१. तारापिठाचे पौराणिक महत्त्व
‘५१ शक्तिपिठांपैकी ५ शक्तिपिठे बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये आहेत. बकुरेश्वर, नालहाटी, बंदीकेश्वरी, फुलोरादेवी आणि तारापीठ ही ती शक्तिपिठे होत. द्वारका नदीच्या काठावरील महास्मशानामध्ये सतीच्या तिसर्या नेत्रातील बाहुलीतील तारा पडला; म्हणून याला ‘तारापीठ’ म्हटले जाते. तारापीठ प्रसिद्ध तंत्रपीठ आहे. स्मशानामध्ये जळत असलेल्या शवाचा धूर श्री तारादेवी मंदिराच्या गर्भगृहापर्यंत जातो, हे या मंदिराचे निराळेपण आहे. भारतात सर्वत्रच्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात; मात्र येथील द्वारका नदी दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे वाहते, हे येथील एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
२. महर्षि वसिष्ठ ऋषींच्या चरणस्पर्शाने पावन झालेले तारापीठ !
राजा दशरथाचे कुलपुरोहित महर्षि वसिष्ठ यांचे तारापीठ हे सिद्धासनही आहे. प्राचीन काळी महर्षि वसिष्ठ यांनी या ठिकाणी श्री तारादेवीची उपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्या वेळी त्यांनी मंदिराची स्थापना केली होती. काळाच्या ओघात ते मंदिर भूमीमध्ये गडप झाले. कालांतराने जयव्रत नामक व्यापार्याने ते पुन्हा बांधले.
३. श्री तारादेवीची मूर्ती
श्री तारादेवीचे रूप जरी उग्र असले, तरी येथील मंदिरातील देवी मूर्ती ‘देवी शिवाला स्तनपान करत आहे’, अशा रूपातील आहे. याविषयी अशी आख्यायिका आहे की, ‘देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले होते. त्यातून निघालेले विष भगवान शिवाने ग्रहण केले होते. त्यामुळे भगवान बेेशुद्ध झाले. तेव्हा देवतांच्या आज्ञेनुसार श्री तारादेवीने भगवान शिवाला स्तनपान करून अमृत पाजले होते. ही मूर्ती जयव्रत यांना येथीलच स्मशानामध्ये मिळाली होती. देवीचे मुख सोडले, तर संपूर्ण मूर्ती फुलांच्या माळांनी आच्छादलेली असते.
४. तारापीठ येथील महास्मशान
तारापीठ मंदिराच्या समोरच महास्मशान आहे. १ कोटी मृतदेहांचे अग्नीसंस्कार झालेल्या स्मशानाला ‘महास्मशान’ म्हणतात. या ठिकाणी आतापर्यंत १ कोटींहून कितीतरी अधिक मृतदेहांचे अग्नीसंस्कार झाले आहेत. त्यामुळे हे सिद्धस्थान आहे. या ठिकाणी केवळ लाकडांच्या चितेवरच मृतदेहाचे दहन केले जाते. येथे विद्युतदाहिनीचा वापर केला जात नाही. या भागात विजेचा वापर होत नाही. असे म्हणतात की, ‘देवीच्या इच्छेने या ठिकाणी विज चालत नाही.’ या ठिकाणी वैष्णवांच्या (विष्णूची उपासना करणार्यांच्या) मृतदेहांचे दहन केले जात नाही, तर त्यांची समाधी बांधली जाते. या ठिकाणी अनेक साधू-संतांची समाधीस्थळे येथे आहेत.
एका पुजार्याने माहिती देतांना सागितले, ‘‘जेथे मृतदेहाचे दहन होते, त्या चितेला चितामाई म्हणतात. देवीचे खरे रूप चितामाई आहे. जेथे मृतदेहाचे दहन होते, ते महाकाल-भैरवीचे रूप आहे. दशमहाविद्यांचे रूप या चितेमध्ये असते.’’
५. श्री तारादेवीचे परमभक्त संत वामाखेपा
येथे संत वामाखेपा यांची समाधी आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांचे समकालीन वामाखेेपा हे तारापीठचे सिद्ध आणि परमभक्त होते. ज्या प्रकारे रामकृष्ण परमहंस यांना कालीमातेने दर्शन दिले होते, त्या प्रकारे संत वामाखेपा यांनाही श्री महाकाली देवीने स्मशानात दर्शन देऊन कृतार्थ केले आणि त्यांना दिव्य ज्ञान दिले. तारापीठपासून २ किलोमीटर अंतरावरील आटला येथे संत वामाखेपा यांचा जन्म झाला होता. त्यांनी देवीची उपासना केली आणि अल्प कालावधीत सिद्धी प्राप्त केली.
(संदर्भ : संकेतस्थळ)
सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले श्री तारादेवीचे दर्शन ! ‘वर्ष २०१३ मध्ये सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी बीरभूम (बंगाल) येथे जाऊन श्री तारादेवीचे दर्शन घेतले. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होऊन साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.’– श्री. विनायक शानभाग (२२.१०.२०२०) |