तणाव निर्मूलनासाठी मनाचा अभ्यास करून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने गोव्यातील पत्रकारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन

पणजी – बाह्य परिस्थिती कशीही असली, तरी आपल्याला आनंदी रहाता आले पाहिजे. स्वतःला आलेल्या तणावाला बाह्य परिस्थिती नाही, तर मनाची स्थिती, दोष कारणीभूत असतात. तणावातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा मनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हटले जात असले, तरी आपल्या मनाचा अभ्यास करून स्वभावावर उपाय योजून त्यामध्ये पालट करता येतो. प्रत्येक व्यक्तीत गुण आणि दोष असतात. दोष शोधून ते दूर करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया कठोरपणे राबवल्यास दोषांवर मात करता येते. दोषच तणाव निर्माण होण्यासाठी कारणीभूत असतात. मनाचा अभ्यास करता आला, तर आपण बाह्य परिस्थिती कशीही असली, तरी तणावरहित जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका सौ. शुभा सावंत यांनी पत्रकारांना उद्देशून केले. गोव्यातील काही पत्रकारांसाठी ‘तणाव निर्मूलन कसे करावे ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या घरातूनच या कार्यक्रमात सहभागी होता आले. या कार्यक्रमाचा लाभ वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या यांच्याशी संबंधित पत्रकारांनी घेतला.

सौ. शुभा सावंत

आपत्काळात घ्यावयाच्या काळजीच्या संदर्भात मार्गदर्शन करतांना सौ. शुभा सावंत म्हणाल्या, ‘‘कोरोना महामारीच्या काळात आपण आपत्काळाची चुणूक पाहिली. संत-महंत, द्रष्टे यांनी सांगितल्यानुसार आणि विविध देशांमधील महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा पहाता केव्हाही तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडू शकते. त्या वेळी कदाचित् भीषण स्थिती असू शकते. त्याला तोंड देण्यासाठी समाजाने मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्ध राहिले पाहिजे. मनाने कणखर बनल्यास कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. या वेळी सौ. सावंत यांनी साधनेचे महत्त्व सांगून कलियुगात कुलदेवतेचे नामस्मरण का करावे ? हे विशद् केले. या व्याख्यानानंतर पत्रकारांनी विषयाशी संबंधित शंकांचे निरसन करून घेत आपत्काळात पत्रकारांनी बजावायचे कर्तव्य याविषयीही चर्चा झाली.

 

पत्रकारांनी मानले सनातन संस्थेचे आभार !

समाजातील विविध घटकांच्या समस्यांना पत्रकार वाचा फोडतात; मात्र पत्रकारांच्या समस्यांची कुणीच नोंद घेत नाही. दळणवळण बंदीमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली, तर अनेकांचे वेतन अल्प झाले. सतत तणावाखाली वावरणार्‍या पत्रकारांना तणाव निर्मूलनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केल्याविषयी पत्रकारांच्या वतीने सनातन संस्थेचे आभार मानण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment