श्री वैष्णोदेवी मंदिर हिंदु धर्मियांसाठी एक पवित्र स्थळ आहे. श्री वैष्णोदेवीला ‘माता राणी’ म्हणूनही संबोधले जाते. श्री वैष्णोदेवीचे मंदिर समुद्रसपाटीपासून ५ सहस्र २०० फूट उंचीवर आहे. जम्मू जिल्ह्यातील कटरा येथून १४ किलोमीटर चढण चढल्यानंतर एका डोंगरावर हे मंदिर आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी देशभरातून लक्षावधी भाविक दर्शनाला येतात.
प्रभु श्रीरामाच्या आज्ञेने उत्तर भारतातील माणिक डोंगरावर ध्यानस्थ बसलेली श्री वैष्णोदेवी !
अ. पुराणांमध्ये देवीचे महात्म्य वर्णन केले आहे. दक्षिण भारतातील रत्नाकर सागर यांच्या घरी वैष्णोदेवी अवतरित झाली. वैष्णोदेवीला बालपणी ‘त्रिकुटा’ नावाने संबोधण्यात येत होते; मात्र भगवान श्रीविष्णूच्या वंशात जन्म घेतल्याने तिला ‘वैष्णवी’ नाव मिळाले. जेव्हा त्रिकुटा ९ वर्षांची होती, तेव्हा तिने पित्याकडून समुद्रकिनारी तपस्या करण्याची अनुमती मागितली.
आ. समुद्रकिनारी तपस्या करत असतांना त्रिकुटाने रामरूपातील श्रीविष्णूला प्रार्थना केली. सीतेच्या शोधार्थ श्रीराम त्यांच्या सेनेसह समुद्रकिनारी पोचले. तेव्हा ध्यानमग्न असलेल्या दिव्य बालिकेने त्यांचे लक्ष वेधले. त्रिकुटाने डोळे उघडले. ती श्रीरामाला म्हणाली, ‘‘मी तुम्हाला माझे पती म्हणून स्वीकारले आहे.’’ श्रीराम तिला म्हणाले, ‘‘या अवतारकाळात मी केवळ सीतेशी एकनिष्ठ रहाण्याचे वचन घेतले आहे.’’ त्यानंतर भगवंताने तिला आश्वासन दिले, ‘‘कलियुगात मी कल्कीच्या रूपात अवतार घेईन, तेव्हा तुझी ही इच्छा पूर्ण होईल.’’
इ. श्रीरामाने त्रिकुटाला उत्तर भारतातील माणिक डोंगरांवरील त्रिकुटा रांगेत असलेल्या गुहेमध्ये ध्यानमग्न रहाण्यास सांगितले. त्यानंतर ‘रावणाच्या विरुद्ध श्रीराम विजयी व्हावे, यासाठी त्रिकुटाने ‘नवरात्र’ उपासना केली. श्रीरामाने तिला वचन दिले होेते, ‘त्रिकुटा श्री वैष्णोदेवीच्या रूपात प्रसिद्ध होईल आणि सदैव अमर होईल. सर्व विश्व श्री वैष्णोदेवीची स्तुती गायील.’
भक्त श्रीधर यांच्या भंडार्यातील अडचणी दूर करून
भैरवनाथ नामक असुराचेही कल्याण करणारी माता श्री वैष्णोदेवी !
अ. भक्त श्रीधर यांच्या भंडार्यातील अडचणी दूर करणे : श्री वैष्णोदेवीचे श्रीधर नामक भक्त होते. एकदा त्यांना देवीने सुंदर मुलीच्या रूपात दर्शन दिले आणि त्यांना भिक्षूक अन् भक्त यांच्यासाठी भंडारा करण्यास सांगितले. या भंडार्यासाठी भैरवनाथ हा स्वार्थी राक्षसही आला होता. ‘भंडारा पार कसा पडेल’, याची श्रीधर यांना चिंता लागली होती. तेव्हा देवीने बालिकेच्या रूपात येऊन श्रीधर यांना आश्वस्त केले आणि देवीच्या कृपेने भंडारा पार पडला.
आ. श्री वैष्णोदेवीच्या बाणाने उगम झाली ‘बाणगंगा नदी’ ! : भैरवनाथला बालिकेमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे लक्षात आले. तो तिला देवीचा अवतार समजत होता. त्याने देवीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने या दिव्य बालिकेचा ९ मास शोध घेतला. भैरवपासून दूर पळतांना देवीने पृथ्वीवर एक बाण मारला. त्यातून पाणी बाहेर आले. हीच ‘बाणगंगा’ नदी म्हणून ओळखली जाते. या नदीकिनारी देवीच्या पावलांच्या खुणा आहेत. त्या आजही तशाच आहेत. त्यांना ‘चरणपादुका’, असे म्हटले जाते.
इ. तपस्याभंग केल्याने भैरवनाथ असुराचे शीर धडावेगळे करणे : श्री वैष्णोदेवीने ९ मास तपस्या केली. या वेळी तिने आध्यात्मिक ज्ञान आणि शक्ती प्राप्त केल्या. या ठिकाणी भैरवनाथला तिचा शोध लागला. त्यामुळे तिची तपस्या भंग झाली. शेवटी देवीने श्री महाकालीचे रूप घेऊन त्याचे शीर धडावेगळे केले. त्याचे शीर पवित्र गुफेपासून अडीच किलोमीटर अंतरावर पडले. त्या ठिकाणी श्री भैरवनाथ मंदिर आहे.
ई. भैरवनाथाची मोक्षप्राप्तीची इच्छा जाणून त्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणे : देवीला ठाऊक होते की, भैरवनाथाने मोक्षप्राप्तीच्या इच्छेने तिची तपस्या भंग केली. त्यामुळे देवीने त्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले आणि वरदान दिले की, ‘जोपर्यंत भक्तगण माझ्यानंतर तुझे दर्शन करणार नाहीत, तोपर्यंत माझ्या दर्शनाची त्यांना पूर्ण फलप्राप्ती होणार नाही.’ याच वेळी वैष्णोदेवीने ३ पिंडींसह (शिरांसह) एका मोठ्या शीळेचा आकार घेतला आणि ध्यानमग्न झाली. आता श्री वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात याच शिळेचे दर्शन सर्वांना मिळते.
भक्त श्रीधर देवीला शोधत येथपर्यंत येतो. तो तेथेच त्या शिळारूपी देवीच्या सेवेत रहातो. तेव्हापासून श्रीधर यांचे घराणे पिढ्यान् पिढ्या देवीचे पुजारी म्हणून सेवारत आहे.
ज्या ठिकाणी श्री वैष्णोदेवीने भैरवनाथाचा वध केला, ते ठिकाण ‘भवन’ नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देवी श्री काली (उजवीकडे), देवी श्री सरस्वती (डावीकडे) आणि देवी श्री लक्ष्मी (मध्यभागी) पिंडीच्या रूपांत गुफेत विराजमान आहेत. या पिंडींच्या एकत्रित रूपाला वैष्णोदेवी म्हटले जाते.’
(संदर्भ : संकेतस्थळ)