नवी देहली – जगात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला नसतांना आता कोरोना विषाणूप्रमाणेच एका बुरशीची जागतिक स्तरावर मोठी साथ येऊ शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘कॅण्डीडा ऑरिस’ असे या बुरशीचे नाव असून ही मानवासाठी अत्यंत घातक आहे. ‘कॅण्डीडा ऑरिस’ ही बुरशी ‘ब्लॅक प्लेग’ प्रमाणेच आहे. ‘ब्लॅक प्लेग’ला ‘ब्यूबॉनिक प्लेग’ असेही म्हणतात. ब्यूबॉनिक प्लेगचे काही रुग्ण मागील काही मासांमध्ये चीनमध्ये आढळून आले होते. ‘द सन’ या वृत्तपत्राने ‘सेंटर्स ऑफर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ या आरोग्य नियंत्रक संस्थेमधील वैज्ञानिकांच्या हवाल्याने याविषयीचे वृत्त दिले आहे.
१. ही बुरशी खूप वेगाने पसरते. या बुरशीचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला अत्यंत वेगाने होतो. या बुरशीला वैज्ञानिक ‘परफेक्ट पॅथोजेन’ म्हणजेच रोग आणि संसर्ग पसरवणारा उत्तम वाहक असे म्हणतात. या बुरशीमध्ये सतत पालट होत असतात. ही बुरशी अनेक औषधांच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करून स्वत:मध्ये पालट करत असते. त्यामुळे यावर औषधांचा फारसा परिणाम होत नाही.
२. ‘कॅण्डीडा ऑरिस’ या बुरशीचा संसर्ग झाला, तर तिचा थेट रक्तप्रवाहावर परिणाम होतो. जर या बुरशीचे रक्तामधील प्रमाण वाढले, तर ते प्राणघातक ठरू शकते. जर ही बुरशी रुग्णालयामधील एका वैद्यकीय उपकरण किंवा शस्त्राच्या माध्यमातून शरिरामध्ये शिरली, तर ती अधिक घातक असते. रुग्णालयामध्ये या बुरशीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला, तर धोका अधिक वाढू शकतो, अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
३. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये जुलैमध्ये कोरोनावर उपचार घेणार्या ४० जणांना ‘कॅण्डीडा ऑरिस’चा संसर्ग झाला. त्यानंतर पुढील मासामध्येही ३५ जणांना ‘कॅण्डीडा ऑरिस’चा संसर्ग झाला होता.