योगमायेने श्रीविष्णूकडून नरकासुराचा वध करवून घेणारी श्री कामाख्यादेवी आणि सर्वोच्च तंत्रपीठ असलेले कामाख्या मंदिर !

Article also available in :

१. श्री कामाख्यादेवी मंदिराचा इतिहास आणि महत्त्व !

मंदिराच्या परिसरात असलेली श्री कामाख्यादेवीची प्रतिकात्मक मूर्ती

आसामची राजधानी गौहत्ती (गुवाहाटी) आहे. याचे प्राचीन नाव प्रागज्योतिषपूर आहे. द्वापरयुगात ही नगरी ‘नरकासुर’ राजाची राजधानी होती. या नगरीमध्ये ज्योतिषशास्त्राचे शिक्षण दिले जात असल्याने या नगराला ‘प्रागज्योतिषपूर’ असे नाव पडले. गौहत्ती शहरापासून १० किलोमीटर दूर असलेल्या नीलाचल पर्वतावर श्री कामाख्यादेवीचे मंदिर आहे. पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी सतीचा एक एक अवयव पडला, त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ निर्माण झाले. ज्या ठिकाणी देवीची योनी पडली, ते स्थान म्हणजे ‘कामाख्या’ होय. संपूर्ण पृथ्वीवर कामाख्या हे स्थान ‘सर्वोच्च तंत्रपीठ’ म्हणून ओळखले जाते. हे ५१ शक्तिपिठांपैकी एक महत्त्वाचे पीठ आहे. मंदिरात गेल्यावर जवळ जवळ ३० फूट खाली उतरावे लागते. तेथे योनीसारखा आकार असलेले एक योनीकुंड (जलकुंड) आहे. या नीलाचल पर्वतावर श्री कामाख्यादेवीच्या मंदिरात आणि मंदिराच्या जवळ दशमहाविद्यांचीही मंदिरे आहेत. मंदिराच्या नजीकच श्री कामदेव मंदिर आहे. तंत्र-मंत्र उपासकांसाठी हे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ‘तंत्र उपासना केल्यावर लगेच सिद्धी प्राप्त होते’, असे या स्थानाचे माहात्म्य आहे. ६ मुख आणि १२ हात असलेले हे देवीचे रूप प्रचलित आहे.

 

२. पौराणिक कथा

२ अ. श्री कामाख्यादेवीच्या मायेने श्रीविष्णूने नरकासुराचा वध करणे

‘राजराजेश्‍वरी कामाख्या रहस्य’ आणि ‘दशमहाविद्या’ या ग्रंथांचे रचनाकार आणि श्री कामाख्यादेवीचे भक्त, ज्योतिषी अन् वास्तूतज्ञ डॉ. दिवाकर शर्मा यांनी या स्थानासंदर्भातील पौराणिक कथा पुढीलप्रमाणे सांगितली.

नरकासुर एक दिवस श्री कामाख्यादेवीला पत्नीच्या रूपात मिळवण्यासाठी अडून बसला. देवीने त्याला सांगितले की, तू जर एका रात्रीत नील पर्वतावर चारही बाजूंनी दगडांचे ४ रस्ते आणि कामाख्या मंदिराजवळ एक विश्रामगृह बांधून दिले, तर मी तुझी पत्नी होईन. जर तू असे करू शकला नाही, तर तुझा मृत्यू निश्‍चित आहे.

गर्वाने उन्मत झालेल्या नरकासुराने चारही रस्ते बांधून पूर्ण केले आणि विश्रामगृह पूर्ण करत असतांनाच महामायेच्या मायावी कुक्कुटाने (कोंबड्याने) रात्र संपल्याचे सूचीत केले. त्यामुळे नरकासुर क्रोधित झाला. त्याने कुक्कुटाचा पाठलाग केला आणि ब्रह्मपुत्रेच्या दुसर्‍या काठावर त्याचा वध केला. हे स्थान आजही ‘कुक्टाचकी’ नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर देवी भगवतीच्या मायेने भगवान श्रीविष्णूने नरकासुराचा वध केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा भगदत्त हा कामरूपचा राजा झाला. त्याचा वंश नष्ट झाल्याने कामरूप राज्य विविध राज्यांमध्ये विभागले गेले आणि सामंत राजा कामरूपावर राज्य करू लागला. नरकासुराच्या नीच कामामुळे आणि एका विशिष्ट मुनींच्या शापामुळे देवी अप्रकट झाली अन् कामाख्या मंदिर लयाला गेले.

आठव्या शतकात तत्कालीन राजांनी पुन्हा देवीचे मंदिर बांधले. त्यानंतर १७ व्या शतकापर्यंत अनेक वेळा मंदिरावर आक्रमणे झाली आणि ते पुन्हा बांधले गेले. सध्या जे मंदिर आहे, ते अहोम राजांच्या काळात वर्ष १५६५ मध्ये बांधलेले आहे.

२ आ. कामदेवाला ज्या ठिकाणी जीवनदान मिळाले, तो नीलांचल पर्वत !

आदिशक्ति महाभैरवी श्री कामाख्यादेवीच्या दर्शनापूर्वी गौहत्तीजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या टापूवर स्थित असलेल्या ‘महाभैरव उमानंद’चे दर्शन घेणे आवश्यक आहे. हे एक नैसर्गिक शैलद्वीप आहे. या टापूला ‘मध्यांचल पर्वत’ म्हणूनही ओेळखले जाते; कारण येथेच समाधीस्त सदाशिवाला कामदेवाने कामबाण मारून जागृत केले होते. त्यामुळे सदाशिवाने त्याला भस्म केले होते. त्यानंतर भगवतीच्या महातीर्थ (योनीमुद्रा) नीलांचल पर्वतावरच कामदेवाला पुन्हा जीवदान मिळाले; म्हणून हे क्षेत्र कामरूपाच्या नावाने ओळखले जाते.

 

३. श्री कामाख्या मंदिरात होणारे उत्सव आणि वैशिष्ट्यपूर्ण पूजा

३ अ. श्री कामाख्यादेवीच्या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची गर्दी असते; परंतु दुर्गाउत्सव, पोहान बिया, दुर्गादेऊल, वसंतपूजा, मदानदेऊल, अम्बुवाची आणि मनासा पूजा आदी उत्सव येथे विशेषत्वाने साजरे केले जातात.

३ आ. मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तांकडून येथे कन्यापूजन आणि भंडारा करण्यात येतो.

३ इ. श्री काली आणि श्री त्रिपुरसुंदरी देवीनंतर श्री कामाख्यादेवी तांत्रिकांची सर्वांत महत्त्वपूर्ण देवता आहे. श्री कामाख्यादेवीचे पूजन भगवान शिवाच्या नववधूच्या रूपात करण्यात येते.

३ ई. श्री कामाख्या मंदिर ३ भागांमध्ये विभागले आहे. प्रथम भाग सर्वांत मोठा आहे. यात ठराविक जणांनाच प्रवेश असतो. दुसर्‍या भागामध्ये देवीचे दर्शन होते, जेथे एका दगडातून सतत पाणी स्रवत असते. असे म्हणतात की, मासातील ३ दिवस देवी रजस्वला असते. हे ३ दिवस मंदिराचे दार बंद असते. त्यानंतर वाजतगाजत मंदिराचे दार उघडले जाते.

 

४. अम्बुवाची पर्व

४ अ. अम्बुवाची पर्व एक वरदान

विश्‍वातील सर्व तांत्रिक, मांत्रिक आणि सिद्धपुरुष यांच्यासाठी वर्षातून एकदा येणारे अम्बुवाची पर्व एक वरदान आहे. हे अम्बुवाची पर्व देवीचे (सतीचे) रजस्वला पर्व असते. पुराणातील शास्त्रांनुसार कलियुगात प्रत्येक वर्षाच्या जून (आषाढ) मासामध्ये तिथीनुसार साजरे केले जाते.

४ आ. अम्बुवाची पर्वाच्या काळात गर्भगृहामध्ये जलस्राव होेणे

पौराणिक सत्य आहे की, अम्बुवाची पर्वाच्या काळामध्ये श्री देवी रजस्वला असते आणि देवीच्या गर्भगृहामध्ये असलेल्या महामुद्राने (योनी-तीर्थाने) सतत ३ दिवस जलप्रवाहातून रक्त प्रवाहित होते. हे आपोआप होत असून या कलियुगामध्ये एक अद्भुत आश्‍चर्य आहे.

या संदर्भात डॉ. दिवाकर शर्मा यांनी माहिती देतांना सांगितले की, अम्बुवाचीयोगपर्वाच्या वेळी देवीच्या गर्भगृहाची दारे स्वत:हून बंद होतात आणि देवीचे दर्शन होत नाही. या पर्वामध्ये तंत्र-मंत्र-यंत्र साधना करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी अन् मंत्रांचे पुरश्‍चरण करण्यासाठी जगभरातून उच्च कोटीचे तांत्रिक-मांत्रिक येथे मोठ्या संख्येने येतात. ३ दिवसांच्या रजस्वला पर्वानंतर श्री कामाख्यादेवीची विशेष पूजा आणि आराधना करण्यात येते.’ (संदर्भ : संकेतस्थळ)

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (२०.११.२०१९)

 

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति
(सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘कामाख्या’ येथे जाऊन घेतले श्री कामाख्यादेवीचे दर्शन !

मंदिराच्या परिसरातील श्री गणेशमूर्तीला दीप ओवाळतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

अ. सद्गुरुद्वयींनी कामाख्यादेवीचे दर्शन घेणे आणि महर्षींनी
सांगितल्याप्रमाणे देवीला सनातनचे कुंकू अर्पण करून प्रसाद म्हणून ते परत घेणे

१५.११.२०१९ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी सांगितले, ‘दोन्ही सद्गुरु जेव्हा कामाख्यादेवीच्या दर्शनाला जातील, तेव्हा त्यांनी सनातनचे कुंकू घेऊन जावे आणि ते देवीला अर्पण करावे. नंतर प्रसाद म्हणून ते कुंकू परत घ्यावे. दोन्ही सद्गुरूंनी ते कुंकू प्रसाद म्हणून समवेत ठेवावे आणि प्रतिदिन वापरावे. १६.११.२०१९ या दिवशी सकाळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ कामाख्यादेवीच्या दर्शनाला गेल्या. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे मंदिरात गेल्यावर त्यांनी देवीला सनातनचे कुंकू अर्पण केले आणि प्रसाद म्हणून ते परत घेतले. नंतर सद्गुरुद्वयींनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणेच्या मार्गावरील भिंतीवर ‘योनीच्या आकारातील देवीची मूर्ती’ आहे. मंदिराला येणारे भाविक देवीला आवर्जून प्रार्थना करतात.

आ. कामाख्यादेवीच्या परिसरातील ‘तंत्र गणपती’चे दर्शन घेतल्यावर सद्गुरुद्वयींच्या
मस्तकावर भाविकांनी मूर्तीला चिकटवलेली नाणी पडणे आणि त्याद्वारे गणपतीने आशीर्वाद देणे

मंदिराच्या भिंतीवर ‘तंत्र गणपति’ नावाचा गणपति आहे. कामाख्यादेवीच्या दर्शनाला जातांना भाविक जलकुंडाजवळ असलेल्या गणपतीचे दर्शन घेतात आणि देवीचे दर्शन झाल्यावर या तंत्र गणपतीचे दर्शन घेतात. या तंत्र गणपतीला भाविक नाणे चिकटवतात. कामाख्यादेवीचे दर्शन झाल्यावर सद्गुरुद्वयी ‘तंत्र गणपती’चे दर्शन करायला गेल्या आणि त्यांनी मूर्तीच्या चरणांवर डोके ठेवले. तेव्हा त्यांच्या मस्तकावर नाणी पडली. ‘त्यांंच्या मस्तकाच्या मध्यभागावर नाणी पडणे’, हे ईश्‍वरी नियोजनच होते. या गणपतीचे दर्शन घेतले की कामाख्यादेवीच्या दर्शनाचे पूर्ण फळ मिळते, असे म्हटले जाते. सद्गुरुद्वयींच्या मस्तकावर नाणी पडणे म्हणजे गणपतीने लक्ष्मीच्या रूपात सनातनच्या कार्याला संपन्नता आणि समृद्धता यांचा आशीर्वाद दिला.’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (२०.११.२०१९)

Leave a Comment