माणगाव येथे प.प. टेंब्येस्वामी यांनी स्थापन केलेले श्री दत्तमंदिर

Article also available in :

श्री क्षेत्र माणगांव (सिंधुदुर्ग) : प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले तीर्थक्षेत्र

माणगाव दत्तमंदिरातील श्री दत्तमूर्ती आणि प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) महाराजांची मूर्ती

सनातन वैदिक धर्म महाभारत काळापासून हिंदु धर्म या नावाने संबोधला जाऊ लागला. या धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे (व्यवच्छेदक लक्षण) वर्णाश्रमव्यवस्था होय. या व्यवस्थेला जेव्हा जेव्हा अवकळा येऊन धर्माचा र्‍हास होऊ लागला तेव्हा तेव्हा या व्यवस्थेच्या रक्षणासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी ‘दत्तसंप्रदाय’ प्रवर्तित झाला. या महत् कार्यासाठी श्री विष्णूचे २४ अवतार झाले. त्यातील श्री दत्तावतार हा ६ वा अवतार आहे. इतर सर्व अवतार सगुणाची खोळ टाकून आपले मूळ वैष्णव तत्त्वात मिळून जातात; परंतु श्री दत्त निर्गुण असूनही सगुण रूपाने पूर्ण ब्रह्म स्वरूपाने अविनाशी चिरंजीवी आहेत.

इतर अवतारांप्रमाणे दुष्टांचा संहार करून समाप्त होणारा हा अवतार नव्हे. आपल्या उपदेशाने जगाचा उद्धार करत चिरंजीव रहाणारा हा अवतार आहे. याचे प्राचीनत्व पुराण काळाच्याही आधीपर्यंत जाते. आजही भक्तांच्या ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्षासाठी श्री दत्त महाराज सिद्ध असल्याचे प्रत्ययास येते, हे या अवताराचे अर्वाचिनत्व आहे. ३ मुखी दत्तावताराची कल्पना ही गुरुचरित्राच्या काळापासूनची असावी, असे वाटते. श्री दत्तात्रेय हा प्रामुख्याने एकमुखीच त्रिगुण अवतार असून पुढे त्यांना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती स्वरूप प्राप्त झाले. आज आपल्याला प्रामुख्याने त्रिमुखी दत्तमूर्ती आढळतात; परंतु महाभारत, पुराणे, अर्वाचिन उपनिषदे यांमध्ये दत्त एकमुखीच आहे. श्री दत्ताचा अवतार जसा अविनाशी तसाच सर्वदूर संचारी आहे. आर्त, पीडित, दुःखितांना संरक्षण देत, श्री दत्त महाराज सर्वत्र संचार करत असतात. श्रीगुरूंच्या स्वरूपात उपदेश देतात. ते व्यक्तीरूपाने सर्वत्र वावरत असतात. अनंत जीवांचा उद्धार करतात.

दत्तावतार प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीची पुन्हा एकदा स्थापना करणारा असला आणि त्याने मुख्यतः ब्राह्मण वर्णाचा पुरस्कार केला असला, तरी इतर जातीजमातींना त्याच्या उपासनेस प्रतिबंध नाही. श्री गुरुचरित्रातील शबर सुत, किरात, मातंग, म्लेंच्छ, यवन आदींच्या कथा वाचण्यासारख्या आहेत. त्रिमुखी किंवा १ मुखी दत्तमूर्तीप्रमाणेच दत्त पादुकांची ही पूजाअर्चा अनेक ठिकाणी करण्याची प्रथा आहे. ‘गुरुवार’हा दत्तप्रभूंचा वार म्हणून दत्तभक्तांना तो पवित्र आणि प्रिय आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. श्री दत्तगुरूंचे १६ अवतार झाले आहेत.

 

माणगाव येथे प.प. टेंब्येस्वामी यांनी स्थापन केलेले श्री दत्तमंदिर

इ.स. १८५४ मध्ये येथील श्री यक्षिणी मातेच्या मंदिरांच्या शेजारील घरात एक थोर दत्तभक्त दांपत्य प.पू. गणेश भट आणि त्यांच्या सौ. रमा बाई यांच्या पवित्र उदरी प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) महाराज यांचा जन्म झाला. टेंब्येस्वामींच्या जन्मामुळे निर्मनुष्य माणगावची काया पालटून देव नगरीत रूपांतरित झाली.

 

दत्तप्रभूंची राजधानी म्हणजे नरसोबाची वाडी !

प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांना नरसोबावाडीचे मोठे आकर्षण होते. तेथे मुक्कामाला असतांना परम ब्रह्मयोगी गोविंदस्वामी यांच्या साक्षीने साक्षात दत्तप्रभूंकडून परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी दीक्षित झाले आणि दत्तप्रभूंची उपासना चालू झाली. त्या प्रेरणेतूनच इ.स. १८८३, वैशाख शुक्ल पक्ष पंचमी १८०५ यावर्षी माणगावात स्वतः टेंब्येस्वामींनी दत्तमंदिराची स्थापना केली. माणगाव पंचक्रोशी दत्तभक्तीने बहरली. श्री दत्तप्रभूंची मूर्ती, मंदिरासाठी भूमी आणि नंतर मंदिराची उभारणी आदी कामे दत्तप्रभूंच्या इच्छेने आपोआप कशी घडत गेली, याचे वर्णन टेंब्येस्वामींच्या चरित्रात असून ते वाचणे महत्त्वाचे आहे. तेव्हापासून प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, तसेच त्यांच्या दत्तमंदिराची कीर्ती आसमंतात पसरली. श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे. टेंब्येस्वामींचे दर्शन व्हावे आणि सहवास लाभावा, यासाठी भक्त मोठ्या संख्येने माणगावात येऊ लागले. प्रत्येक शनिवारी, ५ सहस्रांहून अधिक भाविक येत असतात, तसेच प्रत्येक पौर्णिमा आणि दत्तजयंती उत्सवाच्या दिवशी, तर सहस्रावधी भाविक येथे येतात. आजही श्री टेंब्येस्वामींचे ‘श्रीक्षेत्र माणगांव’ हे तीर्थक्षेत्र म्हणून सार्‍या विश्‍वाचे आकर्षण केंद्र बनले आहे.

www.tembyeswami.in – श्री दत्तमंदिराचे संकेतस्थळ (वेबसाईट)

संकलक : श्री. हेमंत पावसकर, माणगाव, सिंधुदुर्ग

Leave a Comment