विज्ञाननिष्ठ संशोधन करणारे आणि ऋषिमुनींनी दिलेले ज्ञान सहजसोप्या भाषेत उलगडून सांगणारे ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक !

पुणे येथील श्री. विजय ग. कोटस्थाने यांनी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक
श्री. विजय कोटस्थाने

१. ‘विज्ञान म्हणजे अनुभवाचे ज्ञान’ सांगणारे ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक !

भारतीय कालगणनेनुसार म्हणजेच तिथीनुसार फाल्गुन कृष्ण पक्ष नवमी हा दिवस म्हणजे ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांचा पुण्यस्मरणदिन ! या दिनाचे औचित्य साधून ‘डॉ. प.वि. वर्तक यांचे विज्ञाननिष्ठ संशोधन याविषयी एक लेख लिहून त्यांचे पुण्यस्मरण करावे’, असे मनात आले. ‘हा विषय अत्यंत अवघड आहे’, असे माझे मत आहे. याचे कारण डॉ. वर्तक यांचे संशोधन अभ्यासाने समजावून घेण्यासाठी विज्ञान अर्थात ‘सायन्स’चा पाया पक्का असणे आवश्यक आहे. ‘विज्ञान म्हणजे अनुभवाचे ज्ञान’, असे डॉ. वर्तक नेहमी सांगत. ‘अभ्यास करणे म्हणजे नक्की काय ?’ याविषयीच्या निरूपणात त्यांनी अभ्यासाचे चार टप्पे सांगितले आहेत. निरीक्षण, परीक्षण, चिंतन आणि शेवटी स्वानुभव असे ते टप्पे होत. आज आयुष्याची चाळीशी ओलांडल्यानंतर ‘अभ्यास झाला का ?’ या प्रश्‍नाचा खरा अर्थ उमजला.

 

२. अध्यात्मशास्त्र हेही विज्ञान असल्याचे सिद्ध करणारे डॉ. वर्तक !

येथे वानगीदाखल शाळेतील गणिताच्या तासाचा विचार करू. शिक्षक किंवा शिक्षिका वर्गात फळ्यावर जे लिहितात, ते विद्यार्थी प्रथम ‘निरीक्षित’ असतात. गृहपाठाच्या माध्यमातून आपल्यास तो विषय समजला आहे का ?, असा विचार करणारे ‘परीक्षित’ असतात. त्याच वेळी मनात त्या विषयाचे चिंतन चालू असते आणि विविध शंका उत्पन्न होऊन प्रश्‍नोत्तरांतून त्यांचे निरसन करून घेतात. शेवटी वार्षिक परीक्षेच्या माध्यमातून स्वानुभव मिळवतात. डॉ. वर्तक यांनी विज्ञानाशीच एकनिष्ठ राहून संपूर्ण संशोधन केले आहे, हे त्यांच्या प्रत्येक ग्रंथांतून सिद्ध होते. या विज्ञाननिष्ठ निरूपणाच्याच आधाराने डॉ. वर्तक यांनी ‘अध्यात्मशास्त्र हेसुद्धा एक विज्ञानच आहे’, हे त्या संस्कृत शब्दाच्या व्याख्येवरूनच सिद्ध केले आहे. ‘अध्यात्म’ या शब्दात अधि + आत्म हे दोन धातू आहेत. अधि म्हणजे ‘संबंधी’ आणि आत्म म्हणजे ‘मी’. याचा अर्थ माझ्या संबंधीचा अभ्यास म्हणजे अध्यात्म. या व्याख्येनुसार माझ्या आत काय आहे, याचा शोध घेणे आणि माझ्यावर म्हणजेच ‘बाहेर काय आहे’, हे अभ्यासणे ओघानेच आले.

डॉ. वर्तक यांनी संशोधनाने सप्रमाण सिद्ध केले आहे की, आपल्या पूर्वजांनी विज्ञानाचीच कास धरलेली होती; म्हणून ते अत्यंत प्रगत होते. त्यांनी प्रचंड ज्ञान मिळवलेले होते. आपल्या ऋषींनी ब्रह्मज्ञान प्राप्त केले होते. ऋषि म्हणजे आजच्या काळात ज्यांना शास्त्रज्ञ म्हणतात, तसे अत्यंत प्रगत संशोधक होते. ते जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादी अनेकानेक विषयांतील केवळ पुस्तकी पांडित्य नव्हे, तर ते ज्ञान पृथ्वीतलावर मानवी जीवन प्रगत करण्यास्तव उपयोजित होते. याची अनेक प्रत्यक्ष प्रमाणे आजही या पृथ्वीवर उपलब्ध आहेत.

 

३. डॉ. वर्तक यांनी सहजसोप्या भाषेत उलगडून सांगितलेला
भागवत पुराणातील मानवी जीवनाचा गर्भातील प्रवास !

३ अ. ३ सहस्र ६०० वर्षांपूर्वीच गर्भाच्या अवयवांच्या विकासाचा क्रम जाणणारे व्यासमुनी !

भागवत पुराणात मानवी जीवनाचा गर्भातील प्रवास नमूद केलेला आहे, त्याचे डॉ. वर्तक यांनी सोप्या शब्दांत निरूपण केले आहे. भागवत सांगते, ‘कललं त्वेकरात्रेण पञ्चरात्रेण बुद्बुदम् । दशाहेन तु कर्कन्धूः पेश्यण्डं वा ततः परम् ॥’ (श्रीमद्भागवत महापुराण, स्कंध ३, अध्याय ३१, श्‍लोक २) अर्थात् ‘स्त्री-पुरुष मीलनानंतर एका रात्रीत म्हणजेच बारा तासांत कललं म्हणजे fertilized ohm किंवा zygote बनतो, पाच दिवसांनी बुडबुडा म्हणजे bubble stage, दहा दिवसांनी करवंदासारखा आकार म्हणजे spherical mass आणि पंधरा दिवसांनी अंड म्हणजेच lond axis आणि short axis बनतो.’ पुढे १ मासानंतर शिर प्रगट होते आणि त्यावर प्रथम मुख, नंतर नाकपुड्या, मग डोळे आणि शेवटी दोन कान दिसतात. हा क्रम आजच्या प्रगत पाश्‍चात्त्य जीवशास्त्राने मान्य केलेला आहे. भागवत रचित्या व्यासांना हे ज्ञान १ सहस्र ६०० वर्षे इसवी सन पूर्व म्हणजे आजपासून ३ सहस्र ६०० वर्षांपूर्वी, इतक्या प्राचीन काळीही ठाऊक होते; म्हणूनच त्यांनी ते नोंदवून ठेवले आहे !!!

३ आ. ऋषिमुनींनी सांगितल्याप्रमाणे डॉ. वर्तक यांनी विशद केलेली
प्रत्येक आठवडा आणि मास यांत होणारी गर्भाची वाढ म्हणजे पाश्‍चात्त्यांना चपराकच !

भागवत म्हणते, ‘कर्णावस्य विनिर्भिन्नौ धिष्ण्यं स्वं विविशुर्दिशः ।’ (श्रीमद्भागवत महापुराण, स्कंध ३, अध्याय ६०, श्‍लोक १७) म्हणजे ‘कान निर्माण झाल्यानंतर त्यात श्रोत्र हे ऐकण्याचे यंत्र निर्माण होते आणि त्यातच दिशा ओळखण्याचे साधन vestibular apparatus तयार होते. डॉ. वर्तक यांनी या दिशा, या व्यक्तीगत दिशा म्हणजे डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, वर आणि खाली हे सिद्ध केले आहे. भागवत पुढे म्हणते की, दुसर्‍या मासात हृदय चालू होते. वर्ष १९७२ मध्ये आजच्या पाश्‍चात्त्य विज्ञानाला या सत्याचा शोध लागला; कारण क्वीन्स मदर्स हॉस्पिटल, ग्लासगो, इंग्लंड येथे कार्यरत डॉ. रॉबिन्सनने मातेच्या गर्भाला बाहेरून diasonar (diagnostic ultrasound) हे यंत्र लावून गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकले आणि ‘गर्भातील बालकाचे हृदय सातव्या किंवा आठव्या आठवड्यात चालू होते’, असे घोषित केले. पाश्‍चात्त्यांनी हा शोध लावेपर्यंत पाश्‍चात्त्य वैद्यक शास्त्राचा म्हणजेच medical science चा अभ्यास करून पदवीधर झालेले भारतातील सर्व डॉक्टर मात्र ‘पाचव्या मासात बालकाचे हृदय चालू होते’, हा पूर्वीचा पाश्‍चात्त्य शोधच शिरोधार्ह मानून भागवतकार व्यासांना मूर्ख ठरवत होते ! डॉ. वर्तक यांनी ‘पुनर्जन्म’ या ग्रंथात सिद्ध केले आहे की, मानवी गर्भावस्थेतील पहिले कार्यरत मूत्राशय सर्पांमध्ये असते, तसेच निर्माण होते, पुढे आणखी प्रगत होऊन ते हत्तीमध्ये जसे असते, तसे बनते आणि सरतेशेवटी ते मानवात असते तसे प्रगत होते. यावरून त्या गर्भात जी कुणी शक्ती आहे, तिला पूर्वस्मृती असते, हे अनुमान निश्‍चितपणे निघते आणि हे ज्ञान आपल्या ऋषींना होते !

 

४. डॉ. वर्तक यांनी सांगितलेली अन्य माहिती

४ अ. सप्तलोक – पृथ्वी ही सत्यलोकाचा भाग असल्याचे सांगणे

पंचकोष आणि त्यांच्या मर्यादा या ज्ञानाच्या आधाराने आपल्या ग्रंथात जे सप्तलोक सांगितले आहेत, ते म्हणजे भूः – आपली भूमी, भुवः – भुवर्लोक म्हणजे पृथ्वीचे वातावरण, स्व: – स्वर्ग अर्थात द्युलोक, महर्लोक – सूर्यमालेतील आवार, जनलोक – आकाशगंगेतील आवार, तपलोक – आपली आकाशगंगा एकच नसून अशा अनेक आकाशगंगा आहेत आणि त्या सर्व ज्या आवारात असतात तो तपलोक अन् त्यापलीकडील सत्यलोक. येथे हे विधेय (सूत्र) नमूद करणे आवश्यक आहे की, दुसर्‍या आकाशगंगेतील एका सूर्यमालेच्या संदर्भात विचार करतांना आपली पृथ्वी ही सत्यलोकाचा भाग ठरते; म्हणूनच डॉ. वर्तक यांनी पदोपदी हेच सांगितले आहे की, सत्य हे याच भूमीवर आहे. ब्रह्म म्हणजेच जे पसरलेले आहे आणि अजूनही पसरत आहे, ते होय. हेसुद्धा आजच्या खगोलशास्त्राला धरून आहे, हे डॉ. वर्तक यांनी दाखवून दिले आहे.

४ आ. संस्कृत – संस्कृत भाषा विज्ञाननिष्ठ असल्याचे पटवून देणे

संस्कृत भाषा ही किती विज्ञाननिष्ठ भाषा आहे ! ‘खगोलशास्त्र’ या विषयातील ख म्हणजे आकाश, म्हणजेच आकाशातील गोलांचे विज्ञान ! यावरून हे अनुमान निघते की, आपल्या ऋषींना आकाशात दिसणारे तारे आणि ग्रह हे गोलाकार असतात, हे ज्ञान निश्‍चितच होते; म्हणून ‘खगोलशास्त्र’ नाव योजले. तद्वतच ‘भूगोल’ या नावातूनही विज्ञानच प्रकट होते. प्रत्येक भू ही कायम गोलाकारच असते, उदाहरणार्थ – पृथ्वी, मंगळ, गुरु. तुलना करण्यासाठी म्हणून मुद्दामहून येथे नमूद करतो की, आजच्या पाश्‍चात्त्य विज्ञानाने हे सत्य मान्य केले असले तरीही कुराण या मुसलमानांच्या धर्मग्रंथात आजही पृथ्वी सपाटच असल्याची नोंद आहे.

 

५. हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांत नोंदवलेल्या
अनंत वैज्ञानिक तत्त्वांची उकल करणारे डॉ. वर्तक !

हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांत नोंदवलेल्या अनंत वैज्ञानिक तत्त्वांची उकल डॉ. वर्तक यांनी केली आहे. त्यातील महत्त्वाचे संशोधन –

५ अ. ग्रहण का लागते ?

याविषयी अगस्ती ऋषींनी शोधलेले वैज्ञानिक रहस्य ‘स्वर्भानु’ या एका शब्दात साठवून ठेवले होते. ते डॉ. वर्तक यांनी उघड करून दाखवले. ‘स्वर्+भ+अनु’ अशी त्या शब्दाची फोड असून स्वर्गात म्हणजेच अंतराळात, भ म्हणजे तेजाच्या, अनु म्हणजे मागोमाग जाणार्‍या सावलीमुळे ग्रहण लागते आणि ते सर्व भुवनांवरून दिसते. पृथ्वी ही शेषाच्या शिरावर तोलली आहे म्हणजे नक्की काय ? पृथ्वीच्या संदर्भात विचार करतांना उरलेले ते शेष ! आपल्या सूर्यमालेतील सूर्यासहित नऊ ग्रहांच्या परस्परांतील गुरुत्वाकर्षणामुळे सिद्ध झालेल्या शिरावर म्हणजेच vortex वर पृथ्वी तोलली गेली आहे.

५ आ. आठवड्याच्या वारांच्या निर्मितीमागील शास्त्र

आठवड्याचे वार ही हिंदुस्थानची निर्मिती आहे. आपल्या सूर्यमालेच्या संपूर्ण रचनेवर आधारित आपली ही वार पद्धती आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील ग्रह हे अंतर्ग्रह अन् पृथ्वीच्या पलीकडील बहिर्ग्रह धरून सूर्याला, म्हणजेच रवीला आत्मा अन् चंद्राला मन अर्थात सोम मानून प्रथम चंद्रापासून जवळचा मंगळ, नंतर सूर्यापासून जवळचा बुध, मग पुन्हा चंद्रापासून जवळचा असे ग्रह आलटून पालटून घेऊन वार निर्मिले. अशा रितीने सूर्यमालेची रचना सामान्यजनांपर्यंत पोचवली.

५ इ. ‘उदयात् उदयं वार: ।’

म्हणजे ‘नवीन दिवसाचा प्रारंभ हा एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंतचा काळ असे असते’; मात्र असे असूनही आज आपण हिंदु पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करून रात्री बाराला नवीन वार किंवा दिवस चालू करतो. हे निसर्गनियमाविरुद्ध आहे.

५ ई. ‘आर्य बाहेरून आलेले नसून ते मूळचे हिंदुस्थानातीलच’, हे सिद्ध केले.

आर्य म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत लोक, समाज. द्रविड हे जातीवाचक नाम नसून ते केवळ भौगोलिक नाम आहे. भूमीचा जो भाग सागराला लागून आहे, तो द्राविड आणि त्या भागात रहाणारे ते द्रविड. याला धरून आपण समस्त हिंदू हे आर्यच आहोत.

 

६. डॉ. प.वि. वर्तक यांचे वैज्ञानिक संशोधक म्हणून
लक्षात आलेले वैशिष्ट्यपूर्ण पैलू !

६ अ. रामायण आणि महाभारत यांच्या कालखंडांची कालनिश्‍चिती करणे

डॉ. वर्तक यांनी हिंदूंच्या वैभवशाली इतिहासातील रामायण आणि महाभारत या दोन प्रमुख कालखंडांची कालनिश्‍चिती केली.

६ आ. संस्कृत भाषा पंडित !

संस्कृत भाषेतील कित्येक शब्दांचे अर्थ, जे आजपर्यंत इतर कुणालाही लावता आले नव्हते, अशा अनेक शब्दांचे धातूसाधित अर्थ उत्तम निरूपण करून त्यांनी सांगितले, उदा – पुरुष, अध्यात्म, व्याहृति, स्वर्भानु, च्युत, नायक, दंद्रम्यमाण, अमावास्या, संकर्षण, स्वर्ग, नरक, नारायण, गुणाविधी इत्यादी.

६ इ. भाषाशुद्धी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषाशुद्धी तत्त्वानुसार आचरण करून मराठी भाषेत नवीन शब्द निर्मिले. भाषाट – मोबाईल / टेलिफोन, विपत्र – ई-मेल, भूजोड – लँडलाईन, मकर रोग – कॅन्सर, सुनिशा – गुड नाईट, पाऊस निपट्या – वायपर.

६ ई. महाभारताचा नायक कोण ?

‘नयति इति नायक: ।’ म्हणजेच ‘जो कथानक आपल्यासह नेतो, तो नायक’, या व्याख्येला धरूनच डॉ. वर्तक यांनी वायुपुत्र भीमसेन हाच खरा महाभारताचा नायक आहे, हे अनेक प्रमाणे देऊन सिद्ध केले आहे; परंतु आम्हा हिंदूंना आमच्याच सद्गुणविकृतीमुळे महर्षि व्यास यांनी मांडलेले हे सत्य मुळी समजलेच नाही. त्यामुळे भीमाने दुःशासन वधानंतर ‘या शत्रूच्या रक्ताची रूची किती गोड आहे, ती चाखा. मातेच्या दुधाहूनही, मधाहूनही आणि अमृताहूनही ही रूची गोड आहे’, हा आम्हा हिंदूंना दिलेला जाज्वल्य संदेशच मुळी समजला नाही ! आश्‍चर्य म्हणजे आमच्या शत्रूंना मात्र या संदेशातील मर्म कळले आहे; म्हणूनच गेली किमान १ सहस्र ५०० वर्षे, अगदी अलीकडे म्हणजे पुलवामा आक्रमणापर्यंत, आपले शत्रू, अर्थात मुसलमान त्यांच्या शत्रूच्या रक्ताची, म्हणजेच आपल्या हिंदूंच्या रक्ताची मधुर रूची चाखत आहेत. हे सत्य आतातरी आपण हिंदूंनी ओळखून त्वरित सतर्क झाले पाहिजे.

‘डॉ. वर्तक यांचे हे प्रचंड कार्य प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीला अभिमान वाटावा’, असेच आहे. या त्यांच्या कार्यामुळेच समाजाने स्वयंस्फूर्तीने अनेक वेळेस विविध पदव्या देऊन डॉ. वर्तक यांना गौरवले आहे. समाजाकडून त्यांना ब्रह्मर्षि, समाजभूषण, श्रद्धानंद, ज्ञानसूर्य, हिंदुत्वभूषण, प्रज्ञानब्रह्म या पदव्या मिळालेल्या आहेत.

माझ्या बुद्धीच्या पात्रतेनुसार मी डॉ. प.वि. वर्तक या वैज्ञानिक अत्तराचा फाया (अत्तराच्या कापसाचा बोळा) या लेखातून दिला आहे. संपूर्ण अत्तराची बाटली म्हणजे त्यांची ग्रंथमालाच आहे. ती सर्वांनी अभ्यासावी.’

– श्री. विजय ग. कोटस्थाने, पुणे

Leave a Comment