प्रवचन ३ : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र

आपल्या प्रत्येकाची धडपड आनंदप्राप्तीसाठी असली, तरी सध्या सर्वांचे जीवनच संघर्षमय आणि तणावाचे झाले आहे. तणावविरहित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अध्यात्म कृतीत आणणे म्हणजे साधना करणेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर साधनाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन प्रवचन शृंखले’चे आयोजन करण्यात आले आहे. या शृंखलेतील तिसर्‍या प्रवचनामध्ये आज आपण ‘नामजपामुळे होणारे लाभ आणि सत्संगाचे महत्त्व’ हा विषय पहाणार आहोत.

 

१. बुद्ध्यांक (I.Q.) आणि भावनांक(E.Q.) यांच्या जोडीला
अध्यात्मांक म्हणजे spiritual quotient (S.Q.) ही महत्त्वाचा !

नामजप आणि साधना ही केवळ आध्यात्मिक प्रगती आणि मनःशांती यांसाठीच करायची असते, असे नाही, तर साधनेचा आपल्या व्यावहारिक जीवनावरही चांगला परिणाम होतो. साधनेमुळे व्यक्तीत्व आदर्श बनण्यास साहाय्य होते, त्यामुळे आज अनेक बहुराष्ट्रीय व्यावसायिक आस्थापनेही (Multinational Companies) बुद्धयांक (Intelligent Quotient – I.Q.) आणि भावनांक (Emotional Quotient – E.Q.) यांच्या जोडीला अध्यात्मांकाला म्हणजे Spiritual Quotient ला महत्त्व देत आहेत. म्हणजेच अध्यात्माला आज जगभरात जर महत्त्व दिले जात आहे, तर आपणही त्याकडे लक्ष द्यायला हवे.

 

२. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे !

‘ऑनलाईन प्रवचन शृंखले’च्या माध्यमातून आपण अध्यात्म शिकत आहोत. अध्यात्मात तात्त्विक माहितीला केवळ २ टक्के महत्त्व आहे, तर शिकलेला भाग प्रत्यक्ष कृतीत आणण्याला ९८ टक्के एवढे महत्त्व आहे. या संदर्भात एक मार्मिक गोष्ट आहे.

एकदा एक पंडित नावेतून नदी पार करत होता. त्या नावेत पंडित आणि नावाडी दोघेच होते. पंडिताने नावाड्याला अनेक ग्रंथाचे संदर्भ दिले आणि त्याने त्या ग्रंथांचा अभ्यास केला आहे का विचारले. नावाड्याने ‘नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा पंडित त्याला म्हणाला की, ग्रंथांचा अभ्यास न केल्याने तुझे जीवन व्यर्थ गेले आहे. अशी चर्चा चालू असतांना नावेत छिद्राद्वारे पाणी शिरत होते. हे लक्षात आल्यावर नावाड्याने पंडिताला विचारले, ‘‘महाराज, आपणाला पोहता येते का ? आपली नाव आता बुडणार आहे.’’ तेव्हा पंडित म्हणाला, ‘‘मी पोहण्याची बरीच पुस्तके वाचली आहेत आणि ज्ञान मिळवले आहे; पण मला पोहता येत नाही.’’ अर्थात अशा स्थितीत पंडिताच्या नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. तसेच या भवसागरातून आपली जीवननौका पार होण्यासाठी केवळ शाब्दिक ज्ञानापुरते मर्यादित न रहाता, प्रत्यक्ष साधना केली पाहिजे.

 

३. नामजपाचे लाभ

३ अ. बंधनविरहित नामसाधना

नामजपाचा सगळ्यात महत्त्वाचा लाभ म्हणजे, नामसाधनेला स्थळ-काळ-वेळ, शौच-अशौच कसलेही बंधन नाही. याला कर्मकांडाचे नियम लागू नसून हे निवळ ईश्वराचे स्मरण आहे. अर्थात ही भक्तीयोगातील उपासनाकांडाची साधना आहे.

३ आ. नामजपामुळे प्रारब्ध सुसह्य होणे

नामजप साधनेमुळे प्रारब्ध (म्हणजे नशीब) सुसह्य होते किंवा त्याची झळ कमी होते.

३ इ. नामजपामुळे एकाग्रता वाढणे

नामजपामुळे देवता प्रसन्न होतात. मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही अभ्यासाला बसण्यापूर्वी थोडा वेळ नामजप करावा.

३ ई. नामामुळे सद्गुरूंची प्राप्ती होणे

व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते. समाजात काही ठिकाणी असे दिसून येते, ‘काही जण गुरु करतात’; म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संत माझे गुरु आहेत, असे स्वतः म्हणतात किंवा तसे मानून चालतात; पण या म्हणण्याला किंवा मानण्याला तसा काही अर्थ नसतो. अध्यात्मात आपण गुरु करायचा नसतो, तर गुरुंनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करायचा असतो. नामस्मरणाचा महत्त्वाचा लाभ म्हणजे नामामुळे सद्गुरुंची प्राप्ती होते. ‘नाम सद्गुरूंकडून घेणे चांगले; पण सद्गुरु भेटले नाहीत, तरी नामस्मरण करत रहावे; कारण तेच नामस्मरण सद्गुरूंची भेट घडवून आणते.’

३ उ. नामामुळे आध्यात्मिक उन्नती जलद होणे

मोक्षप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, असे अध्यात्मात सांगितले आहे. नामजपामुळे आध्यात्मिक उन्नती जलद होते. साधना करत असतांना काही जणांना रंग दिसणे, प्रकाश दिसणे, नाद ऐकू येणे अशा प्रकारच्या अनुभूती येतात. त्या आल्यानंतर अनेक जण त्या अनुभूतींमध्ये अडकून साधनेच्या त्याच टप्प्याला थांबतात. त्यामुळे त्यांचा पुढचा साधनाप्रवास थांबल्यासारखा होतो. नामजपामुळे अनुभूतींमध्ये न अडकता आपण थेट भगवंतापर्यंत पोहोचू शकतो.

३ ऊ. अंतकाळी भगवंताचे नाम मुखात असल्यास सद्गती मिळणे

अंतकाळी भगवंताचे नाम घेत मृत्यू आला, तर त्या व्यक्तीला मुक्ती मिळते, असे म्हणतात; पण समजा आयुष्यभर नाम घेतलेच नसेल किंवा साधना केलीच नसेल, तर मृत्यूच्या वेळी देवाचे नाव कसे आठवेल ? आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मुखात नाम यायचे असेल, तर आयुष्यभर नामाचे स्मरण करावे लागेल.

३ ए. नामजपाने कर्म – अकर्म होणे

आपण मागच्या प्रवचनात कर्मफलसिद्धांत हा विषय पाहिला होता. चांगली कर्मे केल्याने पुण्य मिळते, तर वाईट कर्मांमुळे पाप भोगावे लागते. आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर व्यक्तीला पाप-पुण्याच्या पलीकडे जावे लागते. पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी कर्म हे अकर्म व्हावे लागते. अकर्म कर्म होण्यासाठी कोणतीही कृती करतांना नामजप करणे आवश्यक असते. नामजपामुळे नकळत झालेल्या पापकर्मांचे क्षालन होते.

‘परमेश्वराच्या नामात अनंत कोटी पापे जाळण्याचे सामर्थ्य आहे. ‘नामाने जळणार नाही, असे पाप मनुष्य करूच शकत नाही’, अशी वचने आहेत. त्या श्रद्धेने आपण नामस्मरण केले, तर भगवंत आपला उद्धार का नाही करणार ?

३ ऐ. नाम घेणे हे कर्तव्य असणे

नामजपाच्या संदर्भात थोर संत आणि सनातनचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटले आहे की, ‘नाम घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याला ज्या ईश्वराने बनवले आहे, त्याचे ऋण फेडण्यासाठी श्वासोच्छ्वासी नाम घ्यायला हवे.’

 

४. नामजप कसे कार्य करते ?

आपण आता नामजपाचे वेगवेगळ्या स्तरांवर होणारे लाभ पाहिले. आता आपण नामजप नेमके कसे कार्य करतो, ते समजून घेऊया.

४ अ. लिंगदेह

अध्यात्मशास्त्राप्रमाणे मनुष्यजीव हा स्थूलदेह आणि लिंगदेह यांनी बनला आहे. स्थूलदेह म्हणजे आपण नेहमी म्हणतो, ते शरीर. लिंगदेह हा आत्मा आणि आत्म्याच्या भोवतालचे मायेचे आवरण यांनी मिळून बनला असतो. सर्व सृष्टी, सजीव-निर्जीव वस्तू या ईश्वराची निर्मिती आहेत, हे तात्त्विकदृष्ट्या आपल्याला ठाऊक असले, तरी तशी जाणीव सतत आपल्याला नसते.

४ आ. ‘अंतःकरण चतुष्टय’

मन, चित्त, बुद्धी आणि अहं यांना ‘अंतःकरण चतुष्टय’, असे म्हणतात. मन, बुद्धी, चित्त यांचे कार्य वेगवेगळे आहे. ते आपण समजून घेऊया.

४ आ १. मन

मन काय करते ?, तर संकल्प विकल्पकात्मकं मनः ।’ असे म्हणतात. म्हणजे विचार करणे, हे मनाचे स्वरूप आहे. त्यात चांगले विचार, वाईट विचार, इच्छा, वासना आणि भावना अंतर्भूत होतात. मन चंचल असते. ‘हे करू का ते करू’, असे विचार सतत चालू असतात; पण त्याला निर्णय घेता येत नाही.

४ आ २. बुद्धी

निर्णय घेण्याचे कार्य बुद्धीचे आहे. ‘निश्चयात्मिका बुद्धि: ।’ म्हणजे निश्चय करणे, योग्य आणि अयोग्य काय, याचा विचार करून निर्णय घेणे, हे बुद्धीचे कार्य आहे. मनातील विचारांनुरूप कृती होणे अथवा न होणे, हे बुद्धीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, कधीकधी आपली द्विधा मनःस्थिती होते. एखादी गोष्ट करावी कि करू नये ?, असे विचार येतात. तेव्हा जो निर्णय घेतला जातो, तो बुद्धीने घेतला जातो.

४ आ ३. चित्त

आता चित्त म्हणजे काय ?, तर आठवणींचे भांडार असते. आपले शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांच्या सर्व वृत्ती आणि कृती यांचा साठा म्हणजे ‘स्मृती’ चित्तात साठवलेल्या असतात.

४ आ ४. अहं

अहं म्हणजे काय, तर अहंकार ! ‘मी’पणा निर्माण करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजेच अहं. ‘एखादी गोष्ट माझ्यामुळे झाली’, ‘मी चांगली कृती केली’, ‘माझ्यासारखे बाकीच्यांना जमत नाही’, अशा प्रकारचे विचार आणि वृत्ती म्हणजे अहंकार.

४ इ. आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे मनाचे भाग

आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे मनाचे दोन भाग आहेत. ‘मन’, असा आपण नेहमी ज्याचा उल्लेख करतो, ते बाह्यमन आणि दुसरा भाग जो अप्रकट असतो, तो म्हणजे अंतर्मन, म्हणजेच चित्त ! आपले मन हे सतत कार्यरत असते. आपण एखाद्या ठिकाणी नुसते बसलो असलो, काही कृती करत नसलो, तरी मनात विचार चालूच असतात. मनाच्या रचनेत आणि कार्यात बाह्यमनाचा फक्त १० टक्के, तर अंतर्मनाचा (चित्ताचा ) ९० टक्के वाटा असतो.

बाह्यमन (Conscious mind) म्हणजेच जागृत मन. नेहमीचे विचार आणि भावना यांचा संबंध बाह्यमनाशी येतो. अंतर्मनालाच (Unconscious mind) आध्यात्मिक परिभाषेत ‘चित्त’ म्हणतात.

अंतर्मन म्हणजे सर्व भावभावनांचे, विचारविकारांचे एक गोदामच असते ! या गोदामात सर्व प्रकारचे अनुभव, भावना, विचार, इच्छा-आकांक्षा वगैरे सर्वकाही साठवलेले असते. अंतर्मनाचेही २ विभाग असतात. एक म्हणजे वरचा थर आणि खालचा थर ! अंतर्मनाच्या वरच्या थरात म्हणजे subconscious mind मध्ये आपले शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांच्याकडून होणार्‍या कृती, तसेच त्यांची वृत्ती यांच्या निरनिराळ्या आठवणी निरनिराळ्या संस्कारकेंद्रात साठवलेल्या असतात आणि त्या विचाररूपाने प्रगट होत असतात. आपल्या इच्छेप्रमाणे त्या बाह्यमनात आणता येतात.

अंतर्मनाचा खोलवरचा थर म्हणजे unconscious mind – यामध्ये सर्व आठवणींचा साठा असतो; पण तो खोलवर साठवलेला असल्याने आपल्याला त्याची आठवणही नसते आणि आपल्या इच्छेप्रमाणे त्यांना बाह्यमनात आणता येत नाही; पण विशिष्ट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे अंतर्मनात खोलवर रुजलेली आठवण परत बाह्यमनात येऊ शकते.

४ ई. अंतर्मनातील संस्कार केंद्रे

अंतर्मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संस्कार केंद्रे असतात. अंतर्मनातील वासना केंद्रामध्ये व्यक्तीच्या वासना, इच्छा-आकांक्षा, अपेक्षा साठवलेल्या असतात. आवड-नावड केंद्रामध्ये व्यक्तीच्या आवडी-नावडीच्या संदर्भातील संस्कार असतात. स्वभाव केंद्रामध्ये व्यक्तीच्या स्वभावातील गुण, उदा. प्रामाणिकपणा, तत्परता आणि दोष, उदा. रागीटपणा, आळशीपणा यांचे संस्कार साठवलेले असतात. वैशिष्ट्य केंद्रामध्ये कला, खेळ अशा प्रकारच्या प्राविण्याच्या संदर्भातील संस्कार साठवलेले असतात.

व्यवहारात ‘संस्कार’ या शब्दाचा अर्थ चांगले आचार, विचार आणि कृती असा होतो. आध्यात्मिकदृष्ट्या ‘संस्कार’ म्हणजे आपल्या वृत्तीचे आणि आपल्याकडून होणार्‍या कृतींचे अंतर्मनात उमटणारे ठसे. चांगल्या गोष्टींचे संस्कार होतात, तसेच वाईट गोष्टींचेही संस्कार होतात, उदा. देवाचा नामजप करण्याचा संस्कार होतो, तसाच शिव्या देण्याचाही संस्कार होतो.

एखादा विचार किंवा कृती पुनःपुन्हा होत गेल्यास हे संस्कार अधिकाधिक दृढ होतात आणि चित्तात स्थिर होतात. या जन्मातीलच नव्हे, तर पूर्वीच्या सर्व जन्मांचे संस्कार अंतर्मनाच्या खोलवरच्या थरांत रुजलेले असतात. प्रत्येक संस्कार व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या बंधनात टाकतो.

४ उ. नामजपाचा संस्कार दृढ होण्याचे लाभ

नामजप सातत्याने केल्याने व्यक्तीच्या मनातील नामजपाचे संस्कारकेंद्र दृढ होते, तर अन्य संस्कारकेंद्रे क्षीण होतात.

नामजपाचा संस्कार प्रबळ होऊ लागल्यानंतर सर्वप्रथम मनातील निरर्थक किंवा अनावश्यक विचार नष्ट होऊ लागतात. असे विचार करण्यापेक्षा मनाला नामजप करावा, असे वाटू लागते. याचा लाभ असा होतो की, निरर्थक विचारांमुळे खर्च होणारी मनाची शक्ती वाचते आणि मन एकाग्र होऊ लागते.

नामजपामध्ये म्हणजे ईश्वरीय अनुसंधानात मन रमू लागल्याने मायेतील आसक्तीचे किंवा व्यावहारिक गरजांचे विचार कमी होऊ लागतात. अर्थात मनातील लोभाचा संस्कार क्षीण होतो. नामजपाची आवड निर्माण झाल्यामुळे मायेतील आवड-नावडचा संस्कार क्षीण होतो. पर्यायातील त्यासंबंधीचे विचार कमी होतात.

पुढे नामजप श्वासाला जोडून होऊ लागल्यानंतर मनुष्य वर्तमानकाळात राहू लागतो. त्यामुळे भूतकाळातील प्रसंग, पूर्वग्रह, भविष्याची चिंता यांविषयीचे संस्कार क्षीण होऊन मन वर्तमानकाळातील कर्तव्याविषयी तत्पर होते.

अशा प्रकारे नामजपाचा संस्कार जसाजसा मनावर दृढ होत जातो, तसा तसा व्यक्तीमध्ये चांगला पालट होतो. अशा प्रकारे नामजप मनाच्या स्तरावर कार्य करते.

1 thought on “प्रवचन ३ : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र”

  1. होय हे वाचून आनंद झाला यातली प्रत्येक गोष्ट शंभर टक्के सत्य आहे .पण मन वारा जसा पळतो ‌‌‌ तस पळायला लागले.

    Reply

Leave a Comment