म्हणे, काकस्पर्श ही ‘अंधश्रद्धा’च !

१. म्हणे, काकस्पर्श ही ‘अंधश्रद्धा’च !

टीका

‘निधनानंतर दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवला, तर मृत व्यक्तीचा आत्मा समाधानी असल्याचे मानले जाते. हा धार्मिक विधीचा भाग आहे; पण कालोचित धर्मचिकित्सा केली, तर ही अंधश्रद्धाच आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे, जेवढा पुरावा तेवढा विश्वास आणि हा पुरावा व्यक्तीनिष्ठपणे तपासता यावयास हवा.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा (दै. सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण

‘व्यक्तीच्या निधनानंतर तिचे श्राद्ध करणे, हे हिंदूंच्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. हे धार्मिक विधी युगानुयुगे लाखो वर्षे चालू आहेत आणि ते हिंदू आचरणात आणत आहेत. त्यामध्ये मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करायच्या पिंडदान विधीमध्ये पिंडाला कावळा शिवतो, हे अनुभूतीसिद्ध आहे. लाखो वर्षे चालू असलेल्या आणि हिंदूंनी अनुभूती घेतलेल्या धार्मिक विधीला दाभोलकर कोणत्या आधारावर अंधश्रद्धा ठरवतात ? त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे का ? ‘वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे, जेवढा पुरावा तेवढा विश्वास’, असे केवळ दाभोलकर यांच्यासारखे बुद्धीप्रामाण्यवादीच म्हणतात. त्यांचे असे म्हणणे म्हणजे ‘आंधळा म्हणतो की, सूर्यच नाही’, असे झाले. अध्यात्मशास्त्रापुढे विज्ञान थिटे आहे. विज्ञानाला अध्यात्मशास्त्र पडताळता येत नाही; कारण अध्यात्मशास्त्र विज्ञानाच्या कुवतीपलीकडील आहे. त्यामुळे विज्ञानाने अध्यात्मशास्त्राचे पुरावे देता येत नाहीत. अध्यात्मातील शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती ही स्पंदने, तसेच त्रासदायक स्पंदनेही कोणत्या उपकरणाने मोजणार ? हे व्यक्तीगत स्तरावर कळायला साधनाच हवी.’


२. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची काकस्पर्शासंबंधीची उपरोधिक विधाने आणि त्यांचे खंडण

अ. उपरोधिक विधान

‘वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे, जेवढा पुरावा तेवढा विश्वास आणि हा पुरावा व्यक्तीनिष्ठपणे तपासता यावयास हवा. हे लक्षात घेऊन काकस्पर्श तपासला, तर काय दिसते – मृत व्यक्तीला आत्मा असतो.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा (दै. सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण

‘मनुष्यजीव हा स्थूलदेह आणि लिंगदेह यांनी बनला आहे. व्यक्ती मृत झाल्यावर तिचा लिंगदेह उरतो. तो जीवात्मा (आत्मा) आणि अविद्या (आत्म्याच्या भोवतीचे मायेचे आवरण) यांनी मिळून बनला आहे. अविद्येचे पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये, पंचसूक्ष्मकर्मेंद्रिये, पंचप्राण, मन (बाह्यमन), चित्त (अंतर्मन), बुद्धी आणि अहं असे एकोणीस घटक आहेत. त्यांचे कार्य सतत चालू असते. जिवंत व्यक्तीला जे कळत असते, ते लिंगदेहाला कळत असते; म्हणून माणूस मृत झाल्यावरही त्याच्या लिंगदेहाला सर्व कळत असते आणि सूक्ष्मातील स्पंदनेही कळत असतात. इतके शास्त्रोक्त पद्धतीने अध्यात्मशास्त्राने विज्ञानाच्या भाषेत सांगितलेले असूनही बुद्धीप्रामाण्यवादी अंनिसच्या दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती हे मानत का नाहीत ?’

आ. उपरोधिक विधान

‘तो (जीवात्मा) दहाव्या दिवशी पिंडात अथवा पिंडाजवळ येतो.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा (दै. सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण

‘मृत्यूनंतर केवळ दहाव्याच दिवशी मृत व्यक्तीच्या लिंगदेहाचा विचार केलेला आहे असे नाही, तर मृत्यूनंतर करायच्या श्राद्धविधींमध्ये पहिले अकरा दिवस, तसेच पुढेही ठराविक कालावधीने मृताचे श्राद्ध करायला शास्त्रात सांगितले आहे. त्या प्रत्येक श्राद्धाचे विशिष्ट उद्देश आहेत. पहिले ९ दिवस प्रतिदिन केलेल्या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे त्या त्या दिवशी वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे लिंगदेहावर आलेल्या काळ्या शक्तीच्या आवरणाचे उच्चाटण होते. दहाव्या दिवशी लिंगदेहाला काकस्पर्शाच्या माध्यमातून पिंडयुक्त हविर्भाग दिला जातो. त्यामुळे तो लिंगदेह अन्नदर्शक आसक्तीयुक्त संस्कारात्मक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो, तसेच लिंगदेहाला पृथ्वीमंडल भेदण्यासाठी आवश्यक बळ पुरवले जाते. अकराव्या दिवशीच्या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींच्या सामर्थ्यावर लिंगदेह पुढची गती धारण करून मर्त्यलोकात प्रवेश करतो. यापुढील श्राद्धांचेही असेच उद्देश आहेत. हे सर्व विधीयुक्त संकल्पातील मंत्रशक्तीमुळे साध्य होते. असे सामर्थ्य मंत्रशक्तीमध्ये आहे. धर्माने मृत्यूनंतरही मनुष्याची इतकी काळजी वाहिली आहे. इतके सर्व शास्त्रशुद्ध आणि उद्देशयुक्त धर्मग्रंथात दिलेले असूनही त्याचा अभ्यास न करता बुद्धीप्रामाण्यवादी (?) काहीही विधाने करतात !’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’


इ. उपरोधिक विधान

‘त्याच्या चेहर्‍यावरून (आत्म्याला चेहरा असतो ?) मृत व्यक्ती समाधानी आहे का दुःखी, हे कावळ्याला (दिव्य दृष्टीने) दिसते.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा (दै. सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण

‘मृत व्यक्तीचा लिंगदेह पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येतो. पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाची गती ही काकगतीशी साधर्म्य दर्शवते. तसेच कावळ्याभोवती असलेल्या सूक्ष्म कोषात लिंगदेहाभोवती असलेल्या कोषासारखे आपतत्त्वाच्या कणांचे प्राबल्य असते. या दोन कारणांमुळे लिंगदेहाला कावळ्याच्या देहात प्रवेश करणे सोपे जाते आणि तो पिंडातील अन्न भक्षण करू शकतो; पण जेव्हा लिंगदेहाच्या अतृप्त इच्छांची पूर्ती झालेली नसते, तेव्हा लिंगदेहातून तमोगुणी मारक शक्तीच्या लहरींचे वातावरणात आणि कावळ्याकडे प्रक्षेपण होत रहाते. त्या लहरी कावळ्याला जाणवतात आणि त्या लहरींमुळे कावळा पिंडाला स्पर्श करत नाही. असे शास्त्र आहे. एखादा काहीही बोलतो आणि ‘ते योग्य आहे का’, हे शास्त्र पडताळून न पहाता तेच ग्राह्य धरून उपरोधात्मक बोलणारे अंनिसचे दाभोलकर यांनाच ‘अंधश्रद्ध’ म्हणावे लागेल.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र

ई. उपरोधिक विधान

‘कावळा न शिवल्यास मृतात्म्यास समाधान देणारे काही बोलले जाते. ते आत्म्याला ऐकू जाते.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा (दै.सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण

‘लिंगदेहाच्या जीवात्म्याभोवतीच्या अविद्येच्या १९ घटकांमध्ये त्या जीवात्म्याचे मन आणि बुद्धी हेही असल्याने त्याला श्राद्धासाठी आलेल्या त्याच्या नातेवाइकांचे विचार कळतात. ‘आपल्याला गती मिळाल्यावर आपल्या मागे आपल्या एखाद्या नातेवाइकाचे, एखाद्या वस्तूचे किंवा मालमत्तेचे कसे होणार’, याची काळजी वाटत असल्याने लिंगदेह पिंडातील अन्न भक्षण करून पुढील गती मिळवायला राजी नसतो. तेव्हा ती काळजी दूर करण्याचे किंवा त्याची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिल्यास आणि ते वचन पूर्ण करणार असल्याची लिंगदेहाला निश्चिती वाटत असल्यास तो समाधानी होतो. हा सर्व सूक्ष्मातील भाग आहे. बुद्धीप्रामाण्यवादी दोन डोळ्यांच्या माध्यमातून जेवढे दिसते आणि बुद्धीला जेवढे समजते, तेवढेच जाणू शकतात. त्या पलीकडे ते काहीच पाहू अन् समजू शकत नसल्याने त्यांना हे कसे कळणार ?’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’

उ. उपरोधिक विधान

‘आत्म्याचा समाधानी चेहरा पाहून कावळा पिंडाला शिवतो.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा (दै. सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण

‘आत्म्याचा समाधानी चेहरा पाहून कावळा पिंडाला शिवतो’, असे होत नाही, तर आधी सांगितल्याप्रमाणे लिंगदेह कावळ्याच्या देहात प्रवेश करून दिलेला पिंडयुक्त हविर्भाग ग्रहण करतो.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’

३. म्हणे, जिवंतपणी दहाव्याचा विधी केला आणि पिंडाला कावळा शिवला !

विधान

‘अंनिसच्या कार्यकर्त्याने जिवंतपणी दहाव्याचा सर्व विधी करून स्वतःचे पिंडदान केले, तरी त्याच्या पिंडाला कावळा शिवला. १०० ठिकाणी ही बाब समिती याच रितीने सिद्ध करू इच्छिते; मात्र धर्माभिमान्यांनी ही चिकित्सा करू देण्याची सिद्धता दाखवावी.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा. (दै. सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण

‘सर्वसाधारण माणूस जिवंत असल्यास त्याचा लिंगदेह बाहेर पडू शकणार नाही आणि तो कावळ्यात शिरू शकणार नाही. असे असतांना लिंगदेह ते पिंडातील अन्न कसे ग्रहण करील ?

अंनिसचे डॉ. दाभोलकर यांच्या हास्यास्पद आव्हानाला एका वाचकाने दिलेले चोख प्रत्त्युत्तर !

जिवंतपणी पिंडदानाचा विधी केल्यास पिंडाभोवती
सूक्ष्म शरीर घुटमळणार नसल्याने प्रत्येक पिंडाला कावळा शिवणे सहज शक्य !

विज्ञान असे सांगते की, शरिरातील चेतनेचा उगम रसायनांमुळे होतो; परंतु ती विशिष्ट रसायने टोचून मृत शरीर जिवंत झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे चेतनेचे मूळ रसायनांमध्ये नसून आत्म्यात आहे, अशी श्रद्धा सर्वत्र दिसते. त्या श्रद्धेनुसार मृत्यूसमयी आत्म्यासोबत सूक्ष्म शरीरही देह सोडून जाते आणि मृताची काही इच्छा राहिली असेल, तर सूक्ष्म शरीर पिंडाभोवती घुटमळत रहाते. ते काकदृष्टीला दिसत असल्याने कावळा पिंडाजवळ येत नाही. तसा अनुभवही अनेकांना येतो; परंतु जिवंतपणी पिंडदानाचा विधी केल्यास सूक्ष्म शरीर पिंडाभोवती घुटमळणार नाही. त्यामुळे अंनिस करू इच्छित असलेल्या उपरोक्त प्रयोगातील प्रत्येक पिंडाला कावळा शिवला, तर नवल नाही. मान्यतापात्र वैज्ञानिक संस्थांनी याविषयी सत्यशोधन करावे.’ – श्री. अभय रायकर, पुणे (दैनिक सकाळ, पुणे शहर, बुधवार, २०.६.२०१२)

(श्री. अभय रायकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या धर्मद्रोही विचारांचा प्रतिवाद केला, हे चांगले केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! याविषयीच्या अधिक माहितीसाठी सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’ हा वाचावा. – संकलक)

Leave a Comment