लेखाच्या या भागात कुरडू आणि टाकळा या २ वनस्पतींची माहिती समजून घेऊया.
८. वनस्पतींची माहिती वाचतांना उपयुक्त अशा काही सामाईक सूचना
अ. पुढे दिलेल्या वनस्पतींच्या माहितीमध्ये वनस्पतीचे लॅटिन नाव आणि कुळही दिले आहे. या आधुनिक वनस्पतीशास्त्रातील संज्ञा आहेत. यांद्वारे आंतरजालावर (इंटरनेटवर) या वनस्पतीसंबंधी अधिक माहिती शोधणे सोपे जाते.
आ. आरंभी औषधी वनस्पतींचे उपयोग दिले आहेत. प्रौढ व्यक्तींसाठी वनस्पतींचे चूर्ण इत्यादी साधारणपणे किती प्रमाणात वापरावे, हे त्याच्या पुढच्या उपसूत्रात दिले आहे. ३ ते ७ या वयोगटासाठी प्रौढ मात्रेच्या पाव प्रमाणात, तर ८ ते १४ या वयोगटासाठी प्रौढ मात्रेच्या अर्ध्या प्रमाणात औषध घ्यावे.
इ. औषधाच्या उपयुक्ततेनुसार ४ जणांच्या कुटुंबासाठी ताजी (वाळलेली नव्हे !) वनस्पती किती प्रमाणात गोळा करावी, हे येथे दिले आहे. हे केवळ दिशादर्शक अनुमान असून प्रत्येकाने आपापल्या आवश्यकतेनुसार वनस्पतींचा संग्रह करावा.
ई. जिथे औषधाचे प्रमाण चमच्यांमध्ये दिले आहे, तिथे मध्यम आकाराचा चमचा घ्यावा.
९. पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवणार्या
आणि त्यानंतर वाळून जाणार्या औषधी वनस्पती
९ अ. कुरडू
९ अ १. पर्यायी मराठी नावे : कुर्डू, हरळू
९ अ २. संस्कृत नाव : शितिवार
९ अ ३. लॅटिन नाव : Celosia argentea
९ अ ४. कुळ : Amaranthaceae
९ अ ५. उपयोग
अ. औषधी उपयोग
१. ही वनस्पती सर्व प्रकृतीच्या लोकांना मानवणारी आणि कोणताही अपाय न करणारी आहे.
२. मूतखडा आणि लघवीच्या समस्या यांवर हे नामी औषध आहे. मूतखड्यावर बी जास्त उपयुक्त आहे. मूतखड्यासाठी, तसेच अडलेली लघवी सुटण्यासाठी १ चमचा खडीसाखरेसह १ चमचा बी खावे.
३. ही वनस्पती थंड गुणधर्माची असून शरिरात कोणत्याही कारणाने वाढलेली उष्णता न्यून करणारी आहे. गोवर, कांजिण्या, नागीण यांसारख्या विकारांमुळे शरिरात निर्माण झालेली उष्णता, अॅलोपॅथी औषधांमुळे होणारी उष्णता, डोळे येणे, तोंडवळ्यावर मुरुमे येणे, अंगावर पुळ्या येणे, रक्ती मूळव्याध, मासिक पाळीच्या किंवा अन्य वेळी योनीमार्गातून जास्त रक्तस्राव होणे, लघवीची जळजळ होणे, तसेच चक्कर येणे यांसारख्या उष्णतेच्या विकारांत अतिशय उपयुक्त आहे.
४. ही रक्त (हिमोग्लोबिन) वाढवणारी आणि थकवा दूर करणारी आहे. हिच्यात लोह, चुना (कॅल्शियम), यशद (झिंक), पालाश (पोटॅशियम) इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हिची भाजी आहारात ठेवावी.
५. डोळ्यांचे विकार, अतीसार (जुलाब), अंगावर (योनीमार्गाद्वारे) पांढरे जाणे, त्वचा विकार, तसेच व्रण भरून येण्यासाठी पंचांगाचे चूर्ण पोटात घ्यावे.
६. धातूपुष्टतेसाठी (वीर्यवृद्धीसाठी) १ चमचा बी १ वाटी दूध आणि २ चमचे तूप यांसह घ्यावे.
७. भांग आणि गांजा यांच्यावर उतारा म्हणून या वनस्पतीची मुळे थंड पाण्यात उगाळून देतात.
८. रुग्णाईत स्थितीतून बाहेर आल्यावर (आजारपणातून उठल्यावर) अंघोळीचे पाणी गरम करतांना त्या पाण्यात ही वनस्पती घालावी आणि हे पाणी गरम झाल्यावर गाळून घेऊन त्याने अंघोळ करावी.
आ. आहारातील उपयोग
१. हिच्या कोवळ्या पानांची भाजी रुचकर आणि पौष्टिक असते. आपत्काळात अन्नधान्याच्या अभावी आहार म्हणून हिचा वापर करता येऊ शकतो.
२. बियांपासून खाद्य तेल काढले जाऊ शकते.
९ अ ६. वनस्पती ओळखण्याची खूण : पावसाळ्याच्या शेवटी रस्त्याच्या कडेला, तसेच माळरानांवर ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. कंबरेपर्यंत उंच वाढणार्या या वनस्पतीच्या शेंड्यावर पांढर्या अन् गुलाबी रंगाचे शंकूच्या आकारातील तुरे असतात. (छायाचित्र पहा.) या तुर्यांत काळ्या रंगाचे मोहरीपेक्षा लहान आकाराचे बी असते. ही माठाच्या (‘माठ’ नावाच्या भाजीच्या) कुळातील वनस्पती आहे.
९ अ ७. गोळा करण्याचे भाग
अ. साधारण ५ किलो मुळासकट पूर्ण वनस्पती गोळा करून तिचे चूर्ण करून ठेवावे.
आ. पोतेभर तुरे गोळा करावेत. तुरे गोळा करण्यापूर्वी काही तुरे हातांनी चुरगळून त्यातील बी परिपक्व झाले आहे ना, याची निश्चिती करावी. परिपक्व बी काळ्या रंगाचे असते. तुरे काढल्यावर ते न धुता उन्हात वाळवून हातांनी चुरगळून किंवा काठीने झोडपून त्यांच्यातील बी गोळा करून ठेवावे. आवश्यक वाटल्यास बी धुवून उन्हात वाळवून ठेवू शकतो.
इ. बी काढल्यावर राहिलेला तुर्यांचा चुरा वेगळा काढून ठेवावा आणि अंघोळीच्या पाण्यात घालून वापरावा.
९ अ ८. मात्रा
अ. १ चमचा पंचांग चूर्ण (पूर्ण वनस्पतीचे चूर्ण) दिवसातून २ – ३ वेळा वाटीभर पाण्यात मिसळून घ्यावे.
आ. १ चमचा बी वाटीभर पाण्यासह घ्यावे.
इ. उपलब्ध असेल, तेव्हा हिच्या पानांची भाजी आहारात ठेवावी.
९ अ ९. लागवड : ‘ही वनस्पती नेहमी उपलब्ध होण्यासाठी आपल्या परसात किंवा गच्चीवरील बागेत हिची लागवड करता येते. हिचे बी रुजत घातल्यापासून ५ ते ७ दिवसांत रुजून येते. ३० ते ४० दिवसांत उत्तम पालेभाजी मिळते. ८० ते ९० दिवसांमध्ये बी परिपक्व होते. कोवळी पाने खुडत राहिल्यास बी उशिरा मिळते. पालेभाजीसाठी या वनस्पतीची लागवड करायची असल्यास चांगले खतपाणी दिल्यास चांगल्या प्रतीची पाने मिळतात. १० × १० मीटरच्या परिसरात लागवड केल्यास एका वेळी १० ते १५ किलो पालेभाजी मिळते.
९ अ १०. वनस्पती कुणी वापरू नये ? : या वनस्पतीच्या बिया पोटात घेतल्यावर डोळ्यांच्या बाहुल्या काही प्रमाणात विस्फारित होतात. त्यामुळे ज्यांना काचबिंदूचा (ग्लॉकोमाचा) त्रास आहे, त्यांनी याचे बी घेऊ नये.’
संदर्भ : http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Celosia+argentea (१६.११.२०२०)
९ आ. टाकळा
९ आ १. पर्यायी मराठी नावे : तरोटा, टाकळी, टायकिळा
९ आ २. संस्कृत नावे : चक्रमर्द, एडगज
९ आ ३. लॅटिन नावे : Senna tora, Senna obtusifolia
९ आ ४. कुळ : Fabaceae
९ आ ५. उपयोग
अ. औषधी उपयोग
१. याचे संस्कृत नाव ‘चक्रमर्द’ आहे. ‘चक्र’ म्हणजे ‘गजकर्ण’. ते ‘मर्द’ म्हणजे नष्ट करणारी वनस्पती म्हणून हिला ‘चक्रमर्द’ म्हणतात. खरूज, नायटा, गजकर्ण या बुरशीजन्य त्वचाविकारांमध्ये (फंगल इन्फेक्शनमध्ये) याचा रस दिवसातून ३ – ४ वेळा त्वचेवर चोळल्यास हे विकार बरे होतात.
२. ‘टाकळ्याचा रस अंगाला (विशेषतः पोट, कुल्ले, स्तन, गळा या भागांवर) चोळल्याने किंवा पंचांगाचे (पूर्ण वनस्पतीचे) चूर्ण उटण्याप्रमाणे अंगाला रगडल्याने अनावश्यक मेद (चरबी) न्यून होऊन शरीर सुडौल बनते. अधिक लाभासाठी प्रतिदिन सूर्यनमस्कार घालावेत.
३. टाकळ्याचा रस आणि बेसन हे मिश्रण त्वचेवर चोळून लावावे. यामुळे त्वचा सुकुमार आणि कांतीमान होते. अनावश्यक तेलकटपणा, काळपटपणा, सैलपणा अल्प होतो. रसाच्या अभावी टाकळ्याचे चूर्ण आणि बेसन यांचे मिश्रण वापरावे.
४. जंत होण्याची प्रवृत्ती असणार्यांनी २ चमचे टाकळ्याचे बी चावून खावे आणि एक घंट्याने २ चमचे एरंडेल पिऊन त्यावर अर्धी वाटी गरम पाणी प्यावे. याने जंत पडून जातात.
५. पुष्कळ खोकला येणे, छातीत कफ वाजत रहाणे, दम लागणे, अंग जड लागणे, ग्लानी रहाणे या अवस्थेत टाकळ्याच्या बियांचे २ चमचे चूर्ण ४ कप पाण्यात उकळून १ कप काढा करावा. काढा करतांना त्यात तुळशीची २ पाने आणि मिर्यांचे २ दाणे ठेचून घालावे. हा काढा गरम असतांना घोट घोट प्यावा. याने पांढरट, फेसकट कफ पडून जातो.
६. अंगावर पांढरे डाग दिसणे, अंगास कंड येणे, वारंवार सर्दी, खोकला येणे, ही लक्षणे असतांना टाकळ्याच्या पानांची भाजी आणि भाजणीची भाकरी खावी.
७. टाकळ्याचे तेल : टाकळ्याचा रस १ लिटर, गोमूत्र २ लिटर, हळद चूर्ण २५ ग्रॅम, ज्येष्ठमध चूर्ण २५ ग्रॅम आणि तिळाचे तेल १ लिटर हे सर्व घटक एकत्र करून केवळ तेल शेष राहीपर्यंत मंद आचेवर उकळावे. तेल थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे आणि त्यात २ ग्रॅम ‘ओव्याचे फूल’ बारीक पूड करून घालून बाटलीचे झाकण घट्ट लावावे अन् बाटली हालवून ओव्याचे फूल तेलात विरघळू द्यावे. (ओव्याचे फूल आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानात मिळते. ते न मिळाल्यास त्याऐवजी तेवढाच भीमसेनी कापूर वापरावा.) हे तेल बाह्योपचारासाठी वापरावे.
अ. सर्व प्रकारच्या त्वचाविकारांत, विशेषतः ज्या त्वचाविकारांत लस जास्त वहाणे, ओलसरपणा आणि खाज ही लक्षणे असतील, त्या विकारांत हे अतिशय उपयुक्त आहे.
आ. योनीमार्गाची खाज, तसेच त्याच्यातून येणारा चिकट स्राव यांमध्ये या तेलात कापसाचा बोळा बुडवून तो रात्री झोपतांना योनीमार्गात ठेवावा.
इ. आग, गरम पाणी, वाफ, विजेचा धक्का इत्यादींमुळे भाजून झालेल्या व्रणांमध्ये हे तेल अप्रतिम लाभदायक आहे. भाजलेल्या जागी पाणी लागू देऊ नये.
ई. खरचटणे, खोक पडणे इत्यादी या व्रणांच्या (जखमांच्या) प्रकारात हे तेल लावल्याने लाभ होतो.
उ. मेदाचे प्रमाण अल्प करण्यासाठी या तेलाने मर्दन (मालीश) करावे.’
संदर्भ : आहार रहस्य (भाग ३ आणि ४), लेखक : वैद्य रमेश मधुसूदन नानल
आ. आहारातील उपयोग
१. बिया भाजून केलेली पूड कॉफीचा पर्याय म्हणून वापरता येते. हिची चव हुबेहुब कॉफीप्रमाणे लागते. कॉफीमुळे होणारे दुष्परिणाम या पुडीमुळे होत नाहीत. ही पूड कफ आणि श्वसनसंस्थेचे विकार न्यून करणारी आहे. त्यामुळे चहा किंवा कॉफी यांच्याऐवजी टाकळ्याच्या बीचे चूर्ण वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.
२. कोवळ्या पानांची भाजी चांगली होते. आपत्काळात अन्नधान्याच्या अभावी आहार म्हणून हिचा वापर करता येऊ शकतो.
९ आ ६. वनस्पती ओळखण्याची खूण : ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे. पावसाळ्यात मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला ही झाडे उगवतात. यांच्या कोवळ्या पानांची भाजी करून खातात. ही झाडे कंबरेएवढी उंच होतात. यांना पिवळ्या रंगाची फुले असतात. या झाडांना विळ्याप्रमाणे साधारण अर्धवर्तुळाकृती शेंगा येतात. पावसाळ्यानंतर या शेंगा वाळून मातकट रंगाच्या होतात. या शेंगांमध्ये मेथीच्या दाण्यांप्रमाणे बिया असतात.
९ आ ७. गोळा करण्याचे भाग आणि बनणारी औषधे
अ. साधारण २ किलो मुळासकट पूर्ण वनस्पती गोळा करून तिचे चूर्ण करून ठेवावे. याचा उपयोग बाह्य उपचारांसाठी करावा.
आ. झाडावरील वाळत आलेल्या शेंगा कात्रीने अलगद कापून गोळा कराव्यात. शेंगा हालवल्यास त्यांच्यातील बी सांडू शकते. साधारण २ ते ४ किलो (किंवा वर्षभरात आपल्याला जेवढी चहा किंवा कॉफी यांची पूड लागते तेवढे किलो) शेंगा गोळा करून उन्हात चांगल्या वाळवाव्यात आणि त्यांच्यातील बी वेगळे काढावे. शेंगांची टरफले टाकून द्यावीत आणि बी उन्हात नीट वाळवावे. वाळलेले बी कढईत मंद आचेवर भाजून ते थंड होत आल्यावर याचे चूर्ण बनवून ठेवावे.
इ. तेल बनवायचे असल्यास पुरेसा रस येईल, एवढी मुळासकट पूर्ण वनस्पती गोळा करावी. पावसाळ्यात पाने ताजी असतांना जास्त रस निघतो. पावसाळा संपल्यावर वनस्पती वाळत असल्याने थोडे अधिक पाणी घालून रस काढावा.
९ आ ८. मात्रा : बियांचे चूर्ण १ ते २ चमचे (कॉफी बनवण्याच्या प्रमाणानुसार)
९ आ ९. लागवड : लागवड करण्याची आवश्यता नसते. निसर्गात पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळते; परंतु काही देशांमध्ये बियांसाठी या वनस्पतीची लागवड केली जाते. लागवड करायची असल्यास एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये टाकळ्याचे वाळलेले बी घालावे आणि ते तसेच १२ घंटे भिजू द्यावे. त्यानंतर ते रुजत घालावे. असे केल्याने बी रुजून येण्याचे प्रमाण वाढते.
९ आ १०. वनस्पती कुणी वापरू नये ?
अ. टाकळ्याचे बी एका वेळी अतीप्रमाणात वापरू नये. याने उलट्या किंवा अतीसार (जुलाब) होऊ शकतो.
आ. काही ठिकाणी टाकळ्याच्या बीचे तेल काढतात; परंतु ते आहारात वापरू नये. याने आतड्यांना हानी पोचून विविध विकार उत्पन्न होऊ शकतात.
इ. टाकळ्याची जुनी पाने पचण्यास जड असल्याने ती खाऊ नयेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२०)