अयोग्य कृती, विचार अथवा प्रतिक्रिया यांचा ! या स्तंभामध्ये दिवसभरात स्वतःकडून झालेली प्रत्येक अयोग्य कृती आणि मनात उमटलेली किंवा व्यक्त झालेली अयोग्य प्रतिक्रिया, तसेच अयोग्य विचार आणि भावना यांची नोंद येथे करावी. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यानंतर पांघरूणाची घडी घातली नाही./ बैठकीला पोचण्यास उशीर झाला./ भाजी तिखट झाली./ दूध उतू गेले. किंवा आईने लवकर आवरण्यास सांगितल्यावर मला राग आला. / कार्यालयात वरिष्ठांनी कामात त्रुटी दाखवून दिल्यावर ‘ते नेहमी चुका शोधायलाच बसलेले असतात’ अशा प्रतिक्रिया आल्या. / कार्यालयात सहकार्यांचे कौतुक झाल्यावर ‘काम आम्ही करतो; पण कौतुक इतरांचेच होते’ असे विचार येऊन मन अस्वस्थ झाले. / माझ्या लहान मुलाला कोरोना तर होणार नाही ना ?, अशी काळजी वाटत होती. अशा प्रकारे चुकांच्या स्तंभामध्ये आपल्याला आपल्याकडून झालेल्या अयोग्य कृती, मनात आलेले अयोग्य विचार यांच्या नोंदी करायच्या आहेत.

दिनांक अ.क्र चुका (अयोग्य कृती / विचार / प्रतिक्रिया) वर्गीकरण
१ जाने २०२४ १. कार्यालयात सहकार्यांचे कौतुक झाल्यावर ‘काम आम्ही करतो; पण कौतुक इतरांचेच होते’ असे विचार येऊन मन अस्वस्थ झाले. स्वतःला कळली
२. बैठकीला पोचण्यास १० मिनिटे उशीर झाला वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितली

३. वर्गीकरण

वर्गीकरण या स्तंभामध्ये ती चूक स्वतःला कळलेली आहे कि इतरांनी सांगितली आहे, हे नमूद करायचे आहे. ज्या व्यक्तीने चूक दाखवून दिली, तिच्या नावाचाही उल्लेख तेथे करायचा आहे. उदा. ‘चहा पिऊन झाल्यावर मी चहाचा कप विसळून न ठेवता तसाच टेबलवर ठेवला’, ही चूक समजा आईने लक्षात आणून दिली, तर वर्गीकरण या स्तंभामध्ये ‘आईने सांगितली’ असा उल्लेख त्या स्तंभात करावा. समजा ‘दूध तापवत ठेवून दुसरी कामे करायला गेल्याने दुधाकडे दुर्लक्ष झाले आणि ते उतू गेले’, अशी चूक आपल्याकडून झाली असेल आणि ती आपल्याच लक्षात आली असेल, तर वर्गीकरण या स्तंभामध्ये ‘स्वतःला कळली’ अशी नोंद करावी. हे सूत्र सगळ्यांना समजले ना ?

दिनांक अ.क्र चुका (अयोग्य कृती / विचार / प्रतिक्रिया) वर्गीकरण कालावधी
१ जाने २०२४ १. मी रात्री झोपतांना संगणक बंद करायची विसरल्याने तो रात्रभर तसाच चालू राहिला. आईने सांगितली ८ घंटे
२. कार्यालयात वरिष्ठ अधिकारी मला ओरडल्याने मला त्यांचा राग आला. स्वतःला १ दिवस

४. कालावधी

सारणीमधील पुढचा स्तंभ आहे – कालावधी ! स्वतःकडून अयोग्य कृती होणे आणि ती केल्याची स्वतःला जाणीव होणे यांमधील कालावधीची नोंद या स्तंभात करावी. उदाहरणार्थ, ‘मी रात्री ११ वाजता संगणक बंद न करता तसाच चालू ठेवून झोपले’, अशी चूक झाली असेल आणि सकाळी ७ वाजता उठल्यावर आपल्याला लक्षात आले की, काल संगणक बंद करायचाच राहून गेले, तर रात्री ११ ते सकाळी ७ मधील कालावधी आपल्याला या स्तंभात लिहायचा आहे. या उदाहरणामध्ये कालावधी या स्तंभात आपण काय लिहू ? तर ८ घंटे. अजून एक उदाहरण पाहूया, समजा ‘कार्यालयात वरिष्ठ अधिकारी मला ओरडल्याने मला त्यांचा राग आला’, अशी चूक असेल, तर त्या प्रसंगामुळे आलेला राग शांत होईपर्यंतचा कालावधी आपल्याला ‘कालावधी’ या स्तंभामध्ये लिहायचा आहे.

५. स्वभावदोष

स्वभावदोष या स्तंभामध्ये ती चूक घडण्यामागे कोणता स्वभावदोष कारणीभूत आहे, हे आपल्याला लिहायचे आहे. स्वभावदोष कोणता आहे, हे शोधण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर स्वतःच स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तरांतून आपल्याला स्वभावदोष लक्षात येतील. उदाहरणार्थ, समजा ‘मी बैठकीला १० मिनिटे उशिरा गेलो’, अशी चूक आपण आपल्या सारणीमध्ये लिहिली असेल, तर यामागे कोणता स्वभावदोष कारणीभूत आहे, हे आपल्याला स्वतःलाच आपल्या मनाला प्रश्न विचारून ठरवायचे आहे. वरकरणी काय वाटते, नियोजित ठिकाणी उशिरा पोचण्याच्या मागे कोणता स्वभावदोष असेल, तर ‘वक्तशीरपणाचा अभाव’ ! पण या चुकीसाठी प्रत्येकच व्यक्तीचा तो स्वभावदोष कारणीभूत असेल, असे नाही. मला बैठकीला जायला १० मिनिटे उशीर का झाला ?, यामागे व्यक्तीनुरुप वेगवेगळी कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, मी बैठक असल्याचेच विसरलो किंवा मला ती बैठक महत्त्वाची वाटली नाही किंवा १० मिनिटे उशिरा गेले, तरी चालते, अशी माझी विचारप्रक्रिया होती किंवा मी बैठकीला जाण्यासाठी किती वाजता निघावे लागेल, याचे नियोजनच केले नव्हते किंवा ‘मी वेळेत पोचू शकतो’, असे वाटत होते, अशी वेगवेगळी विचारप्रकिया असू शकते. या प्रत्येक विचारानुसार व्यक्तीमध्ये कार्यरत असलेला स्वभावदोष वेगळा असेल. बैठकीला जाण्याचे विसरलो, तर त्यामागे ‘विसराळूपणा’ असू शकतो, ‘उशिरा गेले, तरी चालते’, अशी मानसिकता असेल, तर ‘गांभीर्याचा अभाव’ हा स्वभावदोेष असू शकतो, बैठकीला जाण्यासाठी कितीला निघायचे, याचे नियोजनच केले नसेल, तर ‘नियोजनाचा अभाव’ हा स्वभावदोष असू शकतो आणि ‘मी वेळेत पोहोचीनच’ अशी विचारप्रक्रिया असेल, तर ‘अतीआत्मविश्वास’ हा स्वभावदोष असू शकतो. म्हणजे चूक एकच असली, तरी ती होण्यामागे प्रत्येक व्यक्तीची विचारप्रक्रिया वेगवेगळी असू शकते. या विचारप्रक्रियेनुसार आपल्याला स्वभावदोष लिहायचा आहे.

दिनांक अ.क्र चुका (अयोग्य कृती / विचार / प्रतिक्रिया) वर्गीकरण कालावधी स्वभावदोष
१ जाने २०२४ १. दुपारी बैठक असल्याचे मी विसरलो. आयत्या वेळी ते लक्षात आल्याने सर्व आवरून बैठकीला पोचायला मला १० मिनिटे उशीर झाला. स्वतःला २० मिनिटे  विसराळूपणा

येथे सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय लक्षात घ्यायची आहे, तर स्वभावदोष योग्य निवडला जाण्यासाठी आपल्याला सारणीमध्ये चूक योग्य प्रकारे लिहायची आहे. समजा बैठकीला उशिरा जाण्याचेच उदाहरण आपण पाहिले, तर ‘मी बैठकीला १० मिनिटे उशिरा पोहोचलो’, अशी चूक लिहिण्यापेक्षा आपल्या विचारप्रक्रियेनुसार आपल्याला सविस्तर; पण नेमकेपणाने चूक लिहायची आहे. उदाहरणार्थ, ‘दुपारी बैठक असल्याचे मी विसरलो. आयत्या वेळी ते लक्षात आल्याने सर्व आवरून बैठकीला पोचायला मला १० मिनिटे उशीर झाला.’ किंवा ‘बैठकीला थोडे उशिरा पोचले, तर चालते’, अशा विचारांमुळे मी बैठकीला १० मिनिटे उशिरा पोचलो’ किंवा ‘बैठकीला वेळेत पोचण्यासाठी घरातून किती वाजता निघावे लागेल, याचे नियोजन न केल्याने मला बैठकीला पोचायला १० मिनिटे उशीर झाला’, अशा प्रकारे चूक लिहिली, तर यामागे कोणता स्वभावदोष कार्यरत आहे, हे आपल्या लक्षात येईल ना ? थोडक्यात, स्वभावदोष योग्य प्रकारे शोधला जाण्यासाठी आपण चूक व्यवस्थित लिहिणे महत्त्वाचे आहे. या आठवड्यात आपण अशा प्रकारे सारणीमध्ये व्यवस्थितपणे चुका लिहिण्याचा प्रयत्न करूया. स्वयंसूचना आणि प्रगती या स्तंभांविषयी आपण पुढच्या सत्संगात समजून घेऊया.

आजच्या सत्संगात आपण सारणी लिखाण कसे करायचे ते पाहिले. या आठवड्यात आपण चुकांचे निरीक्षण करूया. सारणीतील विविध स्तंभांप्रमाणे चुकांचे विश्लेषण करून सारणी लिखाण करण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या सत्संगात आपण स्वयंसूचनांच्या पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत.

Leave a Comment