‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सलग ३ वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन रामप्रहरी मिळाला. त्या वेळी त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुष्कळ ज्ञान दिले. त्यांनी माझी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करून घेऊन मला चैतन्य दिले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ३.३.२०१९ या दिवशी देहत्याग केला. त्यानंतरही मला ते सूक्ष्मातून चैतन्याच्या स्तरावर मार्गदर्शन करत आहेत. त्याविषयीचे कृतज्ञतापुष्प त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.
१. परात्पर गुरु पांडे महाराज असतांना ठरलेला नित्यक्रम
त्यांच्या देहत्यागानंतरही ‘भावप्रयोग’ म्हणून केल्याने प्रतिदिन
सकाळी चैतन्याने भारित होऊन दिवसाचा आरंभ आनंदाने होऊ लागणे
परात्पर गुरु पांडे महाराज (परात्पर गुरु बाबा) यांच्या देहत्यागानंतरही मी प्रतिदिन पहाटे उठून त्यांच्या खोलीजवळ न चुकता जातो. थोडा वेळ प्रार्थना करत ते खोलीबाहेर येण्याची वाट पहातो. त्यानंतर मी भाव ठेवून मानसरित्या पुढील कृती करतो, ‘सूक्ष्मातून खोलीचे दार उघडले असून त्यांची सेवा करणारा साधक त्यांच्या चपला दाराबाहेर ठेवत आहे. परात्पर गुरु बाबा पलंगावरून उठून काठी टेकत बाहेर येत आहेत. मी खाली उंबरठ्याच्या बाहेर बसून त्यांच्या रबरी चपला (‘स्लीपर’) घसरू नयेत; म्हणून हाताने त्या घट्ट पकडल्या आहेत. या वेळी माझा ‘मी गुरुपादुकांना नमस्कार करून त्या माझ्या हृदयाशी कवटाळल्या आहेत’, असा भाव असतो. त्यानंतर ‘परात्पर गुरु बाबा माझा हात घट्ट पकडून मला ज्ञानामृत देत फिरवत आहेत’, असा मला अनुभव येतो. नंतर खोलीत परत आल्यावर ‘मी त्यांच्या पादुका हातात घेऊन त्या जागेवर ठेवत आहे. ते पलंगावर बसल्यावर त्यांची चैतन्याने भारित झालेली काठी त्यांच्या हातातून घेऊन ठरलेल्या जागेवर ठेवत आहेे. त्यांचे पायमोजे काढतांना पुन्हा त्यांचा चरणस्पर्श होऊन माझ्यात चैतन्य आले आहे’, असा भावप्रयोग करतो.
पूर्वी ते असतांना मी वरील कृती स्थुलातून करत होतो; मात्र आता त्यांच्या खोलीजवळ गेल्यावर मी भावप्रयोग म्हणून प्रतिदिन तशाच सूक्ष्मातून कृती करतो. अशा रितीने प्रतिदिन सकाळी चैतन्याने भारित होऊन माझ्या दिवसाचा आरंभ आनंदाने होतो. त्यामुळे ‘परात्पर गुरु बाबा पूर्वी होते आणि आता नाहीत’, असा प्रश्न मला पडत नाही.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेले ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक श्रेष्ठ’, हे
अध्यात्माचे तत्त्व अनुभवायला मिळून परात्पर गुरु बाबांप्रती कृतज्ञताभाव जागृत रहाणे
परात्पर गुरु बाबांसारख्या उच्च कोटीच्या संतांनी देहत्याग केल्यावर चैतन्याच्या स्तरावर ‘ते साधनेत कसे साहाय्य करतात ? वातावरणातील चैतन्य कसे वाढवतात ?’, याची अनुभूती मला येत आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेले ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक श्रेष्ठ’, हे अध्यात्माचे तत्त्व मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळून परात्पर गुरु बाबांच्या चरणी कृतज्ञताभाव जागृत रहातो. मला त्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते की,
जरी पोरका झालो मी ‘बाबां’च्या सगुण देहाला ।
चैतन्याचा ठेवा माझ्यासाठी त्यांनी हो ठेविला ।
गुरुकृपेने माझ्या साधनेसाठी तो कार्यरत झाला ॥
३. देहत्यागानंतरही ‘परात्पर गुरु पांडे महाराज
चैतन्य रूपात समवेत आहेत’, याची अनुभूती येणे
परात्पर गुरु बाबांचा देहत्याग होण्यापूर्वी १ मास आधी पहाटे फिरत असतांना ते मला म्हणाले होते, ‘‘आता माझे वय झाले आहे. आता मी हिंदु राष्ट्रात नसणार, तर तुम्ही मला ‘फोन’ करून हिंदु राष्ट्राविषयी कळवत जा.’’ त्या वेळी मी म्हणालो, ‘‘बाबा, माझेही वय झाले आहे. त्यामुळे मीही तुमच्यासमवेतच असणार आहे, तर मी तुम्हाला ‘फोन’ कसा करणार ?’’ तेव्हा ते हसले आणि काहीच बोलले नाहीत. ते ‘परात्पर गुरु’ असल्यामुळे सत्यलोक या उच्च लोकात असणार आणि मी अधिकाधिक जनलोकापर्यंतच पोचू शकणार आहे. त्यामुळे ‘मी त्यांच्यासमवेत असेन’, हे माझे बोलणे किती चुकीचे होते’, हे आता माझ्या लक्षात आले; मात्र ‘मागील वर्षभर ते चैतन्याच्या रूपात माझ्या आणि साधकांच्या समवेत देवद आश्रमात आहेत’, असे आम्ही अनुभवले आहे.
४. ज्याप्रमाणे ‘रेंज’मध्ये असल्यास भ्रमणभाषवरून
व्यक्तीशी संपर्क साधता येणे शक्य असते, त्याप्रमाणे परात्पर गुरु
बाबांच्या ‘चैतन्याच्या ‘रेंज’मध्ये आल्यास त्यांचे चैतन्य आणि आनंद अनुभवू शकणे
परात्पर गुरु बाबा नेहमी म्हणत, ‘‘आत्मा ‘इंटरनेट’ असून तो सर्वांशी जोडलेला आहे, म्हणजेच आत्मा परमात्म्याशी जोडलेला आहे. आपल्याला केवळ साधना करून आत्म्यावरील आवरण काढावयाचे आहे. ते काढले की, आत्मा परमात्म्याशी, म्हणजे चैतन्य चैतन्याशी जोडले जाते.’ ‘आपण भ्रमणभाषवरून बोलतांना ‘रेंज’मध्ये असलो, तरच दुसर्यांशी बोलू शकतो. त्याचप्रमाणे आपण परात्पर गुरु बाबांच्या ‘चैतन्याच्या ‘रेंज’मध्ये, म्हणजे त्यांच्या ‘चैतन्याच्या क्षेत्रा’त आलो, तर त्यांचे चिरंतन चैतन्य आणि आनंद अनुभवू शकतो’, असे वाटते.
५. देहत्यागापूर्वी ६ मास परात्पर गुरु बाबांनी संस्कृत
श्लोक आणि मंत्र यांच्या पठणाची सेवा करून घेणे, पठणाचा
सराव झाल्यामुळे नंतर समष्टीसाठी मंत्रजप करतांना सेवेतून आनंद मिळणे
देहत्यागापूर्वी ६ मास परात्पर गुरु बाबांनी मला भगवद्गीतेतील १५ वा अध्याय म्हणण्याची समष्टी सेवा दिली होती. मला संस्कृत येत नाही, तसेच कठीण आणि जोडशब्द नीट उच्चारता येत नाहीत; मात्र त्यांंच्या संकल्पामुळे मी श्लोक, तसेच काही मंत्र म्हणू लागलो अन् मला त्यांची गोडी लागली. त्यांच्या देहत्यागानंतर गुरुकृपेने मला समष्टीसाठी मंत्रजप म्हणण्याची सेवा मिळाली. तेव्हा परात्पर गुरु बाबांनी पठणाचा जो सराव करवून घेतला, तो उपयोगी पडला आणि त्या सेवेतूनही आनंद मिळाला. यावरून ‘उच्च कोटीचे संत कसे द्रष्टे असतात ?’ आणि ‘ते साधकांकडून चैतन्याच्या स्तरावर कशी सेवा करून घेतात ?’ याची अनुभूती मला घेता आली.
६. परात्पर गुरु बाबांच्या देहत्यागानंतर ‘समष्टी संतपद’
प्राप्त झाल्यावर ‘ते सोहळा पहाण्यास हवे होते’, असे विचार येणे
आणि ‘या टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांचे कृपाशीर्वाद लाभल्याची जाणीव
होऊन त्यांनी ‘तुम्ही संतपदाचा टप्पा गाठलेला आहे’, असे पूर्वीच सांगितल्याचे स्मरण होणे
१६.७.२०१९ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला ‘समष्टी संतपद’ मिळाल्याचे घोषित केले गेले आणि सन्मान सोहळा झाला. त्या वेळी बरेच साधक मला म्हणाले, ‘आता परात्पर गुरु बाबा असते, तर त्यांना पुष्कळ आनंद झाला असता. माझ्याही मनात तसा विचार येऊन गेला; मात्र नंतर याविषयी चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘माझी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी, म्हणजे मला त्या स्थितीला नेण्यासाठी परात्पर गुरु बाबांचे कृपाशीर्वादरूपी मोलाचे साहाय्य आहे. देहत्याग करण्यापूर्वी २ – ३ वेळा ते मला म्हणाले होते, ‘‘तुमची प्रगती होत आहे. तुम्ही संतपदाचा टप्पा गाठलेला आहे. मी उगीचच असे सांगूून तुम्हाला चढवत नाही. यापूर्वी मी असे कधी म्हणत नव्हतो; पण आता सांगत आहे.’’ यावरून ‘ते मला त्या स्थितीला नेण्यासाठी सतत साहाय्य करत होते’, असे लक्षात येते.
७. परात्पर गुरु बाबांचे आशीर्वाद, त्यांचे चैतन्य आणि त्यांनी
करवून घेतलेली मनाची सिद्धता यांमुळे विस्तृत लिखाण करता येऊ लागणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती, लेख किंवा कविता लिहिण्याची परात्पर गुरु बाबांकडून स्फूर्ती मिळते. ‘काही वेळा लेख आणि कविता आपोआप विस्तृत होत जातात’, याचे मला आश्चर्य वाटते. त्या लेखांचे प्राथमिक संकलन करणार्या साधिका सौ. आनंदी पांगुळ मला म्हणतात, ‘‘विस्तृत लेख आणि कविता पाहून मला परात्पर गुरु बाबांचीच आठवण येते. ते असेच विस्तृत लेख लिहायचे.’’ त्यावरून ‘परात्पर गुरु बाबांचे आशीर्वाद, त्यांचे चैतन्य आणि त्यांनी माझ्या मनाची करवून घेतलेली सिद्धता, यांमुळे माझ्याकडून हे लिखाण होते’, असे मला वाटते.
८. परात्पर गुरु बाबांचा सूक्ष्मातील सत्संग नित्य
लाभून त्यांची चैतन्यमय शिकवण सतत स्मरत रहाणे
देहत्यागानंतरही गुरुकृपेने माझ्यावर परात्पर गुरु बाबांच्या चैतन्याचा वर्षाव होत आहे. त्यांचा देहत्याग ते आताच्या या क्षणापर्यंत, त्यांना प्रार्थनेची साद घातल्याक्षणी ते सूक्ष्म रूपाने मला सत्संग देऊन मार्गदर्शन करतात. सहसाधकांनी सांगितले की, परात्पर गुरु बाबांनी देहत्याग करून वर्ष होत आल्याने त्यांचे पुण्यस्मरण जवळ आले आहे. त्या वेळी मला वाटले की, ‘त्यांनी देहत्याग करून वर्ष कधी संपून गेले’, ते मला कळलेच नाही. परात्पर गुरु बाबा नेहमी सांगत की,
‘ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ – ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी १
अर्थ : सर्व ठिकाणी कार्यप्रवण असणारा आत्मा हा स्वसंवेद्य आहे, म्हणजे तो चैतन्यमय असून इतका सामर्थ्यवान आहे की, त्याला अशक्य असे या जगात काहीच नाही. असा आत्मा स्वयंपूर्ण, स्वप्रकाशित आणि सामर्थ्यवान आहे.
ती विराट अशी चैतन्यशक्तीच कार्य करते. तिच्यापुढे बाकीच्यांचे काहीच चालत नाही. तिलाच पुढे आणून सेवा आणि साधना करा. बाकी सर्व माया आहे. ती जी भासमान आहे.’ याचा अनुभव त्यांच्या देहत्यागानंतरही सतत येत आहे.
९. अध्यात्मातील शिकवण स्वतः कृतीच्या स्तरावर आचरणारे परात्पर गुरु पांडे महाराज !
काही वेळेस कुणी साधक रुग्णाईत असल्यास किंवा एखाद्या साधकावर काही कठीण प्रसंग आल्यास त्याला भीती वाटते. तेव्हा मी त्यांना सांगतो की, सर्वांत अधिक भीती ही मरणाची असते; मात्र परात्पर गुरु बाबा यांनी शिकवले आहे, ‘अध्यात्मात ‘मृत्यू’ हा शब्द नाही. मृत्यू म्हणजे शरिराचे रूपांतर आहे. ‘आत्मा म्हणजे चैतन्य आहे, जे चिरंतन आणि आनंददायी आहे. चैतन्य केवळ साधनेने मिळते आणि वाढते. ते सर्व कणाकणांत भरलेले आहे.’
‘या मार्गदर्शनाप्रमाणे वागायला हवे’, हे परात्पर गुरु बाबांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले आहे. त्यांच्या पत्नी (कै. (सौ.) पांडेआजी) गेल्यावर दुसर्या दिवशी पहाटे ते नेहमीप्रमाणे फिरायला गेले आणि त्यांनी नित्य कर्मे केली.
१०. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय
आणि सिद्ध केलेले मंत्रजप आजही शेकडो साधकांसाठी उपयुक्त
ठरत असल्याने ते साधकांच्या रक्षणासाठी चैतन्यकवच बनलेले असणे
परात्पर गुरु बाबा म्हणजे प्रीतीचा सागर होते. साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर ते नामजपादी उपाय सांगायचे. शारीरिक आजार असल्यास विशिष्ट प्रकारची योगासने आणि व्यायाम करण्यास सांगायचे, तसेच घरगुती, तसेच आयुर्वेदाचे औषधोपचार करायलाही सांगायचे. मानसिक त्रासावर वेगवेगळे दृष्टीकोन देऊन ते उपाय सांगायचे, तसेच मंत्रजप सांगून ते साधकांकडून करवूनही घ्यायचे. त्यांनी सांगितलेले उपाय आणि सिद्ध केलेले मंत्रजप (उपचार) आताही शेकडो साधकांना उपयोगी पडत आहेत. अशा रितीने ‘ते आताही सूक्ष्मातून साधकांच्या रक्षणासाठी चैतन्यकवच बनले आहेत’, असे वाटते.
११. ‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रती गुरुभाव कसा ठेवावा ?’ याचा आदर्श साधकांना घालून देणे
परात्पर गुरु डॉक्टर भेटण्यापूर्वी परात्पर गुरु पांडे महाराज यांना पहिले गुरु होते. ते स्वतःही परात्पर गुरुपदावर आरुढ झालेले होते, तरीही त्यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रती गुरुभाव कसा ठेवावा ?’ याचा आदर्श आम्हा साधकांना घालून दिला आहे. ते नेहमी ‘परात्पर गुरु डॉक्टरांना ओळखणे’, हीच माझी साधना आहे’, असे म्हणत. त्यांचे प्रत्येक मार्गदर्शन आणि कृती यांमधून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला त्यांचा उच्च कोटीचा भाव प्रगट होत असतांना मी पाहिले आहे. माझ्या मनावरील त्या संस्कारामुळे गुरुस्तवन आणि गुरुस्मरण करण्यास मला आतासुद्धा प्रेरणा मिळते. एवढेच नव्हे, तर आताही ते सूक्ष्मातून प्रेरणा देऊन आमच्याकडून तसे करवून घेत आहेत. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
१२. परात्पर गुरु पांडे महाराज साक्षात् विष्णुस्वरुप परात्पर गुरु
डॉक्टर यांच्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सूक्ष्म रूपाने चैतन्याच्या स्तरावर कार्य
करत असून आता त्यांच्या सूक्ष्मातील कार्याला स्थळकाळाच्या मर्यादा राहिलेल्या नसणे
परात्पर गुरु बाबांचा स्थूल देह, वाणी आणि कृती यांमध्ये चैतन्यच चैतन्य आहे. ते चैतन्याच्या स्तरावर गुरुकार्य आणि समष्टी सेवा करत होते. त्यांनी देहत्याग करून आता एक वर्ष झाले आहे, तरी ते चैतन्याच्या स्तरावर सूक्ष्मातून आम्हा साधकांना साधनेत साहाय्य करत आहेत. साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात ते चैतन्याच्या स्तरावर सूक्ष्म रूपाने कार्य करत आहेत. आता त्यांच्या सूक्ष्मातील कार्याला स्थळकाळाच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. यासाठी म्हणावेसे वाटते की,
परात्पर गुरु बाबा चैतन्य पुरवती समष्टी कार्यासी ।
सूक्ष्मरूपे एकरूप झाले ते गुरूंच्या समष्टी रूपासी ॥
१३. समर्थांचे वचन स्वतःच्या आचरणातून दाखवणारे परात्पर गुरु पांडे महाराज !
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे की,
‘भला रे भला बोलती तें करावें ।
बहुतां जनांचे मुखें येश घ्यावें ॥
परी शेवटीं सर्व सोडोनी द्यावें ।
मरावें परी कीर्तिरूपें उरावें ॥’
अर्थ : समाजात लोक ‘भला’ म्हणतील, असे आचरण असावे. अनेक जणांच्या तोंडी तुमच्या यशाची चर्चा असावी; परंतु शेवटी सर्व (आसक्ती) सोडून द्यावी. देह त्यागला, तरी कीर्तीरूपाने अमर व्हावे.
हे समर्थ वचन परात्पर गुरु बाबांनी स्वतःच्या आचरणातून दाखवले. त्यामुळे त्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते, ‘देहा त्यागावे । परी चैतन्यरूपी उरावे ।’
१४. कर माझे जुळती ।
परात्पर गुरु बाबांंनी आम्हा साधकांना ज्ञानामृत देऊन आमची साधना करून घेतली. त्यांच्या चैतन्यमय शिकवणीमुळे आणि त्यांनी माझ्यासारख्या शेकडो साधकांच्या मनाची सिद्धता केल्यामुळे आम्हाला वर्षभर चैतन्याच्या स्तरावर साधना करता आली. आताही त्यांच्यातील चैतन्यशक्तीमुळे आमची साधना होत आहे. त्यासाठी म्हणावेसे वाटते की,
परात्पर गुरु बाबा साधकांना देती चैतन्याची प्रचीती ।
चरणी तयांच्या कोटीशः कृतज्ञता अन् शरणागतभावे कर माझे जुळती ॥
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१.२०२०)