मागील सत्संगात आपण देवाला कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व आणि लाभ पाहिले होते. त्यामध्ये कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे समजून घेतलेे होते, कृतज्ञताभावात रहाता येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्येय ठरवले होते.
आता आपण सत्संगाच्या मुख्य विषयाकडे वळूया. साधना करत असतांना नामजप हा साधनेचा पाया आहे, तर सत्संगामुळे पाया मजबूत व्हायला साहाय्य होते. सत्संगामुळे आपण साधनेत स्थिर होतो; म्हणून आज आपण सत्संगाचे महत्त्व काय आहे ?, हे समजून घेणार आहोत.
सत्संग म्हणजे काय ?
सत्संग म्हणजे काय ?, तर सत्चा संग. सत् म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्मतत्त्व आणि संग म्हणजे सहवास ! प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास आपल्याला मिळणे अशक्य आहे; म्हणून संत ज्यांना ईश्वराचे सगुण रूप असे म्हणतात, त्यांचा सहवास हा सर्वश्रेष्ठ सत्संग असतो. प्रत्येक वेळी आपल्याला संतांचा सहवास म्हणजे संतसंग मिळेल, असेही नाही. त्यामुळे जे साधना करणारे साधक आहेत, त्यांचा सत्संग महत्त्वाचा असतो. सत्संग म्हणजे ईश्वर, धर्म, अध्यात्म आणि साधना यासंबंधीची सात्त्विक चर्चा. सत्संग म्हणजे ईश्वराच्या किंवा ब्रह्मतत्त्वाच्या अनुभूतीच्या दृष्टीने अनुकूल असे वातावरण ! सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर सत्संग म्हणजे अध्यात्माला पोषक असे वातावरण ! हा सत्संग आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळू शकतो. आता आपण एकत्र जमलो आहोत आणि साधनेच्या प्रयत्नांविषयी जाणून घेत आहोत. हा एक सत्संग आहे. कीर्तनाला किंवा प्रवचनाला जाणे, देवळात जाणे, तीर्थक्षेत्री रहाणे, संतलिखित आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करणे, इतर साधकांच्या सान्निध्यात येणे, संत किंवा गुरूंकडे जाणे ही सगळी सत्संगाचीच वेगवेगळी माध्यमे आहेत. सत्संगामध्ये प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्त्व असते. आपण प्रामाणिकपणे आणि आर्तभावाने सत्संगात सहभागी झालो, तर या ईश्वरी तत्त्वाची प्रचिती येऊ शकते.
सत्संग मिळाला, तरी त्याचा अपेक्षित लाभ घेता येण्यासाठी आपला आंतरिक भावही तितकाच महत्त्वाचा असतो, उदा. देवळात जाणे, हाही एक सत्संगच आहे, असे आपण म्हटले; पण देवळात जातांना एखादी सहल किंवा ‘पिकनिक’ म्हणून गेलो, देवळात जातांना आपण आपापसात बोलत राहिलो किंवा मौज मजेच्या विचारात गेलो, तर त्या देवदर्शनाचा आध्यात्मिक स्तरावर अपेक्षित लाभ होईल का ?; म्हणून जेवढा सत्संग महत्त्वाचा आहे, तेवढाच सत्संगाचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. गुरुकृपेने आपल्याला प्रत्येक आठवड्याला हा सत्संग मिळत आहे. आपणही त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ करून घेण्याच्या दृष्टीने सत्संगात मनापासून सहभागी होऊया.
सत्संगाचे महत्त्व
तपश्चर्येपेक्षाही सत्संगाचे महत्त्व अधिक
सत्संगाचे महत्त्व सांगणारी एक कथा आहे. एकदा वसिष्ठ आणि विश्वामित्र ऋषींत वाद झाला की, सत्संग श्रेष्ठ कि तपश्चर्या ? वसिष्ठऋषी म्हणाले, ‘सत्संग श्रेष्ठ’; तर विश्वामित्रऋषी म्हणाले, ‘तपश्चर्या श्रेष्ठ !’ या वादाचा निकाल लावण्यासाठी ते देवांकडे गेले. तेव्हा देव म्हणाले, ‘शेषच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल !’ तेव्हा दोघेही शेष नागाकडे गेले. त्यांनी शेषनागाला प्रश्न विचारला, ‘सत्संग श्रेष्ठ कि तपश्चर्या श्रेष्ठ ?’ त्यावर शेष म्हणाला, ‘माझ्या डोक्यावरचा पृथ्वीचा भार थोडा तुम्ही हलका करा, मग मी विचार करून उत्तर देईन.’ शेषनागाने पृथ्वी त्याच्या डोक्यावर तोलली आहे, अशी आपल्याकडे पौराणिक मान्यता आहे. शेषनागाच्या डोक्यावरचा पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी विश्वामित्रांनी संकल्प केला, ‘माझ्या १ सहस्र (हजार) वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मी अर्पण करतो. पृथ्वीने शेषाच्या डोक्यावरून थोडे वर जावे’. त्यानंतर पृथ्वी थोडीही हालली नाही. मग वसिष्ठऋषींनी संकल्प केला, ‘मी अर्धा घटकाभराच्या म्हणजे १२ मिनिटांच्या सत्संगाचे फळ अर्पण करतो. पृथ्वीने भार हलका करावा’. त्यानंतर मात्र पृथ्वी लगेच वर उचलली गेली. पृथ्वी लगेच का उचलली गेली ? विश्वामित्रऋषींनी तपश्चर्येचे फळ अर्पण केले, तर वसिष्ठऋषींनी सत्संगाचे ! लक्षात आलं ना सर्वांच्या तपश्चर्येपेक्षा सत्संगाचे महत्त्व किती आहे ? भगवंताच्या कृपेने आपल्याला हा सत्संग मिळत आहे, यासाठी आपण देवाचे आभारच मानायला हवे. बरोबर आहे ना ? आता अजून काही सूत्रांच्या आधारे सत्संगाचे नेमकेपणाने महत्त्व काय आहे हे समजून घेऊया.
वाल्याचे वाल्मिकीमध्ये रूपांतर होण्यासाठी नारदमुनींचा सत्संगच कारणीभूत !
वाल्याचा वाल्मिकी झाला, तोही नारदमुनींच्या काही मिनिटांच्या सत्संगाने ! दरोडेखोर वाल्या वाटसरूंना मारायचा, लुटायचा. एकदा वाल्याला नारदमुनी भेटले आणि त्यांनी वाल्याला विचारले, ‘तू हे पाप ज्यांच्यासाठी करत आहे, ते तुझे कुटुंबीय म्हणजे बायको आणि मुले या पापामध्ये वाटेकरी व्हायला तयार आहेत का ?’, हा प्रश्न वाल्याने घरी गेल्यावर विचारल्यावर त्याच्या बायका-मुलांनी पापामध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्याच्या पुढचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. नारदमुनींच्या कळीच्या प्रश्नानंतर वाल्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी अहोरात्र साधना केली आणि पुढे वाल्याचे रुपांतर संपूर्ण विश्वाला वंदनीय असणार्या वाल्मिकी ऋषींमध्ये झाले. इतके सत्संगाचे महत्त्व आहे.
सत्संगाचे लाभ
वृत्ती सात्त्विक होणे
चांगल्या सवयी पटकन लागत नाहीत. चांगल्या सवयी लावण्यासाठी सातत्याने आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. याउलट वाईट सवयी मात्र लवकर लागतात. आपल्यापैकी अनेकांनी अनुभव घेतला असेल की, समजा आपण प्रतिदिन व्यायाम किंवा प्राणायाम करायचे ठरवले, तर त्याची सवय लागेपर्यंत आपल्याला मनाचा किती संघर्ष करावा लागतो ! याउलट व्यायामातून १ दिवस सुट्टी घ्यायची असेल, तर मन एका झटक्यात तयार होते. सत्संगामुळे व्यक्तीची वृत्ती सात्त्विक होते. त्यातून व्यक्तीमध्ये चिकाटी, सातत्य, सकारात्मकता, जिद्द या गुणांचाही विकास होण्याला साहाय्य होते. हा सत्संग केवळ परमार्थामध्ये महत्त्वाचा आहे, असे नाही, तर प्रपंचात आणि व्यवहारातही महत्त्वाचा आहे.
ईश्वरावरील श्रद्धा वाढणे
सत्संगामध्ये ईश्वर, धर्म, अध्यात्म आणि साधना यांविषयी चर्चा होते. त्यामुळे व्यक्तीचे आध्यात्मिक दृष्टीकोन प्रगल्भ होतात; म्हणजे काय होते तर जीवनात एखादी घटना घडल्यावर सर्वसामान्य व्यक्ती माझ्या सोबत असे का होते याच विचारात रहाते, मात्र काही चांगले घडले, तर माझ्यामुळे झाले असा विचार करते जेव्हा आपण सत्संगात येतो आणि सत्संगात ईश्वरी शक्ती संदर्भात समजून घ्यायला लागतो, तेव्हा आपल्या जीवनात घडणार्या घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो. जसे एखादी अप्रिय घटना आपल्या जीवनात घडल्यावर हे माझ्या प्रारब्ध मुळे घडले असे समजून स्वीकारता येते, तसेच काही चांगले किंवा आनंददायी घडले तर देवाच्या कृपेमुळे झाले या विचारामुळे हळूहळू व्यक्तीचे आध्यात्मिक दृष्टीकोन प्रगल्भ होतात आणि तिची ईश्वरावरील श्रद्धा वाढते.
नामजपामुळे ५ टक्के सात्त्विकता वाढते, तर सत्संगामुळे ती ३० टक्क्यांपर्यंत वाढणे
नामजपामुळे ५ टक्के सात्त्विकता वाढते, तर सत्संगामुळे ती ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. सत्संगामध्ये आपण सर्वजण नामजप करणारे, भगवंताची भक्ती करणारे अध्यात्माबद्दल जाणून घेणारे असे एकत्रित आलेलो आहोत. त्यामुळे सगळ्यांची एकत्रित सात्विकता वाढते. त्यामुळे नामजप केल्यामुळे पाच टक्के सात्त्विकता वाढते, तर सत्संगामध्ये ती ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
आनंद मिळणे
नामजपामुळे जो आनंद मिळतो, तो सत्संगामध्ये सहजतेने मिळतो.
सत्संग हा नामस्मरणाचा पुढचा टप्पा असणे
सत्संग हा नामस्मरणाचा पुढचा टप्पा आहे. अर्थात् प्रत्येक क्षणी म्हणजे २४ घंटे आपण सत्संगात राहू शकत नाही; म्हणून नामजप आवश्यक आहे. नामजपामुळे आपण अखंड साधनारत राहू शकतो.
चैतन्य मिळणे
सत्संगामध्ये ईश्वराविषयी चर्चा केली जाते. जेथे ईश्वराचे गुणगान केले जाते, तेथे ईश्वराचे सूक्ष्मरूपाने अस्तित्त्व असतेच. त्यामुळे सत्संगाचा व्यक्तीला चैतन्याच्या स्तरावरही लाभ होतो. समाजातील अन्य व्यक्तींच्या तुलनेत सत्संगात येणार्यांमध्ये सत्त्वगुण अधिक असतो. सत्त्वगुण अधिक असणार्या व्यक्तींच्या एकत्रीकरणामुळे सामूहिक सत्त्वगुण वाढून वातावरण सात्त्विक होते. त्यामुळे साधकामधीलही सत्त्वगुण वाढायला साहाय्य होते.
ईश्वरप्राप्तीची धारणा दृढ होणे
सत्संगात नियमित उपस्थित राहिल्याने आपली साधना अधिकाधिक दृढ होत जाते. ईश्वरप्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे, ही धारणाही अधिक दृढ होते.
व्यक्तीची सकारात्मकता वाढून मनोबल वाढणे
सत्संगामध्ये असणार्या सात्त्विक वातावरणात साधकाचे ध्यान इत्यादी साधना अधिक चांगली होते. सत्संगामुळे अनुभूती येतात. अनुभूतींमुळे साधनेवरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. व्यक्तीची सकारात्मकता वाढते. तिचे मनोबल उंचावते.
वृत्ती व्यापक होणे
सत्संगात सहभागी अन्य साधकांना साधना करतांना कोणत्या अडचणी येतात, त्यावर कोणते प्रयत्न करायला हवेत ?, सत्संगात आपल्याप्रमाणेच सहभागी अन्य साधक कशा प्रकारे प्रयत्न करतात ?, हे शिकायला मिळते. थोडक्यात सांगायचे, तर साधनेचे प्रायोगिक प्रयत्न शिकण्यासाठी सत्संगासारखे दुसरे माध्यम नाही. सत्संगामध्ये आपण जे प्रयत्न किंवा अनुभूती सांगतो, त्याची आध्यात्मिक कारणमीमांसा सत्संगामुळे कळते. त्यामुळे सत्संगात सहभागी असणार्यांची श्रद्धा वाढायला साहाय्य होते. सत्संगाला येणारे इतर साधक आपलेच आहेत, हा भाव निर्माण होतो. त्यातूनच पुढे ‘अवघे विश्वची माझे घर’, असा भाव निर्माण होतो.
साधनाविषयक शंकांचे निरसन होणे
साधकाच्या मनात साधनेविषयी काही शंका, प्रश्न असतील, तर सत्संगामध्ये त्याची उत्तरे मिळू शकतात.
साधनेच्या प्रयत्नांना गती मिळणे
साधनेविषयी विकल्प निर्माण झाला असेल, तर सत्संगात गेल्यामुळे तो नाहीसा व्हायला साहाय्य होते. आजही समाजामध्ये साधना आणि अध्यात्म यांविषयी चुकीच्या धारणा पहायला मिळतात. उदाहरणार्थ, साधना ही म्हातारपणी करायची गोष्ट आहे किंवा अध्यात्म म्हणजे मागासलेपणा आणि विज्ञान म्हणजे पुढारलेपण ! सत्संगामुळे अशा चुकीच्या धारणा गळून पडतात. साधनामार्गामध्ये प्रयत्नांना दिशा मिळून त्यांना गतीही येते.
सत्संगाचे लाभ काय आहेत ?, हे आपण पाहिले. सत्संगाचे असे कितीतरी लाभ सांगता येतील. आता ज्यांनी हे लाभ प्रत्यक्ष अनुभवले आहेत त्यांच्यापैकी काहींचे अनुभव आपण पाहुया. कोरोना काळात आपले ‘ऑनलाईन’ सत्संग सुरू झाले. त्यात भारतातील विविध भागांतून जिज्ञासू जोडले गेले. सत्संग ऐकल्यानंतर त्यांनी जे अनुभवले ते अनेकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका जिज्ञासूने दिलेल्या अभिप्रायात सांगितले, ‘‘सत्संगात मिळालेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण का करावे ?, हे लोकांना कळले, तरच नामस्मरण करतील. ‘ईश्वर भक्तांचे नेहमीच रक्षण करतो’, हे जेव्हा लोकांना समजेल त्या वेळी ते अत्यंत सद्भावनेने नामस्मरण करतील. या दृष्टीने सत्संगातील माहिती सर्वांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आणि भविष्यकाळाची जाणीव करून देणारी आहे.’’
२. फरीदाबाद हरियाणा येथील अन्य एका जिज्ञासूने सांगितले, ‘‘सत्संग ऐकून पुष्कळ चांगले वाटले मन शांत होते. असे वाटत होते की, भगवंत आमच्या समवेत आहे.’’
सत्संगाचे असे कितीतरी लाभ अनेक जण अनुभवत आहेत सत्संगाचे महत्त्व अनुभवण्यासाठी आपणही सत्संगात येण्यापूर्वीची आपली मनस्थिती आणि सत्संगानंतरची मनस्थिती याचा अभ्यास करू शकता. गुरुकृपेने चालू असलेल्या या सत्संगाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेण्यासाठी आपणही या सत्संगामध्ये मनमोकळेपणाने सहभागी होऊया.