सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीमध्ये वातावरणात विद्यमान
गणेशलहरी (स्पंदने) आकृष्ट करून त्या प्रक्षेपित करण्याची क्षमता असल्याने
गणेशोत्सवाच्या कालावधीत पूजनादी संस्कार केलेले नसतांनाही मूर्तीतील चैतन्यात वाढ होणे

सनातन-निर्मित पांढर्‍या रंगाची श्री गणेशमूर्ती

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’
या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘श्री गणेशचतुर्थीला, गणेशोत्सवाच्या दिवसांत, तसेच गणेशजयंतीच्या दिवशी गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशलहरी (स्पंदने) पृथ्वीवर जास्त प्रमाणात येतात. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. साधक-मूर्तीकाराने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार गणेशतत्त्व आकृष्ट करणारी धूम्रवर्ण (श्‍वेत रंगाची) श्री गणेशमूर्ती बनवली आहे. ‘

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशलहरींचा सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १२.९.२०१८ ते १७.९.२०१८ या कालावधीत चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

 

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत १२.९.२०१८ ते १७.९.२०१८ या कालावधीत सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. तुलनेसाठी मडकई, गोवा येथील सनातनचे साधक श्री. उमेश नाईक यांच्या घरी गणेशोत्सवात ५ दिवस पूजलेल्या श्री गणेशमूर्तीची निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप १ – मडकई, गोवा येथील सनातनचे साधक श्री. उमेश नाईक यांनी श्री गणेशचतुर्थीला (१३.९.२०१८ या दिनी) सकाळी श्री गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर त्या दिवशी पूजनापूर्वी आणि पूजनानंतर, पुढील तिन्ही दिवशी (१४.९.२०१८ ते १६.९.२०१८) आरतीपूर्वी अन् आरतीनंतर, तसेच ५ व्या दिवशी (१७.९.२०१८ या दिनी) उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतर, असे एकूण ५ दिवस श्री गणेशमूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

टीप २ – सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्ती गत काही वर्षांपासून सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवली आहे. तिचे पूजन केले जात नाही. तिच्या समोर बसून साधक नामजपादी साधना करतात. चाचणीच्या कालावधीतही (१२.९.२०१८ ते १७.९.२०१८) तिच्यावर पूजनादी संस्कार केलेले नाहीत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण

दोन्ही गणेशमूर्तींमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. दोन्ही गणेशमूर्तींतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१ अ १. गणेशोत्सवातील पाचही दिवशी पूजनादी संस्कार केल्यानंतर

श्री. उमेश नाईक यांच्याकडील श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे; दुसर्‍या दिवशी गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक असणे आणि त्यानंतर ती उत्तरोत्तर न्यून होणे.

श्री. उमेश नाईक यांच्याकडील
श्री गणेशमूर्तीतील सकारात्मक
ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
पूर्वी (टीप १) नंतर (टीप २)
पहिला दिवस
(१३.९.२०१८ – श्री गणेशपूजन)
१.७० २.०६
दुसरा दिवस
(१४.९.२०१८ – श्री गणेशाची आरती)
३.०५ ४.१८
तिसरा दिवस
(१५.९.२०१८ – श्री गणेशाची आरती)
२.५० ३.२
चौथा दिवस
(१६.९.२०१८ – श्री गणेशाची आरती)
२.०४ २.४७
पाचवा दिवस
(१७.९.२०१८ – श्री गणेशाची उत्तरपूजा)
१.५८ २.३५

टीप १ – ‘पूर्वी’ म्हणजे पहिल्या दिवशी पूजनापूर्वी, दुसर्‍या, तिसर्‍या अन् चौथ्या दिवशी आरतीपूर्वी आणि पाचव्या दिवशी उत्तरपूजेपूर्वी

टीप २ – ‘नंतर’ म्हणजे पहिल्या दिवशी पूजनानंतर, दुसर्‍या, तिसर्‍या अन् चौथ्या दिवशी आरतीनंतर आणि पाचव्या दिवशी उत्तरपूजेनंतर

१ अ २. सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत गणेशोत्सवातील पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी वाढ होणे, तिसर्‍या अन् चौथ्या दिवशी घट होणे, तर पाचव्या दिवशी पुन्हा वाढ होणे.
सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी
(१२.९.२०१८)
५.६२
गणेशोत्सवाच्या कालावधीतील ५ दिवस
पहिला दिवस (१३.९.२०१८) ६.४२
दुसरा दिवस (१४.९.२०१८) ६.७०
तिसरा दिवस (१५.९.२०१८) ५.७०
चौथा दिवस (१६.९.२०१८) ५.६०
पाचवा दिवस (१७.९.२०१८) ५.८०

टीप – सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्ती गत काही वर्षांपासून सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवली आहे. तिचे पूजन केले जात नाही. तिच्या समोर बसून साधक नामजपादी साधना करतात. चाचणीच्या कालावधीतही (१२.९.२०१८ ते १७.९.२०१८) तिच्यावर पूजनादी संस्कार केलेले नाहीत.

 

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. चाचणीतील दोन्ही गणेशमूर्तींमध्ये चाचणीच्या आरंभी सकारात्मक ऊर्जा असणे;
पण सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ अधिक असणे 

चाचणीच्या आरंभी श्री. नाईक यांच्याकडील श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १.७० मीटर होती; तर सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ६.६३ मीटर होती. श्री. उमेश नाईक यांच्याकडील श्री गणेशमूर्तीच्या तुलनेत सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४.९३ मीटर अधिक आहे. याचे कारण पुढे दिले आहे.

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यामुळे देवतेचे रूप आले की, तिची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवले आहे. त्यामुळे मूर्तीकाराने स्वतःच्या कल्पनेने बनवलेल्या एखाद्या देवतेच्या मूर्तीपेक्षा धर्मशास्त्रानुसार असलेल्या देवतेच्या मूर्तीत त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. मूर्तीकाराचा मूर्ती बनवण्यामागील उद्देश, मूर्तीच्या निर्मितीसाठी उपयोगात आणलेले घटक (माती, रंग इत्यादी), मूर्ती बनवण्याचे ठिकाण, मूर्तीकाराचा भाव इत्यादी घटकांवर मूर्तीची सात्त्विकता अवलंबून असते. श्री. नाईक यांच्याकडील श्री गणेशमूर्ती समाजातील मूर्तीकाराने बनवली आहे. तिची उंची ३ फूट असून ती रंगीत आहे. सनातन-निर्मित धूम्रवर्ण (श्‍वेत रंगाची) श्री गणेशमूर्ती साधक-मूर्तीकाराने गुरूंच्या मार्गदर्शनानुसार बनवली आहे. ही धूम्रवर्ण श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार असल्याने तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यामुळे या मूर्तीमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. ही मूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या उच्च प्रतीची स्पंदने प्रक्षेपित करते. त्यामुळे ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक प्रमाणात लाभदायक ठरण्यासह तिच्यामध्ये उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अनुभूती देण्याची क्षमतासुद्धा आहे.

२ आ. गणेशोत्सवातील पाचही दिवशी पूजनादी संस्कार केल्यानंतर
श्री. उमेश नाईक यांच्याकडील श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे; दुसर्‍या दिवशी
गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक असणे आणि त्यानंतर ती उत्तरोत्तर न्यून होणे

गणेश चतुर्थीला मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजन केल्याने तिच्यात देवत्व निर्माण झाले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी दुपारी केलेल्या चाचणीतून गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक असल्याचे दिसून आले. मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहू शकत नाही; तरी त्या देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीत २१ दिवसांपर्यंत चैतन्य टिकून रहाते. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीची पूजाअर्चा होत असल्याने पूजकाच्या भक्तीभावाप्रमाणे मूर्तीतील चैतन्यात वाढही होऊ शकते. नंतर मूर्तीतील चैतन्य हळूहळू घटू लागते. असेच या मूर्तीच्या संदर्भात झाले. पहिल्या दिवशी मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.०६ मीटर होती. दुसर्‍या दिवशी ती ४.१८ मीटर सर्वाधिक होती. नंतर मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत घट होऊन पाचव्या दिवशी ती २.३५ मीटर झाली.

२ इ. सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत
पूजनादी संस्कार न करताही पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी वाढ होणे,
तिसर्‍या अन् चौथ्या दिवशी घट होणे, तर पाचव्या दिवशी पुन्हा वाढ होणे

‘साधकांना श्री गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, तसेच त्यांच्यामध्ये देवतेप्रती भाव वृद्धींगत होण्यास साहाय्य व्हावे’, यासाठी धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीची निर्मिती करण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून साधक-मूर्तीकाराने सेवाभावाने गणेशमूर्ती बनवली आहे. सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीमध्ये वातावरणात विद्यमान गणेशतत्त्व आकृष्ट करून ते प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीवर कोणतेही पूजनादी संस्कार केलेले नसतांनाही गणेशोत्सवाच्या कालावधीत वातावरणात त्या त्या दिवशी विद्यमान गणेशलहरींनुसार त्या त्या दिवशी मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ किंवा घट झाली. श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५.६२ मीटर होती. पहिल्या दिवशी तिच्यात वाढ होऊन ती ६.४२ मीटर झाली. दुसर्‍या दिवशी ती ६.७० मीटर म्हणजे सर्वाधिक होती. तिसर्‍या आणि चौथ्या दिवसापासून मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर घट होऊन ती ५.६० मीटर झाली; म्हणजे तिच्या मूळ स्थितीला आली. पाचव्या दिवशी तिच्या सकारात्मक ऊर्जेत पुन्हा वाढ होऊन ती ५.८० मीटर झाली.

थोडक्यात ‘गणेशोत्सवाच्या कालावधीत पूजनादी संस्कार केलेले नसतांनाही वातावरणात विद्यमान गणेशलहरी (स्पंदने) सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीमध्ये आकृष्ट होऊन मूर्तीतील चैतन्यात वाढ झाली’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२८.८.२०१९)

ई-मेल : [email protected]

Leave a Comment