सत्संग १० : भावजागृतीचे प्रयत्न, मानसपूजा

मागील सत्‍संगात आपण साधनेची अंगे समजून घेतली होती. नाम, सत्‍संग, सेवा, त्‍याग, प्रीती, स्‍वभावदोष निर्मूलन, अहंनिर्मूलन आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ही अष्‍टांग साधना आहे.

आता आपण सत्‍संगाच्‍या मुख्‍य विषयाकडे वळूया. आजच्‍या सत्‍संगात आपण भावजागृतीविषयी जाणून घेणार आहोत. साधना करतांना भावाचे महत्त्व अनन्‍यसाधारण आहे. ‘भाव तेथे देव’, म्‍हणजे ज्‍या ठिकाणी भाव आहे, तेथे भगवंताचे अस्‍तित्‍व असते, असे म्‍हटले आहे. भाव म्‍हणजे काय ? त्‍याचे महत्त्व काय आहे ? आणि भावजागृतीसाठी कोणते प्रयत्न करू शकतो, हे आपण आज समजून घेणार आहोत.

 

भाव म्‍हणजे काय ?

भाव या शब्‍दाची व्‍युत्‍पत्ती आणि अर्थ

भाव हा शब्‍द ‘भा’ आणि ‘व’ या २ अक्षरांनी बनला आहे. यातील ‘भा’ म्‍हणजे तेज आणि ‘व’ म्‍हणजे वृद्धी करणारा. ज्‍याच्‍या जागृतीने आपल्‍यामध्‍ये तेजतत्त्वाची वृद्धी होते, तो ‘भाव’ ! तेजतत्त्व हे ईश्‍वराच्‍या रूपाशी संबंधित आहे.

भाव म्‍हणजे सतत ईश्‍वराच्‍या रूपाची म्‍हणजेच अस्‍तित्त्वाची जाणीव असणे. संतांना ईश्‍वराच्‍या अस्‍तित्त्वाची जाणीव असल्‍याने ते सतत भावावस्‍थेत असायचे. भावामुळे स्‍थूल देहाची, तसेच मनाची शुद्धी होते. देहातील रज-तमाचे प्रमाण न्‍यून होऊन सत्त्वगुण वाढतो. आध्‍यात्मिक उपाय केल्‍याने जेवढा आध्‍यात्मिक लाभ होतो, तेवढाच भावजागृतीनेही होतो. प्राप्‍त परिस्‍थितीला सामोरे जाण्‍याचे आध्‍यात्मिक बळ भावामुळे मिळते. भावामुळे संपूर्ण जगाकडे बघण्‍याची दृष्‍टीच प्रेमळ आणि सकारात्‍मक होते.

भाव ही केवळ कल्‍पना नसून त्‍यामध्‍ये एक ईश्‍वरीय शक्‍ती आहे; म्‍हणूनच ‘भाव तेथे देव’, असे म्‍हटले जाते. भाव ही एक चित्ताची अवस्‍था आहे. आपण अनेक पौराणिक किंवा संतांच्‍या कथांमधून त्‍यांच्‍या उत्‍कट भावाची उदाहरणे ऐकली असतील. संत नामदेव लहान असतांना एकदा देवाला नैवेद्य दाखवण्‍यासाठी विठ्ठलाच्‍या देवळात गेले होते. ‘देवाला नैवेद्य दाखवायचा; म्‍हणजे देवाने तो प्रत्‍यक्ष खायला हवा’, असे नामदेवांना वाटायचे. देवाने नैवेद्य घेतल्‍याविना परत जायचेच नाही; या भावाने ते भगवंताने नैवेद्य ग्रहण करण्‍याची वाट पहात बसले; पण देव काही प्रगटला नाही. ‘देवाने नैवेद्य ग्रहण केला नाही, तर मी प्राणत्‍याग करीन’, असे नामदेवाने देवाला सांगितले. तरीही देवाने नैवेद्य घेतला नाही. अखेर संत नामदेव खरोखरच प्राणत्‍याग करण्‍यासाठी निघाल्‍यावर मूर्तीतून पांडुरंग अवतरित झाले. नामदेवाच्‍या भक्‍तीपायी देवाला प्रगट व्‍हावे लागले आणि नैवेद्य ग्रहण करावा लागला. या भावाची कितीतरी उदाहरणे आहेत. साधनामार्गामध्‍ये भावजागृती हा एक महत्त्वाचा टप्‍पा आहे. त्‍या दृष्‍टीनेच आजच्‍या सत्‍संगात आपण जाणून घेणार आहोत.

 

भाव आणि भावना यांतील भेद

साधनेमध्‍ये भावनेपेक्षा भावाला अधिक महत्त्व आहे. काही वेळा भाव आणि भावना यांमध्‍ये गोंधळ होतो. भाव आणि भावना या दोन्‍ही गोष्‍टी वेगळ्‍या आहेत. डोळ्‍यांतून अश्रू येणे, हे भावना आणि भाव या दोन्‍हींमुळे अनुभवाला येणारे एक लक्षण आहे. डोळ्‍यांतून अश्रू आले, तर ती भावना आहे कि भाव आहे, हे कसे ओळखायचे ?, तर त्‍या वेळी मनाची स्‍थिती कशी आहे, हे पहायचे. मनाला दुःख होऊन रडायला आले, तर ती भावना झाली आणि गुरूंच्‍या किंवा देवाच्‍या आठवणीने जीव व्‍याकूळ झाला आणि त्‍यामुळे डोळ्‍यांतून अश्रू आले, तर तो झाला भाव !

 

देवाचा भक्‍त होण्‍यासाठी भाव महत्त्वाचा

‘भाव तेथे देव’ या न्‍यायाने भाव असणार्‍यांनाच ईश्‍वर मदत करतो. भगवंताचे वचन आहे, ‘न मे भक्‍तः प्रणश्‍यति’ म्‍हणजे माझ्‍या भक्‍तांचा नाश होणार नाही. भाव असणाराच भक्‍त होऊ शकतो. आपल्‍या प्रत्‍येकामध्‍येच देवाप्रती थोडाफार भाव आहे; म्‍हणून तर आपण सत्‍संगाला आलो आहोत. देवाप्रतीचा हा भाव आपल्‍याला वाढवायचा आहे. भावजागृतीसाठी सातत्‍याने प्रयत्न केल्‍याने भावामध्‍ये वाढ होऊ शकते. भावजागृतीसाठी करायचे अनेक छोटे छोटे प्रयत्न आहेत. त्‍यांपैकी आज आपण मानसपूजा याविषयी जाणून घेणार आहोत.

 

मानसपूजा म्‍हणजे काय ?

मानसपूजा म्‍हणजे काय ? तर देवता किंवा गुरु यांच्‍या रूपाची मनाने कल्‍पना करून सर्व पूजा उपचार देवाला अर्पण करून जी पूजा केली जाते ती म्‍हणजे मानसपूजा. आपल्‍या आवडी प्रमाणे देवाला जे जे अर्पण करावेसे वाटेल त्‍याची कल्‍पना करून देवाला अर्पण करता येते. जेवढा वेळ आपण मानसपूजा करतो तेवढा वेळ आपल्‍या मनाचा त्‍याग होतो. मानसपूजेला स्‍थळ, काळाचे बंधन नाही. आपण प्रतिदिन देवाची जी पूजा करतो, ती स्‍थूल पूजा असते. स्‍थूलरित्‍या पूजा करत असतांना काही वेळा आपले मन अन्‍य गोष्‍टींकडे जाऊ शकते. याउलट मानसपूजा सूक्ष्मस्‍तरावरची आहे. आपण याआधीच्‍या सत्‍संगात ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ हा साधनेतील सिद्धांत पाहिला होता. या सिद्धांतानुसार कर्मकांडातील म्‍हणजेच स्‍थूल पूजेपेक्षा मानसपूजा श्रेष्‍ठ आहे. काही जणांना नोकरी, व्‍यवसाय यांसारख्‍या कारणांमुळे देवपूजा करण्‍याची इच्‍छा असूनही ती करता येत नाही. अशांना प्रवासात जाता-येता किंवा अन्‍य ठिकाणी मानसपूजा करण्‍याची संधी असते. कोणी प्रतिदिन देवघरातील देवांची प्रत्‍यक्ष पूजा करत असेल, तरी त्‍याने मानसपूजा करायला हरकत नाही. मानसपूजेतून एकाग्रताही साधली जाते.

 

श्री दुर्गादेवीची मानसपूजा

आजच्‍या सत्‍संगात आपण मानसपूजा करून देवाचे अस्‍तित्त्व अनुभवण्‍याचा प्रयत्न करूया. आपण श्री दुर्गादेवीची मानसपूजा करूया.

सर्वांनी डोळे बंद करूया. ज्‍यांना आपली कुलदेवी ठाऊक आहे, त्‍यांनी मानसपूजा करतांना आपल्‍या कुलदेवीचे रूप आपल्‍या डोळ्‍यांसमोर आणावे. ज्‍यांना आपली कुलदेवी ठाऊक नाही, त्‍यांनी अष्‍टभुजा दुर्गादेवीचे रूप डोळ्‍यांसमोर आणूया. पूजेला आरंभ करण्‍यापूर्वी आपण देवीला संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करूया, ‘हे माते, या अज्ञानी लेकराला तुझी मानसपूजा करायची आहे. हे देवी, ही पूजा कशी करायची, ते मी जाणत नाही; पण हे देवी तूच या पामर जीवावर कृपा कर. मला तुझे दर्शन दे.’ आपण आर्त भावाने प्रार्थना केल्‍यावर श्री दुर्गादेवी प्रत्‍यक्ष आपल्‍यासमोर अवतरित होत आहे. आईचा चेहरा प्रसन्‍न असून ती आपल्‍याला आशीर्वाद देत आहे. देवीच्‍या पूजेसाठी आपण सर्व सिद्धता केली आहे. सुवर्णसिंहासन, सोन्‍याचे तबक, सोन्‍याच्‍या परडीत फुले, रत्नजडित ताम्‍हण आणि कलश, सोन्‍याची ५ निरांजने अन् मोठ्या वाट्यांत हळद-कुंकू घेतले आहे. देवीची पूजा करायला मिळत असल्‍याने आपल्‍याला अत्‍यंत कृतज्ञता वाटत आहे. मी देवीला सुवर्णसिंहासनावर विराजमान होण्‍याची प्रार्थना करत आहे. देवी सिंहासनावर आसनस्‍थ होत आहे. देवीचे चरण ठेवण्‍यासाठी मी रत्नजडित ताम्‍हण घेतले आहे. मी देवीचे चरण दोन्‍ही हातात धरून ताम्‍हणात ठेवत आहे. प्रत्‍यक्ष देवीच्‍या चरणांना स्‍पर्श करण्‍याचे भाग्‍य मिळाल्‍याने मला सद़्‍गतित वाटत आहे. देवीच्‍या चरणांतून मला पुष्‍कळ चैतन्‍य मिळून माझ्‍याभोवतीचे अनिष्‍ट आवरण नष्‍ट होत आहे. मी एका सोन्‍याच्‍या कलशात कोमट सुगंधी जल घेतले आहे. आता त्‍या कोमट जलाने मी देवीच्‍या चरणांना स्नान घालत आहे. नंतर पंचामृताने अभिषेक करत आहे. त्‍यानंतर पुन्‍हा कोमट जलाने देवीच्‍या चरणांना स्नान घालत आहे. आता ताम्‍हण बाजूला ठेवून मी मऊ रेशमी वस्‍त्राने देवीचे चरणकमल हळूवारपणे पुसत आहे. आता देवीच्‍या दोन्‍ही चरणांवर मी ओल्‍या लाल कुंकवाने स्‍वस्‍तिक काढत आहे. त्‍यावर अक्षता अर्पण करत आहे. बाजूला चांदीच्‍या उदबत्तीच्‍या घरात २ सुवासिक उदबत्त्या लावल्‍या आहेत. निरांजन लावले आहे.

दुर्गादेवीने लाल रंगाचे रेशमी वस्‍त्र परिधान केले आहे. त्‍याच्‍या कडा सोनेरी आहेत. तिने अंगावर पिवळेजर्द वस्‍त्र पांघरले आहे. त्‍यावर सुंदर वेलवीण (नक्षी) आहे. देवीने वेगवेगळे दागिनेही घातलेले दिसत आहेत. देवीचे हे रूप पाहून मनाला आनंद वाटत आहे. सोन्‍याच्‍या ताम्‍हनात असलेल्‍या सोन्‍याच्‍या वाट्यांत हळद-कुंकू, केशर, अष्‍टगंध अन् कस्‍तुरी आहे. ते मी देवीच्‍या कपाळावर अलगद लावत आहे. देवीला कुंकू लावतांच बोटातून प्रचंड मोठा शक्‍तीचा झोत माझ्‍या शरिरात जात आहे. आता मी देवीला आवडणारी मोगरा, कमळ, चाफा, बकुळी इत्‍यादी सुवासिक फुले तिच्‍या चरणी अर्पण करत आहे. देवीला फुले अर्पण केल्‍यावर फुलांचा घमघमाट येत आहे. प्रत्‍यक्ष देवीच्‍या चरणांवर अर्पण होता आल्‍याने फुलेही कृतज्ञता व्‍यक्‍त करत आहेत. आता मी पंचारतीने देवीला ओवाळत आहे. ज्‍योतीच्‍या प्रकाशात देवीचे रूप अतिशय तेजस्‍वी दिसत आहे. आता मी देवीला पुरणाच्‍या पोळीचा नैवेद्य दाखवत आहे आणि देवीला तो नैवेद्य ग्रहण करण्‍यासाठी शरणागत भावाने प्रार्थना करत आहे. या अज्ञानी बालकाची प्रार्थना ऐकून देवीही थोडासा प्रसाद ग्रहण करत आहे. आता अत्‍यंत उत्‍कट भावाने मी देवीची आरती करत आहे. आरती करून झाल्‍यावर संपूर्णपणे शरणागत भावाने देवीच्‍या चरणांवर माथा टेकवत आहे. देवीला विनवत आहे, ‘हे देवी, माझा उद्धार कर. या भवसागरातून मला पार कर. माझा तुझ्‍याप्रती भक्‍तीभाव निर्माण होईल, असे कर. हे देवी, एक क्षणही मला तुझा विसर पडू देऊ नको. साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्‍यासाठी तूच मला शक्‍ती, बुद्धी आणि चैतन्‍य प्रदान कर.’ ही प्रार्थना ऐकून देवी वात्‍सल्‍ययुक्‍त दृष्‍टीने माझ्‍याकडे पहात आहे. तिच्‍या एका कृपाकटाक्षाने माझ्‍या सर्व दुःखांचा नाश झाला आहे. आई तिचा प्रेमळ वरदहस्‍त माझ्‍या डोक्‍यावर ठेवून मला आशीर्वाद देत आहे. देवी मला मोगर्‍याच्‍या फुलांची वेणी प्रसाद म्‍हणून देत आहे. ते झाल्‍यावर देवी अंतर्धान पावत आहे. देवीच्‍या दर्शनाने माझे मन कृतार्थ भावाने भरून गेले आहे. मला मानसपूजा करण्‍याची संधी दिल्‍याविषयी मी देवीच्‍या चरणी अनन्‍यभावे कृतज्ञता व्‍यक्‍त करत आहे. आता आपण हळूहळू डोळे उघडूया.

अशा प्रकारे आपण आपल्‍या गुरुदेवांची किंवा इष्‍टदेवतेची प्रतिदिन मानसपूजा करण्‍याचा प्रयत्न करूया. मानसपूजा अधिक एकाग्रतेने केली जात असल्‍याने आपल्‍याला देवतेच्‍या अस्‍तित्त्वाची प्रचिती येऊ शकते.

Leave a Comment