श्राद्धातील कृतींमागील शास्त्र

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यू नंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, असे वासनायुक्त पितर कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, त्यांचा अध्यात्मावरील अविश्वास, त्यांच्या विचारसरणीवर पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाची चढलेली पुटे आदींमुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला वा अवास्तव वाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे. म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते.

श्राद्धाचे महत्त्व, लाभ, प्रकार, श्राद्ध करण्यासंदर्भातील विधीनिषेध यांसारखे मूलभूत ज्ञान ‘भाग १. श्राद्ध (महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन)’ या ग्रंथात दिली आहे. प्रस्तूत ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात श्राद्धातील विविध कृतींमागील बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. यामुळे श्राद्धाविषयीची सत्यता तर पटतेच, याव्यतिरिक्त श्राद्धाविषयीचे विकल्प दूर होण्यासही साहाय्य होते. श्राद्धासाठी पाच ब्राह्मणांना का बोलवावे, श्राद्धविधीत दर्भ, काळे तीळ, तुळस आणि माका का वापरतात, श्राद्धात लाल रंगाची फुले वर्ज्य का, श्राद्धासाठी तांदळाची खीर का करतात, देवता आणि पितर यांना नैवेद्य दाखवण्याच्या पद्धतींचे शास्त्र काय यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात देण्यासहच, श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली, हे ओळखण्याच्या संदर्भातील काही लक्षणे आणि अनुभूती यांचाही अंतर्भाव यात केला आहे.

सनातनच्या साधकांना ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले हे ज्ञान पुढच्या स्तराचे असल्याने सर्वसामान्यांना समजण्यास थोडे कठीण आहे. असे असले तरी जिज्ञासा आणि तळमळ असल्यास या ज्ञानाचे आकलन व्हायला साहाय्य होईल.

या ग्रंथाच्या अभ्यासाने आपल्या महान ऋषीमुनींनी दिलेला ‘श्राद्ध’रूपी अनमोल संस्कृतीधनाचा वारसा जपण्याची सद्‍बुद्धी सर्वांना लाभो, तसेच श्राद्धविधी श्रद्धेने करता येऊन आपल्या पूर्वजांची, तसेच स्वतःचीही उन्नती साधता येवो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना.

– संकलक

 

अर्पणमूल्य : ५० रु.

संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

 

प्रस्तूत ग्रंथाविषयी मिळालेले दिव्य ज्ञान !

‘पितरांच्या देवाण-घेवाणीतून जीवनमुक्त होण्याची संधी
उपलब्ध करून देणारा प.पू. डॉक्टरांचा ग्रंथ ! – सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’

हिंदु धर्माने घालून दिलेल्या नित्य-नैमित्तिक ‘आचार-विचार’ कर्मातील ‘श्राद्ध’ हा महत्त्वाचा आचार (वर्तन) आहे, तर त्यातून उत्पन्न होणारी जीवन्मुक्ततेची फलश्रुती हाच खरा विचार (परिणाम) आहे, असा धर्मनियम आहे. या धर्मनियमाचे पालन करून सर्वांनाच पितरांच्या जीवात्मक, प्राणात्मक अशा मोहमयी वासनात्मक देवाणघेवाणीतून मुक्त होण्याची संधी प.पू. डॉक्टरांनी (प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी) संकल्परूपाने ‘श्राद्ध’ या संज्ञात्मक ग्रंथातून उपलब्ध करून दिली आहे. – सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.८.२००६, दुपारी १२.३५)

Leave a Comment