मागील सत्संगात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग’, हा साधनेचा मूलभूत सिद्धांत आपण समजून घेतला. त्याचबरोबर साधनेची मूलभूत तत्त्वे पाहिली. यामध्ये पातळीनुसार साधना आणि काळानुसार साधना म्हणजे काय ?, हे पाहिले. आता आपण आजच्या सत्संगाचे स्वरूप समजून घेऊया. यामध्ये आज आपण साधना करतांना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, हे समजून घेणार आहोत.
साधनेतील मूलभूत चुका
मागील सत्संगांमध्ये आपण ‘व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ हा साधनेचा सिद्धांत आणि साधनेची मूलभूत तत्त्वे समजून घेतली. आजच्या सत्संगात आपण ‘साधना करतांना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात’, म्हणजेच सर्वसामान्यपणे ‘साधनेत होणार्या मूलभूत चुका’ समजून घेणार आहोत. जसे आजकाल व्यवहारात बर्याच ठिकाणी ‘Do’s’ And ‘Don’ts म्हणजे कोणत्या गोष्टी करा आणि कोणत्या करू नका, असे लिहिलेले असते. या ‘Dos’ And ‘Don’ts’ यांची माहिती असणे, हे व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. त्याप्रमाणे अध्यात्मातही साधना करतांना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याचे ज्ञान आवश्यक ठरते. सर्वसामान्यतः साधनामार्गावरील व्यक्तींकडून ४ प्रकारच्या चुका होऊ शकतात. एक म्हणजे स्वतःच्या मनाने साधना करणे, दुसरे म्हणजे सांप्रदायिक साधनेत अडकणे, तिसरी चूक म्हणजे गुरु करणे आणि चौथी चूक म्हणजे स्वतःला साधक समजणे. या चुकांमुळे अनेक वर्षे साधना करण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षित अशी आध्यात्मिक उन्नती होत नाही. त्यामुळे या चुका टाळणे महत्त्वाचे आहे. याविषयी आता आपण विस्तृतपणे जाणून घेऊया.
१. स्वतःच्या मनाने साधना करणे
बर्याच वेळा समाजात असे दिसून येते की, अनेक लोक स्वतःच्या मनानेच साधना करायला आरंभ करतात. कोणी तीर्थयात्रा करतात, कोणी पोथीवाचन किंवा पारायण करणे चालू करतात, कोणी उपवास, तर कुणी अन्य काही करणे चालू करतात. थोडक्यात, त्यांना जसे वाटेल किंवा जे मनात येईल, त्याप्रमाणे उपासना करण्याचा प्रयत्न करतात. व्यवहारात आपण आपला भ्रमणभाष संच किंवा दूरचित्रवाणी संच म्हणजे मोबाईल किंवा टी.व्ही. (दूरचित्रवाणी संच) बिघडला, तर त्या क्षेत्रातील तज्ञांकडे जातो. आपण आजारी असलो, तर डॉक्टरांकडे जातो. कोर्टकचेरीचे काम असेल, तर वकिलांकडे जातो. थोडक्यात, त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण कृती करतो; पण अध्यात्मात मात्र आध्यात्मिक अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन न घेता मनानेच साधना चालू करतो. देवाधर्माचे काहीच न करण्यापेक्षा हे चांगले असले, तरी आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने मात्र ते उपयुक्त ठरत नाही.
अ. संतांपेक्षाही देवतेचा नामजप करावा !
काही वेळा असेही दिसून येते की, अनेक जण संतांनी सांगितलेले नसतांनाही संतांचा नामजप करतात. हिंदु धर्मशास्त्रामध्ये देवतांच्या नामजपाचे विधान आहे, संतांच्या नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडे ऋषींच्या नावाचा नामजप केला, असे कधी ऐकले आहे का ? नाही ना ! आजच्या काळातील संतांनीही कधी त्यांच्या नावाची उपासना करायला सांगितली नाही, तर भक्तांना देवतांचाच जप करायला सांगितला आहे. संत हे ईश्वराचे सगुण रूप असले, तरी संतांच्या कार्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम लागू होतो. अर्थात् संतांच्या देहत्यागानंतर काही काळाने त्यांच्या प्रकट शक्तीचा लय होत असतो. याउलट ईश्वर अनादी, अनंत, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ आहे. त्यामुळे संतांच्या नावाच्या जपापेक्षाही देवतेच्या नामजपामध्ये अधिक सामर्थ्य आहे. त्यामुळे मनानेच संतांचा नामजप करणे योग्य ठरत नाही.
आ. विचारून करण्याचे महत्त्व
अध्यात्मात ‘मनाने साधना करणे’, ही चूक टाळायची असेल, तर विचारून घेण्याची वृत्ती अंगी बाणवायला हवी. ‘मला काही कळत नाही आणि मला अध्यात्म शिकायचे आहे’, अशी जिज्ञासू वृत्ती निर्माण होते, तेव्हाच एखादी आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती मार्गदर्शन करते. आपल्याला समजायला लागल्यापासून ‘पूजा कशी करायची ? देवळात कसे जायचे ? पोथी कशी वाचायची’, या गोष्टी आपल्याला ठाऊक होत जातात आणि त्याप्रमाणे आपली साधना चालू रहाते; पण तीच तीच साधना करत राहिल्यामुळे आपण आयुष्यभर आहोत तिथेच रहातो. घाण्याचा बैल जसा जिथल्या तिथे फिरत असतो, तशी अवस्था होते. समजा, एखाद्या विद्यार्थ्याला इयत्ता सातवीचा अभ्यास जमायला लागल्यावर तो वर्षानुवर्षे तोच अभ्यास करत राहिला, तर त्याचा त्याला काही उपयोग होईल का ? एक टप्पा झाल्यावर त्याच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा प्रयत्न केला, तर प्रगती होते. पहिलीतून दुसरीत जाणे, दुसरीतून तिसरीत, मग माध्यमिक शाळेत, त्यापुढे महाविद्यालयात जाणे आणि शेवटी पदवीधर होणे, हे जसे आहे, तसेच अध्यात्मातही आहे. साधना करतांना एका टप्प्याची साधना जमू लागल्यावर आपण साधनेचे पुढचे पुढचे टप्पे जाणून घेऊन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
२. सांप्रदायिक साधनेत अडकणे
आज बरेच जण वेगवेगळ्या संप्रदायांच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांना साधनेची गोडी लागली आहे; परंतु साधनेला सुरुवात झाल्यानंतर अध्यात्मात प्रगती करणे अपेक्षित असते. जसे शाळा-महाविद्यालयात शिकतांना आपण एकाच इयत्तेमध्ये न थांबता पुढच्या पुढच्या इयत्तेत जातो आणि शेवटी पदवी प्राप्त करतो. ‘पदवी प्राप्त करणे’, हे शिक्षणाचे ध्येय असते. अगदी तसेच साधनेत पुढच्या टप्प्याची साधना करून ‘ईश्वरप्राप्ती करण’ हे मनुष्य जन्माचे ध्येय आहे आणि ते साधकाला प्राप्त करायचे असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे, एका इयत्तेमधील अभ्यास चांगला यायला लागला आणि त्या इयत्तेत जरी चांगले गुण मिळाले; म्हणून आपण त्याच इयत्तेत थांबतो का ? नाही ना ? त्याच इयत्तेमध्ये न थांबता आपण पुढच्या इयत्तेत जाण्याचा प्रयत्न करतो; कारण आपले अंतिम ध्येय ‘पदवी प्राप्त करण’ हे असते, तसेच आपण संप्रदायात साधनेला सुरुवात केली असेल, तरी ईश्वरप्राप्ती किंवा आनंदप्राप्ती या ध्येयासाठी सांप्रदायिक साधना पार करून पुढे जायला पाहिजे. साधनेच्या महामार्गाला लागतांना सांप्रदायिक साधनेचा जोड रस्ता सोडायला हवा. इथे सांप्रदायिक साधनेला कमी लेखण्याचा भाग नाही; पण त्याही पलीकडे जाऊन आपली साधनेत प्रगती होत आहे ना, याचाही विचार करायला हवा.
आपण पहिल्या सत्संगात ‘व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा अध्यात्मातील मूलभूत सिद्धांत समजून घेतला. पृथ्वीवर सातशे कोटींहून अधिक माणसे आहेत, म्हणजे सातशे कोटींहून अधिक साधनामार्ग आहेत; परंतु कुठल्याही संप्रदायाच्या अनुयायाला एकच साधनामार्ग ठाऊक असतो. तो त्या एकाच मार्गाने साधना करत असतो. इतर साधनामार्ग त्याला ठाऊक नसतात. संप्रदायात सर्वांना सरसकट एकच साधना सांगितली जाते; मात्र ती प्रत्येकाला लागू होतेच, असे नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असल्याने सांप्रदायिक साधना करणार्या बर्याच जणांची अपेक्षेनुसार आध्यात्मिक प्रगती होत नाही. त्यांना अनुभूतीही क्वचित्च येतात. अशामुळे काय होते, तर ‘माझे संपूर्ण जीवन व्यर्थ गेले’, ‘मी देवाची एवढी उपासना करूनही माझे भले झाले नाही’, अशी विचारप्रक्रिया होऊन त्या व्यक्तीचा ईश्वर, साधना किंवा अध्यात्म यांवरचा विश्वास उडून जातो. समजा एखाद्या डॉक्टरला एकच औषध ठाऊक असले, तर आपण त्याला डॉक्टर म्हणू का ? आपण त्याच्याकडे जाणारसुद्धा नाही. तसे सांप्रदायिक साधनेचे आहे. यामुळे ‘सांप्रदायिक साधनेत अडकणे’ ही साधनेतील दुसरी चूक आहे.
सांप्रदायिकतेचा अजून एक तोटा म्हणजे ‘माझा संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे’, असे संप्रदायाच्या अनुयायांना वाटायला लागते. पुढे त्यांच्यात एक-प्रकारचा अहंभाव निर्माण व्हायला लागतो. ‘आमचा संप्रदाय सर्वांत श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ’, असा भेदभाव त्यांच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे सगळीकडे समभावाने पहाणे सांप्रदायिक साधना करणार्यांना कठीण जाते. ‘हे विश्वचि माझे घर’ हा भाव ठेवण्यात अल्प पडतो आणि अन्य संप्रदायांविषयीही आत्मीयता वाटत नाही. वास्तविक साधनेचा उद्देश ‘अहंभाव नष्ट करणे आणि मनाने व्यापक होणे’, हा आहे. सांप्रदायिकतेमुळे तो साध्य करण्यास कठीण जाते.
अर्थात् काहीच साधना न करण्यापेक्षा सांप्रदायिक साधना करणे म्हणजे आध्यात्मिक शिडीच्या पहिल्या पायरीवर चढण्यासारखे आहे; पण अध्यात्मात प्रगती करायची असेल, तर सांप्रदायिक साधनेत अडकणे टाळायला हवे.
३. गुरु करणे
साधनेतील पुढची चूक आहे, ‘गुरु करणे’. खरेतर आपण गुरु करायचे नसतात, तर गुरुंनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करायचा असतो. आपल्या आध्यात्मिक मर्यादांमुळे एखादी व्यक्ती खरेच गुरु आहे का ? किंवा संतपदाची अधिकारी आहे का ?, हे आपल्याला समजू शकत नाही. डॉक्टर, अधिवक्ता यांच्याकडे त्यांच्या पदव्यांची प्रमाणपत्रे असतात; परंतु अध्यात्म हा शब्दाच्या पलीकडचा विषय आहे, तिथे आपण कोणते प्रमाण मानायचे ? सध्याच्या काळात ९८ टक्के लोक जे साधू-संत वाटतात, ते भोंदूच असतात. अशा वेळी गुरु करण्यापेक्षा आपण शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
‘शिष्य कसे बनायचे ?’, यासाठी समर्थ रामदासस्वामी लिखित ‘श्री दासबोध’ आणि सनातनचा ग्रंथ ‘शिष्य’ यांमध्ये शिष्याचे जे गुण दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास आपण करू शकता. शिष्याचे गुण आपल्यात आले की, गुरु स्वतःहून आपल्या जीवनात येतात. जसे एखादा विद्यार्थी हुशार असेल, तर शिक्षक स्वतःहून त्याच्याकडे विशेष लक्ष देतात, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने शिष्याचे गुण अंगी बाणवले, तर गुरुतत्त्वच त्याला पुढचे दिशादर्शन करते.
४. स्वतःला साधक समजणे
साधनामार्गावर होणारी पुढची चूक आहे, ‘स्वतःला साधक समजणे.’ अध्यात्मात थोडेसे काहीतरी केले, दोन-चार पोथ्या वाचल्या किंवा प्रतिदिन स्तोत्रे म्हटली, पूजा केली की, काही जणांना आपण साधक आहोत’, असे वाटते. अशा विचारप्रक्रियेमुळे साधनेच्या प्रयत्नांना खीळ बसून आध्यात्मिक उन्नती थांबू शकते. साधक कुणाला म्हणावे, तर प्रतिदिन २ – ३ घंटे तरी योग्य मार्गाने साधना करणार्याला साधक समजू शकतो.
साधनेत होणार्या या मूलभूत चुका आपण समजून घेतल्या. त्या टाळण्याचा आपण प्रयत्न करूया.