नृत्यशास्त्रानुसार प्रत्येक मुद्रेला आध्यात्मिक अंग आहे. या मुद्रा विविध प्रकारे केल्यावर आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे ती मुद्रा केल्यावर मन अंतर्मुख झाल्यावर काय जाणवते ?, याचा अभ्यास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे नृत्याच्या माध्यमातून साधना करणारे साधक करत आहेत. हा अभ्यास करतांना प्रत्येक व्यक्तीला येणारे अनुभव त्याच्या आध्यत्मिक स्थितीनुसार उदा. आध्यात्मिक पातळी, सूक्ष्मातील कळण्याची क्षमता इत्यादीनुसार वेगवेगळे असतात. साधकाची साधना जसजशी वाढत जाते, तसतसे त्याला सूक्ष्मातील अधिक आकलन होऊन त्याचा पुढच्या स्तराचा अभ्यास होत असतो. नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
१. मुद्रा आणि हस्तमुद्रा यांचा अर्थ
१ अ. मुद्रा
संस्कृत भाषेत मुद् या धातूला रा हा प्रत्यय जोडून मुद्रा हा शब्द बनला आहे. (मुद् (आनंद, आमोद) + रा (आदान करणे, देणे) = मुद्रा (आनंद देणे, शरिराला आकर्षक आकार देऊन आनंद देणे.) वैदिक ग्रंथात मुद्रा, म्हणजे हाताने केलेला संकेत.
१ आ. हस्तमुद्रा
नृत्यात हाताने केलेल्या मुद्रांना जणू काही नृत्याची भाषाच मानले आहे. हाताच्या मुद्रांना हस्तमुद्रा असे म्हणतात. नृत्यामध्ये विविध हस्तमुद्रांचा वापर केला जातो. सखोल अभ्यास करून ऋषिमुनींनी या मुद्रा निश्चित केलेल्या आहेत.
२. नृत्य करण्याआधी केलेला भावप्रयोग
मी नृत्य करण्यापूर्वी मोर श्रीकृष्णाच्या चरणांजवळ शरणागत होऊन बसला आहे. श्रीकृष्ण त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. श्रीकृष्णाच्या केसात स्वतःचे मोरपीस पाहून मोराला पुष्कळ कृतज्ञता वाटून आनंद होत आहे. श्रीकृष्णाचे सर्व जिवांवर प्रेम आहे, असे मोर मनात म्हणत आहे. श्रीकृष्ण मोराकडे आनंदाने पहात आहे. त्याला आशीर्वाद देत आहे. श्रीकृष्ण त्याला म्हणतो, तू मला अतिशय प्रिय आहेस. तू सर्वांना मोहून टाकतोस. मोर म्हणतो, हे मनमोहना, तुमच्या सौंदर्यापुढे माझे सौंदर्य काहीच नाही. मला तुमच्या चरणी बसवल्याने मी धन्य झालो. मोराने श्रीकृष्णाच्या चरणांवर कृतज्ञतेचे अश्रू अर्पण केले, असा भावप्रयोग केला.
३. कु. अपाला औंधकर हिने मूळ स्थितीत मयूर या हस्तमुद्रेचा केलेला अभ्यास
अ. मला अनाहतचक्र आणि आज्ञाचक्र यांवर परिणाम जाणवला.
आ. मला रूप आणि गंध या तत्त्वाची अनुभूती आली.
इ. मला भाव आणि चैतन्य जाणवले. मला शांती जाणवून आनंद मिळाला.
ई. माझी भावजागृती झाली.
उ. श्रीकृष्ण आणि वरुणदेव यांच्या तत्त्वाची अनुभूती आली.
४. अन्य अनुभूती
अ. मला अनाहतचक्रावर पुष्कळ दाब जाणवला.
आ. माझा श्री विष्णवे नमः । हा नामजप चालू झाला. तेव्हा मला आज्ञाचक्रावर दाब जाणवून जडपणा वाटला.
इ. मला ३ – ४ सेकंद मातीचा सुगंध आला. मला अतिशय थंडी वाजू लागली. मला हवेत गारवा जाणवला.
ई. वरुणदेव प्रसन्न होऊन वर्षा होत असून मोर उत्साहाने सुंदर नृत्य करत आहे, असे मला जाणवले. श्रीकृष्ण मन मोहून टाकणारी बासरी वाजवत आहे. मोर आणि श्रीकृष्ण एकताल घेऊन त्यांचा नृत्याविष्कार करत आहेत. मोर नृत्याच्या अंती श्रीकृष्णाच्या चरणी डोके ठेवतो आणि केवळ बासरी ऐकतो. मोराला श्रीकृष्णासह नृत्य करायला मिळाले, हे पाहून माझी भावजागृती झाली.
उ. मला श्रीकृष्णाचे चरण दिसत होते. तेव्हा मनाला पुष्कळ शांत वाटले. या भावप्रयोगाच्या वेळी माझे मन निर्विचार होते. मला कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता; मात्र नृत्याआधी केलेल्या भावप्रयोगाच्या वेळी मला बाहेरचे आवाज ऐकू येत होते. हस्त मूळ स्थितीमधे (खांद्याच्या शेजारी) ठेवून भावप्रयोग करतांना मला केवळ बासरीचा नाद येत होता. मला दृश्य दिसणे थांबल्यावर पुन्हा बाहेरचे आवाज ऐकू येऊ लागले.
ए. माझ्यावरील आवरण नाहीसे होऊन मला हलकेपणा जाणवला. सर्व सूत्रे लिहितांना मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन कृतज्ञता वाटली.
ऐ. मी पुन्हा हस्तमुद्रा करून पाहिल्यावर काही क्षण तो नृत्य करणारा मोर मीच आहे आणि मी श्रीकृष्णासह नृत्य करत आहे, असे मला वाटले. त्या वेळी श्रीकृष्ण विविध पदन्यास करत होता. तेव्हा त्याच्या पायातील घुंगरु सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित करत आहेत, असे मला वाटले.
ओ. मी हस्तमुद्रा केली आहे आणि श्रीकृष्णाचे तत्त्व एका पांढर्या प्रकाशाच्या स्वरूपात माझ्या अनाहतचक्रात जात आहे, असे मला जाणवले. श्रीकृष्ण माझ्या ठिकाणी ती मुद्रा करून हस्तमुद्रा करत आहे, असे मला दिसले.
औ. मला हस्तमुद्रेभोवती पिवळ्या रंगाची दोन वलये दिसली. त्यामधून केशरी रंगाचे कण प्रक्षेपित होत होते. सभोवती चैतन्याचा पिवळा रंग आणि प्रीतीचा गुलाबी रंग पसरला आहे, असे मला दिसले.
अं. नृत्याभ्यास करतांना थांबायला नको, करतच राहूया, असे मला वाटले. मी अभ्यास करतांना पुष्कळ चैतन्य आणि आनंद अनुभवला. मला अभ्यास करतांना मधेमधे अनाहतचक्रावर दाब जाणवला. मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
क. नृत्याभ्यास झाल्यावर माझे शरीर पुष्कळ थंड पडले. मला वातानुकूलित खोलीतून बाहेर आल्यासारखे वाटत होते. माझी पुष्कळ भावजागृती झाली. मला खोलीमध्येही गारवा जाणवला. मला अभ्यासानंतरही पुष्कळ वेळ थंडी वाजत होती.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच माझ्यासारख्या सामान्य जिवाला कृतज्ञता अनुभवता आली. त्यांनी हे सर्व आधीच लिहून ठेवले आहे. मी ते स्थुलातून त्यांच्याच इच्छेने लिहीत आहे, असा भाव ठेवला होता.
– कु. अपाला औंधकर, रत्नागिरी (१३.९.२०२०)