स्वयंभू गणेशमूर्तीचे महत्त्व
श्री विघ्नेश्वर, श्री गिरिजात्मज आणि श्री वरदविनायक यांच्या मूर्ती स्वयंभू आहेत. घडवलेल्या श्री गणेशमूर्तीपेक्षा स्वयंभू गणेशमूर्तीत चैतन्य अधिक असते. स्वयंभू गणेशमूर्तीचे वातावरणशुद्धीचे कार्य अनंत पटींनी अधिक असते. अशी मूर्ती एकाच वेळी सर्व दिशांनी सारख्या प्रमाणात सात्त्विकता प्रक्षेपित करू शकते.
स्वयंभू श्री गणेशमूर्ती श्री वरदविनायक, महड
१. वैशिष्ट्ये
अ. ‘स्वयंभू गणेशमूर्ती निसर्गाने ईश्वराच्या इच्छेने घडवलेली असल्याने मानवाने घडवलेल्या मूर्तीपेक्षा त्यात चैतन्य अधिक असते.
आ. अशा मूर्तीत निर्गुण तत्त्व, म्हणजेच श्री गणेशाच्या मूलतत्त्वाचे प्रमाण पुष्कळ असते. ती तेजतत्त्वाच्या पुढच्या टप्प्याला (उदा. वायू, आकाश) कार्य करणारी असते.
इ. स्वयंभू गणेशमूर्तीचे चैतन्य टिकण्याचा कालावधीही मानव-निर्मित मूर्तींपेक्षा अधिक असतो.
ई. स्वयंभू गणेशमूर्तीत एखाद्या अवयवाची (उदा. सोंड, कान, डोळे आदी) घडण अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य नसली, तरी त्यात श्री गणेशतत्त्व कार्यरत असते; कारण या मूर्तीला स्थळ आणि काळ यांचे बंधन नसते. याउलट मानव-निर्मित गणेशमूर्तीचे सर्व अवयव धर्मशास्त्रानुसार घडवले असतील, तरच त्यात श्री गणेशतत्त्व येते.
उ. ही मूर्ती काळाला अनुसरून उत्पन्न झालेली असते.
ऊ. स्वयंभू गणेशमूर्तीत गणेशतत्त्व मूलतः कार्यमान असते. याउलट मानव-निर्मित गणेशमूर्तीत पूजापाठ किंवा प्राणप्रतिष्ठा करून ते आणावे लागते.
२. महत्त्व
अ. मानव-निर्मित मूर्ती सकाम साधनेत फलदायी असते, तर स्वयंभू गणेशमूर्ती निष्काम साधनेत फळ देणारी असते.
आ. स्वयंभू श्री गणेशमूर्तीचे क्षेत्र आणि वातावरण शुद्धीचे कार्यही अनंतपटीने अधिक असते. एकाच वेळी सारख्या प्रमाणात सर्व दिशांनी ती कार्य करू शकते.’
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.