सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ ! (भाग १)

अनुक्रमणिका

१. प.पू. डॉक्टरांनी विविध सेवा शिकवणे

२. ईश्वराने सुचवल्याप्रमाणे कृती करता येण्यामध्ये लक्षात आलेले टप्पे

३. प.पू. डॉक्टरांनी शिकवलेले दृष्टीकोन

४. साठ टक्के आध्यात्मिक पातळीवरून संतपदापर्यंतच्या प्रवासाविषयी पू. मुकुल गाडगीळ यांच्याशी झालेल्या वार्तालापात त्यांनी सांगितलेली सूत्रे

५. संत झाल्यावरचे मनोगत


पू. डॉ. मुकुल गाडगीळ
पू. डॉ. मुकुल गाडगीळ

 

साधनेतील प्रवास

१. प.पू. डॉक्टरांनी विविध सेवा शिकवणे

१ अ. दृष्टीकोनात्मक चौकटी तयार करायला दिल्यावर ‘ईश्वराचे विचार कसे ग्रहण करायचे’, हे शिकवणे

जून २००० मध्ये सेवा आरंभ केल्यावर सुरुवातीला प.पू. डॉक्टर एखादा दृष्टीकोन सांगायचे आणि त्यावरून साधकांसाठी किंवा समाजासाठी चौकटी करायला सांगायचे. तेव्हा त्या सूत्राच्या अनुषंगाने काय लिहायचे, प.पू. डॉक्टरांच्या कृपेने हे आपोआपच सुचायचे आणि मला चौकट बनवल्याचे समाधान मिळायचे. काही वेळा तसे समाधान मिळायचे नाही. तेव्हा त्या चौकटीमध्ये प.पू. डॉक्टरांनी केलेल्या सुधारणा वाचल्यावर लक्षात यायचे की, त्यातील दृष्टीकोनाचा विचाररूपी धागा माझ्या मनात अस्पष्टसा आला होता; पण मी तो ग्रहण करायला कमी पडलो. त्या वेळी आणखी एक गोष्ट लक्षात आली की, अशा वेळी तो पूर्ण विचार ग्रहण करता न आल्याने त्यातील केवळ एखाद-दुसरा शब्दच मनात येतो. तेव्हा तो तसाच जाऊ न देता लिहून ठेवायचा. तसे केले, तर ईश्वर पुढील आपोआप सुचवतो. पुढे तसे प्रयत्न करू लागलो.

१ आ. पत्रलेखन शिकवणे आणि तेव्हा ‘ईश्वराने सुचवलेले लगेच कृतीत आणायचे’, हे लक्षात आणून देणे

प.पू. डॉक्टर त्यांना साधक, हितचिंतक, मान्यवर, साधू-संत इत्यादींकडून येणार्‍या पत्रांना उत्तरे पाठवायला मला सांगू लागले. खरेतर मी पूर्वी कधी पत्रलेखन केलेले नव्हते. प्रथम काही पत्रे लिहिल्यावर प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक वेळी ‘चांगले लिहिले’, असे म्हणून मला प्रोत्साहन दिले. ते त्या पत्रात सुधारणाही करून द्यायचे. अशा रितीने कोणाला काय लिहायचे, हे लक्षात येऊ लागले. वर्षभरात साधारण १०० पत्रे लिहून होतात. पत्रलेखनाच्या वेळीही एक गोष्ट लक्षात आली की, पत्रातील एखादे वाक्य लिहितांना ‘हे लिहू नये’, असे वाटत असते. तरीही आपण ते लिहितो आणि बरोबर तेच वाक्य प.पू. डॉक्टर गाळतात. तेव्हा ‘ईश्वराने सुचवलेले लगेच अमलात आणायचे’, हे समजले.

१ इ. शिरोभाग लिहायला शिकवणे आणि तेव्हा ‘काय लिहायचे’,
हे लक्षात येत नसले, तरी लगेच सुरुवात करणे मात्र आवश्यक असल्याचे कळणे

काही लेखांना शिरोभाग देणे आवश्यक असते. ते प.पू. डॉक्टर लिहायला सांगतात. मला लेखन करायची सवय नाही. तसेच भाषाप्रभुत्वही नसल्याने ‘नेमके लिहायचे काय’, हा प्रश्न पडतो. त्यामुळे ‘लिहून लिहून मी किती ओळी लिहिणार’, असे वाटते; पण शिरोभाग लिहायला सुरुवात केल्यावर काही क्षणांपूर्वी मनात नसलेले विचार आपोआपच सुचू लागतात आणि चांगलासा शिरोभाग तयार होतो. तेव्हा समजले की, प.पू. डॉक्टरांनी लिहायला सांगितल्यावर त्यासाठी शक्ती दिलेलीच असते. आपण ‘आधी केलेच पाहिजे’, या उक्तीनुसार लगेच सुरुवात मात्र केली पाहिजे.

१ ई. फेब्रुवारी २००८ पासून प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले सहज लिहून होणे

फेब्रुवारी २००८ पासून माझ्या लक्षात आले की, प.पू. डॉक्टरांनी शिरोभाग किंवा काही लिहायला सांगितल्यास प्रार्थना केल्यावर बुद्धीने फार विचार न करता आपोआप ते लिहिता येते आणि ते लिहिण्यासाठी फार वेळही लागत नाही. त्यापूर्वी असे काही लिहिण्यासाठी मला खूप विचार करावा लागायचा आणि त्यामध्ये माझा पुष्कळ वेळही जायचा.

१ उ. २४.२.२००८ दिवशी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आता तुम्ही माझ्यापेक्षाही छान लिहिता !’’

२. ईश्वराने सुचवल्याप्रमाणे कृती करता येण्यामध्ये लक्षात आलेले टप्पे

अ. ख्रिस्ताब्द २००४ पासून सेवा करतांना ईश्वर मला लिहिण्यामध्ये सूत्रे सुचवायचा; पण त्या वेळी मला माझे विचार कोणते आणि ईश्वराचे कोणते, ते कळायचे नाही. त्याबद्दल विचारल्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले होते, ‘बुद्धीच्या अडथळ्यामुळे असे होते. पुढे तो अडथळा दूर होईल.’

आ. ख्रिस्ताब्द २००७ मध्ये मला माझ्या मनात येणारे ईश्वराचे विचार कळू लागले; पण त्याप्रमाणे कृती करता यायची नाही. नंतर तेच प.पू. डॉक्टरांनी सांगितल्यावर ‘माझ्या मनात ईश्वराने तो विचार सुचवला होता’, हे लक्षात यायचे.

इ. सप्टेंबर २००७ मध्ये ईश्वराने सुचवलेल्या विचारांप्रमाणे कृती करता येत नसल्याचे प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी त्यावर स्वयंसूचना देण्यास सांगितले. तशी देण्यास सुरुवात केल्यावर आपोआप मनातील विचारांप्रमाणे कृती होऊ लागल्या.

२ अ. एखादी चूक होण्यापूर्वी ती लक्षात आणून देऊन ईश्वराने चूक होऊ न देणे

फेब्रुवारी २००८ पासून ‘ईश्वर माझ्याकडून चुका होऊ देत नाही’, अशी अनुभूती येत आहे. माझ्याकडून एखादी चूक होण्यापूर्वीच मला स्वतःला त्याबाबत लक्षात येते किंवा माझ्याकडून आपोआप तशी कृती घडते किंवा एखादा साधक मला त्याबाबत सांगतो किंवा प.पू. डॉक्टर त्याबाबत सांगतात. त्यामुळे ती चूक माझ्याकडून आपोआपच होत नाही. याबद्दल मला कृतज्ञ वाटते.

३. प.पू. डॉक्टरांनी शिकवलेले दृष्टीकोन

३ अ. सेवा ठरलेल्या वेळेत करायचा दृष्टीकोन देणे

माझ्याकडून सेवा एकाग्रचित्ताने आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होत असे; पण माझी वृत्ती सर्व गोष्टी हळू हळू करण्याची असल्याने मला प्रत्येक सेवा करायला वेळ लागत असे. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी दृष्टीकोन दिला, ‘एखाद्याने अगदी मन लावून छान स्वयंपाक बनवला; पण तो जेवणाच्या वेळेत न बनवता पुढे दोन घंट्यांनी बनवला, तर त्या स्वयंपाकाचा काय उपयोग ?’ त्यामुळे सर्व चांगले करायचेच आहे; पण ते वेळेतही झाले पाहिजे, हे समजले.

३ आ. वेळेचा पूर्ण उपयोग करण्यास सांगणे

यासाठी प.पू. डॉक्टरांनी ‘दैनंदिनी लिहितांना प्रत्येक मिनिटा-मिनिटाचा वापर सेवेसाठी होतो ना’, हे बघण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘आताच पुरेपूर सेवा करून घेतली नाही, तर पुढे आपत्काळात सेवा करू न शकल्याने ईश्वराची कृपा रहाणार नाही. तेव्हा वाईट शक्तींच्या आक्रमणांतून कोण सोडवणार ?’’ तेव्हापासून मग एखाददिवस काही कारणाने सेवा अल्प प्रमाणात झाल्यास पुष्कळ अपराधी वाटायचे.

३ इ. चुकांविरहित सेवा केलेली ईश्वराला आवडतेच; पण
त्याबरोबर भावपूर्ण सेवा केलेली ईश्वराला आणखी जास्त आवडते, हे लक्षात येणे

साप्ताहिकाच्या सेवेत असलेल्या एका साधिकेच्या सेवा करतांना चुका व्हायच्या. तरीही इतर सेवांमध्ये
प.पू. डॉक्टरांनी तिचे कौतुक केलेले मी ऐकायचो. तेव्हा मला कळेना की, ईश्वराला तिची सेवा कशी काय आवडते ? त्याबद्दल पत्नी सौ. अंजलीला विचारल्यावर तिने सांगितले, ‘‘तिच्यात भाव आहे. चुकांविरहित सेवा केलेली ईश्वराला आवडतेच; पण भावपूर्ण सेवा केलेली ईश्वराला आणखी जास्त आवडते.’’ प.पू. डॉक्टरांकडून भावपूर्ण सेवा करण्याचा दृष्टीकोन अपरोक्षपणे मिळाल्याने मग तसे प्रयत्न माझ्याकडून होऊ लागले. मी श्री दुर्गादेवीला सांगायचो, ‘माते, माझ्यात भाव नाही गं. काय करू ते सांग.’ तिच्यासमोर मी अगदी डोळ्यांत अश्रू येऊन काकूळतीने प्रार्थना करायचो. त्यानंतर एकदा प.पू. डॉक्टरांनीच माझी आणि सौ. अंजलीची भाव असलेल्या साधक-जोडप्यांमधे गणना केल्याने कृतज्ञता वाटली.

३ ई. देवाला विचारून करण्याचा दृष्टीकोन मिळणे

एकदा पानांची संरचना नीट झाली नव्हती. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘देवाला विचारून संरचना तयार करा.’’ त्याप्रमाणे मी देवाने सुचवल्याप्रमाणे कोणत्या पानावर कोणता मजकूर घ्यायचा, हे निश्चित केले. तेव्हा संरचना चांगल्या प्रकरे तयार झाली. तेव्हापासून तो दृष्टीकोन मिळाला. पुढे पुढे देवाला न विचारताही तो चुका आणि पुढचे पुढचे लक्षात आणून देऊ लागला.

३ उ. अल्पसंतुष्टता नको आणि पुढचे पुढचे प्रयत्न करणे थांबवू नयेत, हे लक्षात येणे

एकदा मी ‘दिवसभरात अमुक इतक्याच मजकुराचे संकलन करू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही’, असा ग्रह करून घेतला होता. हे प.पू. डॉक्टरांना कळल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘ही अल्पसंतुष्टता झाली. पुढचे पुढचे प्रयत्न करणे आणि शिकणे सोडले, तर आपली तळमळ कमी होते आणि आपली अध्यात्मात घसरगुंडी व्हायला सुरुवात होते. तसेच सेवेतील आनंद मिळणेही संपते.’’ त्यानंतर मी तो ग्रह मनातून काढून टाकला.

३ ऊ. खरा कृतज्ञताभाव कसा हवा, याची जाणीव होणे

एकदा एका साधकाच्या संदर्भातील लेख मी संकलित केला होता. दुसर्‍या दिवशी पुष्कळ जणांनी तो लेख चांगला संकलित केल्याचे सांगितले. तेव्हा कर्तेपण स्वतःकडे येऊ नये म्हणून मी ती सेवा गुरुचरणी अर्पण करून परत परत त्यांना प्रार्थना करू लागलो. तेव्हा जवळ जवळ अर्धा तास माझा कृतज्ञताभाव टिकून राहिला. त्या वेळी ‘खरोखरीच कर्तेपण ईश्वराला अर्पण करणे म्हणजे काय’, याची मला गुरुकृपेने जाणीव झाली.

वरील सर्व भाग वाचून लक्षात येते की, सर्व प.पू. डॉक्टरांनीच शिकवले आणि दृष्टीकोन दिले. त्यामध्ये माझे स्वतःचे असे प्रयत्न काहीच नाहीत आणि ठरवून असे काही प्रयत्नही झाले नाहीत. प.पू. डॉक्टरांनीच मुक्त हस्ते सर्वकाही दिले. साधना करतांना काही कष्ट पडले नाहीत, साधनेत कुणाचा विरोध नाही. आतापर्यंतची सर्व साधना सहज घडली. ही सर्व प.पू. डॉक्टरांची कृपाच आहे. यापुढेही माझ्याकडून सर्व साधना परिपूर्णपणे घडो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना.

– डॉ. मुकुल गाडगीळ ( आताचे सनातनचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ )

४. साठ टक्के आध्यात्मिक पातळीवरून संतपदापर्यंतच्या प्रवासाविषयी
पू. मुकुल गाडगीळ यांच्याशी झालेल्या वार्तालापात त्यांनी सांगितलेली सूत्रे

४ अ. नामजपाविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्ये

४ अ १. नामजप आपोआप होत असणे

‘गेल्या ४ महिन्यांपासून नामजप आपोआप चालू असल्याचे जाणवत आहे. पूर्वी तो प्रयत्नपूर्वक करावा लागायचा.’

४ अ २. नामजप एकाग्रतेने होत असल्याचा आनंद तोंडवळ्यावर उमटणे

माझा नामजप एकाग्रतेने होतो. नामजपात मन गुंगून गेल्याचा आनंद तोंडवळ्यावर उमटतो. मनात इतर विचार नसतात. ‘रात्रभर नामजप चालू राहू दे’, अशी प्रार्थना करतो.

४ अ ३. नामजपातील शब्द डोळ्यांसमोर दिसणे

नामजप करतांना त्यातील शब्दांचे कधी कधी दर्शन होते, त्यामुळे तो भावपूर्ण होतो.

४ अ ४. नामजपाचा सूक्ष्मनाद देहात चालू असणे

सेवा करतांना नामजप होत नाही; परंतु सेवा नसेल, तेव्हा मात्र आतून तो चालू असतो.

४ अ ५. काही वेळा नाभीतून चालू असणारा जप ऐकू येणे

नाभीतून नामजप चालू आहे, असे वाटते. तो नामजप कधी कधी ऐकू येतो.

४ आ. प्रार्थना करतांना डोळ्यासमोर आपोआपच श्रीकृष्ण आणि अर्जुन दिसणे

पूर्वी श्रीकृष्णाला प्रार्थना करतांना त्याचे चरण दिसायचे. आता गेल्या आठवडाभरापासून त्याला प्रार्थना करतांना आपोआपच श्रीकृष्ण आणि त्याला कृतज्ञतेने नमस्कार करतांना रणांगणावरील अर्जुन दिसतो. नंतर मला समजले की, सध्या मला प्रत्येक कृती करतांना त्यात कृतज्ञताभाव यावा, असे वाटते. त्यामुळे प्रार्थना करतांना डोळ्यासमोर आपोआपच श्रीकृष्ण आणि अर्जुन दिसतो.

४ इ. सेवेतील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

४ इ १. परिपूर्ण सेवा करण्यास ईश्वरी साहाय्य मिळणे

पहिल्यांदा व्यष्टी साधनेतच मी व्यस्त असायचो. समष्टी सेवेने लवकर प्रगती होते; म्हणून आता समष्टीच्या संपर्कात राहून सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सेवेत अपूर्णता असेल, तर ईश्वर ती सेवा परिपूर्ण करण्यास सुचवतो.

४ इ २. सेवेच्या विषयानुसार प्रार्थना होणे

मी ठरवून प्रार्थना न करता सेवेच्या विषयानुसार करतो. ‘सेवा चांगली, तसेच परिपूर्ण होऊ दे आणि सेवा करतांना नामजप चांगला होऊ दे’, अशा प्रार्थना आपोआप अन् आतून होत रहातात.

४ इ ३. ईश्वरेच्छेने कृती होणे

पूर्वी ईश्वरेच्छेने कृती व्हायच्या नाहीत; परंतु आता होतात. प्रत्येक सेवेत ईश्वरच आतून मार्गदर्शन करतो. त्यामुळे सेवा करतांना आनंद मिळतो.

४ ई. मायेपासून अलिप्त झाल्याची उदाहरणे दर्शवणारे विचार !

४ ई १. ‘व्यावहारिक जगतापेक्षा साधना करण्यास अधिक महत्त्व द्यावे’, असे वाटणे

पूर्वी ‘कधीतरी बाहेर जाऊन कुणाला तरी भेटून यावे, बाहेर फिरून यावे’, असे वाटायचे. आता तसे वाटत नाही. आता ‘अधिक वेळ साधनाच करावी’, असे वाटते.

४ ई २. मायेतून अलिप्त होणे

मनातील भावनांचे प्रमाण पुष्कळच उणावले असून मायेतून अलिप्त झाल्यासारखे वाटते.

४ उ. स्वभावात झालेले पालट

४ उ १. अंतर्मुखता वाढणे
४ उ २. अपेक्षा नसणे

साधकांविषयी प्रतिक्रिया येत नाही. कुणाविषयी काहीच अपेक्षा नसतात.

४ उ ३. व्यापकत्व येणे

‘केवळ कुटुंबियांच्या प्रगतीचे विचार मनात येत नाहीत, तर सर्वांचीच प्रगती व्हावी’, असे वाटते.

४ ऊ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

४ ऊ १. तळपायांतून स्पंदने जाणवणे

कुठेही गेले, तरी तळपायांतून चांगली किंवा वाईट स्पंदने वर येतांना जाणवतात. स्पंदनांच्या जाणिवेनुसार एखाद्या ठिकाणी त्रास आहे का नाही, ते लक्षात येते.

४ ऊ २. त्रास असणारा साधक जवळून गेला, तर छातीवर दाब जाणवणे

एखादा त्रास असणारा साधक जवळून गेला, तर छातीवर दाब जाणवतो किंवा दुर्गंध येतो.

४ ऊ ३. पवित्र ठिकाणी गेल्यास छातीत अथवा पायाला थंडावा जाणवतो.
४ ऊ ४. समष्टीच्या कल्याणासाठी पायांतून चांगली स्पंदने बाहेर पडतांना जाणवणे

कधी कधी पायांतून चांगली स्पंदने बाहेर पडतांना जाणवतात. ‘ही स्पंदने वातावरणात पसरत आहेत आणि ही स्पंदने समष्टीच्या रक्षणासाठी आहेत’, असे जाणवते.

४ ए. साधकांना व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करता येणे

‘माझा पिंड कोणाला मार्गदर्शन करण्याचा नाही. मी कधी बैठकही घेतलेली नाही. त्यामुळे मला कोणाला मार्गदर्शन करता येत नाही; पण गेल्या महिनाभरात असे अनुभवले की, कोणी साधनेविषयी काही विचारायला आल्यास मला त्याविषयी व्यवस्थित सांगता येते आणि त्या साधकाचेही समाधान होते अन् त्याला आनंद होतो. तसेच कोणी उपायांविषयी विचारायला आले की, त्या वेळीही योग्य ते सांगता येते आणि गुरुकृपेने ते त्याला लागू होते.

४ ऐ. साधकांच्या आध्यात्मिक त्रासावर उपाय शोधून काढण्याची पद्धत

एखादा त्रास असणारा साधक उपाय विचारण्यासाठी आला, तर ‘त्या साधकाचा देह माझा आहे, असा भाव ठेवून माझ्याच देहावर न्यास, मुद्रा करून उपाय सांगतो’, याचा साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभही होतो.

४ ओ. अनुभूतींचे स्वरूप

४ ओ १. देहात देव दिसणे

‘मी माझ्यातच देवाला पहातो आहे’, असे वाटते.

४ ओ २. स्थिरता येणे

आता स्थिरता आणि थोडा आनंद आतून जाणवतो.

४ ओ ३. क्षात्रभाव जागृत होणे

राष्ट्र आणि धर्म यांविषयी कुणी वाईट वागले, तर माझा क्षात्रभाव जागृत होऊन विचारांच्या रूपात तसे लेखन केले जाते.

प्रार्थना !

‘पू. मुकुल गाडगीळ यांनी दैवी गुणांच्या जोरावर जशी लवकर संतपदाकडे वाटचाल केली, तशीच आम्हा साधकांना करता येऊ दे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (कार्तिक शु. १२, कलियुग वर्ष ५११३ (७.११.२०११))

५. संत झाल्यावरचे मनोगत

प.पू. डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने हे भाग्य मला लाभले. प.पू. डॉक्टर साधकांना करत असलेले मार्गदर्शन हे स्थळ आणि काळ यांना अनुसरून असते. ते मार्गदर्शन केवळ तात्त्विक नाही, तर त्यात ‘प्रत्येक प्रसंगानुसार कसा विचार करायचा, कसे वागायचे’, हेही ते शिकवतात. असे ते प्रायोगिकही आहे. त्यामुळे ते नेहमी यथायोग्यच असते. सनातन संस्थेच्या ‘सनातन’ या नावाप्रमाणेच प.पू. डॉक्टर करत असलेले मार्गदर्शन नित्यनूतन असते. त्यामुळे साधकांनाही नेहमी त्यातून आनंद मिळतो. तसे मार्गदर्शन जगात कुठेच मिळत नसेल. तसेच योग्य मार्गदर्शनामुळे साधकांची वेगाने आध्यात्मिक उन्नतीही होत आहे. तशी उन्नती इतर कोठेही बघायला मिळत नाही. त्यामुळे तीही अद्वितीयच आहे; म्हणूनच प.पू. डॉक्टरांनी लिहून ठेवले आहे, ‘‘सनातन संस्थेमध्ये राहून कोणा साधकाची उन्नती होणार नाही, असे होणारच नाही आणि तसे होत नसेल, तर तो साधकच नाही.’’ या तत्त्वाप्रमाणेच माझीही आध्यात्मिक उन्नती
प.पू. डॉक्टरांनी करवून घेतली. त्यामुळे त्यात माझे कर्तुत्व शून्य आहे.

आता संत झाल्यावर स्वतःवरील दायित्व आणखी वाढले आहे, असे लक्षात आले. प.पू. डॉक्टरांनी मार्गदर्शनात सांगितल्याप्रमाणे त्यांना अपेक्षित असे दायित्व म्हणजे ‘कलियुगातील कलीचा प्रभाव न्यून करण्यासाठी पृथ्वीवरील मानवांचे परिवर्तन करून त्यांच्यात सात्त्विकता आणणे आणि त्यांना धर्माचरणी बनवणे’, हे आहे. हे समष्टी कार्य माझ्याकडून आणि सर्व साधकांकडून अविरत होण्यासाठी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.

– डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (कार्तिक शु. २, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११))

लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment