सनातन संस्था ही एक अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे, तसेच साधकांना वैयक्तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्वरप्राप्तीची वाट दाखवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. भारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी आहे. जगभरातून लोक मनःशांतीसाठी भारतात येतात. सनातन संस्कृती हा भारताचा आत्मा आहे; पण दुर्दैवाने अध्यात्म किंवा साधना यांचे शिक्षण न मिळाल्यानेच आज आपली कस्तुरीमृगासारखी अवस्था झाली आहे. ज्याप्रमाणे कस्तुरीमृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते; पण तो मृग म्हणजे हरीण कस्तुरीच्या शोधासाठी धावाधाव करते. त्याचप्रमाणे आपण सर्व जण आनंदाचा शोध घेत आयुष्यभर धावतो; पण हा आनंद काही आपल्याला कायम अनुभवता येत नाही. आनंदाचे अगदी मोजके क्षण आपल्या वाट्याला येतात. याचे कारण म्हणजे आपल्याला आनंद कसा मिळवायचा हे कुठे शिकवलेले नसते, तसेच इंद्रियजन्य सुखालाच बहुतेक वेळा आनंद मानले जाते.
पंचज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी यांद्वारे जे अनुभवतो ते सुख असते, ते क्षणिक असते. उदाहरण द्यायचे झाल्यास, मनपसंत पक्वान्न खाणे हे जीभेने अनुभवतो; पण तो पदार्थ आपण ठराविक प्रमाणातच खाऊ शकतो, पर्यटनस्थळी जाऊन डोळ्यांनी निसर्ग सौंदर्य पहातो; पण हे आपण २४ घंटे करू शकत नाही. एखादे कोडे सोडवल्यावर आपल्याला आनंद मिळतो; पण तो किती काळ टिकतो?; कारण ते बुद्धीचे सुख असते. चांगले गाणे ऐकल्यावर मनाला आनंद मिळतो; पण ते गाणे १०-२० वेळा ऐकल्यावर आपल्याला तेवढाच आनंद मिळतो का?, तर ‘नाही’ ! याचे कारण ते क्षणिक असते.
पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे जे सुख अनुभवतो ते क्षणिक असते; कारण त्याला मर्यादा आहेत. पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे जे अनुभवतो त्याला आनंद म्हणतात; कारण तो आत्म्याकडून मिळतो. आत्म्यालाच आपण ईश्वर म्हणतो. आत्म्याकडून मिळणारे सुख २४ घंटे मिळणारे असतो. ते चिरंतन टिकणारे असते. ते कधी न संपणारे असते. तो आनंद अमर्याद असतो, ज्याच्या आपण शोधात असतो. त्यासाठी साधना करायची असते.
निसर्गसौंदर्य पहाणे, नवीन कपडे खरेदी करणे, यांतून आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र यातील कोणतीही गोष्ट सतत करणे शक्य नसते. आपण तत्कालीक सुखाच्या मागे धावतो त्यामुळे काही काळाने त्यातून आनंद मिळेनासा होतो आणि मन अस्वस्थ किंवा निराश होते. काही जणांच्या जीवनातील निराशेचे प्रमाण इतके वाढते की, ते एखाद्या व्यसनाच्या अधीन होतात किंवा आत्महत्येसारखे चुकीचे पाउल उचलतात. याचे मुख्य कारण म्हणजे, आनंद हा आत्म्याला येणारा अनुभव आहे, हेच आपल्याला ठाऊक नसते; पण व्यक्ती जेव्हा सत्-चित्-आनंद स्वरूप ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या आनंदावस्थेमध्ये वाढ होते. अर्थात् हा सगळा अनुभवण्याचा म्हणजे प्रत्यक्ष कृती करून अनुभूती घेण्याचा विषय आहे.
धर्मशास्त्रात ईश्वरप्राप्तीचे म्हणजे आनंदप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत; पण या सहस्रो साधनामार्गांपैकी नेमक्या कोणत्या साधनेला आज प्रारंभ करावा, हे बहुतेकांना ठाऊक नसते. त्यामुळे बरेच जण त्यांना जे आवडते किंवा जसे वाटते, त्याप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करतात. जे प्रत्यक्ष साधना करत नाहीत, त्यांना अध्यात्म या विषयीची नुसती माहिती ऐकून काहीएक लाभ होत नाही. अयोग्य प्रकारे साधना करणार्यांनाही होत नाही. उलट अशांची साधना योग्य प्रकारे होत नसल्याने अनुभूती येत नाहीत आणि अशांचा अध्यात्मावरचा विश्वासही अल्प होऊ लागतो. देवळातील कीर्तन-प्रवचन यांना जाणार्या बर्याच जणांना वाटते की, आपण साधना करतो. धार्मिक पुस्तकांचे वाचन आणि अभ्यास करणार्यांनाही वाटते की, आपल्याला अध्यात्मातले थोडे-फार कळते; पण खरे म्हणजे वरील दोन्ही उदाहरणांमध्ये बहुधा तसे नसते. पोहण्याविषयीचे उत्तम प्रवचन ऐकले किंवा त्याचे चांगले पुस्तक वाचले तरी त्याला त्यातून प्रत्यक्षात पोहण्याचा आनंद मिळत नाही, त्याचप्रमाणे केवळ कीर्तन आणि प्रवचन यांना जाणारे किंवा पुस्तकांचे वाचन करणारे यांच्याकडून खरीखुरी साधना होत नसते. साधना म्हणजे नेमके काय आणि योग्य साधना कशी करावी, हे सर्वांना कळावे, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचने आणि सत्संग घेतले जातात.
१. सनातन संस्था आणि संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून व्यक्तीची जलदमार्गाने उन्नती करणार्या साधनेविषयी मार्गदर्शन केले आहे. व्यक्तीची शीघ्र आध्यात्मिक उन्नती करणारा ‘गुरुकृपायोग’ त्यांनी सांगितला आहे.
ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा संगम असलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना करून अनेक साधकांनी आध्यात्मिक प्रगती करून मनुष्यजीवनाचे सार्थक केले आहे. स्वतः परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या वयाच्या ४५ व्या वर्षी साधनेला आरंभ करून अवघ्या काही वर्षांमध्येच अध्यात्मातील सर्वोच्च शिखर गाठले. परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आहेत. मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्ष १९७१ ते १९७८ या कालावधीत इंग्लंडमध्ये त्यांनी संमोहन-उपचारपद्धतीवर संशोधन केले आणि निरनिराळ्या शास्त्रीय परिषदांमध्ये शोध-प्रबंध वाचले. वर्ष १९७८ मध्ये मुंबईला परतल्यानंतर त्यांनी संमोहन उपचारतज्ञ म्हणून व्यवसाय चालू केला आणि संशोधन चालू ठेवले. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी ‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था’ या संस्थेची स्थापना केली आणि या विषयावर एक ‘जर्नल’ म्हणजे नियतकालिक चालू केले, तसेच संमोहन-उपचारपद्धतीचे अभ्यासवर्ग भारतात ठिकठिकाणी घेतले. वर्ष १९६७ ते १९८२ अशी १५ वर्षे मानसिक विकारांवरील संमोहन उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, जवळपास ३० टक्के रुग्ण नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाहीत आणि बरे न झालेल्या रुग्णांपैकी काही जण तीर्थक्षेत्री गेल्यामुळे, तर काही जण कुणा संतांकडे गेल्यामुळे आणि काही जण नारायण-नागबळीसारखे धार्मिक विधी केल्यामुळे बरे झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मूळातच संशोधक वृत्ती असल्याने त्यांनी या सर्वांचा अभ्यास केला. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, शारीरिक आणि मानसिक वैद्यकीय शास्त्रांपेक्षा उच्च प्रतीचे असे एक शास्त्र आहे आणि ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. तेव्हा म्हणजे वर्ष १९८२ मध्ये ते आस्तिक झाले. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांनी अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला आणि अनेक संतांकडे जाऊन शंकानिरसन करून घेतले, स्वतः साधना केली आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ रुग्णांनाच नाही, तर सर्वांना व्हावा; म्हणून अध्यात्मशास्त्रावर वर्ष १९८७ मध्ये एक ग्रंथ लिहिला. त्यांचे ग्रंथलिखाणाचे कार्य आजही चालू आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत सनातनच्या ३२२ ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी (सर्व भाषा सांगणे कठीण झाल्यास २-३ सांगून मग भारतीय आणि विदेशी भाषांत असे सांगू शकतो.) या १७ भाषांत ७८ लाख ५४ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. अजूनही त्यांचे ग्रंथलिखाणाचे कार्य चालू आहे. त्यांच्या प्रेरणेतून सत्संग, बालसंस्कारवर्ग, सनातन प्रभात नियतकालिके, संकेतस्थळ, ग्रंथ, तसेच संशोधनपर साहित्य आदी माध्यमांतून अध्यात्मप्रसाराचे कार्य व्यापक स्वरूपात चालू आहे.
२. अध्यात्माचे महत्त्व
२ अ. प्राणीमात्रांचे ध्येय – चिरंतन आणि सर्वोच्च आनंदाची प्राप्ती
आपण आपापली कामे सोडून इथे का जमलो आहोत ? इथे काहीतरी शिकता येईल आणि त्यातून आपणाला सुख मिळेल, या अपेक्षेनेच आपण सर्वजण इथे जमलो आहोत. किडामुंगीपासून प्रगत मानवप्राण्यापर्यंत प्रत्येक प्राणी, सर्वोच्च सुख सातत्याने कसे मिळेल, यासाठीच धडपडत असतो; पण सुख कसे मिळवायचे, हे शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये शिकवले जाते नाही.
सर्वोच्च आणि सातत्याने टिकणार्या सुखास ‘आनंद’ असे म्हणतात. हा आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. या प्रवचनातून आपण काळानुसार आवश्यक असणार्या साधनेचे एक एक टप्पे जाणून घेणार आहोत.
२ आ. जीवनातील ८० टक्के समस्यांचे कारण आध्यात्मिक
सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात २० टक्के समस्या शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे निर्माण होतात, ३० टक्के समस्या शारीरिक किंवा मानसिक तसेच आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात, आणि उरलेल्या ५० टक्के समस्या निवळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. म्हणजेच जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण आध्यात्मिक असते. त्यामुळे त्यावर आध्यात्मिक उपाय म्हणजे साधनाच करणे आवश्यक असते. साधनेमुळे या आध्यात्मिक समस्या सुटतात किंवा त्या सहन करण्याची म्हणजेच प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळते. ऐहिक सुख इच्छिणार्यांना सकाम साधनेने सुख मिळते तसेच त्यांच्या दुःखात घट होते, तर पारमार्थिक आनंद इच्छिणार्यांना निष्काम साधनेने आनंदावस्था अनुभवता येते.
२ इ. कलियुगात नामस्मरण ही साधना
भगवंताच्या प्राप्तीसाठी करायच्या उपासना युगपरत्वे वेगवेगळ्या सांगितल्या आहेत. सत्ययुगात सर्व जण सोऽहं भावात होते. तेव्हा ज्ञानमार्गाने ईश्वराचे स्वरूप जाणून घेतले जायचे. त्रेतायुगात तपश्चर्या, तर द्वापारयुगात कर्मकांड हे मुख्य साधनामार्ग होते. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. तसेच श्रीमद़्भगवद़्गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्णाने ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि’ असे म्हटले आहे. याचाच अर्थ, कलियुगात नामजप हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे. नामजपाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्थळ, काळ यांचे बंधन नाही, म्हणजे उठता-बसता, प्रवास करतांना, घरातील किंवा कार्यालयीन कामे करतांना आपण नामस्मरण करू शकतो.
२ ई. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र
काही जणांना वाटू शकेल की, आम्ही तर देवाचे करतोच !; तर आम्हाला सत्संगांची आवश्यकता काय ?; पण देवाचे जे करतो, ते कालानुरुप योग्य करतो कि नाही आणि अध्यात्मात पुढच्या पुढच्या टप्प्याला जातो कि नाही, हे पहाणेही महत्त्वाचे असते. जसे व्यावहारिक शिक्षणात पहिलीतून दुसरीत आणि दुसरीतून तिसरीत जाणे असे असते, तसेच अध्यात्मातही टप्पे असतात. बरेच जण अध्यात्मविषयक कथा, कीर्तने, प्रवचने आणि व्याख्याने ऐकतात, तसेच ग्रंथवाचन करतात; पण प्रत्यक्ष कृतीत तितकेसे उतरत नाही. अध्यात्म कृतीत आणण्याकडे लक्ष दिले नाही, तर नुसती तात्त्विक माहिती समजून घेणे अनंत काळ चालू राहील. अध्यात्म म्हणजे अनंताचे ज्ञान आहे. अध्यात्मात तात्त्विक विषय समजणे महत्त्वाचे नसून अध्यात्माचे जीवनातील महत्त्व समजणे आणि प्रत्यक्ष साधना करून त्याचा अनुभव घेणे, म्हणजे अध्यात्म जगणे महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनीही म्हटले आहे ‘एक तरी ओवी अनुभवावी !’ अध्यात्म हे प्रायोगिक आणि अनुभूतीचे शास्त्र आहे. साधना केल्याविना अनुभूती येणार नाहीत; म्हणून आपण साधना करायची म्हणजे नेमके काय करायचे, हे प्रामुख्याने समजून घेणार आहोत.
३. पितृदोष आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व
आजच्या प्रवचनामध्ये आपण पितृदोष आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व समजून घेणार आहोत.
३ अ. पितृदोष म्हणजे काय ?
सर्वप्रथम आपण पितृदोष म्हणजे काय, ते पाहूया. आपल्या हिंदु संस्कृतीत मातृ-पितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. हिंदु धर्मात जी चार ऋणे सांगितली आहेत, त्यामध्ये पितृऋण हे एक ऋण आहे. जिवंतपणी माता-पित्यांची सेवा करणे आणि मृत्यूनंतर पितृलोकातून त्यांना मुक्त करण्यासाठी श्राद्धादि धार्मिक विधी करणे यांद्वारे पितृऋणातून मुक्त होता येते. आपण पूर्वजांची संपत्ती-मालमत्ता वापरत असतो; मात्र त्यांना पितृलोकातून मुक्ती मिळण्यासाठी काही करत नाही. आजच्या आधुनिक काळात तर आपल्या पूर्वजांविषयीही कृतज्ञतेची भावना राहिलेली नाही. बहुतांश लोक पूर्वजांच्या मुक्तीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ते आपल्यावर रागावतात आणि आपण त्यांच्या मुक्तीसाठी काही तरी प्रयत्न करावेत या उद्देशाने आपल्या सांसारिक जीवनात अडचणी निर्माण करतात. या अडचणींच्या निमित्ताने समाजातील लोक त्यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न शोधू लागतात. जे पूर्वजांचे स्मरण ठेवून नियमित श्रद्धापूर्वक धार्मिक कृती करतात, त्यांचे निश्चितच कल्याण होते.
३ आ. पूर्वजांच्या त्रासाची लक्षणे
आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे कि नाही, हे ओळखण्याची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक अशी काही लक्षणे आहेत, ती आपण जाणून घेऊया. शरिराला असाध्य रोग किंवा आजार उद़्भवणे, त्वचाविकार होणे, सर्पदंश होणे, ही पितृदोषाची काही शारीरिक स्तरावरची लक्षणे आहेत. मन अशांत, अस्वस्थ रहाणे, भय वाटणे, दचकणे, बडबडणे, भास होणे, वाईट स्वप्न पडणे, निद्रानाश होणे, लग्नकार्यात अडथळा येणे, विवाह झाल्यास पती-पत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, वारंवार कारण नसतांना गर्भपात होणे, मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग मूल जन्माला येणे, अपत्य बालपणीच मृत्यूमुखी पडणे, पैसा असूनही घरात समाधान नसणे, पैसे पुरे न पडणे, अशा प्रकारचे त्रास होतात. या लक्षणांचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की, कलियुगात कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच पूर्वजांचा त्रास असतो. तो त्रास दूर व्हावा आणि पितरांना गती मिळावी; म्हणून अगदी सोपा आणि सहज उपाय आहे, तो म्हणजे प्रत्येकाने प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ असा नामजप करावा.
३ इ. दत्ताचा नामजप कुणी आणि किती करावा ?
आता आपण जे पूर्वजांचे त्रास पाहिले, तसा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल, तर तो पुढे होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास होत असल्यास कमीत कमी १ ते २ घंटे दत्ताचा नामजप करावा. मध्यम त्रास असेल, तर २ ते ४ घंटे नामजप करावा, तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन ७ प्रदक्षिणा घालाव्यात. तीव्र त्रास असेल, तर ४ ते ६ घंटे नामजप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती यांसारखे विधी या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीला विचारून घेऊन करावेत. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा. आता आपल्याला असे वाटू शकेल की, नामजप करण्यासाठी एवढा वेळ काढायचा कसा ? तर त्याचे उत्तर म्हणजे प्रत्यक्ष नामजप करायला आरंभ करणे. नामजपाला स्थळ, काळ आणि वेळ यांचे बंधन नाही. नामजप साधना आपण कोणत्याही वेळी करू शकतो. नामजपाला शौच-अशौचचेही बंधन नाही. जेव्हा आपण बौद्धिक काम करत नसतो, तेव्हा आपण मनातल्या मनात नामजप करू शकतो. उदाहरणार्थ आंघोळ करतांना, वैयक्तिक आवरतांना, स्वयंपाक करतांना, प्रवास करतांना, केर काढतांना, व्यायाम करतांना आपण नामजप करू शकतो. आपण प्रत्यक्ष नामजप करायला आरंभ केला की, आपल्याला लक्षात येईल की, आपल्याला नामजप करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. अर्थात् जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे, तेवढा वेळ आपल्याला बसून आणि एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे.
३ ई. दत्ताच्या नामजपाचे महत्त्व
आज समाजातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात. मायेत गुरफटलेले असल्यामुळे त्यांच्या इच्छा-वासना मृत्यूनंतरही तशाच रहातात. अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात म्हणजे मृत्युलोकात अडकतात. ‘पूर्वजांना गती देेणे’, हे श्री दत्ततत्त्वाचे विशेष कार्यच असल्याने दत्ताच्या नामजपाने अल्प कालावधीत लिंगदेहाला, तसेच वातावरणकक्षेत अडकलेल्या त्याच्या इतर पूर्वजांना गती मिळते. दत्तगुरुंचा नामजप मनापासून आणि एकाग्रतेने होण्यासाठी प्रयत्न करावेत. जसे श्री गणपति ही बुद्धीची, श्री सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे, त्याप्रमाणे श्री दत्तगुरु ही पूर्वजांना मुक्ती देणारी देवता आहे. दत्ताच्या नामजपाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होते. नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते. नामजप करण्यापूर्वी श्री दत्तगुरूंना प्रार्थना करू शकतो, उदा. ‘हे दत्तात्रेया, भुवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे. हे दत्तात्रेया, अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून तू माझे रक्षण कर. तुझे संरक्षण-कवच माझ्याभोवती सदोदित असू दे’.
आपण येत्या आठवड्याभरामध्ये श्री दत्तगुरुंचा ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप अधिकाधिक वेळ आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. www.sanatan.org या संकेतस्थळावर पितृदोष, दत्तगुुरुंचा नामजप, अध्यात्माचे महत्त्व, विज्ञानाच्या मर्यादा अशी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. www.sanatanshop.com या संकेतस्थळावर आनंदी जीवनासाठी अध्यात्म, सुगम अध्यात्मशास्त्र, आचारधर्म, हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ आदी विविध विषयांवरील ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण आवर्जून त्याचा लाभ घ्यावा.
४. आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व
४ अ. कोरोना महामारी आणि तिसर्या महायुद्धाची नांदी
आपण गेल्या काही महिन्यांपासून पहात आहोत की, कोरोना नामक सूक्ष्म विषाणूने जगभरात हाहाःकार माजवला आहे. ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गामुळे २६ सप्टेंबरपर्यंत जवळपास १० लाख (नेमका आकडा – ९ लाख ८८ सहस्र ५३२) मृत्यू झाले आहेत. एकट्या भारतात साधारण १ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे (नेमका आकडा – ९२ सहस्र २९०), तर जगभरात साधारण सव्वा तीन कोटी लोक (नेमका आकडा ३ कोटी २४ लाख ६० सहस्र १२७) बाधित झाले आहेत. त्याचप्रमाणे अनेक देशांतील राजकारण्यांच्या विस्तारवादी भूमिकेमुळे, दुसर्या देशांची भूमी बळकावून अस्थिरता निर्माण केली जात आहे. यामुळे संपूर्ण जगामध्येच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आपण पहात आहोत. भारत-चीन सीमेवरही तणाव वाढत आहे. एकप्रकारे संपूर्ण जगच दोन गटांमध्ये विभागले जात आहे. त्यामुळे तिसर्या महायुद्धाचा भडका कधी उडेल, हे सांगता येणार नाही. वरकरणी ही सर्व परिस्थिती भौतिक वाटली, तरी हा कालचक्राचा परिणाम आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
४ आ. द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांचे आपत्काळाविषयीचे संकेत
१. तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर असेल की, त्यापुढे पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील ! – नॉस्ट्रॅडॅमस
२. तिसरे महायुद्ध अतिशय महाभयंकर असेल. मोठ्या प्रमाणात संहार होईल. गावेच्या गावे उद़्ध्वस्त होतील. यातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळ असणेच आवश्यक आहे. – परात्पर गुरु डॉ. आठवले
अनेक द्रष्टे साधू-संत, भविष्यवेत्ते यांनी यापूर्वीच महाभीषण आपत्काळाविषयी सूचित केले आहे. चारशे वर्षांपूर्वी नॉस्ट्रॅडॅमस नामक प्रसिद्ध द्रष्टा फ्रान्समध्ये होऊन गेला. त्याने बरीच भविष्ये वर्तवली, ती तंतोतंत खरी झाली. त्याने पहिल्या आणि दुसर्या महायुद्धांविषयी जे सांगितले, तसेच वास्तवात घडले. नॉस्ट्रॅडॅमस यांनी तिसर्या महायुद्धाविषयीही सांगितले आहे, ‘हे तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !’ या भाकितावरून आगामी विश्वयुद्धाची भयावहता आपल्या लक्षात येऊ शकेल. भारतातीलही बर्याच संतांनी अशाच प्रकारे सांगितले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही तिसर्या महायुद्धाविषयी सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘तिसरे महायुद्ध अतिशय महाभयंकर असेल. यात खूप मोठ्या प्रमाणात संहार होणार आहे. गावेच्या गावे उद़्ध्वस्त होतील. यातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळ असणेच आवश्यक आहे. वर्ष २०२० ते २०२३ हा आपत्काळ आणि युद्धकाळ असेल. त्यानंतर वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची म्हणजे रामराज्यासम असणार्या ईश्वरी राज्याची स्थापना होईल.’ या काही उदाहरणांतून आपल्या लक्षात येईल की, आपत्काळाला आरंभ झाला असून कोरोना महामारी ही त्याची केवळ एक झलक आहे. वर्षभरापूर्वी कुणी विचारही केला नसेल की, एखादा सूक्ष्म विषाणू संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प करेल; पण संत त्रिकालदर्शी असल्याने ते काही संकेत देऊन आपल्याला सावध करत असतात. हे संकेत ओळखून संतांचे आज्ञापालन केले, तर आपत्काळ सुसह्य होतो.
४ इ. आपत्काळ हा कालचक्राचा परिणाम
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. बेरोजगारी, महागाई यांचा थेट परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर होतो. ही स्थिती पालटून ती पूर्ववत् कधी होईल, याविषयी कुणीही निश्चितपणे काही सांगू शकत नाही. सर्व जण कोरोनाच्या लसीची वाट पहात असले, तरी या लसीमुळे एकदम चित्र पालटेल, असे आजतरी दिसत नाही. कालचक्राचा हा परिणाम आहे. कलियुगांतर्गत कलियुगांर्तगत कलियुग समाप्त होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग चालू होण्याचा हा काळ आहे. याला संधीकाळ असे म्हटले जाते. हा बाह्यतः कठीण काळ दिसत असला, तरी या काळात साधना केल्याने त्याचे आध्यात्मिक फळ अनेक पटींनी मिळते. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आपल्याकडे मोबाईल, टी.व्ही., इंटरनेट यांसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पुढे कोरोनापेक्षाही भीषण आपत्काळाला सामोेरे जावे लागले, तर त्या काळात या सर्व सुविधाही बंद होतील. अशा वेळी मनाची स्थिरता ठेवण्यासाठी आत्मबल अतिशय चांगले असणे आवश्यक आहे. हे आत्मिक बळ वाढवण्यासाठी साधनाच करायला हवी.
४ ई. आपत्काळात भगवंत भक्तांची काळजी घेतो
साधनेचे बळ असले की, ईश्वर कशी काळजी घेतो किंवा भक्ताच्या रक्षणासाठी अवतीर्ण होतो, याची उदाहरणे आपल्या ग्रंथांमध्ये, तसेच पुराणांमध्ये आहेत. आपल्या सगळ्यांना भक्त प्रल्हादाची गोष्ट माहीत असेल. भक्त प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूने अतिशय छळ केला. प्रल्हादाने देवतांचा वर मिळवून अहंकारी बनलेल्या हिरण्यकश्यपूला सर्वश्रेष्ठ न मानता, श्री विष्णूचे नामस्मरण चालू केले. त्याने तो नामजप करू नये; म्हणून त्याला उकळत्या तेलात टाकले, उंच कड्यावरून ढकलून दिले, तसेच उन्मत्त हत्तीच्या पायाखाली दिले; पण प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण झाले. त्याला या भीषण संकटांची झळही पोचली नाही. उलट भगवान श्रीविष्णू भक्त प्रल्हादासाठी नृसिंह रूप घेऊन अवतीर्ण झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा नाश केला. या केवळ पुराणातल्या कथा आहेत, असे नाही, तर आजच्या काळातही अनेकांनी ईश्वराच्या कृपेच्या बुद्धीपलीकडच्या अनुभूती घेतल्या आहेत. जसे जात्यामध्ये सर्व दाणे भरडले जातात; पण खुंटीजवळचे दाणे तसेच रहातात. त्याप्रमाणे आपणही साधनारूपी खुंटीला धरून राहिलो, तर आपत्काळरूपी जात्यात आपण भरडले जाणार नाही. साधनेशिवाय गती नाही, गतीशिवाय उद्धरणे नाही. उद्धरल्याशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय मोक्ष नाही, असे संतांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच जीवनात अध्यात्माचा पुरस्कार केला पाहिजे, नाहीतर ‘नरजन्मा आला आणि फुका गेला’, अशी स्थिती होण्याची शक्यता अधिक आहे.