मागील सत्संगात आपण सर्वसामान्यपणे साधनेत आपल्याकडून होणार्या चुका समजून घेतल्या होत्या. आजच्या सत्संगात आपण नामजपाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ पहाणार आहोत.
आपण प्रवचनामध्ये प्रामुख्याने कुलदेवता आणि दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व आणि तो कसा करायचा ?, हे समजून घेतले होते. नामजप कसे कार्य करते ?, हेही समजून घेतले. कलियुगात नामस्मरण हीच सर्वश्रेष्ठ साधना मानली गेली आहे. आपल्यापैकी अनेकांनी नामजप करायला आरंभ केला असेल किंवा काही जण पूर्वीपासून नामजप करत असतील. आपल्यापैकी काहींना नामजपाची प्रचितीही आली असेल. ‘नामजप’ हा साधनेचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आजच्या सत्संगामध्ये आपण नामजपाचे काय लाभ होतात ?, हे जाणून घेणार आहोत. व्यवहारातही एखादी गोष्ट करण्याचे लाभ काय आहेत ?, हे कळले, तर व्यक्ती ती गोष्ट अधिक गांभीर्याने करते. एखाद्या विद्यार्थ्याला ‘अभ्यास कर’, असे नुसतेच सांगण्यापेक्षा ‘अभ्यास केल्याने त्याला काय लाभ होणार आहे ? आणि अभ्यास नाही केला, तर काय तोटा होणार आहे ?’, ‘अभ्यास केला, तर तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पुढच्या इयत्तेत जाऊ शकतो’, असे सांगितले, तर अभ्यासाकडे पहाण्याचा विद्यार्थ्याचा दृष्टीकोन पालटतो. तसेच अध्यात्मातही आहे. नामजपाचे महत्त्व आणि लाभ आपण समजून घेतले, तर आपल्या नामजपामध्ये संख्यात्मक वाढ होऊ शकेल आणि गुणात्मकही !
जप म्हणजे काय ?
जप म्हणजे ‘जकारो जन्म विच्छेदकः पकारो पापनाशक:’ याचा अर्थ, ‘पापांचा नाश करून जन्म मृत्यूच्या फेर्यांतून सोडवतो, तो जप !’ आपण आधीच्या प्रवचनांमध्ये पाहिले की, नामस्मरण ही सोपी आणि परिपूर्ण साधना आहे. नामजप आपण सहजतेने कुठेही, कोणत्याही क्षणी करू शकतो. नामजपाला कोणतेच बंधन नाही. त्यामुळे नामस्मरणाद्वारे भगवंताशी अखंड अनुसंधान राहू शकते; म्हणून ही अखंड होणारी साधनाही आहे. नामस्मरण होण्यासाठी आपल्या शरीर आणि मन यांची स्थिती कशीही असली, तरी तो अडथळा ठरत नाही. म्हणजेच आजारी असतांना, आनंदसमयी किंवा कठीण प्रसंगी केव्हाही आपण नामजप करू शकतो.
नामजपाचे महत्त्व
नामजपाला स्थळ, काळ, वेळ, सुवेर-सुतक, मासिक धर्म आदी कशाचेही बंधन नाही. नामजपाचे वैशिष्ट्य म्हणजे, नाम हे सदाचारी आणि पापी दोन्ही प्रकारच्या लोकांचे कल्याण करते. श्रीमद्भागवतात सांगितले आहे की, ‘ज्याप्रमाणे जाणूनबुजून टाकलेला किंवा नकळत पडलेला अग्नी लाकूड जाळून टाकतो, त्याप्रमाणे परमेश्वराचे नाव समजून उच्चारले किंवा नुसते सहज उच्चारले, तरी ते मनुष्याचे पातक नाहीसे करते.’ याचे उदारहण म्हणजे वाल्या कोळी. ‘राम राम’ च्या ऐवजी ‘मरा मरा’, असे नाव घेत होता, तरीही वाल्या कोळ्याची सर्व पापे नष्ट झाली आणि ते वाल्मिकीऋषी बनले. एवढेच नव्हे, तर त्यांनी रामायण लिहिले. तसे आपण जेवढे नामास्मरण करू तेवढे आपले प्रारब्ध नष्ट होणार आहे.
अनेक जणांचा असा समज असतो की, नामजप केवळ अध्यात्माशी संबंधित आहे; पण तसे नाही. नामस्मरण करण्याचे जसे आध्यात्मिक लाभ आहेत, तसे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही अनेक लाभ आहेत.
१. मानसिकदृष्ट्या होणारे लाभ
नामजपाचे मानसिकदृष्ट्या कोणते लाभ होतात ?, ते आपण जाणून घेऊया. नामजपामुळे मनोबल वाढते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनोबल चांगले असणे आवश्यक आहे. आज आपण पहातो की, अगदी लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत बरेच जण तणावाखाली दिसतात. लहान मुलांना अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण असतो, तर महिलांना घरातल्या कामांचा ताण असतो. नोकरी करणार्यांना त्यांचे काम, वरिष्ठांची नाराजी, पगारवाढ अशा अनेक गोष्टींची चिंता असते. वयोवृद्धांना त्यांच्या शारीरिक व्याधींचा किंवा मुलांच्या भविष्याचा ताण असतो. श्रीमंतांना अधिक पैसे कसे कमवायचे ?, याची काळजी असते, तर गरिबांना दैनंदिन जीवन कसे चालवायचे ?, याची भ्रांत असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार ७१ टक्के लोकांना मानसिक तणावामुळे आत्मविश्वास वाटत नाही आणि ते नकारात्मक अन् निराश होतात. वर्ष २०१८ च्या एका अभ्यासानुसार भारतातील ८९ टक्के लोकसंख्या तणावाखाली आहे, तर वर्ष २०१९ च्या एका अभ्यासानुसार ६.५ टक्के लोकांना गंभीर मानसिक आजार आहेत. मागे आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे तर या नैराश्यात अजूनच भर पडली असणार. या तणावाला बाह्य परिस्थिती केवळ ५ ते १० टक्के कारणीभूत असते. तणावामागचे ९० ते ९५ टक्के कारण आंतरिक असते. या तणावामुळे शरीर आणि मन दोन्हींवर विपरित परिणाम होतो. अशा या तणावाच्या निर्मूलनासाठी नामजप लाभदायी आहे. बहुतेक मनोविकारांत नामजपाने लाभ होतो.
१. नामजपामुळे चित्तावर नामाचा संस्कार होत राहिल्याने मनाची एकाग्रता वाढते. आपण प्रवचनामध्ये पाहिले आहे की, आपल्या चित्तावर आपण करत असलेल्या कृती आणि विचारांचे संस्कार होत असतात. आपण जर सतत नामजप करत राहिलो, तर नामाचाही संस्कार होतो.
२. नामजपामुळे मनातील विचार कमी होत असल्याने मनःशांती मिळते.
३. ‘ऑब्सेशन’ म्हणजे निरर्थक विचार कमी करण्यासाठी नामजप हा रामबाण उपाय आहे.
४. नामजपाने मन शांत राहिले की, मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक विकार होत नाहीत आणि शरीरस्वास्थ्य चांगले रहाते.
५. बरेचसे प्रापंचिक प्रश्न अयोग्य बोलण्यामुळे निर्माण होतात. नामजप हे एक प्रकारचे मौनच असल्याने प्रापंचिक प्रश्न कमी होतात.
६. नामजपामुळे खोटे बोलणे, राग येणे यांसारख्या वाईट सवयी, तसेच स्वभावदोष यांवर नियंत्रण मिळवता येते.
७. आपल्या अंतरंगात सद़्गुणांची वाढ होण्यासाठी अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण या गोष्टी आहेत. नामजपाने या दोन्ही गोष्टी वाढण्यास मदत होते.
२. शारीरिकदृष्ट्या होणारे लाभ
आता आपण नामजपाचे शारीरिकदृष्ट्या कोणते लाभ होतात, ते समजून घेऊया. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास हे ३० टक्के निर्माण झाल्यावर त्याची लक्षणे दिसू लागतात. नामजपामुळे काय होते ?, तर रोगाचे स्वरूप प्रकट होण्यापूर्वीच त्याची लक्षणे समजू शकतात. नामजपामुळे आध्यात्मिक ऊर्जा मिळत असल्याने आध्यात्मिक कारण असलेल्या गंभीर शारीरिक व्याधींवरही सहजतेने मात करता येऊ शकते.
३. आध्यात्मिक लाभ
आपण आता नामजपाचे शारीरिक आणि मानसिक स्तरावर लाभ काय आहेत, हे समजून घेतले. नामजपाचे आध्यात्मिक लाभही अनेक आहेत. मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. एखाद्या समस्येचे कारण आध्यात्मिक असेल, तर त्यावरची उपाययोजना पण आध्यात्मिक स्तरावरचीच असावी लागते. नामजप हा उत्तम आध्यात्मिक उपाय आहे. आपल्यापैकी अनेकांनी अशा घटना अनुभवल्या असतील की, व्यक्तीला व्याधी तर असते; पण त्याचे वैद्यकीय निदान होत नाही. सर्व वैद्यकीय अहवाल हे ‘नॉर्मल’ असतात. या संदर्भात आपण हे समजून घ्यायला हवे की, मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक विकारांमागे प्रारब्ध हे एक महत्त्वाचे कारण आहे. नामजपामुळे रुग्णाचे मंद प्रारब्ध नष्ट होते, मध्यम प्रारब्ध कमी होते आणि तीव्र प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी मनाची सिद्धता होते.
बर्याचदा मानसिक तणाव, आजूबाजूचे वातावरण यांमुळे मनुष्याच्या देहावर त्रासदायक आवरण येणे. ते दूर करण्यासाठी किंवा अतृप्त पूर्वजांमुळे होणार्या त्रासांच्या निवारणासाठी नामजप उपयुक्त ठरतो. वास्तूदोष दूर करण्यासाठी वास्तूशांती, उदकशांती केली जाते, तरी देखील वास्तूत त्रासदायक स्पंदने निर्माण होऊ नये, यासाठी नामजप हा अतिशय उपयुक्त ठरतो.
नामजपामुळे विषयाची आसक्ती कमी होते, आसक्ती हेच सर्व दु:खांचे मूळ आणि सर्व रोगांचा पाया आहे. भगवंत हा आनंदस्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरले की, दु:ख त्या ठिकाणी राहू शकत नाही. नाम घेतल्याने भगवंताविषयी प्रेम वाटू लागते आणि आसक्ती सुटून दु:ख नाहीसे होते; म्हणून अनेक संतांनीही नामाचा महिमा गौरवला आहे. आपण दिवसभरात जो भगवंताचा नामजप करणार असू, तो अधिक एकाग्रतेने, मनापासून आणि प्रेमपूर्वक करायचा प्रयत्न करूया.
४. अनुभूती
‘श्री गुरुदेव दत्त ।’, या नामजपामुळे ६ मासांत पूर्वजांच्या त्रासांतून मुक्त होऊन घरात प्रत्येक दिवस सणासारखा वाटणे
रत्नागिरीतील एका व्यक्तीला पूर्वजांचा त्रास होता. त्यांच्या वडिलांना त्याचा अतिशय त्रास होत असे. ते अमावास्या आणि पौर्णिमा या काळात विचित्र वागत. त्यांचे आई-वडील आणि आजोबा यांच्यामध्ये अतिशय भांडणे होत असत. तसेच ‘स्वतःचे एवढे शिक्षण होऊनही त्याचा काही लाभ नाही’, असे निराशेचे विचार त्यांच्या मनात येत. ते जन्मल्यापासून २५ वर्षे त्यांच्या घरात एकही दिवस आनंदात गेला नव्हता. त्यामुळे ‘आमच्या घरात चांगले वातावरण कधी निर्माण होईल ?’, असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यांना साधना कळल्यापासून त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करण्यास आरंभ केला. त्यानंतर ६ मासांत त्यांची पूर्वजांच्या त्रासापासून सुटका झाली. सध्या त्यांच्या घरात प्रत्येक दिवस सणासारखाच असतो.
This is very important, for today’s youth and the rest of the world. You are doing a great job. thank you