आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

‘सनातन प्रभात’च्या गोव्यातील वाचकांना प्रथमच लाभला ‘ऑनलाईन सत्संग सोहळा’ !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पणजी – सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. गोव्यातील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी काही दिवसांपूर्वी प्रथमच ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी वरील मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वेदिका पालन यांनी, तर सौ. शुभा सावंत यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. या सत्संग सोहळ्याचा अनेक वाचकांनी लाभ घेतला. काही वाचकांनी त्यांना आलेल्या अनुभूती सत्संगात कथन केल्या.

या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘कलियुगात भक्तीमार्गाची साधना सांगितली आहे. ही भक्ती गुरुकृपेविना फळाला येत नाही. गुरुकृपा होण्यासाठी सनातन संस्थेकडून ‘गुरुकृपायोग’ मार्ग सांगितला जातो. हा साधनेचा विहंगम मार्ग असून याचा सर्वांनी लाभ करून घेऊया. या मार्गात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन याला महत्त्व देण्यात आले आहे. पूर्वी एकत्रित कुटुंबे आनंदाने रहात. अलीकडच्या काळात कुटुंबातील कोणतीच नाती आनंदाने एकत्र रहात नाहीत. यामागेही स्वभावदोष आणि अहंकार हीच कारणे आहेत; म्हणून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करून आनंदप्राप्ती करून घेऊया.’’

उपस्थित वाचकांचे अभिप्राय

शुभदा सातोसकर, म्हापसा – हा सोहळा ऐकतांना पुष्कळ चांगले वाटले. ‘गुरु सतत आपल्यासमवेत असतात’, याची अनुभूती आली.

प्रतिभा हळदणकर, पणजी – सनातन संस्थेकडून ऑनलाईन सत्संगात सांगितलेल्या विविध विषयांमुळे देवावरील श्रद्धा वाढली. ‘माझ्यावरसुद्धा गुरुमाऊलींचे लक्ष आहे. अंतर्मनात प्रेरणा देऊन तेच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेत आहेत’, अशी श्रद्धा दृढ झाली. ‘आपत्काळात येणार्‍या संकटातून तेच तारतील’, असे वाटत आहे.

वाचकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. सौ. गीता कवळेकर – नामजप आरंभ केल्यावर अनेक समस्या अल्प होणे

दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन सत्संग ऐकू लागल्यापासून मी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करू लागले. नामजप करतांना माझे मन एकाग्र होत नव्हते; म्हणून मी सनातन-निर्मित श्री दत्तगुरूंचे चित्र हातात घेऊन त्याकडे पाहून नामजप केल्यावर मनातील विचार अल्प झाले. नामजप करणे आरंभ केल्यानंतर माझे शारीरिक त्रास अल्प झाले. माझ्या कौटुंबिक समस्या सुटल्या. माझ्या मुलाचे गुणवत्ता सूचीत नाव येऊनही काही तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण येत होती. मी कुलदेवीला प्रार्थना केल्यावर ही अडचण सुटली. त्यामुळे मुलाची आणि माझी देवावरील श्रद्धा दृढ झाली.

२. सौ. रिया पेडणेकर, वास्को – ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप केल्याने घरात शांतता निर्माण झाली

मला लहानपणापासून देवाची आवड होती; पण हे सर्व कशासाठी करायचे, हे ठाऊक नव्हते. ऑनलाईन सत्संगामध्ये ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप एक घंटा करायला सांगितला होता. तो जप केल्यानंतर घरात शांतता निर्माण झाली. माझ्या कौटुंबिक जीवनातील अडचणी सुटल्या. माझ्या कुटुंबामध्ये चांगले पालट झाले. हे श्री दत्तगुरूंच्या नामजपामुळे शक्य झाले.

३. सरला नाईक, पर्वरी – माझी सकारात्मकता वाढली

मी सनातनच्या ऑनलाईन सत्संगातील मार्गदर्शनानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करण्याचा प्रयत्न करू लागल्यापासून माझ्यातील नकारात्मक विचार दूर होऊन माझी सकारात्मकता वाढली असल्याचे मला आढळून आले.

४. सौ. रूपाली कुंभार, मडगाव – कुलदेवी आणि दत्त यांच्या उपासनेमुळे
आईच्या कर्करोगावरील उपचार एका मासात पूर्ण होणे

मी विवाहापूर्वी नामजप करत होते; पण विवाहानंतर घरातील दायित्व सांभाळतांना साधनेचे प्रयत्न झाले नाहीत. सनातनच्या ऑनलाईन सत्संगाला उपस्थित राहिल्यामुळे पुन्हा साधनेला आरंभ झाला. माझ्या आईला दुसर्‍या टप्प्यातील रक्ताचा कर्करोग झाल्याने ती खचून गेली. मी तिला कुलदेवीची उपासना आणि श्री दत्तगुरूंचा नामजप करायला सांगितला. त्याप्रमाणे ती नामजप करू लागली. आईच्या आजारासंदर्भात पुढील तपासणीसाठी आईला रुग्णालयात भरती केले. त्या वेळी मी कुलदेवीला प्रार्थना केली की, ‘तूच मला मार्ग दाखव.’ त्यानंतर मला कर्करोग झालेली एक व्यक्ती भेटली. ‘कर्करोगावर उपचार कसे करतात’, हे त्या व्यक्तीने मला सांगितले. त्याप्रमाणे आईचे सर्व उपचार होत गेले. ज्या उपचारांना तीन ते साडेतीन मासांचा अवधी लागला असता, ते एका मासात पूर्ण झाले. ‘हे सर्व देवाने करवून घेतले आणि ही कुलदेवीची कृपा आहे’, असे मला जाणवले.

५. सौ. ललिता चव्हाण, वास्को – नागपंचमीला मानसरित्या
नागाचे पूजन केल्याने प्रत्यक्ष पूजा केल्याचा आनंद मिळणे

दळणवळण बंदीच्या काळात सण-उत्सव प्रत्यक्ष साजरे करणे शक्य नव्हते. तेव्हा सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘नागपंचमीला मानसरित्या नागाचे पूजन कसे करायचे’, हे शिकायला मिळाले. त्याप्रमाणे केल्यावर मला प्रत्यक्ष पूजा केल्याप्रमाणे आनंद मिळाला. आता मला नामजप करावासा वाटतो.

६. सौ. सोनाली सावंत, माशेल – नामजपामुळे घरातील सर्वांची देवावरची श्रद्धा वाढणे

आमच्या घरी पूर्वी श्राद्धविधी केले जात नव्हते. सनातनच्या ऑनलाईन सत्संगामुळे श्राद्धविधीचे महत्त्व कळले आणि आम्ही श्राद्धविधी करणे आरंभले. ऑनलाईन सत्संगात दत्ताचा सामूहिक नामजप चालू असायचा, त्यालाही आम्ही उपस्थित रहात होतो. पूर्वी मी एकटीच नामजप करत होते. आता सर्वांची देवावरची श्रद्धा वाढली. यजमान आणि मुलेही नामजप करतात.

७. सौ. सुमित्रा आराबेकर, पर्वरी – परात्पर गुरुदेवांनी
स्वप्नात दर्शन देऊन ‘मी तुझ्या पाठीशी आहे’, अशी अनुभूती देणे

‘लहानपणापासून मला गुरूंकडून दीक्षा घ्यावी’, असे वाटत होते. मी आईला म्हणायचे की, ‘जसे कलावतीआई तुझ्या गुरु आहेत’, तसे गुरु मलाही हवेत; पण त्यांच्याकडे जाण्याचा योग येत नव्हता. ‘माझे नशीब चांगले नाही किंवा मी पापी आहे’, असा नकारात्मक विचार मनात यायचा. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना कळल्यावर मला वेगवेगळ्या अनुभूती आल्या. माझे मन दुःखी व्हायचे, तेव्हा मला परात्पर गुरुदेव डॉ. आठवले स्वप्नात दिसायचे. मग माझा उत्साह वाढायचा. कोरोनाच्या काळात यजमानांना नोकरी नव्हती. माझे दुकानही चालू नव्हते. त्या वेळी मी पुष्कळ घाबरले; पण त्या कालावधीत ऑनलाईन सत्संग ऐकल्यावर मन शांत झाले. सत्संगामध्ये आत्मनिवेदनाचे महत्त्व सांगितले होते. त्यानुसार मी रात्री झोपतांना परात्पर गुरुदेवांना आठवून आत्मनिवेदन केले आणि त्यांना सांगितले की, इतर साधकांप्रमाणे माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत. मी स्वतःला तुम्हाला अर्पण करते. आत्मनिवेदन करून मी झोपले, तेेव्हा स्वप्नात परात्पर गुरुदेव आले आणि त्यांनी मला केशरी रंगाची सोनेरी काठ असलेली साडी दिली अन् नंतर साखर खायला दिली. या वेळी स्वप्नात ‘मी आश्रमातील चैतन्यमय वातावरण अनुभवत आहे’, असे वाटले. त्यानंतरपासून मी सत्संगात सांगितल्याप्रमाणे आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून पाण्याचा कमी वापर करून भांडी घासायचा प्रयत्न करत आहे. ते सत्संग ऐकल्यापासून ‘मी स्वयंपाक प्रसाद म्हणून सिद्ध करत आहे’, असा भाव ठेवून जेवण बनवते. भाव ठेवून स्वयंपाक केल्यावर तो रुचकर होतो.

एकदा मला स्वप्नात ‘गुरुपौर्णिमेचे प्रदर्शन लावले आहे आणि तिथे परात्पर गुरु गुरुदेव अन् प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुष्कळ प्रतिमा आहेत’, असे दिसले. तेव्हा परात्पर गुरुदेवांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेसमोर असलेले भस्म घेऊन मला डोक्यापासून पाठीपर्यंत लावले. त्यानंतर ‘माझे अंग हलके झाले आणि छातीतून काहीतरी निघून गेले’, असे मला वाटले. त्यानंतर मी आनंदावस्था अनुभवली. सकाळी उठल्यानंतर माझी आनंदावस्था तशीच होती. ‘गुरुदेव मला स्वप्नात दर्शन देऊन ‘मी तुझ्या पाठीशी आहे’, अशी अनुभूती देतात, याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता !

८. श्री. गिरीश वायंगणकर, पणजी – मला नामजपाची आवड निर्माण झाली

मी संस्थेचे ऑनलाईन सत्संग ऐकल्यानंतर मला बरे वाटते. पूर्वी मी गाडीतून प्रवास करतांना हिंदी गाणी ऐकत होतो. आता नामजप ऐकतो. मला नामजपाची आवड निर्माण झाली आहे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment