१. सुख-दुःख
१ अ. सुख-दुःखाचे स्वरूप
आपल्यापैकी प्रत्येकाने सुखाच्या क्षणांचा आणि दुःखाचाही अनुभव घेतला आहे. प्रत्येकाची धडपड सुखप्राप्तीसाठी असली, तरी बहुतांश वेळेला दुःखच आपल्या पदरी येते, असा आपला अनुभव असतो. सर्वसाधारणपणे सध्याच्या काळात मानवी जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते. बहुतेकांना आनंद कसा मिळवायचा, हे ठाऊक नसते; म्हणून प्रत्येक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे थोडा वेळ तरी सुख मिळवण्याचा, तसेच दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो, तर आवडती वस्तू खाणे, आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे, आवडता छंद जोपासणे अशा प्रकारच्या कृती करून सुख मिळवायचा प्रयत्न करतो, तर शारीरिक व्याधींवर औषधे घेणे, दूरदर्शन संच बिघडल्यास तो ठीक करून घेणे, अशा प्रकारच्या कृती करून दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो. पण यांमुळेही कायमस्वरूपी सुख मिळत नाही. याचे ‘सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥’, असे संत तुकाराम महाराज यांनी अतिशय मार्मिक वर्णन केले आहे. स्वामी विवेकानंद यांनीही म्हटले आहे की, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सगळ्यांना केवळ सुख हवे असते; मात्र कोणतेही सुख येतांना दुःखाचा काटेरी मुकुट घालून येते.
१ आ. सुख-दुःखाची कारणे
आपण ज्या आनंदस्वरूप ब्रह्मापासून निर्माण झालो आहोत, त्याच्याकडे जाण्याची ओढ प्रत्येकालाच थोड्या-फार प्रमाणात असते. त्यासाठी आपण आता सुख-दुःखाची कारणे कोणती असतात आणि दुःखनिवारणाचा उपाय काय आहे, हे जाणून घेऊया. सुख-दुःखाची कारणे शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असतात. शारीरिक स्तरावरचे दुःख म्हणजे शरिराला एखादी व्याधी जडणे. कुणीतरी आपल्याला फसवले किंवा अयोग्य पद्धतीने बोलले, तर आपल्या मनाला वाईट वाटते. हे मानसिक स्तरावरचे दुःख झाले. पुष्कळ प्रयत्न करूनही सातत्याने अपयश पदरी पडणे, लग्न न जमणे अशा प्रकारच्या घटनांमुळे होणार्या दुःखाचे कारण आध्यात्मिक असते.
१ इ. दुःखनिवारणाचा खरा उपाय
बुद्धीअगम्य किंवा आध्यात्मिक कारणामुळे होणार्या दुःखाच्या निवारणासाठी साधना करणेच आवश्यक !
दुःखाचे कारण आध्यात्मिक असेल, तर त्याच्या निवारणासाठी आध्यात्मिक स्तरावरच उपाय करावे लागतात. दुःखाचे कारण आध्यात्मिक आहे, हे बुद्धीने कसे ओळखायचे ? तर काही लक्षणांवरून आपण याचा अंदाज बांधू शकतो. एखाद्या कुटुंबात बर्याच जणांना त्रास असतो, उदाहरणार्थ एका कुटुंबात एक मुलगा मनोरुग्ण होता, दुसर्याच्या लग्नानंतर दहाव्या दिवशीच पती-पत्नी विभक्त झाले, तिसर्याने शिक्षण अर्धवट सोडले, तर दिसायला सुंदर, पदव्युत्तर शिक्षण झालेल्या आणि चांगले वेतन असलेल्या मुलीचे लग्नच जमत नव्हते. या सर्व गोष्टींचा ताण आई-वडिलांच्या मनावर आला होता. थोडक्यात, घरातील प्रत्येक जण दुःखी होता. अशा प्रकारचे काही असेल किंवा पुष्कळ प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसेल तर त्या दुःखामागचे कारण बहुतांश वेळेला आध्यात्मिक असते. थोडक्यात ज्या दुःखाच्या कारणाचे बुद्धीद्वारे विश्लेषण करता येत नाही, असे दुःख आध्यात्मिक स्वरूपाचे असते. या आध्यात्मिक दुःखाच्या निवारणासाठी साधनाच करणे आवश्यक असते.
१ ई. सकाम आणि निष्काम साधना
धर्म असे सांगतो की, मनुष्यजन्माची सार्थकता मोक्षप्राप्तीतच आहे. मोक्षप्राप्तीसाठी प्रतिदिन किमान दोन-तीन घंटे शरीर, मन आणि/ किंवा बुद्धी यांनी जे प्रयत्न केले जातात, त्याला साधना म्हणतात. साधनेचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम साधना आणि दुसरी निष्काम साधना ! सकाम साधना म्हणजे वैयक्तिक अपेक्षांच्या पूर्तीसाठी उदाहरणार्थ कुटुंबाचे कल्याण व्हावे, विवाह जुळण्यात येणारे अडथळे दूर व्हावेत, अशा प्रकारच्या उद्देशपूर्तीसाठी केली जाणारी साधना, तर निष्काम साधना म्हणजे कोणत्याही अपेक्षेविना भगवंताच्या भक्तीसाठी केली जाणारी साधना !
सकाम साधना केली, तर कामना म्हणजे इच्छा पूर्ती होते आणि निष्काम साधना केली, तर आध्यात्मिक उन्नती होऊन कामनापूर्तीही होऊ शकते; कारण ‘माझ्या निष्काम भक्ताच्या कामना मी पूर्ण करतो’, असे भगवंताचे वचन आहे. सकाम साधना करणार्याला सकामातले म्हणजे व्यवहारातले फळ मिळू शकते; पण ईश्वरप्राप्ती होत नाही. मनुष्यजन्माचे ध्येय मोक्षप्राप्ती हे आहे. साधना निष्काम झाली, तरच मोक्षप्राप्तीचे ध्येय साध्य होते.
२. कर्मफलसिद्धांत
हिंदु धर्मात दोन सिद्धांत सांगितले आहेत. पहिला कर्मफलसिद्धांत आणि दुसरा पुनर्जन्मसिद्धांत ! कर्मफलसिद्धांत काय सांगतो, तर केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ व्यक्तीला भोगावे लागते. शुभकर्म केले, तर पुण्य मिळते आणि अशुभ कर्म केले, तर पाप भोगावे लागते. उदाहरणार्थ आई-वडिलांची काळजी घेणे, मंदिरात दान करणे, आदि कर्मांमुळे पुण्य मिळते आणि इतरांना खोटे बोलणे, टोचून बोलणे, चोरी करणे, आदि कर्मांमुळे पाप लागते. पुण्यप्राप्तीमुळे फलस्वरूपात सुख मिळते, तर पापामुळे दुःख भोगावे लागते.
समजा एखाद्या व्यक्तीने चोरी केली आणि ती पकडली गेली नाही, तर त्या चोराला व्यावहारिक जगात शिक्षा मिळणार नाही. तो चोर लौकिक जगात शिक्षा मिळण्यापासून एक वेळ वाचू शकेल; पण ईश्वराच्या दरबारात नाही. भगवंताकडे व्यक्तीच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कर्माची नोंद घेतली जातेच. प्रत्येक व्यक्तीच्या काया-वाचा-मने होणार्या प्रत्येक चांगल्या-वाईट कृतींचा हिशेब ठेवत असतो.
२ अ. कर्माचे फळ हे उद्देशावरही अवलंबून
कर्माचे फळ हे कर्म करण्याच्या उद्देशावरही अवलंबून असते. एखाद्या गुंडाने व्यक्तीचा पाय कापणे आणि एखाद्या डॉक्टरांनी शस्त्रकर्म करण्यासाठी व्यक्तीचा पाय कापणे, यांमध्ये कृती एकसारखी असली, तरी उद्देश भिन्न आहेत. गुंडाचा उद्देश व्यक्तीला इजा पोचवण्याचा असतो, तर डॉक्टरांचा उद्देश व्यक्तीला आजारातून बरे करण्याचा असतो. अशा प्रकारे कर्माचे फळ हे त्याच्या उद्देशावरही अवलंबून असते.
२ आ. कलियुगात प्रारब्धाचे प्रमाण ६५ टक्के, तर क्रियमाण कर्माचे प्रमाण ३५ टक्के
हिंदु धर्मात पुनर्जन्माची मान्यता आहे. व्यक्तीकडून झालेले पुण्यकर्म आणि पापकर्म यांचे फळ व्यक्तीला याच जन्मात भोगावे लागते, असे नाही, तर काही वेळा ते पुढील जन्मांतही भोगावे लागते. साधारणतः गेल्या जन्मातील कर्माचे फळ आपण या जन्मात भोगत असतो. या गेल्या जन्मातील कर्माच्या फळाला ‘प्रारब्ध’ म्हणतात. यालाच आपण व्यावहारिक भाषेत ‘नशीब’ असे म्हणतो. अध्यात्म असे सांगते की, कलियुगात मनुष्याच्या जीवनात घडणार्या ६५ टक्के घटना या प्रारब्धाधीन असतात आणि ३५ टक्के क्रियमाण कर्म म्हणजेच प्रयत्न व्यक्तीच्या हातात असतात. याचा अर्थ आयुष्यातील ६५ टक्के घटना या गतजन्मातील कर्मांची फळे म्हणून वाट्याला येतात.
उदाहरणार्थ, समजा २ विद्यार्थी एकाच वर्षी समान गुण मिळवून पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यातील एकाला लगेच नोकरी मिळते, तर दुसर्याला त्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो. २ जुळ्या मुलांपैकी एक सुदृढ असते, तर दुसर्याला शारीरिक आजार असतात. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहिली असतील किंवा अनुभवली असतील. ‘असे का होते ?’, याची उत्तरे आधुनिक विज्ञान देऊ शकत नाही. व्यक्तीची सुखप्राप्तीसाठी धडपड असतांनाही व्यक्तीच्या वाट्याला दुःख का येते, याची उकल विज्ञान करू शकत नाही, तर याचे उत्तर अध्यात्मात मिळते. व्यक्तीच्या वाट्याला येणार्या दुःखाचे कारण पूर्वजन्मीचे पापकर्म हे असू शकते.
३. साधनेचे महत्त्व
३ अ. साधनेमुळे प्रारब्ध सुसह्य होणे
आता असा प्रश्न कुणाला पडू शकतो की, ‘जर आयुष्यातील घटनांवर प्रारब्धाचाच प्रभाव रहाणार असेल, तर साधना केल्याने काय लाभ होतो ?’ याचे उत्तर असे की, जरी व्यक्तीला प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवावे लागत असले, तरी साधना केल्यामुळे हे भोग भोगणे सुसह्य होते. जसे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूल दिल्याने शरीराला शस्त्रक्रियेची जाणीव होत नाही किंवा वेदना होत नाहीत, त्याचप्रमाणे साधनेमुळे प्रारब्धभोग भोगण्याचे बळ मिळते. साधनाबळामुळे दुःख हे दुःख वाटत नाही. उलट दुःखाचा डोंगर असतांनाही भगवंत भक्ताचे रक्षण करतो, याची अनुभूती येऊ शकते. याचे एक समर्पक उदाहरण म्हणजे संत मीराबाई ! मीराबाई या राजघराण्यातील होत्या. लहानपणापासूनच त्या कृष्णभक्त होत्या. त्यांची कृष्णभक्ती त्यांच्या सासरच्या लोकांना पसंत नव्हती; म्हणूून त्यांनी मीराबाईंना जीवे मारण्याचे हर तर्हेने प्रयत्न केले. मीराबाईंना विष दिले; मात्र मीराबाईंच्या अत्युच्च भक्तीमुळे या विषाचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. साधनेचे बळ आणि भक्ती असेल, तर भगवंत प्रारब्ध कसे सुसह्य करतो किंवा प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो, याचे हे उदाहरण. या उदाहरणासह मनुष्याकडे उपलब्ध असलेले ३५ टक्के क्रियमाण त्याच्या प्रारब्धावर मात करू शकते, हेही कायम लक्षात ठेवले पाहिजे.
३ आ. जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी साधना आवश्यक
जसे शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शिक्षण घ्यावे लागते, तसे आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साधना करावी लागते. आध्यात्मिक उन्नती होऊन मुक्ती मिळेपर्यंत आत्म्याचा पुन्हा पुन्हा जन्म होत असतो. एखादी व्यक्ती समजा आयुष्यभर पुण्यकर्मे करत आहे; परंतु तीने साधना केली नाही, तर तिला जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळेल का ? तर याचे उत्तर ‘नाही’, असे आहे. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीला मृत्यूनंतर चांगल्या कर्मांमुळे स्वर्गप्राप्ती होते. पुण्यबळाचा साठा असेपर्यंत ती तेथे रहातेे आणि मग पुण्यबळ संपले की तिला पृथ्वीवर गत जन्मांतील प्रारब्ध भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. पापकर्मे करणार्या व्यक्तीचे आध्यात्मिक पतन होते आणि मृत्यूनंतर त्वरीत पुन्हा मनुष्ययोनीत जन्म मिळत नाही, तर कीटक, पशू, पक्षी, वृक्ष अशा ८४ लक्ष कनिष्ठ योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे साधना न केल्यास ‘पुनरपि जननम्, पुनरपि मरणम्…’ हे चालूच रहाते.
३ इ. मनुष्याचा जन्म पुनःपुन्हा होण्याची कारणे
मनुष्याचा जन्म दोन कारणांसाठी पुनःपुन्हा होतो. पहिले कारण म्हणजे प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि दुसरे म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्तता करून घेणे; पण याकडे आपले लक्षच नसते; किंबहुना याविषयी आपल्याला ठाऊकच नसते. त्यामुळे घर, बंगला, नोकरी, गाडी, पैसे यामध्येच अनेकांचे जीवन गुरफटून जाते.
चांगली साधना केली, तर साधनेतील तपोबलाने तसेच संतांच्या कृपेमुळे प्रारब्ध नष्ट होऊन जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते, म्हणजेच मृत्यूनंतर पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागत नाही. साधना करणार्या व्यक्तीला मृत्यूनंतर सद़्गती लाभते; म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग लोकाच्याही पुढील लोकांमध्ये अर्थात महा, जन, तप आणि सत्य या उच्चलोकांत पुढील साधना करून मोक्षप्राप्ती करता येते. हे साधनेचे महत्त्व आहे.
कुणाची कर्मफलसिद्धांत किंवा पुनर्जन्मसिद्धांत यांवर श्रद्धा असो वा नसो, कुणाला कर्माचे फळ हवे असो वा नसो, प्रत्येकाला ते मिळतेच.
आतापर्यंतच्या विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की, आपल्या वाट्याला येणारे सुख-दुःख हे बहुधा पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ असते. पाप-पुण्याच्या पलीकडे जाऊन मोक्षप्राप्ती साध्य करायची असेल, तर साधना करण्याला पर्याय नाही. कालानुरूप साधनेतील एक महत्त्वाचा आणि आवश्यक भाग आता आपण जाणून घेऊया.
कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. बर्याच ठिकाणी असे दिसून येते की, अनेक जण त्यांना आवडणार्या देवाचे किंवा त्यांना आवडेल त्या प्रकारे नामस्मरण करतात. घेतलेले एकही नाम वाया जात नाही. त्यामुळे इष्टदेवाचे नामस्मरण करणे ठीकच आहे; पण त्याच्या जोडीला काळानुरूप कुलदेवतेचे नामस्मरण करणेही आवश्यक आहे.
४. कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व
४ अ. कुलदेवीच्या नामजपाने आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होणे
आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. ‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. कुलदेवतेची उपासना केल्याने मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो.
४ आ. कुलदेवीच्या नामस्मरणामुळे ब्रह्मांडातील सर्व देवतांच्या तत्त्वाचा नामधारकाला लाभ होणे
ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांंपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. जसे व्हिटॅमिन ए, बी, सी, डी यांच्यापैकी कुठले व्हिटॅमिन कमी असेल, तर त्या त्या व्हिटॅमिनची गोळी घेतल्याने तेवढेच व्हिटॅमिन वाढते; परंतु डॉक्टरने ‘मल्टीव्हिटॅमिन’ची गोळी दिल्यास तिच्यात सर्वच प्रकारची व्हिटॅमिन्स असल्यामुळे शरीरात जे जे व्हिटॅमिन कमी आहे, ते वाढते. कुलदेवीचे नामस्मरण या ‘मल्टीव्हिटॅमिन’प्रमाणे आपल्या शरीरात ज्या देवतेचे तत्त्व कमी आहे, ते वाढवण्यास साहाय्य करते.
त्याशिवाय कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास नामस्मरण करणार्याला कोणताही त्रास होत नाही.
ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, तर त्यांनी कुलदेवीचा नामजप करण्यास प्राधान्य द्यावे. आई आणि बाबा दोघे जवळ असतांनाही मूल साहाय्यासाठी प्रथम आईला हाक मारते. तसेच हे आहे.
४ इ. कुलदेवतेचा नामजप कसा करावा ?
श्री (कुलदेवीचे नाव) देव्यै नमः । उदाहरणार्थ ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, ‘श्री रेणुकादेव्यै नम: ।’
देवतेच्या नामाआधी ‘श्री’ लावावा, नामाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी ‘नमः’ म्हणावे, उदा. कुलदेवी भवानी असेल तर ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ असे म्हणावे. कुलदेवी रेणुकादेवी असेल, तर ‘श्री रेणुकादेव्यै नम: ।’ असा नामजप करावा.
आपल्या कुळात केवळ कुलदेव असेल, तर देवतेच्या नामाआधी ‘श्री’ लावावा, नामाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी ‘नमः’ म्हणावे, उदा. कुलदेव श्री व्यंकटेश असेल, तर ‘श्री व्यंकटेशाय नमः ।’, असा नामजप करावा. याच प्रमाणे कुलदेव श्री गणेश असेल, तर ‘श्री गणेशाय नमः ।’, असा नामजप करावा.
कुलदेवता ठाऊक नसेल, तर ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप करावा.
आता अनेक जणांना कुलदेवता माहितीच नसते, अशा वेळी त्यांनी ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते, अशी अनुभूती अनेक जणांनी घेतली आहे.
विवाह म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्म असल्याने विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.
आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन कमीत कमी १ ते २ घंटे आणि जास्तीत-जास्त म्हणजे सतत करावा. आधीच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे नामजपाला शौच-अशौच, सुवेर-सुतक, स्थळ-काळ यांचे बंधन नसल्याने हा नामजप आपण कोणत्याही वेळी करू शकतो. आपल्या उपलब्ध वेळेनुसार हा नामजप बसून करावा. त्याच जोडीला वैयक्तिक आवरतांना, स्वयंपाक करतांना, टीव्ही किंवा मोबाईल पहातांना, प्रवास करतांना अशा प्रकारे जिथे जिथे शक्य होईल, तिथे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा.
४ ई. साधनेतील अखंडत्व फक्त नामस्मरणाने साधता येणे
अनंत अशा परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अखंड म्हणजे २४ घंटे (तास) साधना व्हायला हवी. ज्ञानयोगाप्रमाणे वेद, उपनिषदे यांचा अभ्यास, कर्मयोगाप्रमाणे ध्यान-धारणा, त्राटक, प्राणायाम, भक्तीयोगाप्रमाणे देवपूजा, भजन, कीर्तन असे २४ घंटे करणे शक्य होत नाही; पण नामस्मरण मात्र २४ घंटेही करता येऊ शकते. साधनेतील अखंडत्व फक्त नामस्मरणाने साधता येते, म्हणून ती सर्वोत्तम साधना मानली जाते. आपण कुलदेवीचा मनापासून आणि एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न करूया.
खूप छान माहिती आहे.
अतिशय सुंदर माहिती आहे प्रत्येक साधकाने अवलंब करावा तेणे कल्याण च होईल
खुपच उपयोगी माहीती मिळाली धन्यवाद
विजय निकम नाशिक
मनाला खुप प्रसन्न वाटले
वाचून खुप छान व प्रसन्न वाटले. मन समाधानी झाले.
खूप खूप छान महिती मिळाली मन खूप हलके झाले. पुढे असेच महिती मिळावे हीच अपेक्षा.