सनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेला आपत्काळ दाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. कधीही तो आता प्रवेश करू शकतो. गेल्या वर्षभरापासून चालू असलेले कोरोना महामारीचे संकट ही आपत्काळाची एक छोटीशी झलक आहे. प्रत्यक्षातील आपत्काळ याहून कितीतरी पटींनी भयानक आणि अमानुष असणार आहे. त्याची विविध रूपे असणार आहेत. यात मानवनिर्मित, तसेच नैसर्गिक प्रकार असणार आहेत. यातील काहींची माहिती आपण या लेखमालिकेत पहाणार आहोत. या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा लाभ वाचकांनी करून घ्यावा, हाच ही लेखमालिका प्रसिद्ध करण्याचा उद्देश आहे. पुढील तिसर्या महायुद्धाच्या वेळी अणूबाँबचे आक्रमण गृहीतच धरावे लागणार आहे. अणूबॉम्ब म्हणजे काय ?, अणूबॉम्बच्या स्फोटाचे स्वरूप, त्याच्या स्फोटाचे मानवी जीवनावरील दुष्परिणाम यांविषयीची माहिती आपण मागील लेखात पाहिली.
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/77278.html
१ अ १ उ. अणूबॉम्बचे आक्रमण होण्यापूर्वी स्वतःच्या रक्षणासाठी करायची उपाययोजना
१. सुरक्षित आसरा घेता येण्यासाठी तळघर किंवा इमारतीचा मध्यभाग आधीच पाहून ठेवणे अथवा शक्य असल्यास घराभोवती खंदक सिद्ध करणे
अणूबॉम्बचे आक्रमण केव्हाही होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या आपत्तीला तोंड देण्यासाठी स्वतःचे घर, कामाचे ठिकाण किंवा शाळा यांसारख्या ठिकाणी जेथे आपण दिवसातील बराच वेळ व्यतीत करतो, तसेच नेहमीच्या प्रवासाच्या वाटेवर असतो, त्या जवळील सुरक्षित ठिकाणे शोधून ठेवावीत. भूमीगत असलेले तळघर आणि मोठ्या भक्कम इमारतींचा मध्यभाग ही अणूबॉम्बच्या आक्रमणापासून सुरक्षा होण्यासाठीची सर्वोत्तम ठिकाणे असतात. अशी जागा नसल्यास ज्यांना शक्य आहे ते घरासमोर मोकळ्या जागेत युद्धाच्या प्रसंगी बांधतात तसे खंदक बनवू शकतात आणि त्याचा उपयोग करू शकतात.
संदर्भ : www.nrc.gov/about-nrc/emerg-preparedness/about-emerg-preparedness/potassium-iodide-use.html
१ अ १ ऊ. अणूबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर त्यातून किरणोत्सर्ग चालू होण्यापूर्वी स्वतःच्या रक्षणासाठी करायच्या उपाययोजना
१ अ १ ऊ १. अणूबॉम्बच्या स्फोटाच्या ठिकाणापासून त्वरित दूर जाणे
अणूबॉम्ब पडल्याचे समजताच, त्याच्या किरणोत्सर्गाचा आपल्यावर परिणाम होण्यापूर्वी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी लवकरात लवकर स्फोटाच्या ठिकाणापासून दूर जावे. यासाठी फॉलआऊटचा कालावधी उपयोगी पडू शकतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे हा कालावधी १५ मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो. किरणोत्सर्गाचे ठिकाण घरापासून जवळ असेल, तर घरीच थांबून रहावे.
१ अ १ ऊ २. किरणोत्सर्गाच्या वेळी उत्सर्जित होणार्या गॅमा किरणांपासून बचाव होण्यासाठी शक्य असल्यास खंदकात लपणे
स्फोटानंतर होणार्या किरणोत्सर्गाच्या वेळी प्रसारित होणार्या गॅमा किरणांपासून बचाव करण्यासाठी शक्य असल्यास आपण ४ – ५ फूट खोल अशा खंदकाचा वापर करावा; परंतु खंदकाची जागा स्फोटाच्या धक्क्याने उद्ध्वस्त होऊन आपण त्यात गाडले जाणार नाही, इतपत ती सुरक्षित आहे ना, याची निश्चिती करावी.
१ अ १ ऊ ३. घर किंवा इमारत यांच्या छतावर जाणे टाळणे
फॉलआऊट म्हणजेच किरणोत्सर्ग असलेली धूळ इमारतीच्या छतावर, तसेच बाहेरील भिंतींवर लवकर गोळा होते; म्हणून शक्यतो उंचावरील मजल्यावर जाणे टाळावे, तसेच बाहेरील भिंती आणि छत यांपासून दूर रहावे.
१ अ १ ऊ ४. अणूबॉम्बच्या स्फोटाच्या वेळी होणारा प्रचंड प्रकाश पहाण्यासाठी किंवा आवाज ऐकण्यासाठी खिडकीजवळ जाणे टाळणे
अणूबॉम्बच्या स्फोटाच्या वेळी आधी प्रचंड प्रकाश होतो आणि नंतर प्रचंड आवाज येतो. जर आपल्याला असा प्रचंड प्रकाश जाणवला, तर कुतूहलापोटी खिडकीजवळ जाऊन पाहू नये. शॉक वेव्हज् मुळे (स्फोटामुळे निर्माण झालेल्या हवेच्या आत्यंतिक तीव्र दाबाच्या लहरींमुळे) दुखापत होऊ शकते. अशा प्रसंगी रक्षण होण्यासाठी खोलीतील कपाट अथवा तत्सम आडोशामागे लपावे. अशा शॉक वेव्हज्मुळेच बहुतांशी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होते.
१ अ १ ऊ ५. घराची सर्व दारे-खिडक्या बंद करून त्यांमधील लहान-लहान फटीही बंद करणे
अणूबॉम्बच्या स्फोटाच्या वेळी तुम्ही घरातच असाल, तर (आपल्याला घरातच रहावे लागल्यास) बाहेरील हवा किंवा धूळ घरात येऊ नये, यासाठी (आत येण्यास) दारे, खिडक्या इत्यादी बंद कराव्यात. दारे, खिडक्या, भिंती आणि लादी यांमध्ये फटी असल्यास त्या बंद करण्यासाठी सेलोटेप इत्यादींचा वापर करावा.
१ अ १ ऊ ६. वाहनात असल्यास वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून करायच्या कृती
स्फोटाच्या वेळी आपण जर एखाद्या वाहनात बसलेले असू, तर हवेत उडणार्या अवशेषांपासून, तसेच उष्म्यापासून रक्षण होण्यासाठी वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवावे. जवळ एखादे सुरक्षित स्थान शोधून तेथे लपून बसावे. सुरक्षित स्थान दिसत नसेल, तर वाहनातच स्वतःची मान आणि डोके हाताने झाकून घेऊन रक्षण करावे. जर आपण बाहेर असू, तर शक्य झाल्यास तोंडवळा भूमीकडे करून झोपून रहावे.
१ अ १ ऊ ७. किरणोत्सर्गापासून रक्षण करू शकणार्या सामग्रीचा (उदा. शिशाचे पत्रे, केमिकल प्रोटेक्टीव्ह मास्क यांचा) उपयोग करणे
शिसे, काँक्रीट किंवा पाण्याचे अडथळे गामा किरण आणि क्ष-किरण यांपासून संरक्षण करतात. यामुळे एरव्ही काही किरणोत्सर्गीय सामग्री ठेवायची असल्यास ती नेहमी पाण्याखाली, काँक्रीटच्या किंवा शिशाच्या खोल्यांमध्ये ठेवली जाते. अणूबॉम्बच्या स्फोटानंतर होणार्या किरणोत्सर्गापासून रक्षण होण्यासाठी काँक्रीटच्या इमारतींचा मध्यभाग, पाण्याच्या खाली किंवा पाण्याने भरलेल्या मोठ्या पिंपांच्या मधे लपून बसू शकतो. तसेच शिशाच्या पत्र्यांचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे आपल्या चारही बाजूंनी शिशाचे पत्रे लावून त्यामध्ये राहू शकतो. किरणोत्सर्गाच्या स्रोतामध्ये अशा प्रकारचे योग्य कवच निर्माण झाल्यास आपले रक्षण होऊ शकते. शक्य असल्यास केमिकल प्रोटेक्टिव्ह मास्कचाही वापर करू शकतो.
संदर्भ :
१. www.remm.nlm.gov/nuclearexplosion.htm
२. www.remm.nlm.gov/RemmMockup_files/nuke_timeline.png
३. www.epa.gov/radiation/protecting-yourself-radiation
१ अ १ ए. अणूबॉम्बच्या स्फोटामुळे किरणोत्सर्ग झाल्यानंतर स्वतःच्या रक्षणासाठी करायच्या उपाययोजना
१ अ १ ए १. किरणोत्सर्गी धूळ शरिरावर पडली असल्यास ती शक्य तितक्या लवकर पुसून काढणे किंवा स्वच्छ अंघोळ करणे
फॉलआऊट होऊन गेल्यानंतर तेव्हा शरिरावर असलेल्या कपड्यांवर किरणोत्सर्गी धूळ पडलेली असू शकते. असे दूषित कपडे हळूवारपणे त्यावरील किरणोत्सर्गी धूळ अयोग्य ठिकाणी पडणार अथवा पसरणार नाही, याची काळजी घेऊन काढावेत. तसेच किरणोत्सर्गाच्या संपर्कात न आलेल्या पाण्याने कपड्यांबाहेरील उघडी राहिलेली त्वचा पुसावी / धुवावी अथवा अंघोळ करावी. जितक्या लवकर ही धूळ आपल्या शरिरापासून विलग होईल तितके चांगले. तात्काळ अंघोळ करणे शक्य नसल्यास कागदाने / ओल्या फडक्याने शक्य तितक्या लवकर धूळ पुसून काढावी आणि नंतर अंघोळ करावी. नाक शिंकरून घ्यावे. घरी पाळीव प्राणी असल्यास त्यांचीही अशीच स्वच्छता करावी.
१ अ १ ए २. किरणोत्सर्गी धुळीने दूषित झालेले कपडे, पादत्राणे इत्यादी वस्तू पिशवीत बंद करून ठेवणे
शरिरावरून काढलेले दूषित कपडे, वस्तू, तसेच पादत्राणे आदी प्लास्टिक पिशव्यांत बंद करून बाजूला ठेवावे आणि नंतर संबंधित अधिकार्यांना किरणोत्सर्ग तपासणीसाठी द्यावे. त्यांनी ते कपडे सुरक्षित असल्याचे घोषित केल्याविना वापरू नये.
१ अ १ ए ३. केस काळजीपूर्वक स्वच्छ धुणे
केस धुण्यासाठी शाम्पू लावू शकतो; मात्र कंडिशनर लावू नये; कारण त्यामुळे किरणोत्सर्गी धूळ केसांना चिकटून रहाते.
१ अ १ ए ४. सर्व अन्नपदार्थ झाकून ठेवणे
अन्न, पाणी आणि इतर उपयोगी वस्तू झाकून ठेवाव्यात. झाकलेले पदार्थ सोडून इतर पदार्थ खाऊ नयेत, तसेच पाळीव प्राण्यांनाही खायला घालू नयेत. उघड्या विहिरी, तलाव यांंमधील पाणी, तसेच उघड्यावरील अन्नधान्य, भाज्या, दूध वापरू नये.
१ अ १ ए ५. पोटॅशियम आयोडाईड औषधाच्या गोळ्यांचा उपयोग करणे
आपत्काळासाठी आपण आपला एक आणीबाणी संच (इमर्जन्सी किट) सिद्ध करून ठेवावा. ज्यांना शक्य असेल, त्यांनी यात पॉटेशियम आयोडाईड या औषधाच्या गोळ्या ठेवाव्यात. आपत्तीच्या वेळी त्या किती प्रमाणात घेतात, ते आधुनिक वैद्यांकडून नीट समजून घ्यावे. या गोळ्यांमुळे किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम अल्प व्हायला साहाय्य होते. विदेशात अणूभट्टीजवळ रहाणार्या लोकांना या नेहमी घरात ठेवण्यास सांगतात.
१ अ १ ए ६. कुटुंबीय आणि पाळीव प्राणी यांची काळजी घेणे
अणूबॉम्बच्या स्फोटाच्या वेळी कुटुंबीय विखुरले गेले असतील, तर त्यांनी जिथे असतील, तिथेच रहावे, धोकादायक किरणोत्सर्गाचा धोका टळल्यानंतर पुन्हा एकत्र येता येऊ शकतात, हे लक्षात घ्यावे. घरी पाळीव प्राणी असतील, तर त्यांना घरात किंवा बंदिस्त जागेतच ठेवावे.
१ अ १ ए ७. प्रशासनाकडून सूचना येईपर्यंत बंदिस्त जागेत रहाणे
अणूबॉम्बच्या स्फोटानंतरचे पहिले २४ ते ४८ घंटे (जेव्हा किरणोत्सर्गाचा धोका सर्वाधिक असतो) किंवा स्थानिक प्रशासकीय अधिकारी इतर सूचना देत नाहीत, तोपर्यंत बंदिस्त जागेतच रहावे. अधिकार्यांच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे.
१ अ १ ए ८. शासकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे
शासकीय अधिकार्यांनी इमारत रिकामी करण्याचे आदेश दिल्यास (करण्याविषयी अधिकार्यांनी सल्ला दिल्यास) त्यानंतर पुढे काय करावे, कोठे जावे ? निवारा कोठे मिळेल ? त्याविषयीची कार्यपद्धती काय असेल ? इत्यादी माहिती नीट ऐकावी. त्यानुसार शासकीय तसेच पुढील सूचनांचेही पालन करावे.
१. घरातून अनावश्यक बाहेर जाऊ नये.
२. आपण इमारत रिकामी केली असल्यास, स्थानिक शासकीय अधिकार्यांनी इमारतीत परत येणे सुरक्षित आहे, असे घोषित केल्याविना परत येऊ नये.
३. अणूबॉम्बच्या स्फोटांच्या अतिदाबाच्या लाटांमध्ये जुन्या इमारती, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता धरून त्यापासून लांब रहाण्याची काळजी घ्यायला हवी; कारण ती केव्हाही पडू शकतात.
१ अ १ ए ९. आकाशवाणी, दूरचित्रवाणी इत्यादींद्वारे मध्ये मध्ये आपत्तीची माहिती घेत रहाणे
अधिकृत माहितीसाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही माध्यमातून (रेडिओ, दूरचित्रवाणी इत्यादी) आवश्यक माहिती मिळवावी. उदा. बाहेर पडणे सुरक्षित आहे का ? किंवा आपण कोठे जावे ?
संदर्भ : ndma.gov.in/images/pdf/pocketbook-do-dont.pdf
१ अ २. हायड्रोजन बॉम्बद्वारे होणारे आक्रमण
हा अणूबाँबपेक्षा १ सहस्र पटींनी विनाशकारी आहे. याची शक्ती हवी त्या प्रमाणात वाढवता येते. त्यामुळे अधिकाधिक विनाश करता येतो. जेव्हा हा बॉम्ब फोडायचा असतो, तेव्हा त्याच्या समवेत अणूबॉम्बही असतो. प्रथम अणूबॉम्ब फुटतो आणि मग त्याच्या उष्णतेने हायड्रोजनचे अणू एकमेकांशी जोडले जातात. म्हणून याला फ्युजन बॉम्ब असेही म्हणतात. हे अणू जोडले जाऊन एक पूर्ण मोठा गोळा बनतो आणि तो हिलीयम वायूमध्ये रूपांतरित होतो.
अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गामुळे होणार्या
|