सत्संग ७ : कृतज्ञता

मागील सत्‍संगात आपण देवाला प्रार्थना करण्‍याचे महत्त्व आणि लाभ समजून घेतले होते. प्रार्थना करण्‍याचे महत्त्व लक्षात घेऊन आपण आध्‍यात्मिक स्‍तरावरील काही प्रार्थनांची उदाहरणेसुद्धा पाहिली होती आणि प्रार्थना अधिकाधिक होण्‍यासाठी काही प्रयत्न करायचे ठरवले होते, उदा. प्रार्थनेची आठवण होण्‍यासाठी भ्रमणभाषवर गजर लावणे, प्रार्थनेचा कागद दर्शनी भागात भिंतीवर चिकटवणे इत्‍यादी.

प्रार्थना केल्यामुळे आलेली अनुभूती

प्रार्थनेच्‍या संदर्भात एका साधिकेला आलेली ही अनुभूती आहे. तिचा तीन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्‍यामध्‍ये तिचा डावा हात निकामी झाल्‍यामुळे ती अपंग झाली होती. तिची निवृत्तीवेतनाची कागदपत्रे सिद्ध होत नव्‍हती. त्‍याच कालावधीत तिला भावसत्‍संगातून प्रार्थना कशी करायची ?, तसेच कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचे महत्त्व शिकायला मिळाले. एकदा निवृत्तीवेतनाची कागदपत्रे सिद्ध करण्‍यासाठी कार्यालयात जात असतांना तिला प्रार्थना करण्‍याची आठवण झाली. प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून कार्यालयात गेल्‍यानंतर तिचे २ दिवसांत काम पूर्ण झाले, त्‍यामुळे गुरुदेवांप्रती तिला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली आणि तिने त्‍वरित कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

आजच्‍या सत्‍संगामध्‍ये कृतज्ञता म्‍हणजे काय ? आणि भावजागृतीच्‍या प्रयत्नांमध्‍ये कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचे महत्त्व, हे जाणून घेणार आहोत.

आता आपण सत्‍संगाच्‍या मुख्‍य विषयाकडे वळूया. याआधीच्‍या सत्‍संगात आपण प्रार्थना म्‍हणजे काय ? आपण दैनंदिन कृती करत असतांना आध्‍यात्‍मिक स्‍तरावर कोणत्‍या प्रार्थना करू शकतो ? याविषयीची सूत्रे पाहिली होती. आज आपण प्रार्थनेलाच जोडून असणारा ‘कृतज्ञता’ हा विषय पहाणार आहोत. कृतज्ञतेचा सोपा अर्थ काय ?, तर आभार मानणे ! व्‍यवहारात आपल्‍याला कुणी काही साहाय्‍य केले, तर आपण त्‍याचे आभार मानतो, तसेच अध्‍यात्‍मातही ईश्‍वराच्‍या आपल्‍यावर असणार्‍या कृपेविषयी आभार मानणे म्‍हणजे कृतज्ञता व्‍यक्‍त करणे ! सर्वसाधारणपणे एखाद्या संकटातून आपण बाहेर पडलो किंवा मोठ्या संकटातून वाचलो, तर ‘ईश्‍वराची कृपा झाली’, असे म्‍हणतो; पण प्रत्‍यक्षात् पहायला गेले, तर केवळ संकटसमयीच नाही, तर अगदी प्रत्‍येक क्षणी परमदयाळू ईश्‍वर प्राणीमात्रांवर कृपा करत असतो. केवळ ती पहाण्‍याची दृष्‍टी आपली कमी पडते. ईश्‍वर कधीही कोणाचे अहित करत नाही. जरी आपल्‍यावर काही संकटे आली किंवा दुःख वाट्याला आले, तरीही ती आपल्‍याच पूर्वजन्‍मीच्‍या कर्मांची फळे असतात. देव ती आपल्‍याकडून भोगून घेऊन आपले प्रारब्‍ध कमी करतो आणि आपण साधना करत असू, तर आपले प्रारब्‍धाचे भोगही सुसह्य करतो.

 

कृतज्ञता म्‍हणजे काय ?

सृष्‍टीचा निर्माणकर्ता ईश्‍वर आहे. आपण या सृष्‍टीचा एक घटक आहोत. ईश्‍वराविषयी किंवा त्‍याच्‍या कोणत्‍याही स्‍वरूपाविषयी जाणीव असणे आणि या जाणिवेचेही सर्व श्रेय ईश्‍वराला अर्पण करणे, याला कृतज्ञता म्‍हणतात, उदा. प्रतिदिन आपल्‍याला सूर्याकडून पुष्‍कळ प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते, तेही विनामूल्‍य ! युगानुयुगे एकही दिवस विश्रांती न घेता, एकही दिवस पुढे-मागे न करता सूर्यदेव आपल्‍याला प्रकाश देतो. निसर्गचक्रानुसार पाऊस पडून आपल्‍याला पाणी उपलब्‍ध होते. आपण जे काही अन्‍न खातो, ते पचून त्‍यातून शक्‍ती मिळते, झोपेतून आपल्‍याला सकाळी जाग येते, हे सगळे कोण करतो ? देवच कर्ता करविता आहे. आपला श्‍वास चालू असणे, आपल्‍या देहातील चैतन्‍य कार्यरत असणे, देहाकडून चालणे, बोलणे, बुद्धीने विचार करणे, डोळ्‍यांची उघड झाप होणे, हे सर्व आपण काहीच न करता अहोरात्र चालू असते. ही देवाची आपल्‍यावर असलेली कृपा नाही, तर दुसरे काय आहे ? या सगळ्‍याची जाणीव ठेवून आपण ईश्‍ववराप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करायला हवी.

 

भावजागृतीच्‍या दृष्‍टीने कृतज्ञतेचे महत्त्व

कृतज्ञतेचे भावजागृतीच्‍या दृष्‍टीनेही पुष्‍कळ महत्त्व आहे. आपण बहुतांश सगळे जण भक्‍तीमार्गी आहोत. भक्‍तीमार्गामध्‍ये देवाप्रतीच्‍या भावाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. ‘भाव तेथे देव’, असे म्‍हटले आहे. असे असले, तरी प्रत्‍येक क्षणी भावावस्‍थेत रहाणे किंवा भावजागृती होणे आताच्‍या काळात कठीण आहे. कारण आपल्‍या प्रत्‍येकाकडे कमी-अधिक प्रमाणात स्‍वभावदोष आणि अहं यांचे गाठोडे आहे. ते जोपर्यंत आहे, तोपर्यंत ईश्‍वराची कृपा किंवा देवाचे अस्‍तित्त्व सातत्‍याने अनुभवता येत नाही. अशा वेळी काय करायचे ?, तर यावर सोपा उपाय आहे, तो म्‍हणजे कृतज्ञताभावात रहाणे ! कृतज्ञताभाव असला की, आपली दृष्‍टीच भावमय आणि सकारात्‍मक होते.

 

कृतज्ञताभाव कसा निर्माण करावा ?

आता महत्त्वाचे सूत्र आहे, ते म्‍हणजे कृतज्ञताभाव निर्माण कसा करायचा ? किंवा कृतज्ञताभाव वाढवायचा कसा ? त्‍यासाठी सोपा प्रयत्न आपल्‍याला करायचा आहे, तो म्‍हणजे प्रत्‍येक कृती झाल्‍यानंतर ती देवाच्‍या चरणी अर्पण करून कृतज्ञता व्‍यक्‍त करायची ! प्रत्‍येक चांगल्‍या गोष्‍टीचे श्रेय देवाला अर्पण करून कृतज्ञता व्‍यक्‍त करायची ! एखादी गोष्‍ट चांगली झाली आणि कुणी आपले कौतुक केले, तर आपल्‍याला काय वाटते ? आपली विचारप्रक्रिया काय होते ? समजा आपण केलेला स्‍वयंपाक अतिशय चांगला झाला आणि कुटुंबियांनी त्‍याचे पुष्‍कळ कौतुक केले, तर आपल्‍याला काय वाटते ? कुणी आपले कौतुक केले, तर आपले मन सुखावते, आपल्‍याला चांगले वाटते आणि ‘माझ्‍यामुळे ते चांगले झाले’, असे वाटते. बरोबर ना ? इथे आपल्‍याला विचारांची दिशा कशी ठेवायची आहे, तर ‘देवाने माझ्‍याकडून ती कृती करवून घेतली’ ! चांगला स्‍वयंपाक करण्‍यासाठी देवाने आवश्‍यक ते सगळे साहित्‍य उपलब्‍ध करून दिले, गॅस दिला, सगळे घटक योग्‍य त्‍या प्रमाणात घालून घेतले, माझ्‍या मनाची स्‍थिती चांगली ठेवून मला स्‍वयंपाक करण्‍यासाठी शक्‍ती दिली, त्‍यामुळे स्‍वयंपाक चांगला होऊ शकला ! अशी विचारप्रक्रिया झाली की, ‘स्‍वयंपाक चांगला होऊ शकणे’, हीही देवाची कृपाच आहे, हे लक्षात येते आणि देवाप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त होते. जिथे झाडाचे एक पानही देवाच्‍या इच्‍छेविना हलू शकत नाही, तिथे ‘आपल्‍यामुळे काही होते’, असे मानणे, हा वेडेपणा नाही का ?

 

कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचे महत्त्व

कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचे महत्त्व काय आहे ?, तर कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याने आपला अहंभाव कमी होतो; कारण कृतज्ञतेमध्‍ये जीवनात घडणार्‍या प्रत्‍येक कृतीचे संपूर्ण श्रेय ईश्‍वर किंवा गुरु यांना दिले जाते. ‘सर्व काही देवच करवून घेत आहे. प्रत्‍येक चांगला किंवा वाईट प्रसंग मला काही तरी शिकवण्‍यासाठी आणि माझी साधनेत प्रगती करवून घेण्‍यासाठी घडला आहे’, असा भाव निर्माण होतो. कृतज्ञतेमध्‍ये कर्माचे फळ ईश्‍वराला अर्पण करतात. कर्मफलत्‍याग झाल्‍यामुळे आपल्‍याकडून होणारे कर्म हे अकर्म कर्म होते. म्‍हणजे कर्म देवाला अर्पण केल्‍यामुळे त्‍यातून पाप-पुण्‍य किंवा देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाहीत.

 

कृतज्ञताभावात राहिल्‍याने होणारे लाभ

सतत कृतज्ञताभावात राहिल्‍यामुळे आध्‍यात्‍मिक स्‍तरावरही पुष्‍कळ लाभ होतो. आपली देवावरची श्रद्धा वाढते. मनाविरुद्ध घडणार्‍या प्रसंगांमध्‍ये मनाची स्‍थिरता वाढते. साधनेच्‍या प्रयत्नांमध्‍ये सातत्‍य येते आणि चिकाटी वाढून प्रयत्नांना गती मिळते. देव देत असलेल्‍या प्रत्‍येक क्षणातून आनंद घेता येतो.

 

कृतज्ञतेची काही उदाहरणे

कृतज्ञतेमधील आनंद सातत्‍याने घेता येण्‍यासाठी सुरुवातीच्‍या टप्‍प्‍याला देवाच्‍या कृपेची आणि त्‍याच्‍या अस्‍तित्त्वाची जाणीव रहाण्‍यासाठी प्रयत्नपूर्वक कृतज्ञता व्‍यक्‍त करावी. म्‍हणजे कसं करू शकतो; तर सकाळी उठल्‍यानंतर ‘देवा, तुझ्‍या कृपेने जाग आली आणि साधनेसाठी नवीन दिवस मिळाला, त्‍यासाठी तुझ्‍या चरणी कृतज्ञ आहे’, जेवण, न्‍याहारी करून झाल्‍यानंतर ‘देवा, तुझ्‍या कृपेने आज हे अन्‍न मिळाले, त्‍यासाठी तुझ्‍या चरणी कृतज्ञ आहे’, अशी कृतज्ञता व्‍यक्‍त करू शकतो. स्‍वयंपाक झाल्‍यानंतर अन्‍नपूर्णामातेच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करू शकतो की, ‘हे अन्‍नपूर्णामाते, तुझ्‍या कृपेमुळे आज स्‍वयंपाक होऊ शकला’, त्‍यासाठी तुझ्‍या चरणी कृतज्ञ आहे. ‘देवा, तू नामजप करण्‍याची आठवण करून दिलीस आणि नामजप करवून घेतलास; म्‍हणून तुझ्‍या चरणी कृतज्ञ आहे’, आपली मनाची स्‍थिती चांगली आणि आनंदी असेल, तर ‘देवा, तुझ्‍या कृपेमुळे सर्व सुरळीत चालू आहे, मन आनंदी आहे, त्‍यासाठी तुझ्‍या चरणी कृतज्ञ आहे’, अशी कृतज्ञता व्‍यक्‍त करू शकतो. साधना कळल्‍याविषयी कृतज्ञ राहू शकतो. मनुष्‍यजन्‍माची खरी सार्थकता मोक्षप्राप्‍ती करण्‍यामध्‍ये आहे. जगामध्‍ये ७०० कोटी लोक आहेत. त्‍यांपैकी अनेक जण या भौतिक जगालाच अंतिम सत्‍य मानून जगत आहेत; पण एवढ्या सगळ्‍या लोकांमधून देवाने मला साधनेच्‍या वाटेवर आणले, साधनेची आवड निर्माण केली, हे लक्षात घेतले, तर आपण भाग्‍यवान आहोत असे वाटते कि नाही ? या विचारांनी मनात सतत कृतज्ञताभाव निर्माण होऊ शकतो.

 

कृतज्ञताभावाचे परिणाम

कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी देवासमोर जाऊन उभे रहाण्‍याची आवश्‍यकता नाही. आपण कृती झाल्‍यानंतर आहे त्‍या ठिकाणावरूनच कृतज्ञता व्‍यक्‍त करू शकतो. आंघोळीला मिळणारे पाणी, आपण घालत असलेले कपडे, चप्‍पल, आपल्‍याला मिळालेला ‘मोबाईल’, चांगले कुटुंबीय, मदत करणारे मित्र, आपले हात-पाय, अवयव या सगळ्‍यांप्रती आपण कृतज्ञता व्‍यक्‍त करू शकतो. सुरुवातीच्‍या टप्‍प्‍याला असेही आपल्‍याला वाटू शकेल की, मी कृतज्ञता शब्‍दांतून व्‍यक्‍त करत आहे; पण ती यांत्रिक पद्धतीने होत आहे. मनात तसा भाव उमटत नाही; पण त्‍याची काळजी करायला नको. आपल्‍याला सुरुवातीला कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याची मनाला सवय लावायची आहे. एकदा का कृतज्ञतेचा संस्‍कार मनावर निर्माण झाला की, ५-६ आठवड्यांतच कृतज्ञताभाव निर्माण व्‍हायला सुरुवात होते. पुढे पुढे तो भाव वाढत जातो. त्‍यामुळे साधनेत प्रगती होऊ लागते. कृतज्ञताभाव निर्माण झाला की, कृती करण्‍यापूर्वी, कृती करतांना आणि कृती झाल्‍यावर ‘ईश्‍वरेच्‍छेनेच सर्व होते, देवच सर्व करतो’, याची जाणीव सतत होते. एखादी गोष्‍ट मनासारखी झाली नाही, मिळाली नाही, संकटे आली, तरी त्‍यातही देवाची कृपाच अनुभवता येते आणि आनंदी रहाता येऊ शकते.

ध्‍येय : दिवसभरात किमान १५ वेळा कृतज्ञता व्‍यक्‍त करणे.

आपण या आठवड्यात कृतीच्‍या स्‍तरावर काय प्रयत्न करायचे आहेत, तर सर्वप्रथम आपल्‍याला ज्‍या गोष्‍टींविषयी कृतज्ञता वाटते किंवा कुठे-कुठे आपण कृतज्ञता व्‍यक्‍त करू शकतो, ते वहीमध्‍ये लिहून काढायचे आहे आणि दिवसभरात किमान १५ वेळा कृतज्ञता व्‍यक्‍त करायची आहे. अगदी काहीच सुचले नाही, तर ‘देवा, तुझ्‍याप्रती कृतज्ञ आहे’, एवढे तरी म्‍हणू शकतो. आपण जेवढे अधिकाधिक कृतज्ञताभावात रहाण्‍याचा प्रयत्न करू, तेवढे आपले मन अधिक शांत, आनंदी, सकारात्‍मक झाल्‍याचे आपल्‍याला आढळून येईल. मग या आठवड्यात आपण तसे प्रयत्न करणार ना ?

Leave a Comment