सत्संग ४ : नामजप करण्याच्या पद्धती

गेल्‍या सत्संगात आपण नामजप केल्‍यामुळे आपल्‍याला शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्‍मिक स्‍तरावर कसे लाभ होतात ? याविषयी जाणून घेतले होते. आजच्‍या सत्‍संगात आपण नामजप करण्‍याच्‍या पद्धती, नामजप चांगला होण्‍यासाठी करायचे प्रयत्न यांविषयी जाणून घेणार आहोत.

मागील सत्संगात आपण नामजपाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेतले. आरंभी झालेल्‍या प्रवचनांमध्‍ये आपण कुलदेवता आणि दत्तगुरु यांचा नामजप का करायचा ?, हे समजून घेतले. आपल्‍यापैकी अनेकांनी हे नामजप चालूही केले असतील. ‘नामजप करतांना आपल्‍यापैकी काही जणांना चांगल्‍या अनुभूतीही आल्‍या असतील, तर काही जणांना काही अडचणी आल्‍या असू शकतात. काही जणांनी नामजपात मन एकाग्र होऊन ते शांत आणि प्रसन्‍न झाले, असे अनुभवले असेल, तर काहींनी नामजप करतांना मन एकाग्र होत नाही, मनातील विचारांमध्‍येच गुरफटून गेल्‍यामुळे नामजप बंद पडतो किंवा नामजप करायचे लक्षात रहात नाही’, असे अनुभवले असेल. आजच्‍या सत्‍संगात आपण नामजप अधिकाधिक चांगला होण्‍याच्‍या दृष्‍टीने नामजप करण्‍याच्‍या विविध पद्धती समजून घेणार आहोत.

 

लिखित नामजप

प्राथमिक टप्‍प्‍याला आपण ‘लिखित नामजप’ करू शकतो. लिखित नामजप म्‍हणजे काय ?, तर आपण जो नामजप करत आहोत, तो वहीत लिहायचा. या पद्धतीमध्‍ये आपण पहिला नामजप उच्‍चारतो, नंतर लिहितो आणि लिहिलेले योग्‍य आहे कि नाही, हे पहाण्‍यासाठी त्‍यावरून दृष्‍टी फिरवतो; म्‍हणजे १ नामजप लिहितांना आपले ३ वेळा स्‍मरण होते. हा नामजप करतांना आपले डोळे, हात, बुद्धी आणि मन नामात गुंतलेले असते. त्‍यामुळे नामजपाच्‍या वेळी आपले मन भरकटण्‍याची शक्‍यता कमी असते. नामजप लिहिलेल्‍या वह्या घरी ठेवल्‍या की, ती वास्‍तू शुद्ध होण्‍यास आणि शुद्ध रहाण्‍यास साहाय्‍य होते. नामाची गोडी लागण्‍यासाठी आरंभी नामजप हाताने लिहिणे, पुढच्‍या टप्‍प्‍याला तो मोठ्याने म्‍हणणे आणि त्‍यानंतर मन नामजपात रमायला लागल्‍यावर नामजप मनातल्‍या मनात करणे अशा पद्धतीने नामजप करता येतो.

 

वैखरी नामजप

लिखित नामजपाच्‍या ऐवजी आपण वैखरी वाणीतूनही नामजप करू शकतो. वैखरीतून नामजप करणे म्‍हणजे मोठ्याने नामजप करणे. असे केले, तर जपावर मन एकाग्र करणे सोपे जाते. त्‍याच्‍यासह प्राणायामाचाही लाभ होतो. वैखरीतून म्‍हणजे मोठ्याने नामजप करण्‍याचा अजून एक लाभ म्‍हणजे नामजपातून ज्‍या ध्‍वनीलहरी निर्माण होतात, त्‍यांच्‍यामुळे वातावरण सात्त्विक व्‍हायला साहाय्‍य होते. मोठ्या आवाजात नामजप केल्‍यामुळे घरातील आपल्‍या कुटुंबियांच्‍या कानावर नामजप जाऊन त्‍यांच्‍या मनातही सात्त्विक भाव निर्माण व्‍हायला साहाय्‍य होते.

वैखरीतून नामजप करण्‍याची मर्यादा म्‍हणजे, हा नामजप मोठ्याने होत असल्‍यामुळे मन निर्विचार अवस्‍थेत जाऊ शकत नाही. नामातून मन निर्विचार अवस्‍थेत जाणे, हे आध्‍यात्‍मिक उन्‍नतीचे लक्षण असते.

वैखरी वाणीसह मध्‍यमा, पश्‍यंती आणि परा या वाणीही आहेत.

 

मध्‍यमा

‘मध्‍यमा’ वाणीतून होणारा नामजप म्‍हणजे आपोआप होणारा जप ! वैखरी आणि पश्‍यंती या नामजपाच्‍या २ वाणींच्‍या मधली ही वाणी असल्‍याने तिला ‘मध्‍यमा’ म्‍हणतात. नामजपाचा मनावर संस्‍कार झाल्‍यानंतर सामान्‍यतः महिन्‍याभरात नामजप मनातल्‍या मनात आपोआप होऊ लागतो. अशा प्रकारची कोणी अनुभूती गेल्‍या महिन्‍याभरात घेतली असेल, तर आपला जप मध्‍यमा वाणीतून होण्‍यास आरंभ झाला आहे, असे समजू शकतो. या वाणी मध्‍ये ‘बाळ जसे मातेला आर्ततेने बोलावते’, ती आर्तता नामजप करणारा अनुभवू शकतो. अशा प्रकारचा जप होणे, हे नामजपातील उन्‍नतीचे लक्षण आहे.

 

पश्‍यंती

द्रष्‍टे संत आणि ऋषिमुनी यांचा जप होतो, तो पश्‍यंती वाणीतून होतो. ‘पश्‍य’ या धातूपासून ‘पश्‍यंती’ हा शब्‍द बनला आहे. पश्‍य म्‍हणजे पहाणे. त्रिकाल पहाणार्‍या द्रष्ट्या ऋषिमुनींचा नामजप होतो, त्‍याला ‘पश्‍यंती’ वाणीतील नामजप म्‍हणतात.

 

परा

‘परा’ वाणी म्‍हणजे काय ?, तर नाम घेणाराच नामरूप होऊन जातो; म्‍हणजे परा वाणीत जप होत नाही, तर जपासह अद्वैत झालेले असते. जपकर्ता जपासह एकरूप झालेला असतो. म्‍हणजे नेमकेपणाने काय झालेले असते ?, तर जो नाम घेणार आहे त्‍याचा ईश्‍वरीय शक्‍तीशी आपोआप संपर्क झालेला असतो आणि त्‍या शक्‍तीशी त्‍याचा संवाद होतो. हा संवाद आत्‍मशक्‍ती जागृत झाल्‍यामुळे होतो यालाच ‘परा’ वाणी, असे म्‍हणतात.

 

जपमाळेने नामजप करणे

आपण जपमाळ घेऊनही नामजप करू शकतो. जपमाळेने नामजप मोजल्‍यामुळे ठराविक संख्‍येइतका नामजप पूर्ण केल्‍यावर मनाला समाधान मिळते आणि नामजपातील गोडीही वाढते.

प्राथमिक अवस्‍थेतील साधक माळ घेऊन नामजप करत असल्‍यास प्रतिदिन न्‍यूनतम तीन माळा नामजप करावा. नामजप अल्‍प होत असल्‍यास, किती माळा अल्‍प झाला हे कळण्‍यासाठी माळा अवश्‍य मोजाव्‍या. बराच नामजप होत असल्‍यास माळा मोजण्‍याची आवश्‍यकता नाही.

अ. जपमाळेतील मण्‍यांची संख्‍या

हिंदूंच्‍या जपमाळेत बहुधा १०८ मणी असतात. मेरुमणी निराळा असतो. काही संप्रदायांत निराळी संख्‍याही असते, उदा. शैवपंथीय ३२ मण्‍यांची माळ वापरतात. काही ग्रंथांत ‘जपमाळ ही ९ मण्‍यांची असावी आणि तिच्‍या १२ फेर्‍यांतून १०८ नामजप संख्‍या मोजावी’, असे सांगितले आहे.

आ. जपमाळेतील १०८ मण्‍यांचा आध्‍यात्‍मिक अर्थ

विविध योगमार्गांनुसार १०८ मण्‍यांचे विविध अर्थ आहेत. कुंडलिनीयोगानुसार आपल्‍या शरीरात १०८ संवेदनाबिंदू आहेत. जपमाळेतील मणी त्‍याचे दर्शक आहेत. त्‍यांचा संबंध कुंडलिनीयोगाशी आहे. जपमाळेतील मणी त्‍याचे दर्शक आहेत. ज्ञानयोगानुसार ज्ञानदेवता आणि विद्या यांची संख्‍या १०८ आहे. जपमाळेतील मणी त्‍याचे दर्शक आहेत.

२७ नक्षत्रे आहेत आणि प्रत्‍येक नक्षत्राचे चार चरण असतात. त्‍यामुळेही जपमाळेत १०८ मणी असतात. अध्‍यात्‍मामध्‍ये ९ या संख्‍येला ब्रह्माचे वाचक मानले आहे. या संख्‍येच्‍या १२ पट जप व्‍हावा. विविध मार्गांनुसार कारणे जरी विविध असली, तरी यातून आपल्‍याला काय शिकायचे आहे ?, तर आपला संख्‍यात्‍मक नामजप वाढवण्‍यासाठी जपमाळेचा उपयोग करू शकतो.

इ. मेरुमणी

हा माळेतील मुख्‍य मणी आहे. नामजप करतांना मेरुमणी ओलांडत नाहीत.

ई. मेरुमणी का ओलांडत नाहीत ?

‘जप करतांना मेरुमणी आल्‍यावर माळ उलट का फिरवितात ?’, असा आपल्‍या मनात प्रश्‍न असू शकेल. ते आपण समजून घेऊया.

१. जप करण्‍याची क्रिया विसरण्‍यासाठी असे केले जाते. भक्‍तीयोगानुसार ईश्‍वराचे स्‍मरण अपेक्षित आहे. ‘मी किती वेळा जप केले ?, याची जाणीव विसरून मला सतत ईश्‍वराच्‍या नामात दंग राहायचे आहे’, हे लक्षात ठेवण्‍यासाठी जप मोजण्याची क्रिया आपल्याला विसरायची आहे.

२. ज्‍याप्रमाणे डावीकडची इडा किंवा उजवीकडची पिंगळा नाडी नव्‍हे, तर मधली सुषुम्‍ना नाडी चालू असणे साधकाच्‍या दृष्‍टीने महत्त्वाचे असते. त्‍याचप्रमाणे नुसत्‍या एका दिशेने माळ फिरविणे साधकाच्‍या दृष्‍टीने योग्‍य नाही. इडा आणि पिंगळा नाड्यांच्‍या मध्‍ये सुषुम्‍ना नाडी असते. तसे माळेच्‍या उलट-सुलट फिरण्‍याच्‍या मध्‍ये मेरुमणी असतो. चुकून जर मेरुमणी ओलांडला गेला, तर प्रायश्‍चित्त म्‍हणून सहा वेळा प्राणायाम करावा.

 

जपमाळेने जप करण्‍याची पद्धत

अ. माळ आपल्‍याकडे ओढावी

माळ आपल्‍याकडे ओढण्‍याऐवजी बाहेरच्‍या दिशेला ढकलल्‍यास काय वाटते ?, त्‍याची अनुभूती घ्‍या. बहुतेकांना त्रासदायक अनुभूती येते. याचे कारण आपल्‍याकडे माळ ओढतांना प्राणवायू कार्यरत असतो, तर बाहेरच्‍या दिशेला माळ ढकलतांना समानवायू कार्यरत होतो. आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. यामध्‍ये पृथ्‍वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे विविध कार्य आहे. अशाच एका वायूचे अर्थात समानवायूपेक्षा प्राणवायूचे कार्य चालू असतांना अधिक आनंद होतो. (या वायूंविषयीचे विवरण सनातनचा ग्रंथ ‘आध्‍यात्‍मिक उन्‍नतीसाठी हठयोग (भाग २)’ यात दिले आहे.)

आ. उजव्‍या हातात माळ धरून नामजप करणे

अ. मधल्‍या बोटाच्‍या मधल्‍या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्‍याकडे अंगठ्याने ओढावे. माळेला तर्जनीचा स्‍पर्श होऊ देऊ नये.

आ. अनामिकेवर माळ ठेवून अनामिका आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडावी. नंतर मधल्‍या बोटाने माळ ओढावी. मधल्‍या बोटाने माळ ओढणे हे शरीरशास्‍त्रदृष्‍ट्याही अधिक सोयीचे असते.

इ. मण्‍यांचे प्रकार

ज्‍या देवतेचा नामजप असेल, तिची पवित्रके खेचून घेणार्‍या मण्‍यांची माळ असावी, उदा. शिवाच्‍या नामजपासाठी रुद्राक्षांची, श्रीविष्‍णूच्‍या नामजपासाठी तुळशीची माळ वापरावी. पवित्रके म्‍हणजे सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्‍यकण. आपल्‍या डोळ्‍यांना न दिसणारे असे अनेक कण या वातावरणामध्‍ये असतात त्‍यामध्‍ये विविध देवतांची तत्त्वेसुद्धा असतात. त्‍यालाच ‘पवित्रके’, असे म्‍हटलेले आहे.)

नामजप साधनेत आध्‍यात्‍मिक उन्‍नतीच्‍या उद्देशानुसार सत्त्व, रज किंवा तमप्रधान मणी वापरतात. यात आपण पाहिले तुळशीची माळ ही श्रीविष्‍णु, श्रीकृष्‍ण, श्रीराम या देवतांसाठी वापरतात. त्‍याप्रमाणे शिव आणि मारुति यांच्‍या उपासनेसाठी रुद्राक्षाची माळ, श्री दुर्गादेवीच्‍या उपासनेसाठी मोती किंवा पोवळे यांची माळ, श्री लक्ष्मीदेवीच्‍या उपासनेसाठी सुवर्णाची माळ, त्रिपुरादेवीसाठी रक्‍तचंदनाची माळ आणि श्री गणेशाच्‍या उपासनेसाठी हस्‍तिदंताची माळ उपयोगात आणतात.

 

मनातल्‍या मनात नामजप करणे

आपण मनातल्‍या मनातही नामजप करू शकतो. स्‍थुलापेक्षा सूक्ष्म अधिक सामर्थ्‍यवान असल्‍याने मनात केलेला नामजप अधिक प्रभावी असतो.

आपला मुख्‍य उद्देश आहे, अधिकाधिक नामजप करणे. तो होण्‍यासाठी आपण कोणकोणत्‍या पद्धतींनी नामजप करू शकतो, हे पाहिले. आपण वहीत नामजप लिहू शकतो, मोठ्या आवाजात किंवा जपमाळेवर नामजप करू शकतो किंवा मनातल्‍या मनातही नामजप करू शकतो. आपण आपल्‍याला जी पद्धत सोयीची वाटते, त्‍यानुसार नामजप करू शकतो. नामजप करण्‍यासाठी एक किंवा अधिक पद्धतींचा उपयोग करू शकता. यामध्‍ये महत्त्वाचे आहे, ते नामजप होणे. त्‍यामुळे आपला नामजप अधिकाधिक कसा होईल ?, त्‍या दृष्‍टीने आपण या आठवड्यात प्रयत्न करूयात.

4 thoughts on “सत्संग ४ : नामजप करण्याच्या पद्धती”

Leave a Comment