श्राद्ध(महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन)

श्राद्ध’ म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते. धर्मशिक्षणाचा अभाव, अध्यात्म समजून घेण्याविषयीची अनास्था, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव, धर्मद्रोही संघटनांकडून हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांवर सातत्याने होणारी द्वेषमूलक टीका इत्यादींचा हा परिणाम आहे. श्राद्धाविषयी पुढीलसारखी विचारसरणीही समाजात आढळून येते. पूजाअर्चा, श्राद्धपक्ष यांवर विश्वास न ठेवणारे किंवा समाजकार्यच सर्वश्रेष्ठ आहे, असे म्हणणारे, ‘पितरांसाठी श्राद्धविधी न करता त्याऐवजी गरिबांना अन्नदान करू किंवा शाळेला मदत करू’, असे म्हणतात ! त्याप्रमाणे कित्येक जण करतातही ! असे करणे म्हणजे, ‘एखाद्या रोग्यावर शस्त्रक्रिया न करता त्याऐवजी आम्ही गरिबांना अन्नदान करू, शाळेला मदत करू’, असे म्हणण्यासारखे आहे. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असल्याने श्राद्धविधीतून पितरांना गती मिळणे शक्य होते; म्हणून वरील विधाने हास्यास्पद ठरतात. वरील प्रकारची विचारसरणी असणार्‍या व्यक्तींच्या डोळ्यांवरील अज्ञान आणि अंधविश्वास यांचे पटल दूर सारून त्यांना ‘श्राद्ध’ या हिंदु धर्मातील पवित्र संस्काराकडे पहाण्याची सकारात्मक आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टी लाभावी, या हेतूने मुख्यतः या ग्रंथाचे प्रयोजन केले आहे.

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. लहानपणी तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्याला जपणार्‍या आपल्या मातापित्यांचा मृत्योत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धविधीमुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते. विशिष्ट वार, तिथी आणि नक्षत्र यांना श्राद्ध केल्याने पितृकर्म होण्याबरोबरच विशिष्ट फलप्राप्तीही होते. अशा विभिन्न पैलूंद्वारे श्राद्धाचे महत्त्व आणि फायदे या ग्रंथात स्पष्ट केले आहेत.

याचबरोबर नांदी, महालय, भरणी, त्रिपिंडी यांसारखे श्राद्धाचे प्रकार, श्राद्ध कोणी करावे, श्राद्ध कधी आणि कोठे करावे, श्राद्धासाठी योग्य ब्राह्मण न मिळाल्यास काय करावे, श्राद्धाच्या स्वयंपाकातील आवश्यक पदार्थ कोणते, श्राद्धकर्ता आणि श्राद्धभोक्ता यांसाठीचे विधीनिषेध कोणते, श्राद्धप्रयोग कसा असतो, पितरांना आणि देवांना अन्न निवेदन करण्याची पद्धत कोणती, श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर कशा कराव्यात यांसारखी उपयुक्त माहितीही या ग्रंथात दिली आहे. श्राद्धात ब्राह्मणांना दिलेले अन्न पितरांना कसे पोहोचते, पिंडाला कावळा शिवण्यामागचे शास्त्र काय यांसारख्या सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या शंकांचे निरसनही या ग्रंथात केले आहे.

या ग्रंथाच्या अभ्यासाने आपल्या महान ऋषीमुनींनी दिलेला ‘श्राद्ध’रूपी अनमोल संस्कृतीधनाचा वारसा जपण्याची सद्‌बुद्धी सर्वांना लाभो, तसेच श्राद्धविधी श्रद्धेने करता येऊन आपल्या पूर्वजांची, तसेच स्वतःचीही उन्नती साधता येवो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना.

– संकलक

 

अर्पणमूल्य : ५० रु.

संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

 

 

१. श्राद्धाचे महत्त्व

१ अ. पितृऋण फेडणार्‍या श्राद्धामुळे देवऋण आणि ऋषीऋण फेडणे सुलभ होणे

ऋषी हे देवांपेक्षा कोपिष्ट असले, तर ते शाप देऊन जिवाला बंधनात अडकवू शकतात. पितृऋण हे कर्मवाचक असल्याने ते फेडायला अत्यंत सोपे आणि सहज आहे. श्राद्धविधीकर्मातून हे आपल्याला शक्य होते; म्हणून प्रत्येकाने इतर ऋणे चांगल्या तर्‍हेने फेडता येण्यासाठी देव आणि ऋषी यांना जोडणार्‍या पितृऋणरूपी दुव्याचा आश्रय घेऊन त्यांना विधीतून संतुष्ट करून त्या योगे मोक्षाची गती धारण करण्याचा प्रयत्न करावा. श्राद्धविधीकर्म केल्याने पितरांच्या साहाय्याने आपल्याला हळूहळू देव आणि ऋषी यांच्यापर्यंत पोहोचता येऊन वसु, रुद्र आणि आदित्य (‘वसु’ म्हणजेच इच्छा, ‘रुद्र’ म्हणजेच लय आणि ‘आदित्य’ म्हणजेच तेज, म्हणजेच ‘क्रिया’), या तिन्हींच्या संयोगाने अनुक्रमे पिता, पितामह आणि प्रपितामह यांचा उद्धार करता येणे शक्य होऊन देवतांचा आशीर्वाद मिळवणे शक्य होते.

 

१ आ. आपापसातील बंध तोडून जीवन्मुक्त होणे

‘श्राद्ध’ ही संज्ञा पूर्णतः माया आणि ब्रह्म यांना ऋणबंधनाने जोडलेली आहे. ज्या वेळी हे ऋणबंधनरूपी देवाणघेवाणयुक्त धागे संपुष्टात येऊन जीव मुक्त होतो, त्या वेळीच तो गती धारण करून मोक्षाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. पितरऋणरूपी मायेचे ध्येयही मोक्षाकडे जायचे असल्याने श्राद्धविधीकर्मातून विष्णुगणांच्या साक्षीने आपापसातील बंध तोडून जीवन्मुक्त होता येते.

 

 

२. या ग्रंथाद्वारे प.पू. डॉक्टरांनी पितरांच्या देवाणघेवाणीतून मुक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे

हिंदु धर्माने घालून दिलेल्या नित्य-नैमित्तिक ‘आचार-विचार’कर्मातील ‘श्राद्ध’ हा महत्त्वाचा आचार (वर्तन) आहे, तर त्यातून उत्पन्न होणारी जीवन्मुक्ततेची फलश्रुती हाच खरा विचार (परिणाम) आहे, असा धर्मनियम आहे. या धर्मनियमाचे पालन करून सर्वांनाच पितरांच्या जीवात्मक, प्राणात्मक अशा मोहमयी वासनात्मक देवाणघेवाणीतून मुक्त होण्याची संधी प.पू. डॉक्टरांनी (प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी) संकल्परूपाने ‘श्राद्ध’ या संज्ञात्मक ग्रंथातून उपलब्ध करून दिली आहे.

 

– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.८.२००६, दुपारी १२.३५)

Leave a Comment