१. शृंगेरी शारदा मंदिर, चिक्कमगळुरू, कर्नाटक
१ अ. शृंगेरी शारदा मंदिराचा इतिहास
कर्नाटक राज्यातील चिक्कमगळुरू जिल्ह्यात तुंगा नदीच्या काठी शृंगेरी नावाचे गाव आहे. येथील पर्वतावर पूर्वी शृंगऋषि रहायचे; म्हणून या स्थानाला ‘शृंग गिरि’ असे नाव पडले. पुढे शृंगगिरीचे रूपांतर ‘शृंगेरी’ असे झाले. २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्य या ठिकाणी आले होते. एकदा त्यांनी तुंगा नदीच्या काठी एक आश्चर्यकारक घटना पाहिली. एक नाग त्याच्या फणाच्या खाली गर्भवती असलेल्या बेडकीचे सूर्यापासून रक्षण करत होता. हे दृश्य पाहून आद्य शंकराचार्यांना जाणवले, ‘जेथे वैरभावच नष्ट झाला आहे, त्या भूमीचे काहीतरी वैशिष्ट्य असणार आहे.’ पुढे त्यांनी तुंगा नदीच्या काठी ‘शारदादेवी’च्या (सरस्वतीच्या एक रूपाची) मूर्तीची स्थापना केली आणि त्यांनी स्थापन केलेल्या ४ मठांपैकी पहिला मठ येथे स्थापन केला. तेव्हापासून त्या मठाला ‘शृंगेरी शारदापीठ’ असे नाव पडले.
१ आ. शृंगेरी मठाचे दर्शन आणि त्यानंतर घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !
१ आ १. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शृंगेरी मठाचे सध्याचे शंकराचार्य आणि त्यांचे उत्तराधिकारी या दोघांचेही हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आशीर्वाद घेणे
या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शृंगेरी शारदापिठाचे ३६ वे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी आणि त्यांचे उत्तराधिकारी ३७ वे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विदुशेखर भारती स्वामीजी यांना भेटून हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
१ आ २. श्री शारदादेवीची अनुभवलेली कृपा ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात ‘शारदापिठातील श्रीयंत्रावर झालेल्या कुंकुमार्चनातील पूजेचे कुंकू मागावे’, असा विचार येणे, त्या वेळी ३७ वे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विदुशेखर भारती स्वामीजी यांच्या पूर्वाश्रमातील आजींनी त्यांना श्रीयंत्रावर कुंकूमार्चन केलेले पूजेतील हळद-कुंकू देणे
श्री शारदादेवीचे दर्शन झाल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात आले, आपण ‘देवीच्या श्रीयंत्रावर झालेल्या कुंकुमार्चनातील पूजेचे कुंकू मिळेल का ?’, असे मंदिरातील पुजार्यांना विचारूया.’ शंकराचार्यांचे दर्शन झाल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तुंगा नदीच्या पुलावरून चालत येत असतांना ३७ वे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विदुशेखर भारती स्वामीजी यांच्या पूर्वाश्रमातील आजी त्यांच्याजवळ आल्या आणि त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्रीयंत्रावर झालेल्या कुंकुमार्चन पूजेचे कुंकू आणि हळद प्रसाद म्हणून दिले. त्या वेळी ‘साक्षात् शारदादेवीच येऊन श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रसाद देत आहे’, असे साधकांना जाणवले. (‘३७ वे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विदुशेखर भारती स्वामीजी यांचे पूर्वाश्रमातील आई-वडील आणि आजी-आजोबा हे तिरुपतीला असतात. तिरुपति मंदिराच्या वेदपाठशाळेचे संचालन या परिवाराकडे आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यामुळे आजी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ओळखतात. – संकलक)
१ इ. शारदादेवीच्या मंदिराच्या आवारातील ‘विद्याशंकर मंदिरा’तील वैशिष्ट्यपूर्ण खांब
शारदादेवीच्या मंदिराच्या आवारात प्राचीन ‘विद्याशंकर मंदिर’ आहे. या मंदिराच्या आत १२ राशींचे १२ खांब आहेत. या खांबांचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्या राशीच्या खांबांवर सूर्याचा प्रकाश पडतो.
२. श्री मूकांबिकादेवी मंदिर, कोल्लुरू (जिल्हा उडुपी), कर्नाटक.
२ अ. श्री मूकांबिकादेवीच्या मंदिराचा इतिहास
कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात ‘सौपर्णिका’ नदीच्या काठी ‘कोल्लुरू’ नावाचे गाव आहे. या गावाच्या मागे ‘कोडचाद्री’ नावाचा पर्वत आहे. सत्ययुगात देवीने कोडचाद्री पर्वतावर मूकासुराचा वध केल्यानंतर देवीला ‘मूकांबिका’ असे नाव पडले. या पर्वतावर आद्य शंकराचार्यांना मूकांबिकादेवीने दर्शन दिले होते. पुढे आद्य शंकराचार्यांनी कोडचाद्री पर्वताच्या खाली असलेल्या कोल्लुरू गावात एका स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात मूकांबिका देवीची स्थापना केली. या शिवलिंगावर बरोबर मध्यभागी सुवर्णाची एक रेषा आहे.
– श्री. विनायक शानभाग, मुल्की, कर्नाटक.