१. त्रेतायुगात अनावृष्टीमुळे भयंकर दुष्काळ
पडल्यावर दधीचि ऋषींना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे
कठीण होणे, त्यांनी आपल्या एका मुलाला वाटेतच सोडून देणे, तो मुलगा
पिंपळाची फळे खाऊन जगू लागणे आणि त्यामुळे त्याचे नाव ‘पिप्पलाद’ असे पडणे
‘भविष्यपुराणा’त सांगितले आहे, ‘एकदा त्रेतायुगात अनावृष्टीमुळे भयंकर दुष्काळ पडला. त्या घोर दुष्काळात दधीचि ऋषीं आपल्या पत्नी-मुलांसह आपले निवासस्थान सोडून दुसर्या प्रदेशात निवास करण्यासाठी बाहेर पडले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्यामुळे अतिशय जड मनाने त्यांनी आपल्या एका मुलाला वाटेतच सोडून दिले. ते मूल तेथे तहान-भुकेने व्याकुळ होऊन रडू लागले. अकस्मात् त्याला एक पिंपळवृक्ष दिसला. तो मुलगा पिंपळाची फळे खाऊन आणि जवळच्याच एका विहिरीचे पाणी पिऊन जगू लागला. त्यामुळे त्याचे नाव ‘पिप्पलाद’ असे पडले.
२. देवर्षि नारदांनी पिप्पलादाला मंत्रदीक्षा देणे
त्या मुलाने तेथे आपल्या घोर तपस्येला आरंभ केला. एकदा तेथे देवर्षि नारद आले. पिप्पलादाने त्यांना वंदन करून आदरपूर्वक बसवले. दयाळू नारद लहान वयात त्याच्यामध्ये असलेली नम्रता आणि त्याची तपस्या पाहून प्रसन्न झाले. त्यांनी त्या मुलावर उपनयनादी सर्व संस्कार करून त्याला वेद शिकवले, तसेच त्याला १२ अक्षरी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या मंत्राची दीक्षा दिली.
३. पिप्पलादाच्या तपामुळे भगवंताने त्याला दर्शन देऊन ज्ञान आणि योग
यांचा उपदेश करणे अन् भगवंताच्या उपदेशामुळे पिप्पलाद पुढे महाज्ञानी महर्षि होणे
त्यानंतर पिप्पलाद प्रतिदिन भगवंताचे ध्यान आणि गुरुमंत्राचा जप करू लागला. थोड्याच वेळात त्या बालकाच्या तपामुळे संतुष्ट होऊन भगवान श्रीविष्णु तेथे प्रगट झाले. आपले सद्गुरु देवर्षि नारदांच्या श्रीमुखातून ऐकलेल्या वचनांच्या आधारे त्या बालकाने श्रीविष्णूला ओळखले. भगवंताने प्रसन्न होऊन त्याला ज्ञान आणि योग यांचा उपदेश केला अन् भक्तीचा आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला. भगवंताच्या उपदेशामुळे तो बालक पुढे महाज्ञानी महर्षि झाला.
४. महर्षि पिप्पलाद यांनी स्वतःला होणार्या त्रासाचे कारण
विचारल्यावर देवर्षि नारद यांनी त्यांना शनि ग्रहामुळे त्रास असल्याचे सांगणे
एके दिवशी महर्षि पिप्पलाद यांनी नारदांना विचारले, ‘‘महाराज, कोणत्या कर्मामुळे मला एवढे कष्ट सोसावे लागले ? एवढ्या लहान वयातही ग्रहांमुळे मला एवढा का त्रास होत आहे ? माझे आई-वडीलही कुठे नाहीत. ते कुठे आहेत ?’’
नारद त्याला म्हणाले, ‘‘हे पिप्पलाद, शनैश्वर (शनी) ग्रहाने तुला फार त्रास दिला आहे. आज संपूर्ण देश त्याच्या मंद गतीच्या चालण्यामुळे त्रस्त आहे. शनीच्या क्रूर दृष्टीमुळेच तुझा तुझ्या आई-वडिलांशी वियोग झाला. तो पहा, तो अभिमानी शनैश्वर ग्रह आकाशात प्रज्वलित झालेला दिसत आहे.’’
५. महर्षि पिप्पलादांनी रागाने शनि ग्रहाला
खाली पाडणे आणि ‘शनिवारी महर्षि पिप्पलादांचे पूजन करणार्यास
शनीची पीडा सहन करावी लागणार नाही’, असे वरदान ब्रह्मदेवाने महर्षि पिप्पलादांना देणे
हे ऐकून महर्षि पिप्पलादांना अतिशय राग आला. त्यांनी शनि ग्रहाला ग्रहमंडळातून खाली पाडले. हे अद्भुत दृश्य पाहून तेथे देव उपस्थित झाले. त्यांनी महर्षींचा राग शांत केला. भगवान ब्रह्मदेवाने महर्षि पिप्पलाद यांना वरदान देतांना म्हटले, ‘‘जो कुणी शनिवारी तुझे भक्तीभावाने पूजन करील, त्याला ७ जन्मांपर्यंत शनीची पीडा सहन करावी लागणार नाही आणि तो पुत्र-पौत्रांनी युक्त असा होईल.’’
६. शनीला ग्रहाच्या रूपात पुनर्प्रतिष्ठित करणे
तेव्हा पिप्पलादांनी शनीला ग्रहाच्या रूपात पुनर्प्रतिष्ठित केले आणि त्याला ही सीमा घालून दिली की, १६ वर्षांपर्यंतच्या वयाच्या बालकांना तो त्रास देणार नाही.’