कला म्हणजे नेमके काय ? कला हा ईश्वरी, दैवी गुण आहे. तो एक साधनेचा मार्ग आहे; परंतु आज परिस्थिती संपूर्णपणे पालटलेली आहे. आज जो येतो, तो हिंदु धर्मातील देवतांची हवी तशी विटंबना करतो आणि त्याला नाव देतो ‘कलेचे स्वातंत्र्य.’
१. चित्रकलेच्या माध्यमातून होणारे विडंबन
या धर्मविरोधकांत हिंदूद्वेष्टे चित्रकार मकबुल फिदा हुसेन यांचे सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल. हुसेन यांनी हिंदूंच्या एक-दोन नव्हे, तर अनेक देवतांची नग्न आणि अश्लिल चित्रे काढली असून, त्यांची ते कोट्यवधी रुपयांना विक्री करत आहेत. ‘हिंदु जनजागृती समिती’ला हे समजताच समितीने याविषयी ठिकठिकाणी आंदोलने केली. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक आदी राज्यांत १२५० हून अधिक गार्हाणे नोंदवल्या गेले. अनेक ठिकाणी हिंदूंनी हुसेन यांच्या विरोधात खटले भरले. याउपरही सरकारकडून हुसेन यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. इतकेच नव्हे, तर हुसेन यांच्यावर कायदेशीर कारवाईची अपेक्षा करणार्या हिंदूंनाच वृत्तपत्रांतून ‘हिंदु अतिरेकी’ संबोधण्यात येत आहे. भारतातील खटल्यांना उपस्थित रहावे लागू नये आणि पुढील कारवाई चुकवण्यासाठी भारताबाहेर पळ काढणार्या हुसेन यांना मातृभूमीपासून वंचित रहावे लागत असल्याचा कळवळा हिंदूविरोधी वृत्तपत्रे छापत आहेत.
या सर्व परिस्थितीत ज्यांनी हुसेनला बेड्या ठोकून कारावासात टाकायला हवे होते, त्या मुंबईच्या आरक्षक आयुक्तांनीच आरक्षक कल्याण निधीसाठी हुसेनच्या चित्रांचा लिलाव आयोजित केला. समितीने तो लिलाव रद्द करण्यास भाग पाडले. त्यानंतरही हुसेनचा उदोउदो थांबला नाही. ‘ए.बी.एन्. अॅम्रो’ या विदेशी बँकेने हुसेनचे चित्र असलेल्या ‘क्रेडिट कार्ड’चे वितरण करण्याचे ठरवले. याच्या विरोधातही समितीने आंदोलन करून बँकेला सदर ‘कार्ड’ रहित करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडून लेखी माफीही घेतली.
२. नाटकांच्या माध्यमातून होणारे विडंबन
हिंदु धर्माचे, देवतांचे विडंबन करण्यात सध्याच्या नाटककारांचाही मोठा वाटा आहे. मच्छिंद्र कांबळी यांचे ‘वस्त्रहरण’, संतोष पवार यांचे ‘यदाकदाचित’, ऋषिकेश घोसाळकर यांचे ‘देव करी लव्ह’ ही अशा नाटकांची प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. या नाटकांतून वंदनीय अशा देवतांना हास्यास्पद स्वरूपात दाखवून त्यांच्या तोंडी अश्लिल संवाद दिले जातात. वस्त्रहरणमध्ये ‘तुक्याचा अड्डा’ म्हणजे ‘दारूचा अड्डा’ संबोधण्यात आले आहे, तर ‘देव करी लव्ह’ (नवीन नाव – हरि आला दारी) नाटकात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे विडंबन केले आहे……. ज्या देवतांची श्रद्धापूर्वक पूजा-अर्चा करून आपण त्यांच्याकडे संकटात आपले रक्षण करण्याची विनवणी करतो, त्याच देवतांना नाटकातील विनोदातून विटंबित होतांना पाहून, विरोध करण्याऐवजी त्या विनोदावर हसतो, हे वाईट तर आहेच. त्यासह असे विडंबन करणार्या नाटककारांच्या पापकर्मातही आपण सहभागी होत आहोत. याला वेळीच तीव्र विरोध न केल्यास देवतांना अशा विनोदी स्वरूपात पाहिल्याने पुढच्या पिढीच्या मनात देवतांविषयी श्रद्धा निर्माण होणे तर दूरच, ती देवतांचे पूजन करणेही नाकारेल आणि मंदिरात जाणेही बंद करेल.
जर आम्ही ठरवले, तर अशी संस्कृती नष्ट करणारी नाटके बंद करणे सहज शक्य आहे. आपण मनाशी निश्चय करा की, आमच्या धर्माची, देवतांची, धर्मग्रंथांची विटंबना असणारे कोणतेही नाटक किंवा चित्रपट आम्ही पहाणार नाही, तसेच इतरांनाही ते न पहाण्यास सांगू, तर अशा प्रकारची नाटके आणि चित्रपट काढण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.
३. विज्ञापने आणि उत्पादने यांच्या माध्यमातून होणारे विडंबन
नाटक आणि चित्रकला यांप्रमाणे विविध उत्पादने अन् त्यांचे विज्ञापन यांसाठीही हिंदू देवी-देवतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. खाजगी उत्पादकांप्रमाणेच आता सरकारी विज्ञापनातूनही देवतांचे विडंबन केले जात आहे. निवडणूक आयोगाची श्री गणेश आणि मूषक यांचा वापर केलेली मतदार ओळखपत्रांच्या प्रसिद्धीसाठीचे विज्ञापन, एड्स जनजागृती मोहिमेच्या हस्तपत्रकावरील शिव-पार्वतीचे चित्र, तसेच व्यसनमुक्तीच्या मोहिमेतील धूम्रपानाचे दुष्परीणाम सांगण्यासाठी ब्रह्मचारी साधूंना नपूंसक दाखवणारे विज्ञापन ही याची काही मोजकी उदाहरणे आहेत. निधर्मी सरकारचे माहिती आणि प्रसारण खातेही हिंदूद्वेष्टेपणा करत असून, अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांना घेऊन कोणतेही विज्ञापन करण्यास मात्र ते धजावलेले नाही.
हाच प्रकार हिंदु देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांविषयी ! ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ति एकत्र असते’, या अध्यात्मशास्त्रीय सिद्धान्तानुसार देवतेचे चित्र (रूप) म्हणजे प्रत्यक्ष देवताच होय. त्यामुळे फटाक्यांवर एखाद्या देवतेचे चित्र असणे म्हणजे प्रत्यक्षात ती देवताच तेथे अधिष्ठित असणे. असे फटाके लावल्याने देवतेच्या चित्राच्या चिंधड्या होतात. फटाक्यांवरील देवतांची चित्रे पायाखाली तुडवली जातात, तसेच नंतर ती कचर्यात टाकली जातात. यामुळे धर्महानीच होते.
यासंदर्भात जनजागृतीसह या संदर्भात शासनाकडूनही कारवाई व्हावी; म्हणून याविषयी महाराष्ट्राच्या आरक्षक महासंचालकांना आम्ही पत्र पाठवले, ‘हिंदु देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने देवतांची विटंबना होत असल्याने आपण अशा फटक्यांवर बंदी घालावी.’ त्यावर आरक्षक महासंचालकांच्या कार्यालयाकडून सरकारी धाटणीचे उत्तर आले. ‘जे फटाके सिद्ध करतात आणि जे फटाके फोडतात, त्यांचा धर्माची विटंबना करण्याचा कोणताही हेतू नसतो. जिथे हेतू नसतो, तिथे गुन्हा होतच नाही. त्यामुळे अशा फटाक्यांवर बंदी लादता येणार नाही.’ हेच पत्र अन्य धर्मियांनी पाठवले असते, तर आरक्षक महासंचालकांनी त्याला असे उत्तर दिले असते का ? ही जर अन्य धर्मीयांची गोष्ट असती, तर शासनानेच सर्वप्रथम त्यावर बंदी घातली असती.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमध्ये सनातन संस्थेच्या वह्यांवर महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवरायांचे चित्र छापून त्याखाली ‘पाच मुसलमानी पातशाह्या हिंदूंवर अंमल करत होत्या. त्यामुळे हिंदु धर्म धोक्यात आला होता’, हा सत्य इतिहास लिहिल्यामुळे केवळ एका मुसलमानाने धार्मिक भावना दुखावल्याचे गार्हाणे करताच केरळच्या हिंदूविरोधी साम्यवादी सरकारने त्या वह्यांवर बंदी घालून त्या जप्त केल्या. इतकेच नव्हे, तर वह्यांचे विनामूल्य वितरण करणार्या श्री. सुरेश भट नामक हिंदु धर्माभिमान्याला अटक करून आरक्षक कोठडीत ठेवले. पहा, सरकार अन्य धर्मियांच्या धार्मिक भावनांविषयी किती जागृत आहे !
सरकार उगाचच अन्य धर्मियांविषयी ही जागरूकता दाखवत नाही. ते स्वतः आपल्या धर्माविषयी अतिशय जागृत आणि संवेदनशील असल्यानेच सरकारलाही त्वरित कारवाई करावी लागते. या तुलनेत हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरोधातील आंदोलनांत किती हिंदू सहभागी होतात ? हे प्रमाण अतिशय अल्प असल्यामुळेच आपल्याला दिसते की, डेन्मार्कच्या व्यंगचित्रानंतर इस्लामधर्मीयांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणारे एकही चित्र निघाले नाही; मात्र हिंदु देवतांची विडंबनात्मक चित्रे निघतच आहेत आणि बाजारात लाखो रुपयांना विकलीही जात आहेत. आजही बाजारात ‘तुलसी जर्दा’ नावाची संत तुलसीदासांचे चित्र असलेली तंबाखू उघडपणे विकली जाते. इमारतीच्या कोपर्यात लोकांनी थुंकू नये; म्हणून देवतांची चित्रे असलेल्या ‘टाइल्स’ बसवल्या जातात. तसेच बहुरूपी देवतांची वेशभूषा करून भीक मागतांना दिसतात.
यासाठी तुम्ही काय करू शकता ?
देवतांचे विडंबन रोखणे म्हणजे धर्मपालन
धर्मविषयक कर्तव्य बजावणे म्हणजे जसे धर्मपालन, तसे देव आणि धर्म यांची विटंबना थांबविणे, हेदेखील धर्मपालनच होय. आपण जर धर्माचे रक्षण केले, तर धर्म (ईश्वर) आपले रक्षण करील.
१. देवता आणि संत यांची चित्रे वेष्टनांवर असलेली उत्पादने (उदा. उदबत्तीचा खोका), तसेच अशी चित्रे असलेल्या विवाहपत्रिका, दिनदर्शिका इत्यादी वस्तू शक्यतो नंतर कचर्यात वा इतस्तत: टाकल्या जातात. यामुळे त्यांतील देवत्वाचा अनादर होऊन पाप लागते. यासाठी देवतेला प्रार्थना करून अशी उत्पादने अग्नीत समर्पित करा !
२. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे व नावे असलेले फटाके वाजवू नका !
३. देवतांची चित्रे असलेले कपडे वापरू नका !
४. अशा उत्पादनांचे उत्पादक अन् विक्रेते यांचे प्रबोधन करा !
५. अशा उत्पादनांवर बहिष्कार घालून पर्यायी उत्पादने वापरा !
६. देवतांचे विडंबन करणार्या जाहिराती असणारी उत्पादने, नाटके, चित्रपट आदींवर बहिष्कार घाला !
७. देवतांचे विडंबन करणार्यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करू शकता.
८. देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्यांना रोखा !
९. देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्याविषयी अनुद्गार काढणार्यांना वैध मार्गाने प्रतिबंध करा !
१०. देवता आणि संत यांच्या चित्रांची विटंबना रोखण्याविषयी इतरांनाही सांगून धर्मकर्तव्य बजावा !
११. ‘सनातन संस्था’ यासंदर्भात सनदशीर मार्गाने लढते; आपणही या कार्यात सहभागी व्हा !
देवतांच्या विटंबनेचा निषेध संयत मार्गाने करा !
निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परीवर्तन करणे हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !