मनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ असते. चांगल्या कर्मांचे फळ म्हणून पुण्य मिळते, तर वाईट कर्मांचे फळ म्हणून पाप लागते. परमेश्वर प्रत्येक जिवाला त्याच्या कर्मानुसार न्याय देतो. त्यामुळे मानवाकडून होणार्या प्रत्येक अपराधानुसार त्याला दंड मिळतो आणि हा दंड त्याला भोगूनच संपवावा लागतो.
जन्माला येतांना मनुष्य स्वतः समवेत चांगले-वाईट कर्म घेऊन जन्माला येतो आणि त्या कर्मांचे हिशोब पूर्ण करतो. हा हिशोब पूर्ण झाला नाही, तर तो पूर्ण करण्यासाठी त्याला पुढील जन्म घ्यावा लागतो. मनुष्याला स्वतःच्या कर्मासह समवेत असणार्या व्यक्तींशी संबंधित कर्मे करून त्यांचे ऋणही फेडावे लागते, म्हणजेच प्रत्येक जन्मातील सहचारी व्यक्तींचे देवाणघेवाण हिशोब पूर्ण करावे लागतात. केवळ मनुष्य प्राण्यालाच बुद्धीने कुंडलीच्या माध्यमातून कर्माविषयी जाणून घेता येते, तसेच योग्य कर्म करून जन्माचे सार्थक (मोक्षप्राप्ती) करून घेणे शक्य होते. कर्माचे परिणाम हे सर्वस्वी अटळ असतात. त्यात परमेश्वरसुद्धा हस्तक्षेप करत नाही. कर्मभोग देवांनाही अटळ असतात.
कर्माच्या गति असती गहना । जें जें होणार तें कदा चुकेना ।
तें तें भोगल्यावीण सुटेना । देवादिकां सर्वांसी ॥ – शनिमाहात्म्य १३८
अर्थ : कर्मांच्या गती गहन असतात. होणारे कधीही चुकत नाही. कर्माचे भोग कुणालाही, म्हणजे अगदी देवादिकांनाही चुकत नाहीत.
१. कर्मांचे प्रकार
१ अ. संचित कर्मे
मागील अनेक जन्मांत केलेल्या पाप-पुण्यादी कर्मांना संचित कर्मे असे म्हणतात.
१ आ. प्रारब्ध कर्म
पूर्वजन्मांच्या कर्मांची फळे या जन्मी भोगावी लागतात. त्यांचा कार्यकारणभाव लक्षात येत नसल्याने त्यांना दैव, नशीब किंवा प्रारब्ध असे म्हटले जाते.
१ इ. क्रियमाण कर्म
आपल्या स्वतःच्या बुद्धीने किंवा इच्छेने आपण जे कर्म करतो, त्याला क्रियमाण कर्म असे म्हणतात.
२. कर्माचा उद्देश
किडामुंगीपासून प्रत्येक प्राणिमात्राच्या जीवनाचा उद्देश सातत्याने सुख मिळवणे आणि दुःख टाळणे, हाच असतो. मनुष्य सुखदायक गोष्ट मिळवणे आणि दुःखदायक गोष्ट टाळणे, यांसाठी सतत प्रयत्न, म्हणजे कर्म करत रहातो. केवळ मनुष्य प्राण्याला त्याच्या पत्रिकेतील कुंडलीतील कर्मस्थानावरून कर्माचा बोध होऊ शकतो.
३. कर्मयोगाविषयी विवेचन
३ अ. भगवान श्रीकृष्ण
भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कर्मयोगाचे महत्त्व सांगितले आहे. या योगात कर्माद्वारे भगवंताची प्राप्ती कशी होते ?, याचे वर्णन केले आहे. कर्मयोगी कर्माचा त्याग करत नाहीत, तर कर्मफळांचा त्याग करतात आणि जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतात.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४७
अर्थ : माणसाला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्माचे फळ त्याच्या हातात नसते.
३ आ. संत रामदास स्वामी
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ – मनाचे श्लोक, श्लोक ११
अर्थ : हे मना, तू जे पाप अथवा पुण्य गेल्या जन्मांत केले आहेस, त्यानुसार तुला या जन्मात भोग भोगावे लागत आहेत.
३ इ. स्वामी स्वरूपानंद
कर्म तैसे फळ लाभते केवळ । आणिकांते बोल लावू नये ॥
पेरोनिया साळी गव्हाचे ते पीक । घ्यावया निःशंक धावू नये ॥
उत्तरासारखे येते प्रत्युत्तर । करावा विचार आपणाशी ॥
पहावे ते दिसे दर्पणी साचार । आपुला आचार ओळखावा ॥
स्वामी म्हणे होसी सर्वथैव जाणे । तुझ्या तू कारण सुखदुःखा ॥
अर्थ : आपण जसे कर्म करू, तसेच फळ आपल्याला लाभते. त्यासाठी इतरांना दोष देऊ नये. आपण जर साळीचे (भाताचे) पीक लावले असेल, तर गहू मिळावे, अशी अपेक्षा करू नये. आपण जे उत्तर देतो, तसेच प्रत्युत्तर आपल्याला मिळते, असा विचार करावा. आपण जसे पहातो, तसेच आपल्याला आरशामध्ये दिसते. त्यामुळे आपले आचरण कसे आहे ?, याकडे लक्ष द्यावे. स्वामी (स्वरूपानंद) म्हणतात, तुझ्या सुखाचे आणि दुःखाचे कारण सर्वथा तूच आहेस, हे लक्षात घे.
३ ई. मराठी भाषेतील साहित्यिक आणि कवी राम गणेश गडकरी
आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो ना कळे ।
आहे जो सुखदुःखभोग नशिबीं कोणास तो ना टळे ॥
आहे जीवित हा हिशेब सगळा हा बोध चित्तीं ठसे ।
देणें हें गतकालिचे सकळही सव्याज देणें असे ॥
अर्थ : एखाद्याच्या नशिबी जे लिहिले आहे, ते कुणालाही टाळता येत नाही. नशिबी असलेले सुख-दुःखाचे भोग टळत नाहीत. त्यामुळे हे जीवन म्हणजे (पूर्वकर्मांचा) हिशेब आहे, हा बोध मिळतो आणि गतजन्मांतील हे सर्व देणे व्याजासहीत या जन्मात द्यावेच लागते.
४. कुंडलीतील कर्मस्थान
व्यक्तीचा जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मठिकाण यांवरून जी कुंडली सिद्ध केली जाते, ती जन्मकुंडली होय ! ही कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी आकाशात जी ग्रहस्थिती असते, त्याचा नकाशाच होय. जन्मकुंडलीतील १० व्या स्थानाला, म्हणजेच दशम स्थानाला कर्मस्थान असे म्हणतात. दशम स्थानाला केंद्रस्थान किंवा उपचयस्थान असेही म्हणतात. कुंडलीतील १, ४, ७ आणि १० ही केंद्रस्थाने असून ती अतिशय शक्तीमान स्थाने असतात. कार्यशक्तींच्या दृष्टीने केंद्रस्थानातील पहिल्या स्थानापेक्षा चौथे, चौथ्यापेक्षा सातवे आणि सातव्यापेक्षा दहावे स्थान बलवान असते.
५. कर्मस्थानावरून कोणत्या गोष्टींचा बोध होतो ?
दशम स्थानावरून जातकाची जगातील ओळख, पितृसौख्य, दत्तकपुत्र, सासू, नोकरी किंवा व्यवसाय, कार्यक्षमता, अधिकाराचा योग, पत, प्रतिष्ठा, सामाजिक यश, कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध लढण्याची क्षमता, राजकारण, यज्ञयाग, सामर्थ्य, संन्यास आदींचा बोध होतो.
६. कुंडलीतील कर्मस्थान (दशम स्थान) दर्शवणारी आकृती
७. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक कर्माशी संबंधित असणारे ग्रह
७ अ. शनि
व्यक्तीच्या स्वकर्माचा स्वामी ‘शनि’ ग्रह आहे.
७ आ. रवि
पितृकर्माचा (पित्याचे शुभ-अशुभ पूर्व कर्म) स्वामी ‘रवि’ ग्रह आहे.
७ इ. चंद्र
मातृकर्माचा (मातेचे शुभ-अशुभ पूर्व कर्म) स्वामी ‘चंद्र’ ग्रह आहे.
७ ई. शुक्र
पती-पत्नी संबंधित पूर्वकर्माचा स्वामी ‘शुक्र’ ग्रह आहे. त्याप्रमाणे संपूर्ण घराण्याचे पूर्वकर्म दर्शवणारा स्वामीही ‘शुक्र’च आहे.
७ उ. गुरु
संतती संबंधित पूर्वकर्माचा स्वामी ‘गुरु’ ग्रह आहे.
७ ऊ. मंगळ
वास्तू दोष किंवा भूमी दोष यांच्याशी संबंधित कर्माचा स्वामी ‘मंगळ’ ग्रह आहे.
८. कर्मस्थानाचे कारक ग्रह, म्हणजे त्या स्थानात
महत्त्वाचे ठरणारे ग्रह आणि त्या ग्रहाशी संबंधित व्यक्ती
कर्मस्थानाचे कारक ग्रह रवि, शनि, बुध आणि गुरु आहेत.
८ अ. कर्मस्थानाचे कारक ग्रह
८ अ १. रवि
आत्मिक तेजाचा कारक ग्रह ‘रवि’ कर्मस्थानात शुभ असल्यास व्यक्ती उत्तम नेतृत्व करते. हा सत्तेची आवड दर्शवतो.
८ अ २. शनि
कर्माचा कारक ग्रह ‘शनि’ कर्मस्थानात शुभ असल्यास व्यक्ती कठोर परिश्रमाने फलप्राप्ती करणारी, तसेच इतरांकडून कर्म करून घेणारी असते.
८ अ ३. बुध
बुद्धीचा कारक ग्रह ‘बुध’ कर्मस्थानात शुभ असल्यास व्यक्ती अभ्यासू वृत्तीने आणि तर्कशास्त्राचा विचार करून कृती करणारी असते.
८ अ ४. गुरु
विद्या आणि ज्ञान यांचा कारक ग्रह ‘गुरु’ कर्मस्थानात असल्यास व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करणारी, ज्ञानाचा प्रसार करणारी आणि शुभ कर्म करणारी असते.
८ अ ५. मंगळ
कर्मस्थानातील शुभ मंगळ व्यक्तीला क्रांतीकारक ठरतो.
८ आ. कारक ग्रहाशी संबंधित देवता, संत आणि काही मान्यवर व्यक्ती
८ आ १. कर्मस्थानात रवि असलेले
प्रभु श्रीरामचंद्र, आद्य शंकराचार्य, संत रामदास स्वामी, बिडकर महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षि धोंडो केशव कर्वे, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. नितू मांडके, पंडित शौनक अभिषेकी इत्यादी.
८ आ २. कर्मस्थानात शनि असलेले
थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती, गुरुनानक, संन्यासी, स्वामी, करपात्री महाराज, स्वामी विवेकानंद, मेहरबाबा, प.प. श्रीधर स्वामी, संत वाङ्मयाचे अभ्यासक ले. रा. पांगारकर, इतिहास संशोधक वि.का. राजवाडे, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक भालजी पेंढारकर, मा. यशवंतराव चव्हाण इत्यादी.
८ आ ३. दशमात बुध असलेले
प्रभु श्रीरामचंद्र, संत रामदास स्वामी, ‘भूदान चळवळी’चे जनक आचार्य विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन्, पद्मविभूषण प्राप्त थोर शास्त्रज्ञ डॉ. वामन पटवर्धन, इतिहासतज्ञ वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक पु.ना. ओक, महर्षि धोंडो केशव कर्वे इत्यादी.
८ आ ४. दशमात गुरु असलेले
संत रामदास स्वामी, श्री स्वामी समर्थ, स्वामी लोकनाथ तीर्थ, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, महर्षि धोंडो केशव कर्वे, उद्योगपती धीरुभाई अंबानी इत्यादी.
९. कर्मस्थानातील ग्रह स्वगृही असणे
कुंडलीतील कर्मस्थानाचा अधिपती कर्मस्थानात, म्हणजे स्वगृही असेल, तर व्यक्ती कर्तृत्ववान असते. अशी काही नावे पुढे दिली आहेत.
नाव | कर्मस्थानातील राशी | कर्मस्थानातील स्वग्रह |
१. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज | ८ | मंगळ |
२. संत रामदास स्वामी | १२ | गुरु |
३. स्वामी लोकनाथ तीर्थ | १२ | गुरु |
४. गुरुदेव रानडे | २ | शुक्र |
५. आचार्य विनोबा भावे | ६ | बुध |
१०. दशमस्थानाच्या अनुषंगाने कुंडलीतील स्थानांचा विचार दर्शवणारी आकृती
११. जन्मकुंडली ६५ टक्के ‘प्रारब्धकर्म’ आणि ३५ टक्के ‘क्रियमाण कर्म’ दर्शवते !
व्यक्तीची जन्मकुंडली ‘व्यक्ती पूर्वजन्मीच्या कोणत्या कर्मांची शिदोरी घेऊन जन्माला आली आहे ? आणि या जन्मात त्या शिदोरीचा कसा भोग अन् उपभोग घ्यायचा आहे ?’, हे दर्शवते. कर्माला प्रतिसाद देण्याचे काम नियती करत असली, तरीही सद्सद्विवेकबुद्धी वापरून आणि ईश्वराचे अधिष्ठान ठेवून कर्म केल्यास ईश्वरप्राप्ती होऊन सत्-चित्-आनंदाची प्राप्ती होते. कुंडलीतील पूर्वकर्मांनुसार मिळालेल्या गोष्टी (प्रारब्धकर्म) ६५ टक्के, तर या जन्मात करावयाच्या गोष्टी (क्रियमाण कर्म) ३५ टक्के असतात.
१२. पूर्वकर्मांनुसार मिळालेल्या गोष्टी दर्शवणारी कुंडलीतील स्थाने
१२ अ. प्रथम स्थान
यावरून ‘व्यक्तीचे रंगरूप, तसेच उंची कशी असेल ?’, हे कळते.
१२ आ. द्वितीय स्थान
स्वतःचे कुटुंबीय कसे असतील ? कौटुंबिक धन मिळेल का ?
१२ इ. तृतीय स्थान
भावंडे किती आणि कशी असतील ?
१२ ई. चतुर्थ स्थान
कोणत्या आई-वडिलांच्या उदरी जन्म घेणार ? गृहसौख्य कसे असणार ?
१२ उ. पंचम स्थान
शिक्षणाची आवड, तसेच संततीची संख्या आणि ती कशी असेल ? प्रेमसंबंध कसे असतील ?
१२ ऊ. षष्ठ स्थान
संभाव्य आजार आणि अनुवंशिकता
१२ ए. सप्तम स्थान
पती किंवा पत्नी यांचे सुख किती मिळेल ?
१२ ऐ. अष्टम स्थान
आयुष्य किती असेल ?
कुंडलीतील १२ पैकी ८ स्थाने, म्हणजे ६५ टक्के भाग ‘प्रारब्ध’ दर्शवतो आणि उर्वरित ४ स्थाने ‘क्रियमाण कर्म’ दर्शवतात. या जन्मात व्यक्ती जे कर्म करणार, त्याला भाग्यस्थानाची साथ मिळून तिने शुद्ध भावनेने केलेल्या कर्मानुसार तिला होणारे लाभ आणि व्यय हे अनुक्रमे लाभस्थान अन् व्ययस्थान यांवरून अभ्यासले जातात.
१३. कर्मस्थानाला पोषक असणारी इतर स्थाने
कर्मस्थानाचा विचार करतांना अकर्मकर्म होण्यासाठी कुंडलीतील पुढील तीन स्थानांचा विचार करणे आवश्यक आहे.
१३ अ. तृतीय स्थान हे कर्मस्थानाचे षष्ठ स्थान !
तृतीय स्थानावरून भावंडे, शेजारी, पराक्रम आदी अभ्यासले जाते. षष्ठ स्थानावरून स्पर्धक, शत्रू, रोग आदी अभ्यासतात. तृतीय स्थान हे कर्मस्थानाचे षष्ठ स्थान असल्याने योग्य कर्म होण्यासाठी भावंडे, तसेच शेजारी यांची संगत चांगली असणे आणि योग्य पराक्रम घडणे आवश्यक असते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडते, तेव्हा अनेक स्वभावदोषांमुळे ती नकळत कर्मबंधनांत अडकते. यासाठीच तृतीय स्थान हे कर्मस्थानाचे शत्रू स्थान आहे.
१३ आ. चतुर्थ स्थान हे कर्मस्थानाचे सप्तम स्थान !
चतुर्थ स्थानावरून माता, मन, सुख आदींचा बोध होतो. सप्तम स्थानावरून जोडीदाराचा बोध होतो. व्यक्तीच्या हातून योग्य कर्म होण्यासाठी त्याच्या सतत सोबत असणारे त्याचे ‘मन’ हे जोडीदार असते. प्रत्येक कर्म करतांना बाह्य मनाऐवजी अंतर्मनाचे साहाय्य घेतल्यास हातून योग्य कर्म घडते.
१३ इ. पंचम स्थान हे कर्मस्थानाचे अष्टम स्थान !
पंचम स्थानावरून विद्या, संतती, तसेच मागील जन्मांतील साधना यांचा बोध होतो. अष्टम स्थान मृत्यू दर्शवते. योग्य साधनेच्या आधारे कर्म केल्यास व्यक्ती जन्म-मरणाच्या फेर्यांतून सहज मुक्त होऊ शकते.
कुंडलीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार त्रिकोणांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्वरचरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करते. यासाठी व्यक्तीच्या हातून योग्य कर्म होणे आवश्यक आहे.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ‘ज्योतिष फलित विशारद’ आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०१९)