अनुक्रमणिका
- १. श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत
- २. नवीन मूर्तीचे प्रयोजन
- ३. शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी
- ४. मूर्तीची आसनावर स्थापना
- ५. मध्यपूजाविधी
- ६. उत्तरपूजा (उत्तर आवाहन)
- ७. पूजेला लागणार्या साहित्याच्या सिद्धतेसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक !
- ८. विसर्जन
- श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध का असते ?
- श्री गणेश चतुर्थी या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्ज्य असणे
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
१. श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत
‘श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी. ज्या कुटुंबात एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे, त्या कुटुंबात ज्या भावामध्ये देवाविषयी अधिक भाव आहे, त्याच्याच घरी गणपति बसवावा.’
श्री गणेश चतुर्थी चलच्चित्रपट (Shri Ganesh Chaturthi Video)
२. नवीन मूर्तीचे प्रयोजन
पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे – श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.
श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ?
चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर आॅफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे !
मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी !
मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी !
परंपरा किंवा आवड यांप्रमाणे गणेशमूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्रसंमत गणेशमूर्ती पुजावी.
श्री गणेशाभोवती सजावट करतांना गणेशतत्त्व आकर्षित करणार्या आकृतीबंधाचा वापर करणे
आकृतीबंध
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. गणेशतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे गणपतीला लाल फूल, दूर्वा, शमीची पत्री, मंदारची पत्री इत्यादी वाहतात, तसे काही आकृतीबंधांमुळेही गणेशतत्त्व आकर्षित होण्यास साहाय्य होते. गणेशतत्त्वाला आकर्षित करणारा एक आकृतीबंध येथे दाखवला आहे. ही आकृती रांगोळी, गणपतीची आरास, तोरण इत्यादींमध्ये वापरल्यास गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होतो.
गणेशतत्त्व आकर्षित करणार्या रांगोळ्या पहाण्यासाठी ‘क्लिक’ करा !
३. शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी
‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्या, तिसर्या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.’
४. मूर्तीची आसनावर स्थापना
मूर्तीची आसनावर स्थापना करण्यापूर्वी तेथे थोडे तांदूळ का ठेवतात ?
पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते, त्यावर तांदूळ (धान्य) ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदुळाचा लहानसा ढीग करतात. तांदुळावर मूर्ती ठेवण्याचा फायदा पुढीलप्रमाणे होतो.
मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदूळ भारित होतात. सारख्या कंपनसंख्येच्या दोन तंबोर्यांच्या दोन तारा असल्या, तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसर्या तारेतूनही येतो. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की, घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात. अशा तर्हेने शक्तीने भारित झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात.
श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ?
शक्यतो गणेशमूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी.
अ. श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे.
आ. मूर्ती हातात घेणार्याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.
इ. मूर्ती आणतांना तिच्यावर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे. मूर्ती घरी आणतांना मूर्तीचे मुख आणणार्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी. मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्त्व, तर पाठच्या भागातून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत असते. मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो. तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे. मूर्तीचे मुख त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्त्वाचा लाभ होतो, तर इतरांना निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.
ई. श्री गणेशाचा जयजयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी.
उ. घराच्या उंबरठ्याबाहेर उभे रहावे. घरातील सुवासिनीने मूर्ती आणणार्याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे.
ऊ. घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी.
सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी. सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी. मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही, याची काळजी घ्यावी. मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रूमाल घालून ती झाकून ठेवावी. उंदराची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी.
गणेशमूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असावे ?
मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावी. पूजकाने पूजा करतांना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला येणार नाही, अशा पद्धतीने बसावे. पूजा करतांना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी यासाठी पुढील पर्याय आहेत –
1. मूर्तीचे मुख पश्चिमेला किंवा दक्षिणेला असल्यास पूजकाचे मुख आपसूकच अनुक्रमे पूर्व आणि उत्तर दिशेला होईल. पण
2. मूर्तीचे मुख पूर्वेला असल्यास पूजकाने पश्चिमेला मुख करून पूजा न करता मूर्तीच्या उजव्या हाताला उत्तरेकडे तोंड करून बसावे.
3. मूर्तीचे मुख उत्तरेला असल्यास पूजकाने दक्षिणेकडे मुख करून पूजा न करता मूर्तीच्या डाव्या हाताला पूर्वेकडे तोंड करून बसावे.
दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते, उदा. काली, हनुमान, नरसिंह इत्यादी. गणपतीची जी मूर्ती आपण आणतो, ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते; म्हणूनच शक्यतो तिला दक्षिणमुखी ठेवू नये.
५. मध्यपूजाविधी
गणपति घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरत्या आणि मंत्रपुष्प म्हणावे.
गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रतिदिन करावयाची पंचोपचार पूजा
अ. संध्याकाळी म्हणजे सात-साडेसात वाजता देवावरील वाहिलेली फुले काढून गंध, फुले, दुर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. पद्धतीप्रमाणे आरती करावी. यास पंचोपचार पूजा म्हणतात. रात्री झोपतेवेळी गजाननाची प्रार्थना करावी आणि त्यानेच आजच्या दिवसाची सेवा चांगली करून घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अन् शांत चित्ताने निद्राधीन व्हावे.
आ. प्रतिदिन षोडशोपचार पूजा जमली नाही, तरी वर सांगितल्याप्रमाणे पंचोपचार पूजा तरी करावी.
इ. पूजा झाल्यावर वेळ मिळाल्यास गणेशस्तोत्र, गणपति अथर्वशीर्ष, गणेश सहस्रनामावली म्हणावी. मुलांनाही स्तोत्रे शिकवावीत. दुर्वा निवडण्यास शिकवावे. फुले आणि पत्री यांची माहिती द्यावी. मुलींनी मोदक बनवण्यास शिकावे. (मुलांनीही शिकण्यास हरकत नाही.)
ई. गणेशमूर्तीसमोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा. फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावा आणि झाकून ठेवावा, नाहीतर थोड्या वेळाने वास येऊ लागतो अन् खाण्यासारखे रहात नाही. फळांची आणि पेढे इत्यादींची योग्य व्यवस्था करावी.
याप्रमाणे प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी.
६. उत्तरपूजा (उत्तर आवाहन)
अ. विधी
गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी – १. आचमन, २. संकल्प, ३. चंदनार्पण, ४. अक्षतार्पण, ५. पुष्पार्पण, ६. हरिद्रा (हळद)-कुंकूमार्पण, ७. दूर्वार्पण, ८. धूप-दीप दर्शन आणि ९. नैवेद्य. (पाठभेद : चंदनाच्याच वेळी हळद आणि कुंकू वाहतात.)
यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या आणि मूर्ती उजव्या हाताने हालवावी.
आ. महत्त्व
पूजेमुळे पूजा करणारा गणेशलहरींनी संपृक्त व्हावा, हा पूजेचा उद्देश असतो. संपृक्तता वाढवण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे उत्तरपूजा. उत्तरपूजेच्या वेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके एकदम बाहेर पडतात. उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती स्थानापासून थोडी हालवतात. त्यामुळे उरलीसुरली पवित्रके मूर्तीपासून दूर जातात, म्हणून ती पूजा करणार्याला मिळू शकतात. ‘श्री गणेशमंदिरात एका भक्ताची महापूजा बांधली की उत्तरपूजा करतात. मग दुसर्याची महापूजा करतात. येथेच उत्तरपूजेला विशेष महत्त्व आहे. ‘गणपतीला परत बोलावले आहे’, त्या अर्थी त्याला सन्मानाने परत पाठवणे (विसर्जन करणे) महत्त्वाचे ठरते.’
७. पूजेला लागणार्या साहित्याच्या
सिद्धतेसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक !
पूजेची सिद्धता (तयारी), पूजासाहित्याची सूची (यादी), पूजेच्या संदर्भातील काही सूचना आणि संपूर्ण पूजाविधी वाचण्यासाठी भेट द्या श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)
८. विसर्जन
उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी.
मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यामागील कारण
उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. वहात्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात आणि अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याकारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास साहाय्य होते.
विसर्जनाच्या वेळी जेथे विसर्जन केले, तेथील माती घरी आणून ती सर्वत्र शिंपडण्याची प्रथा आहे.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `श्री गणपति – भाग १’
श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध का असते ?
‘मूषकावर आरूढ असलेल्या श्री गणेशाच्या रूपाला पाहून चंद्र हसला. म्हणून श्री गणेशाने त्याला शाप दिला की, श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी तुला कोणी पहाणार नाही’, अशी कथा पुराणात सांगितलेली आहे. त्यामुळे ‘श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करू नये’, असे सांगितले जाते. अनेकांना याविषयी प्रश्न पडतो की, ‘असे का ?’ अध्यात्मशास्त्रदृष्ट्या त्याचे कारण म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. श्रीगणेश हा ॐकारस्वरूप आहे. ‘ॐ’ हा ध्वनी ब्रह्मवाचक आहे. म्हणजेच गणेश-उपासना ही ब्रह्मोपासनाच ठरते. त्यासाठी मन नाश पावणे, म्हणजे मनाचा लय होणे आवश्यक असते. गणेशभक्ताला किंवा साधकाला तर मनोलयच करायचा असतो. सोप्या भाषेत ‘मनोलय करणे’, म्हणजे मनाची चंचलता घालविणे. चंद्राचा आकार तिथीनुसार लहान-मोठा होतो. त्यामुळे ग्रहमालेत जसा चंद्र चंचल आहे, तसे शरिरात मन चंचल आहे. चंद्रदर्शनाने मनाची चंचलता एक लक्षांश इतकी वाढते. यासाठी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करू नये.
श्री गणेश चतुर्थी या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्ज्य असणे
‘श्री गणेश चतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पहाणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास ‘श्रीमद्भागवता’च्या १० व्या स्कंधाच्या ५६-५७ व्या अध्यायात दिलेली ‘स्यमंतक मण्याची चोरी’ ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका रहात नाही.
चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. या मंत्राचा २१, ५४ किंवा १०८ वेळा जप करावा.
सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः ।
सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ।। – ब्रह्मवैवर्त पुराण, अध्याय ७८
अर्थ : हे सुंदर सुकुमार ! या मण्यासाठी सिंहाने प्रसेनला मारले आहे आणि जांबुवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे; म्हणून तू रडू नकोस. आता या स्यमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे.’
Namaskar,
Women can also bring the Ganesh idol home, install it and do its immersion.
मूर्तीचे तोंड जर पूर्वेला असेल तर लेखात सांगितल्याप्रमाणे पूजक मूर्तीच्या डाव्या हाताला काटकोनात बसला तर त्याचे तोंड दक्षिण दिशेला होते. आणि पूजकाचे तोंड दक्षिणेस असू नये असेही सांगितले आहे. नेमके काय?
नमस्कार,
मूर्तीच्या डाव्या हाताला बसावे की बसू नये हे मुख्य नाही तर मूळ सूत्र हे लक्षात ठेवावे की पूजा करतांना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी यासाठी पुढील पर्याय आहेत
1. मूर्ती मुख पश्चिमेला किंवा दक्षिणेला असल्यास पूजकाचे मुख आपसूकच अनुक्रमे पूर्व आणि उत्तर दिशेला होईल. पण
2. मूर्ती मुख पूर्वेला असल्यास पूजकाने पश्चिमेला मुख करून पूजा न करता मूर्तीच्या उजव्या हाताला उत्तरेकडे तोंड करून बसावे.
3. मूर्ती मुख उत्तरेला असल्यास पूजकाने दक्षिणेकडे मुख करून पूजा न करता मूर्तीच्या डाव्या हाताला पूर्वेकडे तोंड करून बसावे.
या प्रमाणे लेखात पालट केला आहे.
खूप छान माहिती दिलीत.
पर्यावरण पूरक गणपती मूर्ती,ह्या बद्दल संस्थेचे काय मत आहे, कृपया मार्गदर्शन करा.
नमस्कार,
या संबंधी अभ्यास पुढील काही लेखांमध्ये त्या-त्या वेळी मांडण्यात आला होता –
https://www.sanatan.org/mr/a/47332.html
https://www.sanatan.org/mr/a/32097.html
https://www.sanatan.org/mr/a/49264.html
सविस्तर माहितीसाठी वाचा – https://www.sanatan.org/mr/ganesh-chaturthi
khup sundar sujak mahiti dili
khup khup aabhar
atta ashi riti samjawli tashi ch taiyari karu
ani
sah pariwar poojan ani pooja karu
खूप छान माहिती मिळाली गणपती बाप्पा मोरया