मागील सत्संगात आपण नामजप करण्याच्या विविध पद्धती जाणून घेतल्या होत्या. नामजपामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने प्राथमिक टप्प्यात आपण कसे प्रयत्न करू शकतो ? याविषयी समजून घेतले होते, उदा. लिखित नामजप करणे, वैखरीतून जप करणे, मनातल्या मनात जप करणे, जपमाळेने जप करणे, इत्यादी. आजच्या सत्संगामध्ये आपण नामजपामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होण्यासाठी करायचे प्रयत्न समजून घेणार आहोत.
नामजप एकाग्रतेने आणि चांगल्या प्रकारे होण्यासाठी करायचे प्रयत्न
आपण नामजप करतो. तेव्हा आपले लक्ष बर्याचदा नामजपाच्या संख्येकडे अधिक असते. त्यापेक्षा आपण करत असलेला नामजप खरच देवाच्या चरणांपर्यंत पोचतो आहे का ? याची अनुभूती आपण घ्यायला हवी. याचा अर्थ ‘नामजपाच्या संख्येकडे लक्ष देऊ नये’, असा नाही. खरे तर साधनेच्या प्राथमिक टप्प्यात संख्यात्मक नामजपही तेवढाच महत्त्वाचा आहे; परंतु संख्यात्मक नामजप करता करता आपल्याला मनातून ईश्वराला अनुभवत नामजप करायचा आहे. त्यासाठी काय प्रयत्न करायचे ?, हे आता आपण पाहूया.
प्रार्थना करणे
नामजप किंवा कोणतेही सत्कार्य करतानांचा एक महत्त्वाचा पैलू आहे, देवाला प्रार्थना करणे ! प्रार्थना केल्यामुळे आपल्यात याचकवृत्ती निर्माण होऊन आपला अहंकार कमी व्हायला साहाय्य होते. नामजप करण्याच्या पूर्वी आपण आपल्या उपास्यदेवतेला प्रार्थना करावी. ‘हे भगवंता, मी नामजप करायला आरंभ करत आहे. आपणच माझ्याकडून हा नामजप करवून घ्या. हा नामजप माझ्याकडून चांगल्या प्रकारे होऊ दे, यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये’, अशी मी प्रार्थना करतो / करते. देवाला शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर नामजप होण्यातील विघ्ने दूर होऊन नामजप चांगला होण्यासाठी लाभ होतो.
नाम श्वासाला जोडणे
नामजप एकाग्रतेने होण्यासाठी तो आपल्या श्वासाच्या गतीला जोडायचा प्रयत्न करू शकतो. आपण श्वासामुळे जिवंत असतो; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आरंभी शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष एकाग्र करावे आणि नंतर नामजप श्वासाला जोडून करण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, समजा आपण ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा नामजप करत आहोत, तर श्वास घेतांना ‘श्री गुरुदेव’ हे शब्द म्हणू शकतो आणि श्वास सोडतांना ‘दत्त’ असे म्हणू शकतो. आपण आपल्या श्वासाच्या गतीनुसार नामजप बसवण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्यांचा नामजप आपोआप होत आहे, त्यांनी तो श्वासाला जोडण्याची आवश्यकता नाही. आपल्या शरिरात चालू असलेला श्वासच अखंड चालू असल्याचे जाणवत असल्याने आपण नामजप अखंड करण्यासाठी तो श्वासोच्छ्वासाच्या क्रियेशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतो. इथे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की, श्वासाच्या गतीला आपल्याला नामजप जोडायचा आहे. नामजपाप्रमाणे श्वास संथ-जलद घ्यायचा नाही.
जप गतीने करणे
नामजप करतांना मनामध्ये अनावश्यक विचार येत असतील, तर जप जलद गतीनेही करू शकतो. जप जलद गतीने केला, तर जपावर लक्ष केंद्रित होण्यास साहाय्य होते. पुढे मन जपावर केंद्रित व्हायला लागले की, टप्प्याटप्प्याने गती कमी करावी. शेवटी श्वासोच्छ्वासाच्या गतीशी जपाची गती जोडावी. त्याहूनही गती कमी झाली, तर चांगलेच आहे. जपाला लय आली की, तो अजून चांगला होऊ शकतो.
दशापराधविरहित नामजप
नामजप करत असतांना आपले वागणे आणि बोलणे याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. आपण एकीकडे नामजप करत आहोत आणि दुसरीकडे लोकांशी उद्धटपणे वागत आहोत, इतरांशी अपमानास्पद बोलत आहोत, तर नामजपाचा लाभ होईल का ? म्हणूनच ‘नामजप दशापराधविरहित असावा’, असे म्हटले आहे, म्हणजे नामजप करतांना आपले वर्तन हे सद्वर्तन असणेही आवश्यक आहे. साधुनिंदा करणे, गुरुजनांची अवज्ञा करणे, वेद-शास्त्र-पुराणे यांची निंदा करणे, नामाच्या बळावर पापाचरण करणे असे काही दशापराधांमधील अपराध आहेत.
नामधारकाने अपराधांची ही कुपथ्ये टाळायला हवीत; नाहीतर त्या अपराधांचे परिमार्जन करण्यात सर्व साधना फुकट जाते आणि आध्यात्मिक उन्नती होत नाही. उदा. एक शिवी दिली तर तीस माळा, लाच खाल्ली तर पाचशे माळा जप फुकट जातो; म्हणून साधना करतांना केवळ नामसाधना करणे पुरेसे नाही, तर आपल्या अयोग्य सवयी, स्वभावांतील दोष आणि अहंकार घालवण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ते कसे साध्य करायचे, ते आपण पुढच्या पुढच्या सत्संगांमध्ये जाणून घेणार आहोत.
अधिकाधिक नामजप करणे
नामजपाचा संस्कार आपल्या मनावर ठसावा, यासाठी आपण आपल्या दैनंदिन कृतींना जोडून नामजप करण्याची सवय लावू शकतो, उदा. गृहिणी असतील, तर त्या स्वयंपाक करतांना नामजप करू शकतात. नामजप करत स्वयंपाक केला, तर अन्नातही सात्त्विकता उतरून अन्न ग्रहण करणार्यांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. आंघोळ करतांना, वैयक्तिक आवरतांना, मोबाईल किंवा टीव्ही पहातांना नामजप करू शकतो. कोणी नोकरीला बाहेर पडत असेल, तर प्रवास करतांना, भाजी आणायला जातांना आपण नामजप करू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करू शकतो.
आपल्यापैकी काही जणांना असे वाटू शकते की, अन्य कृती करत असतांना नामजप कसा करायचा ?, तर याचे उत्तर सोपे आहे. ते म्हणजे प्रत्यक्ष कृती करून पहाणे. व्यवहारातही आपण कुशलतेने ३ – ४ कामे एकाच वेळी करू शकतो किंवा काही वेळा करतही असतो. समजा आपण रस्त्यावरून चाललो आहोत, तर आपण त्या वेळी आजूबाजूला पहात असतो, कुणी आपल्यासाठी ‘हॉर्न’ वाजवला, तर तो ऐकून बाजूला सरकतो, त्याच वेळी रस्त्यावरील दुकानांकडेही आपले लक्ष असते, आपण कुणाशी तरी बोलत असतो किंवा घरी गेल्यावर काय काय करायचे आहे, हेही मनात ठरवत असतो. जर हे सगळे आपण एका वेळी करू शकतो, तर दैनंदिन कृतींना जोडून नामजप करायला जमू शकते. आरंभी आपल्याला हा नामजप प्रयत्नपूर्वक आणि निग्रहाने करावा लागेल. एकदा नामजपाचा संस्कार झाला की, मग तो सहजतेने आणि अखंड होऊ शकतो.
नामजपामुळे व्यक्तीची उर्जा आणि सकारात्मकता वाढणे
सर्व संतांनी नामाचा महिमा गौरवला आहे. आपल्यापैकी अनेकांनी नामस्मरणामुळे मन शांत आणि स्थिर झाल्याचे अनुभवले असेल. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या भाषेत अमूल्य ज्ञान दिले आहे. नामस्मरणामुळे व्यक्तीला उत्साही का वाटते ?, ते समजून घेऊया. व्यक्तीतील एकूण शक्ती १०० टक्के मानली, तर त्यातील ७० टक्के शक्ती शरीर आणि लिंगदेह यांच्या क्रियांसाठी खर्च होत असते, तर ३० टक्के कुंडलिनी शक्ती असते. ७० टक्क्यांपैकी स्थूल देहाकडून ज्या ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया घडत असतात, जसे की पापण्यांची उघडझाप नैसर्गिक रित्या होत राहते. त्यासाठी २० टक्के शक्ती वापरली जाते, तर मन, चित्त, बुद्धी आणि अहं या लिंगदेहाच्या व्यवहारांसाठी ५० टक्के शक्ती वापरली जाते. आपल्या मनातले विचार हे जेवढे जास्त, तेवढी आपली मनाची ऊर्जा जास्त खर्च होते. थोडक्यात सांगायचे झाले, तर व्यक्तीच्या एकूण १०० टक्के शक्तीपैकी, २० टक्के शक्ती शारीरिक गोष्टींसाठी, ५० टक्के शक्ती मानसिक गोष्टींसाठी व्यय होते, तर ३० टक्के कुंडलिनी शक्ती सुप्त असते. नामस्मरणामुळे व्यक्तीच्या मनातील अनावश्यक, नकारात्मक, निरर्थक विचार उणावतात. त्यामुळे विचारांमध्ये व्यय होणारी मानसिक शक्ती वाचते, तसेच नामजपामुळे कुंडलिनी जागृत होण्याच्या दिशेने प्रवास होत असल्याने सुप्तावस्थेत असणारी शक्तीही जागृत होऊ लागते. त्यामुळे नामस्मरण केल्यामुळे उत्साही, सकारात्मक, स्थिर, शांत वाटणे, अशा प्रकारच्या अनुभूती येतात.
आजच्या सत्संगात आपण नामजप करतांना येणार्या अडचणींवर मात करून नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होण्यासाठी कसे प्रयत्न करू शकतो ?, याविषयी जाणून घेतले. त्यामध्ये नाम श्वासाला जोडणे, तसेच मनातील अनावश्यक विचारांवर मात करून जपात एकाग्रता साधता येण्यासाठी जलद गतीने जप करणे, दशापराधविरहित नामजप करण्याचे महत्त्व ही सूत्रे समजून घेतली. त्याचबरोबर मनुष्य अष्टावधानी असल्यामुळे नामाचा संस्कार दृढ होण्यासाठी दैनंदिन कृती करत असतांना येता-जाता नामजप करणे कसे शक्य आहे, हे आणखी एक महत्त्वाचे सूत्र आपण शिकलो.
मागील तीन सत्संग आपण नामजप चांगला होण्यासाठी काय प्रयत्न करायचे ? नामजपाचे लाभ काय आहेत ? हा विषय जाणून घेतला. हा विषय एवढा विस्तृत घेण्यामागचे कारण काय आहे ?, तर नामजप हा आपल्या साधनेचा महत्त्वाचा पाया आहे. आपला नामजप संख्यात्मकासह गुणात्मकही झाला, तर त्याचा लाभ आपल्याला साधनेत प्रगती करण्यासाठी होणार आहे. या २ – ३ सत्संगामध्ये आपण जे काही शिकलो त्यानुसार पुढच्या आठवड्यात आपण कसे प्रयत्न करणार ? याविषयी १ – २ जणांनी सांगूया. आपण सर्व जण या सत्संगाच्या माध्यमातून शिकत राहूया.
पुढील आठवड्यात आपण अजून एक कृती करू शकतो. ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’, असे संतांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे आपल्याला नामजपाचे जे महत्त्व लक्षात आले किंवा नामजपामुळे काही अनुभूती आली असल्यास आपण इतरांना सांगू शकतो. याचा लाभ आपल्याला कसा होतो ? तर जेव्हा आपण आपल्याला कळलेली नामजपाची महती इतरांना सांगतो, तेव्हा आपल्याच मनावर नामजपाचे महत्त्व अधिक ठसते; म्हणून या आठवड्यामध्ये आपण कमीत कमी २ जणांना नामजपाचे महत्त्व सांगूया.
आजच्या सत्संगात शिकल्याप्रमाणे आपण नामजप करायचा प्रयत्न करूया. आपण विविध प्रसंगी देवाला प्रार्थना करत असतो. ‘प्रार्थनेचे काय महत्त्व आहे ?’, ते आपण पुढील सत्संगामध्ये जाणून घेणार आहोत.
Nice remarkable articles