सत्संग ६ : प्रार्थना

मागील सत्‍संगात आपण ‘नामजपामध्‍ये संख्‍यात्‍मक आणि गुणात्‍मक वाढ होण्‍यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी जाणून घेतले होते. त्‍यामध्‍ये नाम श्‍वासाला जोडणे, मनातील अनावश्‍यक विचारांवर मात करून जपात एकाग्रता साधता येण्‍यासाठी जलद गतीने जप करणे, दशापराधविरहित नामजप करण्‍याचे महत्त्व ही सूत्रे समजून घेतली होती. त्‍याचबरोबर मनुष्‍य अष्‍टावधानी असल्‍यामुळे नामाचा संस्‍कार दृढ होण्‍यासाठी दैनंदिन कृती करत असतांना येता-जाता नामजप करणे कसे शक्‍य आहे ?, हे आणखी एक महत्त्वाचे सूत्र आपण शिकलो.

आज आपण प्रार्थना करण्‍याचे महत्त्व आणि लाभ समजून घेणार आहोत.

आपण अनेकदा देवाजवळ प्रार्थना करत असतो. सकाळी उठल्‍यानंतर, देवपूजा केल्‍यानंतर, घरातून बाहेर पडतांना, कधी देवळात देवदर्शनासाठी गेल्‍यावर किंवा कठीण प्रसंगाला सामोरे जायची वेळ आली की, देवाला मनोमन आर्ततेने प्रार्थना करतो. असे होते ना ?, तर आज आपण प्रार्थना म्‍हणजे काय ? आपण प्रार्थना का करतो ? त्‍याचा आपल्‍याला कसा लाभ होतो ? हे आपण ‘प्रार्थना करणे या विषयाच्‍या संदर्भात जाणून घेणार आहोत. प्रार्थनेच्‍या माध्‍यमातून देवाकडे काय मागणे मागायचे ?, देवाकडे प्रार्थनेच्‍या माध्‍यमातून व्‍यावहारिक गोष्‍टी मागितल्‍या, तर ते योग्‍य आहे का ?, अशी काही सूत्रे आपण समजून घेणार आहोत.

देवाला प्रार्थना करण्‍याचा महत्त्वाचा लाभ काय आहे ?, तर प्रार्थनेमुळे मनाला शांती मिळते. दिवसभरात आपली कुणावर तरी चिडचिड होते, आपल्‍या मनासारखे काही होत नाही, कामे खोळंबतात, उशीर होतो, धावपळ होते, असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. या सगळ्‍यामुळे आपण दैनंदिन धकाधकीच्‍या जीवनात आपली मनःशांती हरवून बसतो. ती मनःशांती प्रार्थनेमुळे मिळते. प्रार्थनेमुळे सकारात्‍मकता निर्माण होते. अशक्‍य गोष्‍टी शक्‍य वाटतात; कारण प्रार्थनेमुळे ईश्‍वराचा आशीर्वाद लाभतो. ‘प्रार्थनेचे महत्त्व केवळ अध्‍यात्‍मात आहे’, असे नाही, तर वैज्ञानिकांनीही ते मान्‍य केले.

आपल्‍यापैकी कुणी दैनंदिन प्रार्थना करतात का ? किंवा देवळात गेल्‍यावर आपण देवाला कशी प्रार्थना करतो ? आपल्‍यापैकी काही जण सांगू शकता.

 

प्रार्थना म्‍हणजे काय

प्रार्थना म्‍हणजे एखाद्या गोष्‍टीची प्रकर्षाने केलेली याचना ! प्रार्थना म्‍हणजे मागणे ! देवापुढे विनम्र होऊन इच्‍छित गोष्‍ट तळमळीने मागणे याला ‘प्रार्थना’ म्‍हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्‍तीभाव या गोष्‍टी अंतर्भूत आहेत. आपण कोणतेही कार्य देवतेला प्रार्थना करून केले, तर त्‍या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो, तसेच प्रार्थनेमुळे आत्‍मशक्‍ती आणि आत्‍मविश्‍वास वाढतो. त्‍यामुळे कार्य चांगले आणि यशस्‍वी होते.

 

प्रार्थनेचे वैशिष्ट्य – स्‍थुलातून सूक्ष्माकडे जाणे

बहुतांशी लोक आयुष्‍यभर पूजाअर्चा, धार्मिक विधी इत्‍यादी कर्मकांडानुसार उपासना करत रहातात. कर्मकांडानुसार उपासना ही स्‍थुलातील उपासना आहे. ईश्‍वराचे स्‍वरूप सूक्ष्म आहे. ईश्‍वराची प्राप्‍ती होण्‍यासाठी उपासनाही ‘स्‍थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारी असायला हवी. आपण या आधीच्‍या सत्‍संगांमध्‍ये ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ हा आध्‍यात्‍मिक सिद्धांत पाहिला आहे. ‘प्रार्थना’, ही देवाला मनाच्‍या स्‍तरावर करायची असते; म्‍हणून ती ‘स्‍थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारी एक सोपी उपासनापद्धत आहे. साधना करतांना ईश्‍वराच्‍या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्‍यामुळे ईश्‍वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते.

 

प्रार्थनेचे परिणाम

आपण आर्तभावाने, शरणागतीने देवाला प्रार्थना करतो. तेव्‍हा आपली काळजी किंवा चिंता न्‍यून होते. प्रार्थनेने चिंता घटून चिंतन वाढते. मन कार्यरत आहे, तोपर्यंत मनात विचार येतच रहातात. आपण शरिराने स्‍वस्‍थ असलो, तरी मनात विचारांची शृंखला चालूच असते. या विचारांमध्‍ये आपली बरीच शक्‍ती व्‍यय होते. विचारांमुळे मनाच्‍या शक्‍तीचा होणारा अपव्‍यय टाळण्‍यासाठी प्रार्थना उपयुक्‍त आहे. प्रार्थनेमुळे अशक्‍यप्राय गोष्‍टीही शक्‍य होऊ शकतात. द्रौपदीच्‍या वस्‍त्रहरणाचा प्रसंग आपल्‍या सगळ्‍यांना ठाऊक आहे. जोपर्यंत ‘द्रौपदीला ती स्‍वतः किंवा पांडव तिचे शीलरक्षण करतील’, असे वाटत होते, तेव्‍हा श्रीकृष्‍ण साहाय्‍याला आला नाही; पण जेव्‍हा द्रौपदीने भगवान श्रीकृष्‍णाला आर्तभावाने साद घातली, तेव्‍हा श्रीकृष्‍ण तिच्‍या साहाय्‍याला आला. हे प्रार्थनेचे महत्त्व आहे.

 

प्रार्थना’ करण्‍याचे लाभ

प्रार्थनेमुळे आपला अहंकार लवकर न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होते. अहंमुळे मनुष्‍याच्‍या जीवनात दुःख निर्माण होत असते. देव सर्वशक्‍तीमान, सर्वज्ञ, सर्वव्‍यापी आहे. देवासाठी अशक्‍य काहीच नाही. मनुष्‍य प्रार्थनेच्‍या माध्‍यमातून सर्वशक्‍तीमान ईश्‍वराला शरण जातो. प्रार्थनेद्वारे तो देवाकडे याचना करत असतो; त्‍यामुळे त्‍याचा कर्तेपणा गळून पडायला साहाय्‍य होते.

 

देवाकडे अशाश्‍वत गोष्‍टी का मागू नयेत ?

व्‍यावहारिक इच्‍छा-अपेक्षा यांच्‍या पूर्तीसाठीची प्रार्थना म्‍हणजे सकाम साधना ! सकाम साधनेचा व्‍यक्‍तीच्‍या आध्‍यात्‍मिक उन्‍नतीच्‍या दृष्‍टीने खर्‍या अर्थाने लाभ होत नाही. व्‍यावहारिक घटना या बहुधा प्रारब्‍धवश घडत असतात. गुरु किंवा देव सहसा प्रारब्‍धात ढवळाढवळ करत नाहीत. याशिवाय एखाद्याच्‍या नशिबात एखादी गोष्‍ट मिळायची असेल, तर प्रार्थना केली नाही, तरी ती त्‍याला मिळते आणि एखाद्याच्‍या नशिबात एखादी गोष्‍ट मिळायची नसेल, तर प्रार्थना करूनही त्‍याला ती मिळत नाही. त्‍यामुळे भगवंताकडे प्रार्थना करतांना मायेतील काही मागणे म्‍हणजे शाश्‍वत भगवंताकडे अशाश्‍वत गोष्‍टी मागण्‍यासारखे आहे.

 

प्रार्थनेत काय मागावे ?

प्रार्थना केल्‍यामुळे होणारे परिणाम किंवा लाभ आपण आता समजून घेतले; पण प्रार्थनेच्‍या साधनेच्‍या दृष्‍टीने आपल्‍याला लाभ कधी होईल ?, तर आपली प्रार्थना जेव्‍हा निष्‍काम असेल, आपली प्रार्थना जेव्‍हा आध्‍यात्‍मिक स्‍तरावर असेल, तेव्‍हा ! व्‍यावहारिक यश मिळण्‍यासाठी, इच्‍छापूर्तीसाठी किंवा आपल्‍या कुठल्‍या व्‍यावहारिक अडचणी सुटण्‍यासाठी प्रार्थना करण्‍यापेक्षा साधनेला पूरक अशी देवाला प्रार्थना करायला हवी. याचे कारण आपल्‍या व्‍यावहारिक जीवनात येणारे बहुतांश प्रसंग हे प्रारब्‍धवश निर्माण होत असतात आणि प्रारब्‍ध हे आपल्‍याला भोगूनच संपवायचे असते. आपण साधना केली, तर प्रारब्‍ध सहन करण्‍याचे बळ मिळते. संतांनीही देवाकडे ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्‍हावा !’, असे शाश्‍वत आणि चिरंतन मागणे मागितले आहे.

 

आध्‍यात्‍मिक स्‍तरावरील प्रार्थनेची काही उदाहरणे

आध्‍यात्‍मिक स्‍तरावरील किंवा साधनेला पूरक प्रार्थना म्‍हणजे काय, त्‍या कशा करू शकतो, असा प्रश्‍न आपल्‍या मनात असेल. तर त्‍याविषयी आता आपण समजून घेऊया. प्रार्थना केवळ देवळात गेल्‍यावर किंवा देवासमोर उभे राहिल्‍यावरच करायला हवी, असे नाही. आपण दिवसभरात अनेक कृती करत असतो. त्‍या कृती करण्‍यापूर्वी आपण मनोमन देवाचे स्‍मरण करून प्रार्थना करू शकतो.

‘हे भगवंता माझ्‍या साधनेतील अडथळे दूर होऊ दे. मला नामजप करण्‍याची आठवण होऊ दे. हे भगवंता, तूच माझ्‍याकडून एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करवून घे. हे ईश्‍वरा, माझी भगवंतावरची श्रद्धा वाढू दे. दिवसभरात घडणार्‍या प्रत्‍येक प्रसंगात मला शांत, स्‍थिर आणि आनंदी रहाता येऊ दे. माझी प्रत्‍येक कृती साधना म्‍हणून होऊ दे’, अशी प्रार्थना करू शकतो.

‘हे नारायणा, मला प्रत्‍येक परिस्‍थिती स्‍वीकारता येऊ दे. मला तुझे अस्‍तित्त्व अनुभवता येऊ दे. माझी तुझ्‍याप्रती अनन्‍य भक्‍ती निर्माण होऊ दे. एक क्षणही मला तुझा विसर नको होऊ देऊ. मी कुठे चुकत असेल, तर त्‍याची मला जाणीव होऊ दे आणि माझ्‍याकडून योग्‍य ती कृती केली जाऊ दे.’

‘हे भगवंता, अनिष्‍ट आणि नकारात्‍मक शक्‍तींपासून माझे रक्षण होऊ दे. तुझे संरक्षककवच माझ्‍याभोवती असू दे. हे भगवंता, मला नामस्‍मरण करण्‍याची आठवण होऊ दे’, अशा प्रार्थना आपण करू शकतो.

सकाळी उठल्‍यानंतर देवाला प्रार्थना करू शकतो, ‘हे भगवंता, तुझ्‍याच कृपेमुळे मला हा दिवस पहायला मिळाला आहे. तूच दिवसभरात माझ्‍याकडून साधनेसाठी प्रयत्न करवून घे.’

जेवण करण्‍यापूर्वी प्रार्थना करू शकतो, ‘हे अन्‍नपूर्णा माते, तुझ्‍याच कृपेमुळे मिळालेले अन्‍न मला ‘प्रसाद’ या भावाने ग्रहण करता येऊ दे. यातून मला साधना करण्‍यासाठी शक्‍ती आणि चैतन्‍य मिळू दे’.

आंघोळ करण्‍यापूर्वी प्रार्थना करावी, ‘हे जलदेवते, तुझ्‍या चैतन्‍याने माझ्‍या भोवतीचे रज-तमाचे आवरण नष्‍ट होऊ दे. मला चैतन्‍य मिळू दे.’

रात्री झोपतांना प्रार्थना करू शकतो, ‘हे निद्रादेवी, तुझे संरक्षक-कवच माझ्‍याभोवती अखंड राहू दे. झोपेतही माझा नामजप चालू राहू दे’, अशा स्‍वरूपाच्‍या प्रार्थना आपल्‍याला जमतील, सुचतील तशा करू शकतो.

 

प्रार्थना करण्‍याची आठवण होण्‍यासाठी करायचे प्रयत्न आणि ध्‍येय

या आठवड्यात आपण कृतीला जोडून दिवसभरात किमान २५ वेळा प्रार्थना करण्‍याचा प्रयत्न करूया. प्रार्थना करण्‍याची आठवण होण्‍यासाठी आपण आपल्‍या ‘मोबाईल’वर गजर म्‍हणजे ‘अलार्म’ लावू शकतो. काही प्रार्थना लिहून काढून त्‍या घरामध्‍ये आपण जेथे अधिक वेळ असतो, तेथे भिंतीवर चिकटवून येता-जाता वाचू शकतो किंवा वहीत लिहून त्‍या वाचू शकतो. प्रार्थनेमध्‍ये शब्‍दापेक्षाही भाव महत्त्वाचा आहे. अनेक जणांनी प्रार्थना केल्‍यानंतर बुद्धीपलीकडच्‍या अनुभूती घेतल्‍या आहेत. त्‍या सर्व सांगणे आता शक्‍य नाही. आपण स्‍वतःच प्रार्थना करून अनुभव घेऊया.

अजून एक महत्त्वाचे सूत्र म्‍हणजे, आपली प्रार्थना देवापर्यंत किंवा श्रीगुरूंपर्यंत पोचते आहे कि नाही ?, अशी शंका मनात आणायला नको. जेथे मुंगीच्‍या पायातील घुंगराचा आवाजही देवापर्यंत पोचतो, तेथे आपण केलेली प्रार्थना देवापर्यंत का नाही पोचणार ? ‘आपली प्रत्‍येक प्रार्थना देवाकडे रुजु होत आहे’, असा भाव ठेवून आपण या आठवड्यापासून अधिकाधिक प्रार्थना करण्‍याचा प्रयत्न करूया.

3 thoughts on “सत्संग ६ : प्रार्थना”

  1. मला नामजप कसा करायचा ते समजले. सर्व काही गुरु आहेत. मला त्यांनी भक्तिमय वातावरणात आणले आणि नामजपाचे महत्व समजवले मला … कृतज्ञता

    Reply

Leave a Comment