त्रिपुरारि पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा)

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. हा देवांचा उत्सव असून असुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्‍याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. या उत्सवामागील इतिहास आणि त्याचे महत्त्व पुढील लेखातून समजून घेऊया.

 

१. तिथी

त्रिपुरारि पौर्णिमा हा उत्सव कार्तिक पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो.

 

२. इतिहास

‘त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले. मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटपट केली; परंतु ती व्यर्थ गेली. ब्रह्मदेव वर देण्यास सिद्ध झाला. त्रिपुराने ‘मला अमरत्व प्राप्त व्हावे’, असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष श्रीविष्णूसही त्या त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. शेवटी शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्या दैत्याचा वध करून देवांचे गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांस आनंदीआनंद झाला आणि त्यांनी शंकराची स्तुती करून दीपोत्सव केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेस हा उत्सव साजरा केला जातो.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, नोव्हेंबर २००६)

 

३. साजरा करण्याची पद्धत

त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला सभोवती दिवे लावण्याची व्यवस्था करून तिथे दिवे लावले जातात. या खांबांना त्रिपुरी म्हणतात.

 

त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला दिवे लावणे
त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला दिवे लावणे

 

४. महत्त्व

तेजाचे अधिष्ठान असलेला हा दिवस दिपोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

शिवाने स्वत:च्या प्रचंड सामर्थ्याने त्रिपुरासुराचा नाश केला. या विजयाची स्मृती भारतियांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे. या दिवशी सर्व शिवालयांतून दीपोत्सव करण्यात येत असतो. काही प्रांतात हा दिवस शिवाचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून पाळतात आणि त्या प्रीत्यर्थ त्यांच्या मूर्तीची पूजा करण्यात येते. तारकासुराचा नाश करणारा हाच वीर असून तो अतिशय सुंदर होता.

दक्षिण हिंदुस्थानात शिवासाठी ‘कृत्तिका’ नावाचा महोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. सर्वत्र उत्कृष्ट साज-शृंगार करून मिरवणूक, महापूजा इत्यादी उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात. सुमारे २५ हात उंचीचा खांब देवळासमोर उभा करून त्यावर कापूर आणि इतर ज्वालाग्राही पदार्थ घालून तो पेटवून देतात. तिरुवण्णामल्ली, त्रिचनापल्ली, सिरुलन्नी, अशा ठिकाणी दीपोत्सव करण्यात येत असतो.’

साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’,लेखक : प्रल्हाद नरहर जोशी

2 thoughts on “त्रिपुरारि पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा)”

  1. खुप छान माहिती मिळाली. आपले मनःपूर्वक आभार.

    Reply

Leave a Comment