जर्मनीतील एका विचारवंत लेखिकेला आणि पाश्चात्त्य विद्वानांना भारतातील योग, प्राचीन शास्त्र, अध्यात्म, ऋषिमुनी यांचे महत्त्व कळते, ते भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी, बुद्धीजीवी यांना कधी कळणार ? यातून हेच दिसून येते की, भारताची संस्कृती ही प्राचीनतम आणि विश्ववंद्य आहे !
सलील गेवाली लिखित ‘ग्रेट माइंड्स ऑन इंडिया’ शीर्षकावरील भारतावरील एका अविश्वसनीय पुस्तकाशी माझी पहिली ओळख अनुमाने २ वर्षांपूर्वी जेव्हा मी जर्मनीतील कोलोनमधील एका योग केंद्राच्या साधकांच्या खोलीत गेले होते, तेव्हा झाली. मी त्याच्या मुखपृष्ठावर आर्थर शोपेनहॉयर आणि अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्या चित्रांमुळे खूप आकर्षित झाले; म्हणून मी तातडीने ते पुस्तक टेबलवरून उचलले. माझ्या योग-साथीदारानेही मला ते पुस्तक वाचण्याची शिफारस केली. हे आश्चर्यकारक आहे की, मी यापूर्वी खोलवर कधीही विचार केला नाही की, भारत ज्ञानाने श्रीमंत आहे. मी योगाच्या सखोल तत्त्वज्ञानाने (अध्यात्माने) आकर्षित झाल्यापासून काही वर्षांपूर्वी मी भारतात गेले होते. आता मला असे वाटते की, या देशाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा वरील पुस्तकाद्वारे पुन्हा जागृत झाली. मला हे कधीच ठाऊक नव्हते की, योगा व्यतिरिक्त प्राचीन भारतीय ऋषि विचार आणि ज्ञानात अपरिमित प्रगत होते अन् शतकानुशतके युरोपमधील प्रगत संस्कृती, तसेच साहित्य यांच्यावर भारतीय विज्ञान आणि अध्यात्म (तत्त्वज्ञान) प्रभाव पाडत होते.
जर्मन विचारवंतांसाठी भारत हा एक प्रेरणास्थान !
महान जर्मन विचारवंतांसाठी विशेषत: १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या काळात भारत हा एक प्रेरणास्थान होता. अल्बर्ट आईनस्टाईन, आर्थर शोपेनहॉयर, हर्मन हेसे, जोहान गोएथी किंवा फ्रेडरिक हेगल अशा बहुतेक अशा जर्मन विचारवंतांनी कधीही भारत पाहिला नव्हता. तरीही ते या देशाविषयी बरेच काही शिकले. अल्बर्ट आईन्स्टाईन हे म्हणत की, भारतीय ज्ञान स्तुतीस पात्र आहे. त्यांना खात्री होती की, भारतीय मोजमापशास्त्र (गणित) आणि शून्य ही भारतीय प्रणाली उपलब्ध नसती, तर आधुनिक विज्ञानाने इतकी प्रगती केली नसती. बर्याच शतकानुशतके भारतीय अंक प्रणालीवर संशय घेतला गेला आणि युरोपियन लोकांनी त्याचा स्वीकार केला नव्हता. मला आता कळले आहे की, भारतीय ज्ञानी ऋषींनी अनेक जटील समीकरणे, उणे संख्या आणि पायचे मूल्य शोधले, जे नंतरच्या काळात गॉटफ्राइड लिबनिझ आणि इतरांनी मांडले.
भाषाशास्त्र, गणित यांसारख्या सिद्धांतांचा शोध युरोपियनांपूर्वी २ सहस्र
वर्षे आधीच भारतियांनी लावल्याचे जर्मन विचारवंत आर्थर शोपेनहॉयर यांनी सांगणे
या अद्वितीय भारतीय ज्ञानाने विशेषत: भाषिक, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांनी वर उल्लेखलेले विचारवंत अत्यंत भारावून गेले होते. या विषयांचे गूढ आणि सखोल तत्त्वज्ञान अन् योग अजूनही भारताकडे जीवनाचा सखोल अर्थ शोधणार्या लोकांना आकर्षित करतो. भारतीय उपनिषदांच्या अभ्यासामध्ये तो अर्थ आर्थर शोपेनहॉयरने अनुभवला होता. त्यामुळेच शोपेनहॉयरने त्यांच्या ‘द वर्ल्ड ऍज विल अॅण्ड रिप्रेझेन्टेशन’ या ग्रंथात लिहिले आहे की, संपूर्ण जगात उपनिषदांइतके लाभदायक आणि प्रगती करवून देणारे कोणतेही ज्ञान नाही. हे माझ्या आयुष्यात आनंद देणारे आहे आणि ते माझ्या मृत्यूच्या वेळीही आनंद देईल. भारतीय उपखंडातील सर्वांचे स्वागत करणार्या संस्कृतीचे कौतुकच नाही, तर ज्यांना जागतिक दृष्टीकोन आणि वैश्विक अस्तित्वाचे शुद्ध ज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे, अशा सर्वांसाठीच उपनिषदांचे ज्ञान अनमोल रत्न आहे. आता हे मान्य केले गेले आहे की, भाषाशास्त्र, सामाजिक विज्ञान, गणित, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या सिद्धांतांचा शोध युरोपियन शास्त्रज्ञ अन् विचारवंत यांनी प्रारंभ करण्यापूर्वी भारत बौद्धिकरित्या अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वीच विकसित झाला होता.
पाणिनीच्या भाषाविषयीच्या भव्य कल्पनांमुळे आधुनिक भाषाशास्त्र अधिक प्रगत होणे
आधुनिक भाषाशास्त्र जे स्विस भाषाशास्त्रज्ञ फर्डिनांड डी सॉसूर, लिओनार्ड ब्लूम फिल्ड आणि नोम चॉम्स्की या अमेरिकन भाषेच्या अभ्यासकांनी अधिक प्रगत केले, त्यांनी जर पाणिनीच्या कार्यापासून भाषेच्या भव्य कल्पना घेतल्या नसत्या, तर ते शक्य झाले नसते. त्याचप्रमाणे जोहान गोएठे यांनी त्यांच्या बर्याच लिखाणामध्ये भारतीय साहित्याच्या उत्कृष्टतेची संमती दिली आहे. कालिदासाच्या ‘शकुंतला’ या संस्कृत नाटकाचा अभ्यासामुळे जर्मन रंगमंचावर एक क्रांती घडवून आणली. १९ व्या शतकात ‘शकुंतला’ नाटकाचे जर्मनसह अनेक भाषांतरे झाली.
मानवाला शहाणपणा आणि गुणांचा साक्षात्कार भारतात
होत असल्याचे जर्मन तत्त्वज्ञ गोटफ्रिड फॉन हर्डर यांनी सांगणे
जर्मन तत्त्वज्ञ गोटफ्रिड फॉन हर्डर एकदा म्हणाले होते की, मानवजातीचा उगम भारतात सापडतो, जिथे मानवी मनाला शहाणपणा आणि गुणांचा पहिला साक्षात्कार झाला. यातून हे सत्य समोर आहे की, भारताचे वर्णन युरोपियन संस्कृतीचा पाळणा म्हणून केले जाऊ शकते. त्यामुळे युरोपियन साहित्य प्रगत होत आहे. जर्मनीच्या जोहान हर्डर, विल्हेल्म फॉन हम्बोल्ट, हेनरिक हाईन आणि व्हेर्झबर्ग येथील आधुनिक भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हेसनबर्ग आणि इतर जर्मन अभ्यासक यांनीही भारताच्या तत्त्वज्ञानाच्या (अध्यात्माच्या) ज्ञानाची प्रशंसा केली.
भारताच्या अद्भुत भूमीविषयी अभिमान वाटणे
मला या अद्भुत भूमीविषयी अभिमान वाटण्याचे फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे मी येथून (भारतातून) योगाचे अफाट तत्त्वज्ञान शिकू लागली आहे. मी स्वत: ला खूप भाग्यवान समजते की, या ‘ग्रेट माइंड्स ऑन इंडिया’ या पुस्तकाचा जर्मन भाषेत मला अनुवादित करता आला. दोन मासांपेक्षा अल्प कालावधीत मी हा अनुवाद पूर्ण केला. माझ्या या प्रयत्नास मी प्राचीन ऋषीमुनींना नम्र वंदन करते. मला खात्री आहे की, पश्चिमेस पूर्वेच्या ज्ञानाचा खरा प्रकाश पसरवण्यासाठी हे पुस्तक एक ज्योत म्हणून काम करील.