सत्संगाला आरंभ करण्यापूर्वी आपण श्रीगणेश आणि ग्रामदेवता यांच्या चरणी प्रार्थना करूया.
प्रार्थना : ‘हे श्रीगणेशा, हे (ग्रामदेवतेचे नाव), (स्थानदेवतेचे नाव) तुझ्या कृपेने आजच्या या सत्संगात साधनेविषयी जी सूत्रे आज मला शिकायला मिळणार आहेत, ती समजून घेण्याची बुद्धी तूच मला दे आणि त्यातील सूत्रे मला कृतीत आणता येऊ दे, हा सत्संग मला मन आणि बुद्धीच्या सोबत चैतन्याच्या पातळीवर ग्रहण करता येऊ दे’, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
आपण सर्वांनी बुद्धीदाता, विघ्नहर्ता श्रीगणेशाचा श्लोक म्हणूया.
श्लोक :
वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
आतापर्यंत झालेल्या ३ प्रवचनांमध्ये आपण अध्यात्माचे महत्त्व, कुलदेवता आणि दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व, कर्मफलसिद्धांत, नामजप करण्याचे विविध लाभ आणि नामजप कार्य कसे करते ?, हे विषय समजून घेतले. आजच्या सत्संगात आपण साधनेचा सिद्धांत आणि साधनेची प्रमुख तत्त्वे पातळीनुसार साधना आणि काळानुसार साधना समजून घेणार आहोत.
साधनेचा सिद्धांत – व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग !
साधनेचा महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे, ‘व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग !’ ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आदी साधनेचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याचे मोक्षप्राप्तीचे मार्गही वेगळे असतात. अशा वेळी सर्वांनी एकाच प्रकारे किंवा एकाच मार्गाने उपासना करण्याचा आग्रह धरणे अयोग्य ठरते. प्रत्येकाने त्याच्या प्रकृतीनुसार साधना केली, तर त्याची आध्यात्मिक उन्नती जलद होते.
एकाच कुटुंबातील सर्व जण वेगवेगळ्या प्रकृतीचे म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी साधना करणारे असू शकतात. उदाहरणार्थ, माझी देवावर अतिशय श्रद्धा आहे; मला भगवंताविषयी ओढ वाटते, तर मी भक्तीमार्गी झाले / झालो. माझ्या वडिलांचा भगवद़्गीतेचा अभ्यास आहे. त्यांना धार्मिक ग्रंथांच्या वाचनाची आणि चिंतन-मनन करण्याची आवड आहे, तर ते ज्ञानमार्गी झाले. माझ्या पतीचे / पत्नीचे सहजतेने ध्यान लागते, तर ते ध्यानमार्गी झाले. माझा मुलगा समजा तळमळीने हिंदुत्वाचे कार्य करत आहे, तर तो कर्ममार्गी झाला. म्हणजे आमचा परिवार एक आहे; पण प्रत्येकाची प्रकृती आणि साधनामार्ग वेगळा आहे. अशा वेळी मी ज्ञानमार्गी वडिलांना ‘फिल्ड’वर जाऊन म्हणजे ‘प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हिंदुत्वाचे कार्य करा’, असे सांगितले, तर ते त्यांना जमेलच, असे सांगता येईल का ? किंवा कर्ममार्गी मुलाला ‘तू प्रतिदिन ध्यान लावून बस’, असे सांगितले, तर त्याला ते जमेल का ? पण प्रत्येकाने त्याच्या प्रकृतीप्रमाणे साधना केली, तर त्यांची साधना मनापासून होईल; म्हणून व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग असे म्हटले आहे.
प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग असले, तरी प्रकृतीनुसार असणार्या साधनामार्गांसह सर्व साधनामार्गांमध्ये असणारी सर्वसमावेशक योग्य साधना केली, तर शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होते. तसेच कुठल्याही साधनामार्गानुसार साधना केली, तरी गुरुकृपेविना उन्नति होत नाही. यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जलद आध्यात्मिक उन्नती करून देणारा सर्वसमावेशक असा ‘गुरुकृपायोग’ सांगितला. गुरुकृपायोग हा सांप्रदायिक शब्द नाही. अध्यात्मात प्रगती व्हायची असेल, तर गुरुकृपाच आवश्यक असते. त्या दृष्टीने हा शब्द आहे. गुरुकृपायोगात ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा सुरेख संगम आहे.
‘व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ हा सिद्धांत समजून घेतल्यानंतर आता आपण गुरुकृपायोगातील साधनेतील प्रमुख तत्त्व कोणती आहेत ?, प्रत्यक्ष साधनेला आरंभ करतांना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ?, हे समजून घेऊया. बहुतेकांना साधनेतील तत्त्वे माहीत नसल्याने अयोग्य साधना करण्यात त्यांचा आयुष्यातील वेळ वाया जाण्याचा धोका असतो. साधना करून त्यांना स्वतःमध्ये अपेक्षित पालट न जाणवल्याने ते साधना मध्येच सोडून देण्याचीही शक्यता असते. ‘मी देवाचे एवढे केले, तरीही अमुक एक प्रसंग माझ्या जीवनात का आला ?’, अशा प्रकारची अयोग्य विचारप्रक्रिया होण्याचाही धोका असतो. तसे होऊ नये; म्हणून आपण साधनेची काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे समजून घेणार आहोत.
पातळीनुसार साधना
साधनेचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे, पातळीनुसार साधना ! पातळी म्हणजे काय, तर अधिकार ! अधिकार हा शब्द इथे व्यावहारिक नाही, तर आध्यात्मिक अर्थाने घ्यायचा आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘अधिकार तैसा करू उपदेश’. आध्यात्मिकदृष्टीने याचा अर्थ म्हणजे आपल्याला पेलेल तितकीच साधना करण्याचा प्रयत्न करावा, तरच प्रगती होते. जे पेलणार नाही, ते करू नये. उदाहरणार्थ, ब्राह्ममुहुर्तावर उठून शुचिर्भूत होऊन साधना केल्यास अधिक फळ मिळते, असे म्हटले आहे; पण आताच्या जीवनशैलीप्रमाणे तसे करण्यास आपल्याला आरंभी जमत नसेल, तर अट्टाहासाने तसे करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी दिवसभरातील अधिकाधिक वेळ साधनेसाठी कसा देऊ शकतो, याकरीता प्रयत्न करावा. ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा तन, मन, आणि धनाचा संपूर्ण त्याग करावा लागतो; पण आताच्या टप्प्यात आपल्याला ते कठीण वाटते; म्हणून आपण आपल्याला जमेल त्याप्रमाणे त्याग करण्याचा प्रयत्न करावा. संतांच्या आश्रमात जाऊन शारीरिक सेवा करणे, इतरांसाठी देह झिजवणे हा झाला तनाचा त्याग, राष्ट्र आणि धर्मासाठी कार्य करणार्या संघटनांना नियमित धन अर्पण करणे हा झाला धनाचा त्याग, तर पदार्थांच्या आवडी-निवडी, छोट्या छोट्या इच्छा-आसक्ती यांचा त्याग करणे, आपल्या आवश्यकता कमी करणे, आपला आग्रह बाजूला सारून इतरांच्या मताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, इतरांमध्ये न अडकणे, अधिकाधिक नामस्मरण करणे हा झाला मनाचा त्याग. याप्रमाणे नियमित प्रयत्न करून प्रयत्नांमध्ये वाढ करणे म्हणजे पातळीप्रमाणे साधना करणे होय. साधना करून आपली आध्यात्मिक पातळी वाढत जाईल, तसतसे आपल्याला भगवंताला अपेक्षित असे वागता येऊ शकेल.
पातळी (टक्के) | साधना |
---|---|
२० | नाही |
३० | पूजा, देवळात जाणे, पोथीवाचन |
४० | नामस्मरण |
५० | सत्संग |
५५ | सत्सेवा आणि गुरुप्राप्ती |
६० | जन्ममृत्यूच्या फेर्यांतून मुक्ती |
७० | संतपद |
अध्यात्माच्या परिभाषेत सांगायचे झाले, तर मोक्ष म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, तर दगड, माती यांसारख्या निर्जीव वस्तूंची पातळी ० टक्के असते. कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीची पातळी २० टक्के आहे. साधनामार्गानुसार आध्यात्मिक पातळी किती असते, याचे काही सर्वसाधारण ठोकताळे आहेत. २० टक्के आध्यात्मिक पातळीची व्यक्ती काहीच साधना करत नाही. अशा व्यक्तींचा अध्यात्माशी दूरान्वयेही (दूरदूरचाही) संबंध नसतो. ईश्वरप्राप्ती करण्याचा विचारही अशा व्यक्तींच्या मनात येत नाही. भांडणतंटा, भ्रष्टाचार किंवा मौजमजा करण्यात अशांचे आयुष्य निघून जाते. सामान्यतः २५ टक्के पातळीची व्यक्ती थोडीफार आस्तिक असते. ३० टक्के आध्यात्मिक पातळीची व्यक्ती पूजा करणे, देवळात जाणे, पोथीवाचन, उपवास करणे अशा स्वरूपात साधना करते. तिला कर्मकांडाची आवड अधिक असते. या पुढच्या पातळीला उपासनाकांडाची साधना, म्हणजेच नामस्मरणाची साधना आहे. नामजप करणार्या व्यक्तीची पातळी सर्वसाधारणपणे ४० टक्के असते. अशा व्यक्तींना पोथीवाचन करणे, उपवास करणे यापेक्षा नामस्मरण करण्यात अधिक आनंद मिळतो. प्रत्येक कृती करतांना नामस्मरण करण्याचा प्रयत्न सातत्याने काही महिने केला केला की नामस्मरण आपोआप होण्यास सुरुवात होते. पुढेपुढे तर झोपेतसुद्धा नामजप होत असल्याची जाणीव होते. असे प्रयत्न सातत्याने केल्यास ५० टक्के पातळीचा टप्पा म्हणजेच सत्संगाचा टप्पा गाठता येतो. सत्संग म्हणजे काय, तर सत् चा संग ! सत् म्हणजे ईश्वर आणि संग म्हणजे सहवास. जेथे धर्म, ईश्वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न, अध्यात्म, यांविषयी चर्चा केली जाते तो म्हणजे सत्संग. एखादी व्यक्ती नियमितपणे सत्संगाला जात असेल, आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून अधिकांश वेळ ईश्वराच्या अनुसंधानात रहात असेल, तर त्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्के असते. अशा व्यक्तींना सत्संगाची ओढ लागते, सत्संगातून अधिक आनंद मिळतो. पुढे ५५ टक्के पातळीला व्यक्ती सत्सेवा करू लागते आणि तिला गुरुप्राप्ती होते; म्हणजे गुरु, शिष्याच्या जीवनात येऊन त्याला मार्गदर्शन करतात. गुरूंना अपेक्षित साधना केली की पुढे अध्यात्मिक उन्नती होऊन पातळी ६० टक्के होते. ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाली की, ती व्यक्ती जीवन-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होते. पुढे ७० टक्के आध्यात्मिक पातळीला संतपद प्राप्त होते. मनुष्यजन्माचे ध्येय साधना करून ईश्वरप्राप्ती करणे हे आहे. आपण करत असलेल्या साधनेने आध्यात्मिक पातळी वाढणे हा साधनेचा परिणाम आहे; मात्र आध्यात्मिक पातळीपेक्षाही आपल्याला साधनेवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. याचा अर्थ पातळीमध्ये अडकण्यापेक्षा गुरुंना अपेक्षित साधना करत रहाणे, हेच महत्त्वाचे असते. कधी कधी दोन साधकांची साधना सारखीच असली, तरी एकाची प्रगती जलद होते, तर एकाची आध्यात्मिक प्रगती व्हायला वेळ लागतो. याचे कारण आध्यात्मिक पातळी साधनेसह त्या व्यक्तीच्या प्रारब्धावरही अवलंबून असते. एखाद्याचे प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब अल्प असेल, तर त्याची प्रगती जलद होऊ शकते आणि एखाद्याचे प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब तीव्र असेल, तर त्याची आध्यात्मिक प्रगती व्हायला वेळ लागू शकतो. जसे दोन व्यक्ती नोकरी करत असतील आणि पगार सारखाच असेल पण एकावर कर्ज असेल, तर त्याचा पगार कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी जात असल्याने त्याची शिल्लक म्हणजे balance कमी रहातो आणि दुसर्यावर कर्ज नसेल, तर त्याची शिल्लक म्हणजे balance साहजिक अधिक असतो. तसेच साधना आणि आध्यात्मिक पातळी यांच्या संदर्भात आहे.
आध्यात्मिक पातळीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या जन्मात मृत्यूसमयी आपली जेवढी आध्यात्मिक पातळी असते, त्या पातळीपासूनच पुढच्या जन्मात आपला आध्यात्मिक प्रवास चालू होतो. शालेय शिक्षण घेतांना आपण या जन्मात बाराखडी, आकडे शिकलो, तरी पुढच्या मनुष्यजन्मात आपल्याला पुन्हा अ, आ, इ … पासून शिकावेच लागते, तसे अध्यात्मात नाही. आपले आध्यात्मिक बळ मृत्यूनंतरही आपल्यासमवेत असते. जसजशी साधना योग्य प्रकारे होत रहाते, तसतशी आध्यात्मिक प्रगती होऊन पातळी वाढते. एखाद्याची आध्यात्मिक पातळी किती आहे ?, हे खरे संत किंवा सद़्गुरुच सांगू शकतात. मग काय करायचे ? तर आपण सध्या जी साधना करत आहोत त्याच्या पुढच्या टप्प्याची साधना करण्याचा प्रयत्न करायचा. उदा. केवळ कर्मकांड करणार्या जिज्ञासूने नामजप करायला हवा. नामजप करणार्या व्यक्तीने नियमित सत्संग मिळवायचा प्रयत्न करायला हवा. असे केल्यास जलद आध्यात्मिक उन्नती होते. साधना करून आपली आध्यात्मिक पातळी वाढत जाईल, तसतसे आपल्याला भगवंताला अपेक्षित असे वागता येऊ शकेल.
काळानुसार साधना
साधनेचे पुढचे आणि महत्त्वाचे तत्त्व आहे, काळानुसार साधना ! आपण आरंभीच्या प्रवचनांमध्ये पाहिले की, आताच्या कलियुगात नामस्मरण ही श्रेष्ठ साधना आहे. काळाप्रमाणे योग्य साधना केली, तर त्याचे जास्तीतजास्त फळ मिळते. सत्ययुगात सर्व जण सात्त्विक आणि सोऽहं भावात असल्याने त्या काळी ज्ञानयोगाची साधना होती. नंतरच्या त्रेतायुगात ध्यानयोगाची साधना केली जात असे. ऋषिमुनींनी अनेक वर्षे ध्यान लावून तपश्चर्या करण्याची उदाहरणे आपण ऐकली असतीलच. द्वापारयुगात यज्ञयागाच्या माध्यमातून कर्मकांडाची साधना करण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले. सध्याच्या कलियुगामध्ये भक्तीयोग ही साधना आहे. कलियुगातील बहुतेक संत हे भक्तीमार्गी आहेत. संत मीराबाई, संत ज्ञानेश्वर महाराज, चैतन्य महाप्रभू, राघवेंद्र स्वामी, चिदंबर स्वामी अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. भक्तीयोगामध्ये ईश्वराच्या ९ प्रकारच्या भक्ती सांगितल्या आहेत. त्यातील स्मरणभक्ती ही सहज-सुलभ आणि अखंड करता येते. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत म्हटले आहे, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’, म्हणजे ‘सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ (नामजप) श्रेष्ठ आहे’, असे भगवंताने गीतेत (अध्याय १०, श्लोक २५) सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर सध्याच्या काळासाठी नामजप ही प्रमुख साधना सांगितली आहे; पण आताच्या काळात केवळ नामसाधनाच पुरेशी नाही. सध्याचा काळ हा एक प्रकारे धर्मसंस्थापनेचा काळ आहे. जगभरातील लोक आज हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. धर्मसंस्थापनेच्या या समष्टी कार्यात आपणही यथाशक्ती सहभागी होणे, ही देखील आपली साधनाच आहे. हिंदुधर्मातील आपली जी गुरुपरंपरा आहे, तिचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे गुरु-शिष्य परंपरेने केवळ आध्यात्मिक शिकवण दिली नाही, तर धर्मसंस्थापनेसाठीही योगदान दिले आहे. महाभारताच्या युद्धात गुरुरूपातील श्रीकृष्णाने शिष्यरूपी अर्जुनाला सांगितले आहे – ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥’, म्हणजेच ‘सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुनःपुन्हा अवतार घेतो.’ धर्मसंस्थापनेचा हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आर्य चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्यस्वामी-हरिहरराय आणि बुक्कराय, समर्थ रामदास्वामी-छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी गुरु-शिष्यांनी धर्मसंस्थापनेचे ऐतिहासिक कार्य केले. तसेच कार्य या काळात हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करणे अपेक्षित आहे. नामस्मरणाच्या जोडीला धर्मसंस्थापनेच्या दृष्टीने योगदान देणे, हीही आताच्या काळानुसार आवश्यक साधनाच आहे.
पातळीप्रमाणे साधना आणि काळानुसार साधना ही साधनेची तत्त्वे समजून घेतली. यानुसार आपण साधना केली, तर आपल्या साधनेला गती येईल.
उपयुक्त माहिती आहे
अतिशय महत्त्वाची व प्राथमिक शंका दूर करणारा लेख आहे