धन्यमाणिक राजाला स्वप्नदृष्टांत देऊन माताबरी (त्रिपुरा) येथे स्थानापन्न झालेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी !

Article also available in :

दशमहाविद्यांमध्ये एक म्हणजे त्रिपुरासुंदरीदेवी आहे. शक्ति संप्रदायात त्रिपुरासुंदरीदेवीला विलक्षण महत्त्व आहे. त्रिपुरासुंदरीदेवीच्या नावावरूनच त्रिपुरा राज्याचे नाव प्रचलित झाले आहे. त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहरानजीक माताबरी गावात श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे मंदिर आहे. हे ५१ शक्तिपिठांपैकी एक पीठ आहे. येथे सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली होती. कलियुगात या स्थानी धन्यमाणिक नावाच्या राजाने मंदिर उभारले आणि या मंदिरात त्रिपुरासुंदरीदेवीची स्थापना केली.

 

सध्याच्या मंदिराविषयी धन्यमाणिक राजाला झालेला दृष्टांत !

वर्ष १५०१ मध्ये त्रिपुरावर धन्यमाणिक राजाचे राज्य होते. एका रात्री राजाला आई त्रिपुरेश्‍वरीने स्वप्नदृष्टांत दिला. देवी राजाला म्हणाली, ‘‘चट्टग्राम येथे तिची एक मूर्ती आहे. ती सकाळ होण्यापूर्वी घेऊन ये.’’ त्यानंतर राजाला जाग आली. त्याने त्वरित सैनिकांना ती मूर्ती घेऊन येण्याचा आदेश दिला. सैनिक ती मूर्ती घेऊन येत असतांनाच सूर्योदय झाला. त्या वेळी ते माताबरी या गावात होते. देवीच्या आदेशानुसार तेथेच मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्या वेळी तेथील राजा धन्यमाणिक यांना त्या स्थानी श्रीविष्णूचे मंदिर बांधायचे होते. तेथे त्रिपुरेश्‍वरीच्या मूर्तीची स्थापना झाल्यामुळे राजा विचारात पडला. त्या वेळी आकाशवाणी झाली की, राजाने त्या स्थानी त्रिपुरासुंदरीदेवीचेच मंदिर बांधावे. राजाने त्याप्रमाणे देवीचेच सुंदर मंदिर त्या स्थानी बांधले.

 

दैवी कासवांचा आश्रय असलेले कल्याणसागर तळे !

दैवी कासवांचे निवासस्थान असलेले कल्याणसागर तळे आणि त्यामागे देवीचे मंदिर

त्रिपुरासुंदरीदेवीच्या मंदिरामागे साडेसहा एकर जागेत एक मोठे तळे आहे. त्याला ‘कल्याणसागर तळे’ म्हणतात. या तळ्यात १०० वर्षांहून अधिक वय असलेलीही काही कासवे आहेत. या तळ्यातील कासवांना त्यांचा मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाल्यावर ती स्वतःहून पायर्‍या चढून मंदिराच्या प्रांगणात येतात. देवीला एक प्रदक्षिणा घालतात आणि प्राणत्याग करतात. मंदिराच्या परिसरात अशा कासवांची समाधीही आहे. या स्थानाला ‘कूर्म पीठ’ असेही म्हणतात; कारण या मंदिराचा आकार कूर्माप्रमाणे आहे.’

 

भांडासुराचा वध करून देवतांना भयमुक्त करणारी श्री त्रिपुरासुंदरीदेवी !

‘शांत मुद्रेत शयन केलेल्या सदाशिवाच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळाच्या आसनावर श्री त्रिपुरासुंदरीदेवी विराजमान असते. ती चतुर्भुज आहे. तिच्या हातात पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण आदी शस्त्रे आहेत. देवीचे आसन ब्रह्मा, विष्णु, महेश आणि यमराज आपल्या मस्तकावर धारण करतात. देवी त्रिनेत्रा आहे. तिने मस्तकावर अर्ध चंद्र धारण केला आहे. त्रिपुरासुंदरीदेवीची उत्पत्ती कशी झाली, याचे पुराणांमध्ये वर्णन आहे.

सतीच्या वियोगानंतर भगवान शिव सदैव ध्यानमग्न राहू लागले. त्याच वेळी सर्व सृष्टीला त्रस्त करणार्‍या तारकासुराने ब्रह्माकडून वर प्राप्त करून घेतला की, शिवाच्या पुत्राकडूनच त्याला मृत्यू येईल.  त्यामुळे सर्व देवतांनी भगवान शिवाला ध्यानातून जागृत करण्यासाठी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांना कैलास पर्वतावर पाठवले. कामदेवाने त्याच्या कुसुम नामक बाणाने भगवान शिवाचे ध्यान भंग केले. ध्यान भंग झाल्याने क्रोधित झालेल्या शिवाने तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले. शिवाच्या एका गणाने कामदेवाच्या भस्मापासून एक मूर्ती बनवली. त्या मूर्तीतून एक पुरुष निर्माण झाला. त्या पुरुषाने भगवान शिवाची स्तुती केल्यानंतर भगवान शिवाने त्याचे ‘भांड’ असे नामकरण केले. शिवाच्या क्रोधातून निर्माण झाल्यामुळे भांड हा तमोगुणी होता. त्याने तिन्ही लोकांत भयंकर उत्पात माजवला. त्याने स्वर्गावर आक्रमण करून सर्व देवतांना त्रस्त केले. त्या वेळी देवराज इंद्राने महर्षि नारदांना यावर उपाय विचारला असता, नारदांनी इंद्रदेवतेला स्वतःचे रक्त आणि मांस यांद्वारे आदिशक्तिची आराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंद्रदेवतेने देवीची उपासना केल्यावर देवीने त्रिपुरासुंदरीच्या रूपात प्रकट होऊन भांडासुराचा वध केला आणि देवतांना भयमुक्त केले !’

 

सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे दर्शन !

श्री त्रिपुरासुंदरीदेवीला भावपूर्ण नमस्कार आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ‘

१०.१२.२०१८ या दिवशी सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या मंदिरात जाऊन श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे दर्शन घेतले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांनी या ठिकाणी यज्ञ केला. त्यांनी येथील कासवांच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथे प्रार्थनाही केली.

 

वैशिष्ट्यपूर्ण

येथील कल्याणसागर तळ्यातील कासवांना खाद्य दिले की, ती पाण्यावर येऊन दर्शन देतात. तसेच या तळ्यातील सर्व कासव देवीच्या आरतीच्या वेळी तळ्यातच एके ठिकाणी जमतात. ज्या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या स्थानी गेल्या होत्या, त्या दिवशी त्या तळ्यात एक औषध घातल्यामुळे कासवांना खाद्य देता आले नाही, तसेच कोणतेच कासव पाण्यावर न आल्याने त्यांचे दर्शनही झाले नाही. देवीचे दर्शन आणि यज्ञ झाल्यानंतर त्या मंदिरातून निघतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात विचार आला की, एकदा तरी कासवाचे दर्शन होऊ दे. त्याच क्षणी एक मोठे कासव वर आले आणि त्याने त्यांना दर्शन दिले.’

– श्री. विनायक शानभाग (१७.१०.२०२०)

भांडासुराचा वध करून देवतांना भयमुक्त करणार्‍या श्री त्रिपुरासुंदरीदेवीची कृपा सर्व भक्तांवर व्हावी आणि तिच्या कृपेने कलियुगातील दुष्प्रवृत्तींचा नाश होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी, अशी तिच्या चरणी प्रार्थना !

Leave a Comment