विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

प्रतिवर्षी देशभरात केवळ फटाक्यांवर अब्जावधी रुपयांचा व्यय होत असतो. देशाला दिवाळखोरीचे चटके बसत असतांना आणि फटाक्यांमुळे कोणत्याही प्रकारचा लाभ न होता केवळ हानीच होत असतांना फटाके वाजवणे, म्हणजे देशद्रोहच होय. फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांची पुढील लेखातून माहिती करून घेऊया.

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा
विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा

कानाचे पडदे फाडणारे, हृदयरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेश चतुर्थी, दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो ?

 

हिंदूंच्या सणांत शिरलेल्या विकृती !

१. हिंदूंच्या सणांतून वाढत असलेले उपद्रवमूल्य !

एकेकाळी समाजाचा अभिमानास्पद सांस्कृतिक वारसा समजल्या जाणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाचे लाजिरवाणे अवमूल्यन झाले आहे. न्यायालयांचे निकाल आणि दंडविधान (कायदे) धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत टिपर्‍या बडवणार्‍यांनी दसर्‍याच्या आधीच्या नवरात्री नकोशा केल्या आहेत. कर्णकटू आवाजाच्या फटाक्यांची गल्लोगल्ली आतषबाजी करणार्‍यांनी दिवाळीच्या काळात भयनिर्मिती केली आहे.

२. सणाला उपद्रवकारक स्वरूप येणे,
ही धनदांडग्यांच्या काळ्या पैशांमुळे निर्माण झालेली विकृती !

आपण म्हणजे समाज’, असे मानणार्‍या धनदांडग्यांच्या काळ्या पैशांच्या संस्कृतीसमोर मध्यमवर्गाने शरणागती पत्करल्याने अलीकडे ‘अधिकाधिक लोकांना उपद्रव देऊन सण साजरे करणे’, ही रीतच बनली आहे. अवैध संपत्तीची उणीव नसलेल्यांनी श्री गणेश चतुर्थी आणि दिवाळी हे सण अधिकाधिक लोकांच्या डोळ्यांत भरतील, अशा प्रकारे साजरे करण्याची स्पर्धा आरंभली. साहजिकच या सणांच्या आनंदाचे आविष्कार अधिक उपद्रवकारक स्वरूप घेऊ लागले.

 

फटाक्यांचे दुष्परिणाम !

फटाक्यांचे दुष्पपरिणाम
फटाक्यांचे दुष्पपरिणाम

१. फटाक्यांमुळे होणारे अपघात

अ. ख्रिस्ताब्द १९९७ मध्ये दिल्लीत केलेल्या एका पाहणीत फटाक्यांमुळे केवळ त्या शहरात ३८३ जणांचे मृत्यू, तसेच ४४२ जणांना दुखापतग्रस्त झाल्याचे आढळून आले होते.

आ. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये हरियाणातील सोनपथ येथे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत ४४ जणांचे बळी गेले.

इ. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरात फटाक्यांमुळे आग लागून बाजारपेठच भस्मसात झाली आणि लक्षावधी रुपयांची हानी झाली.

ई. ५ सप्टेंबर २०१२ या दिवशी फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाके बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ५२ जणांचा मृत्यू, तसेच ७० हून अधिक कामगार दुखापतग्रस्त झाले.

उ. फटाक्यांमुळे दुसर्‍यांच्या घरात जळका बाण जाऊन अपघात होतो.

(सूक्ष्म-चित्र)

वरील उदाहरणे केवळ प्रातिनिधीक आहेत. देशातील अनेक भागांत असे अपघात होतात आणि त्याची वृत्तेही प्रतिवर्षी प्रसिद्ध होतात.

२. भौतिकदृष्ट्या

फटाक्यांमुळे आग लागून अपघात तर होतातच; पण याच कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांचे याहूनही आणखी दुष्परिणाम आहेत. ‘कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. घराचे ‘प्लास्टरिंग’ सैल होते. विजेचे बल्ब जळतात वा पडतात.

३. आरोग्यदृष्टया

फटाक्यांमुळे होणार्‍या रुग्णाइतांत ६० टक्के प्रमाण १२ वर्षांखालील बालकांचे असते.

४. ध्वनीप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी

अ. रुग्णालयातील नवजात बालके, तसेच रुग्ण यांना फटाक्यांच्या आवाजाचा विलक्षण उपसर्ग होतो.

आ. कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे सदाचा बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते. फटाक्यांमुळे कान बधीर होतात. श्रवणयंत्रणातील पेशी एकदा मृत झाल्या की, पुन्हा निर्माण होत नाहीत.

इ. फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणामुळे डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे विकार वाढतात.

ई. फटाक्यांच्या आवाजामुळे श्वसनमार्गाचे आणि फुफ्फुसाचे विकार बळावतात.

उ. गर्भवती महिलांना फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाचा अपाय होतो.

५. वायूप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी

अ. फटाके फोडले जातात, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी धूरही होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत दम्याच्या रुग्णांत वाढ होते.

आ. फटाक्यांमुळे वातावरणात पसरणारा विषारी वायू सर्वच नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असतो.

६. पर्यावरणदृष्ट्या होणारी हानी

अ. फटाक्यांमुळे केवळ पैशांचा अपव्यय होतो, असे नाही, तर पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ आणि धूर या अनिष्टकारक गोष्टी विनाकारण निर्माण होतात.

(गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होते असा कांगावा करून त्या विरोधात मोहीम राबवणारी बौद्धिक दिवाळखोरी दाखवणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती फटाक्यांविरुद्ध आवाज उठवत नाही किंवा फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी कायदा करत नाही. यातून तिचे समाजप्रबोधनाचे ढोंग दिसून येते. – संपादक)

७. आर्थिकदृष्ट्या होणारी हानी

अ. भारताची भयानक सद्यस्थिती

२० प्रतिशत जनतेला दोन वेळ पुरेसे अन्न मिळत नाही, प्यायला पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, तीव्र वीज टंचाई आहे, कुपोषण, २४ – ३० टक्के जनता निरक्षर आहे आणि औषधोपचाराची सोय नाही, अशी स्थिती आहे.

आ. कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे अयोग्य

एकट्या महाराष्ट्रात दिवाळीत १२ कोटींचे फटाके वाजवले जातात, हा आकडा ख्रिस्ताब्द १९९९ चा आहे. आजची फटाक्यांची उलाढाल सहजच १०० कोटी रुपयांहून अधिक आणि भारतभरातील सहस्रो कोटी रुपये असेल ! सणांचा आनंद साजरा करण्यासाठी कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे, हे उचित आहे का ?

इ. फटाके उडवणे म्हणजे आर्थिक दिवाळे काढणे

खरी दिवाळी फटाके विकणार्‍यांची असते; कारण पाच रुपयांचा फटाका विक्रेता वीस रुपयांना विकत असतो. तरीही पाच-पाच, दहा-दहा सहस्र रुपयांचे फटाके उडवणारे लोक आपल्याकडे अल्प नसतात.

८. मानसिकदृष्ट्या होणारी हानी

अ. फटाक्यांमुळे लहान मुलांमध्ये निर्माण होणारी विकृती

दारात भिकार्‍याच्या झोळीत एखादी करंजी टाकण्यापेक्षा त्याच्या पायाजवळ ‘अ‍ॅटमबाँब’ फोडून त्याला पळवून लावण्यात हल्लीची लहान मुले धन्यता मानतात. फटाक्यांनी निर्माण केलेली ही विकृती आहे.

आ. मानसिक स्वास्थ्य बिघडणे

देहातील तमोगुणी स्पंदनांच्या संवर्धनामुळे मनःपटलावर विपरित परिणाम होऊन अनावश्यक, तसेच विकल्पयुक्त विचारांची निर्मिती झाल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडते.

९. आध्यात्मिक दुष्परिणाम

भजन, आरती किंवा सात्त्विक नाद यांनी चांगल्या शक्ती आणि देवता येतात; मात्र सध्या तामसिक आधुनिक संगीत आणि फटाके यांचेच ध्वनी अधिक प्रमाणात होत असल्यामुळे वातावरणात अनिष्ट शक्ती आकर्षिल्या जातात. त्यांच्यातील तमोगुणाचा परिणाम मानवावर होतो आणि त्याची वृत्तीही तामसिक होते.

१. देह आणि मन यांचे संतुलन बिघडल्याने आध्यात्मिक स्तरावर मानवाची कधीही भरून न निघणारी हानी होते. तमोगुणाच्या देहातील संकरामुळे नैतिक मूल्यांचा र्‍हास होतो.

२. फटाक्यांत भरलेल्या दारूगोळ्यातून निघणारा धूर वायूमंडलात घनीभूत होऊन तेथे वाईट शक्तीशी संबंधित स्थाने निर्माण करतो.

३. या स्थानांच्या आश्रयाने अनेक दुर्जन शक्ती पोसल्या जाऊन वायूमंडलातील आध्यात्मिक क्षमतारूपी चैतन्याचा र्‍हास करतात.

४. अनेक धार्मिक विधींच्या वेळी वाजवले जाणारे फटाके वायूप्रदूषण करून देवतांच्या भूतलावर होणार्‍या आगमनात अडथळा निर्माण करतात. यामुळे फटाके वाजवणार्‍या मनुष्याला तिसर्‍या नरकाची शिक्षा मिळते.

हे सर्व दुष्परिणाम पाहिले, तर फटाके न उडवणेच श्रेयस्कर !

 

फटाके वाजवतांना होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम

(सूक्ष्म-चित्र)

फटाक्यांविषयीचे परराष्ट्रांचे स्तुत्य धोरण !

१. अमेरिका

अमेरिकेसारख्या सुधारलेल्या विकसित देशात आवाज करणार्‍या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तेथे केवळ शोभेचे, उदा. आवाज न करता केवळ प्रकाश देणारे फटाके उडवण्यास अनुमती आहे. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. प्रसंगोपात्र आवाज करणारे फटाके वाजवायचे असल्यास विशेष अनुमती घ्यावी लागते. अशी अनुमती देतांना कुणासही धोका होणार नाही, अशा ठिकाणी वस्तीपासून दूर हे फटाके उडवण्याची अनुमती दिली जाते. शिवाय ही अनुमती देतांनाच ‘तिथे अग्नीशामक दलाची व्यवस्था आहे कि नाही, हे आधी पाहिले पाहिजे. आपणाकडे असे किती दक्षतेचे उपाय योजले जातात ?

२. इतर

न्यूझीलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम या देशांत केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास अनुमती आहे. या धर्तीवर भारतातही असे दंडविधान होणे आवश्यक आहे.

 

फटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाय !

फटाक्यांमुळे होणारी एवढी हानी आपणास थांबवता येणार नाहीत का ? फटाक्यांचा मोह टाळला, तर हे सहज शक्य आहे. यासाठी हे करा –

१. मुलांनो, फटाके वाजवणार नाही, अशी शपथ शाळाशाळांमधून घ्या !

मुंबईतील काही शाळांमधून दिवाळीची सुट्टी पडण्याआधी तेथील मुलांनी ‘दिवाळीत आम्ही फटाके उडवणार नाही’, अशी शपथ घेतली होती.

२. पालकांनो, फटाक्यांच्या निर्मितीसाठी बालकामगार
वापरले जात असल्याने ते न वाजवण्याविषयी पाल्यांचे प्रबोधन करा !

भारतातील फटाक्यांच्या नगरीत म्हणजेच तामिळनाडूतील शिवकाशीत हे फटाके निर्मिण्यासाठी मुख्यत्वेकरून बालकामगारांचा उपयोग केला जातो. या फटाक्यांच्या कारखान्यातील अविरत कष्ट, तसेच तेथील विषारी वायूंचे प्रदूषण यांमुळे या बालकांचे जीवन अकाली उखडलेल्या कळीप्रमाणे कोमेजून जाते. ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेऊन आपल्या मुलांना दिवाळीत फटाक्यांवर बहिष्कार घालण्यासाठी पालकांनी प्रबोधन केले पाहिजे.

३. लोकहो, फटाके उडवतांना ही दक्षता घ्या !

ख्रिस्ताब्द २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोंगाटबंदीच्या संदर्भात दिलेल्या निकालासंदर्भात रात्री १० ते सकाळी ६ या काळात फटाके वाजवणे, हा अपराध ठरवला गेला आहे. तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी, धर्मदाय विश्वस्त संस्थांची रुग्णालये आणि नागरिक यांना त्रास होईल, अशा ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.

४. फटाक्यांचे पैसा राष्ट्रकारणी लावा !

तोफा आणि खरे बाँब यांच्या धडधडाटीची देशाच्या सीमारेषांवर नितांत आवश्यकता आहे. इथे फुकटचे बार काढण्यापेक्षा, ते पैसे संरक्षण खात्याकडे वळवल्यास सत्कारणी लागतील.

– एक राष्ट्रप्रेमी

फटाके वाजवल्यामुळे स्थुलातून वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होते अन् सर्वत्र कचरा होतो. त्यामुळे फटाके वाजवलेल्या ठिकाणी त्रासदायक स्पंदने जाणवतात. फटाक्यांतून वातावरणात तमोगुणाचे प्रक्षेपण होऊन या तमप्रधान वातावरणाकडे पाताळातील त्रासदायक शक्ती आकृष्ट होते. त्यामुळे वातावरणात जडपणा वाढून दाब जाणवू लागतो. तसेच फटाके वाजवणार्‍या व्यक्तीतील तमोगुण वाढून त्याचा अहंकार वाढतो आणि त्याच्या भोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण हाऊ शकते. फटाके वाजवल्यामुळे निर्माण होणार्‍या त्रासदायक नादाकडे पाताळातील आक्रमक वाईट शक्ती चटकन आकृष्ट होऊन स्थुलातून अपघात होणे किंवा भाजणे यांसारख्या दुर्घटना घडू शकतात. फटाके वाजवल्यामुळे इतरांना त्रास होत असतांना फटाके वाजवणार्‍या व्यक्तीला मात्र सुख वाटत असते. हे सुख आसुरी सुख असल्यामुळे फटाके वाजवणार्‍या व्यक्तीतील दुष्प्रवृत्ती प्रबळ होऊ शकते आणि वाईट शक्तींना त्याचे नियंत्रण घेणे सोपे जाऊ शकते. यासाठी दिवाळीत फटाके वाजवू नयेत.’

·कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१७ रात्री ११)

 

दिवाळीविषयीचे लघुपट पहा !

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment