अनुक्रमणिका
- १. वृक्षारोपण करतांना यजुर्वेदातील ऋचा म्हणणे
- २. बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे
- ३. वृक्षारोपण संदर्भातील महत्त्वाची सूचना
- ४. कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे ?
- ५. घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत ?
- ६. कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत आणि लावल्यास त्यामुळे होणारे दुष्परिणाम
- ७. झाडे कधी कापावीत ?
- ८. कोणतेही झाड कापायचे असल्यास काय करावे ?
१. वृक्षारोपण करतांना यजुर्वेदातील ऋचा म्हणणे
अपो देवीरुपसृज मधुमतीः, अयक्ष्माय प्रजाभ्य: ।
तासाम् आस्थानात् उज्जिहताम्, ओषधय: सुपिप्पला: ॥
– यजुर्वेद, अध्याय ११, कण्डिका ३८
अर्थ : हे अग्निदेवा, लोक निरोगी व्हावेत, यासाठी तू आरोग्यदायी जलदेवतांना येथे घेऊन ये. जलदेवतांनी सिंचन केलेल्या या भूमीतून फळा-फुलांनी समृद्ध अशा वनस्पती उगवू देत, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. वृक्षारोपण करतांना यजुर्वेदातील ही ऋचा मनःपूर्वक म्हटल्यास तो वृक्ष दीर्घायुषी आणि फलसमृद्ध होतो. वृक्षारोपण करण्यासाठी केलेल्या खड्यात मंत्रपूर्वक पाणी प्रोक्षण करावे. झाडाची मुळे आणि त्याची अग्रे यांवरही मंत्राचे पठण करत पाणी शिंपडावे.
२. बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे
घराभोवती बाग करायची असेल किंवा वृक्षारोपण करायचे असेल, तर ते नेहमी अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, विशाखा, अनुराधा, उत्तराषाढा, शततारका, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांवर शुभवारी करावे.
३. वृक्षारोपण संदर्भातील महत्त्वाची सूचना
स्मशान, मार्ग, तपस्वींचे आश्रम, नद्यांचे संगम, या ठिकाणी उगवलेल्या वृक्षवल्ली, वादळामुळे उन्मळून पडलेल्या वृक्षवल्ली, शुष्क झालेले (वाळलेले) रोप अथवा झाड, तसेच रोगी व्यक्तीने आणून दिलेली फुले अथवा फळ यांचे रोप कधीही लावू नये.
४. कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे ?
पूर्व दिशेला औदुंबर, पश्चिमेला पिंपळ आणि दक्षिणेला औदुंबर ही झाडे असणे शुभदायक असते. पूर्व दिशेला चमेली, चंपा, पिवळी केतकी, पांढरा गुलाब, लाल फुले येणारी झाडे, नारळ, लिंबू, सुपारी, जांभूळ आणि आंबा ही झाडे लावावीत.
५. घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत ?
अ. बेल, शमी, अशोक, नागकेशर, चंपा, डाळिंब हे वृक्ष आणि गुलाब, चमेली अन् केतकी ही फुलझाडे लावणे शुभदायक असते.
आ. केशर, अशोक, मालती, जपाकुसुम (जास्वंदी), चंदन, दालचिनी, नारळ आणि फणस ही झाडे घराच्या कोणत्याही दिशेला लावली, तरी शुभदायक असते.
इ. तुळशीची रोपे आणि दुर्वा अधिक प्रमाणात लावल्यास त्याचे सकारात्मक परिणाम होतात. तुळस आणि कडुनिंबाची झाडे वास्तूत अधिक असल्यास प्राणवायूचा पुरवठा होतो.
ई. पारिजातक, कण्हेर आणि निळी फुले असणार्या वेली, उदा. गोकर्ण, कृष्णकमळ आदी ईशान्य दिशेला असल्यास शुभ परिणाम होतात. या दिशेला कमळपीठ आणि कारंजे असणे शुभ असते.
उ. लॉन (हिरवळ), लहान आकाराची उंच न वाढणारी झाडे, औषधी गुणांनी युक्त लहान झाडे, सजावटीची झाडे, सुवासिक फुलांची रोपे, उदा. जाई, जुई, शेवंती, गुलाबांच्या फुलांचे ताटवे इत्यादी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावीत.
ऊ. घरगुती वाटिका (बाग) उत्तर आणि वायव्य भागात करावी.
ए. पेरूचे झाड उत्तर दिशेला लावल्यामुळे समृद्धी प्राप्त होते.
ऐ. सोनचाफा, मोगरा यांसारखी पांढरी सुवासिक फुलझाडे वायव्य भागात लावावीत. त्यामुळे मन प्रसन्न होते.
ओ. डाळिंबाचे रोप प्लॉटच्या उत्तर दिशेला कोणत्याही मासातील शुक्ल पक्षातील हस्त नक्षत्रात लावावे. डाळिंबाच्या झाडात लक्ष्मीचा वास असतो.
औ. कढीपत्त्याचे झाड पूर्व आणि आग्नेय या दिशांना लावावे.
अं. बदामाचे झाड आग्नेय भागात शुक्ल पक्षातील उत्तरा नक्षत्रात लावल्यास भरभराट होते.
क. औदुंबर वृक्ष दक्षिण दिशेला असल्यास शुभ फळ मिळते; कारण या वृक्षात गुरुतत्त्व असते. त्यामुळे दक्षिण दिशेकडून येणार्या यमलहरी नष्ट होतात.
ख. केळीचे झाड घराचे प्रवेशद्वार अथवा कंपाऊंड गेट रहदारी असणार्या रस्त्याला लागून असल्यास लावू नये. या झाडामध्ये वातावरणातील नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता अधिक असल्याने ती नकारात्मकता वास्तूच्या सभोवती पसरते.
६. कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत आणि लावल्यास त्यामुळे होणारे दुष्परिणाम
अ. आग्नेय दिशेला औदुंबर, पाकर, लाल फुलांचे वा काटेरी वृक्ष लावू नयेत. त्यामुळे मृत्यू वा अन्य हानी होण्याची शक्यता असते.
आ. पूर्व दिशेला पिंपळ, पश्चिमेला वड, उत्तरेला औदुंबर आणि दक्षिणेला पाकर ही झाडे लावू नयेत. हे अशुभ असते. त्यामुळे व्यक्तीचा उत्कर्ष होत नाही.
इ. पूर्व दिशेला पिंपळ वृक्ष लावल्यास भीती वाढते.
ई. पश्चिम दिशेला वटवृक्ष लावल्यास मालक अथवा कुटुंबीय यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास होतो.
उ. उत्तर दिशेला औदुंबराचे झाड लावल्यास त्या घरात राहणार्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार संभवतात.
ऊ. घराजवळ पिवळ्या रंगाचे फुलाचे झाड असणे अशुभ असते.
ए. घराजवळ बोर, बाभूळ, सराटे, निवडुंग अथवा कोणत्याही प्रकारची काटेरी रोपे असू नयेत. या झाडांचे काटे नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात. ते अनिष्ट शक्तींचे बलस्थान असते. यामुळे अकारण शत्रूत्व निर्माण होऊन कुटुंबियांमध्ये वादविवाद होतो, मनाला उद्विग्नता येते आणि घरात समृद्धी येत नाही.
ऐ. शमी, कडुनिंब आणि बेल ही झाडे घराच्या पाठीमागे काही अंतरावर असावी; परंतु घराजवळ अथवा घरासमोर असू नये.
ओ. क्षिरवृक्ष म्हणजे ज्या झाडातून चीक प्रसवतो, अशी झाडे लावल्यास धननाश संभवतो, उदा. रुईचे झाड, विशेषतः जांभळ्या रुईचे झाड वास्तूच्या सभोवती कधीही लावू नये.
औ. कोणत्याही वृक्षाची छाया दिवसाचा एक प्रहर झाल्यानंतर, म्हणजे सकाळी ९ वाजल्यानंतर घरावर पडू नये.
अं. निळंबी आणि दारू हळद यांची झाडे (दारू हळद हा हळदीचा एक प्रकार आहे.) घराच्या जागेत लावू नयेत. ही झाडे शेतात लावावीत. त्यामुळे संपत्ती आणि संतती यांचा नाश होतो.
क. केळी, चिकू, चिंच, शेवगा, जांभूळ आणि पपई यांसारखी अनेक बिया असणारी झाडे लावल्यास पैसा टिकत नाही, आर्थिक ओढाताण होते; म्हणून ती घराच्या जागेत लावू नयेत.
ख. घराजवळ पूर्व दिशेला मोठी झाडे लावू नयेत; कारण त्यामुळे घरात सूर्यप्रकाश येत नाही. सूर्यप्रकाश न आल्याने घरातील व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती उणावते.
ग. प्लॉटमध्ये जांभळाचे झाड लावू नये. जांभळाच्या बियांचा रक्तातील साखर अल्प करण्यासाठी औषधी उपयोग करतात, म्हणजेच रक्तातील साखर (गोडवा) अल्प होते. यामुळे जांभळाचे झाड वास्तूत असेल, तर कुटुंबात वादविवाद होतात.
७. झाडे कधी कापावीत ?
भाद्रपद किंवा माघ या मासांत कोणतेही झाड कापल्यास चालते. सिंह अथवा मकर राशीत सूर्य असतांना केव्हाही झाड कापू नये. पुनर्वसु, अनुराधा, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि श्रवण ही नक्षत्रे झाड कापण्यास शुभदायी आहेत.
८. कोणतेही झाड कापायचे असल्यास काय करावे ?
कोणतेही झाड काढायचे असल्यास प्रथम शासनाची अनुमती घ्यावी. अनुमती मिळाल्यावर झाड काढायच्या आदल्या रात्री त्या झाडाला नैवेद्य दाखवून क्षमायाचना करावी. हे वृक्षा, काही अपरिहार्य कारणास्तव आपणास काढावे लागत आहे, यासाठी मला क्षमा असावी. योग्य ठिकाणी आपले एक झाड मी निश्चित लावीन, असे म्हणून संकल्प करावा. दुसर्या दिवशी झाडाची पूजा करून उत्तर किंवा पूर्व दिशेकडून झाड कापावे. झाड कापल्यानंतर ते पूर्व किंवा उत्तर दिशेला पडेल, असे पहावे.
– सौ. प्राजक्ता जोशी, वास्तु विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, ज्योतिष विभागप्रमुख, गोवा.
उत्तम