परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था निर्माण करणार असलेले ‘साधक-वृद्धाश्रम’ यांचे महत्त्व ओळखा !

वृद्धकाळाची पूर्वसिद्धता म्हणून आतापासूनच स्वतःला मनोलयाची सवय लावा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था निर्माण करणार असलेले ‘साधक-वृद्धाश्रम’ यांचे महत्त्व ओळखा !

 

१. वृद्धकाळी होणार्‍या मनाच्या संघर्षाला
तोंड देता येण्यासाठी आतापासूनच स्वतःला मनोलयाची सवय लावा !

१ अ. वृद्धकाळातील काही समस्या आणि दुःख

‘वृद्धकाळी स्वतःमध्ये विशेष काही करण्याची शारीरिक क्षमता न उरल्यामुळे लहानसहान गोष्टींसाठीही कुटुंबियांवर अवलंबून रहावे लागते. काही वेळा काही वस्तू विकत घेण्यासाठी लागणारे पैसेसुद्धा कुटुंबियांकडे मागावे लागतात. कुटुंबीय जे खाण्या-पिण्यास देतील, त्यात समाधान मानावे लागते. कुटुंबीय ज्या परिस्थितीत ठेवतील, ती परिस्थिती स्वीकारावीच लागते. वृद्धकाळात शारीरिक दुखणीही पुष्कळ वाढतात आणि वयोमानानुसार त्यांच्यावर उपचार होण्यालाही मर्यादा असतात. अशा वेळी ती दुखणी सहन करण्याविना गत्यंतर नसते.

बहुतेक वेळा हिंडता-फिरता येत नसल्यामुळे एकाच जागी बसून रहावे लागते; त्यामुळे एकाकीपणा वाढतो. बहुतेक घरी असे आढळते की, कुटुंबीय त्यांच्या वृद्ध माता-पित्यांना सांभाळण्याचे काम ‘आता आपल्याला हे नाईलाजास्तव करावेच लागणार’, या भावनेतून करतात. त्यामुळे त्यामध्ये प्रेमाचा ओलावा नसतो. काही वेळा तर कुटुंबीय त्यांच्या वृद्ध माता-पित्यांना सांभाळण्याची कटकट नको; म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे दुष्कृत्यही करतात. अशा प्रकारच्या सर्व गोष्टींमुळे वृद्धकाळात मनाचा पुष्कळ संघर्ष होतो किंवा काही वेळा तीव्र नैराश्यही येते.

१ आ. तरुणांनो, ‘उद्या तुम्हीही वृद्ध होणार आहात’, हे लक्षात घेऊन आजच सावध व्हा !

पू. संदीप आळशी

१. ‘माता-पिता हे देवासमान आहेत’, असे आपली हिंदु संस्कृती शिकवते. त्यामुळे आज तरुण असणार्‍यांनी ‘आपल्या अयोग्य वागण्या-बोलण्यामुळे माता-पिता दुःखी होत नाहीत ना’, याचा गांभीर्याने विचार करावा; कारण असे करणे हे पाप आहे आणि या पापाचे फळ भोगावेच लागते.

२. आज तरुण असणार्‍यांना ‘भविष्यात त्यांच्या मुलांकडून अयोग्य वागणूक मिळू नये’, यासाठी त्यांनी आतापासूनच स्वतःच्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता आहे.

३. आज तरुण असणार्‍यांनी ‘स्वतःला वृद्धकाळात भोगाव्या लागू शकणार्‍या समस्यांना सहजपणे सामोरे जाता यावे’, यासाठी आतापासूनच सिद्धता करायला हवी. त्यांनी स्वतःच्या खाण्या-पिण्याच्या आणि हिंडण्या-फिरण्याच्या आवडींना मर्यादा घालायला हव्यात; ‘मी म्हणतो तसेच व्हायला हवे’, ही वृत्ती सोडायला हवी आणि ‘परिस्थिती न स्वीकारणे’, ‘इतरांशी जुळवून न घेणे’, ‘इतरांकडून अपेक्षा ठेवणे’ यांसारख्या स्वभावदोषांवर नियंत्रण मिळवायला हवे. थोडक्यात स्वतःला मनोलयाची सवय लावून कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहायला शिकायला हवे. यासाठी साधनाच करायला हवी. साधनेविषयी योग्य मार्गदर्शन ‘सनातन संस्था’ करते.

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना
‘साधक-वृद्धाश्रम’ निर्माण व्हावेत, असे वाटण्यामागील कारणे

अ. आज सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे काही साधक रुग्णाईत किंवा वृद्ध आहेत.

आ. आतापर्यंत घरी राहून साधना करणार्‍या ज्या साधकांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि साधना केली, अशांचे मन वृद्धपणी मुलांच्या घरी राहून नातवंडांशी खेळणे, घरात चालू असलेले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, मायेतील गप्पागोष्टी करणे इत्यादींत रमत नाही. त्यांना साधना सोडून अन्य सर्व नकोसे वाटते. ‘अशा साधकांची शेवटच्या श्‍वासापर्यंत चांगली साधना व्हावी’, यासाठी त्यांनाही आश्रमात रहाण्यासाठी बोलावले जाते. सध्या असेही काही जण आश्रमात रहात आहेत.

इ. ज्या साधकांनी साधनेसाठी पूर्णवेळ त्याग केला आहे, अशांच्या वृद्ध माता-पित्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनाही आश्रमात रहायला बोलावण्यात येते. सध्या असेही काही वृद्ध आश्रमात रहात आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या साधकांना सहसाधकांकडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडेही ‘आपले कुटुंबीय’, या भावाने पहाण्यास शिकवले आहे. त्यामुळे सनातनच्या आश्रमात सर्व जण कुटुंबभावनेने रहातात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या शिकवणुकीमुळे आश्रमातील साधक रुग्णाईत वा वृद्ध साधकांचे खाणे-पिणे, औषधपाणी आदी सर्व प्रेमाने आणि सेवाभावाने करतात. त्यामुळे रुग्णाईत वा वृद्ध साधकांच्या मनावर कोणतेही दडपण रहात नाही किंवा त्यांना आश्रमात रहाण्याविषयी संकोच वाटत नाही आणि ते आनंदाने राहू शकतात. सनातनचे साधक ‘रुग्णाईत वा वृद्ध साधकांचे सर्व करणे, ही सेवाच आहे’, या भावाने करत असल्यामुळे त्यातून साधकांचीही साधनाच होते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे मन आकाशाएवढे व्यापक, प्रेमभाव सागराएवढा खोल आणि ‘सर्वांना कोणत्याही अडचणींविरहित साधना करून ईश्‍वरप्राप्ती करून घेता यावी’, ही तळमळ हिमालयाएवढी उत्तुंग आहे. त्यामुळेच परात्पर गुरु डॉक्टरांना साधक-वृद्धांच्या सोयीसाठी प्रथम भारतातील प्रत्येक राज्यात आणि पुढे प्रत्येक जिल्ह्यात ‘साधक-वृद्धाश्रम’ निर्माण व्हावेत, असे वाटते. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्थापन केलेल्या किंवा त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था लवकरच त्या दिशेने प्रयत्नही करणार आहेत. अशा परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी साधकांनी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच पडेल.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२०.८.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment